विरह

“तुझ्याशिवाय तुला सोडून जगलो. खूप भोगलं. तू पण जगलीस. पण माझ्याशिवाय. मला सोडून नव्हती गेलीस. मी गेलो तुला सोडून. निरंतर यातनांचा एक स्त्राव झिरपत होता माझ्यात. 

  मी होतो सतत तुझ्या सोबत. पण माझ्या एकाकी प्रवासात तू सोबतीला जाणवली नाहीस मला. आणि ते खूप साहजीक आहे ग. कोणासाठी किती काळ थिजलेलं रहायचं? देहानं तिथेच होतीस पण मनाने भरकटलीस. मी देह पुढे ढकलला प्रवाहात. खूप गुदमरलो. खूपदा नाकातोंडात पाणी गेलं. जीव घाबरला खूपदा. खूप कासावीस व्हायचो. अस वाटायचं प्रवाहाच्या विरोधात निघावं. कितीही घुसमट होवो परत यावं. 

यातना दाटलेल्या असायच्या मनात. मी तुला सोडून आलोय. अनिश्चींत काळासाठी. माझ्या पावलात केंव्हा बळ येणार आहे परतीच्या प्रवासाचं हे मला माहीती नव्हतं. आणि प्रवाहात झोकून देणंही मला जमत नव्हतं.

खूप रणरण, चटचट तापलेल्या उन्हाळ्याच्या दुपारी हमखास तुझी आठवण माझा जीव कुरतडत रहायची. खूप कष्टाने थकल्यावर कपाळावरचा घामाचा थेंब टपकायचा तेंव्हा तू आठवायचीस. का माहीत आहे? होरपळीशी आपल्या नात्याचे घट्ट फेरे बांधले होते नियतीने. फक्त कष्ट आणि थकवा जोपर्यंत माझ्यात जिवंतपणा ठेवतील तोपर्यंत माझ्यात तुझी वेदना टवटवीत रहाणार होती.

मग जाणवायची प्रचंड पोकळी. ते घामाचे थेंब हाताच्या ओंजळीत घेऊन मी त्यांचा हिशोब लावायचो. ओंजळ भरायला किती काळ जायला हवा होता ग अजून? ओंजळभरली की मी तुझ्याकडे परत येणार आहे.

तिन्हीसांजेला तुझ्या निरांजनीतल्या वातीची अस्पष्ट थरथर मला इथे जाणवायची. तुझ्या डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कडांचा पाऊस मला झेपणार नव्हता. मग मी अजून धावत सुटायचो. अजून . अजून … अजून ….

खूप दमलो. पायाच्या भेगा मला माझा पत्ता विचारायला लागल्या. भर दुपारी डोक्यावर सूर्य घेऊन चालताना पाय पोळणारच न फक्त? 

“काळजी घेशील न स्वत:ची?” 

टचकन भरून येवून दुथडी भरून वाहीलेली ती तुझ्या डोळ्यातली काजळओल .

पालापाचोळा करकरतच राहीला पायाखाली. पुढे हिरवळीचा भास दिसायला लागला. मला रस्त्याशी नातं होतं. तुझ्यापासून दूर करणारा रस्ताच तुझ्यापर्यंत पोचवणारा होता. म्हणूनच हिरवळ खुणावत असताना मागे पलटलो. झपझप त्याच रस्त्याने. तेच उन, तिच होरपळ.

“तुझ्याशिवाय तुला सोडून जगलो. खूप भोगले ग “

मी परत आल्यावर तू तशीच असायला हवी होतीस मला जसं मी सोडून गेलो होतो. तिथेच होतीस. पण तरी नव्हतीस. का नव्हतीस? 

मग मला उगाचच काही बाही आठवत गेले

“चलते चलते हमसे पुंछा पाव के छालोने 

बस्ती कितनी दूर बना ली दिल मे बसने वालो ने 

अब कौन पुछेगा हमारा पता इन दिवारोंसे 

अपना अपना नाम लिख्खा है सब आने वालो ने “

“काळजी घेणार होतास न स्वत:ची? मग पाय इतके कसे फुटले रे ?”

“रस्ता तोच होता न ग . तुझ्यापासून निघून तुझ्याचपर्यंत पोचणारा. तुझ्याकडे येणारी वाटही खाचखळग्यांची आणि दूर जाणारीसुद्धा.”

परत एकदा काजळ ओल झिरपायला लागली. 

थंड शिडकाव्या सकट होरपळीला शमवत गेली 

 

गायत्री मुळे मराठी साहित्यातील लेखिका.

– गायत्री मुळे 

नागपूर 

भ्रमणध्वनी: +97670 08977

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top