आजच्या आधुनिक युगात आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या, त्यातही ‘कॉन्व्हेट’ शाळेत शिकविणे ही पालकांसाठी प्रतिष्ठेची गोष्ट बनली आहे. उत्तम इंग्रजी बोलणे, टापटीप युनिफॉर्म आणि पाश्च्यात्य शिस्तीचा आव यांमुळे कॉन्व्हेट शाळांनी पालकांना आकर्षित केले आहे. मात्र,या झगमगाटाच्या मागे आजच्या लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये एक सुप्त अराजकता निर्माण होते, की काय? ही एक भीती निर्माण झाली आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
कॉन्व्हेट’ शाळेमध्ये मिळणारे शिक्षण हे बऱ्याचदा भारतीय संस्कृती आणि भारतीय कौटुंबिक मूल्यांपासून थोडे दूर जाणारे असलेले आपणास दिसून येते. पाशिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे इंग्रजी शाळेत नैतिक शिक्षण शिकविले जात असेलच, याची खात्री दिली जाऊ शकत नाही. प्रत्यक्षात आपले भारतीय संस्कार, नीती, मूल्य, रूढी, परंपरा ह्या जगासाठी एक आदर्श आहेत. आपण पाशिमात्य अनुकरणात यापासून दूर तर जात नाही आहोत ना, हा प्रश्न पडतो आहे? घरात असणारे सण-उत्सव, आजी आजोबाचे संस्कार , संयुक्त कुटुंबातून मिळणारे संस्कार हे बदलत्या कुटुंब व्यवस्थेमुळे कालबाह्य होत असताना दिसत आहेत. शाळेत शिकविली जाणारी पाच्यात्य जीवनशैली आणि आपली संस्कृती या दोन वेगवेगळ्या प्रवाहामुळे लहान मुले गोंधळून जातात. कोणती संस्कृती योग्य, कोणती अयोग्य हे समजून घेताना मुलांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. त्याच्या मनामध्ये एक प्रकारचे वैचारिक युद्ध निर्माण होते आणि यामुळे मुले चिडचिड करायला लागतात.
पाशिमात्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या कॉन्व्हेट शाळा आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखल्या जातात. केस कसे असावेत, कपडे कसे असावेत इथपासून ते बोलण्याच्या भाषेवर कडक निर्बंध ते घालतात. शाळेच्या आवारात मुलांनी फक्त इंग्रजी भाषेतच बोलले पाहिजे, अशी शाळेत सक्ती असते. स्थानिक भाषेत बोलल्यास मुलांना कडक शिस्त दिल्या जाते किवा दंड आकारल्या जातो. शाळेत मुलांना मातृभाषेतून बोलू दिले जात नाही. त्यामुळे मुले मनमोकळेपणे इतरांशी संवाद. साधू शकत नाहीत. हळूहळू ते इंग्रजी भाषा आत्मसात करतातही. घरी जर पालकांना इंग्रजी भाषा येत नसेल तर त्यांचा आपल्या आई वडिलांशी संवाद तुटतो, परिणामी मुले आत्मकेंद्रित बनतात. संवाद सुटला की ही मुले इन्टरनेट, सोशल मिडियाच्या अती आहारी जातात. त्यांच्यामध्ये भावनिक व नैतिक अराजकता निर्माण होते. मानसोपचार तज्ञांच्या मते, जेव्हा मुलांवर प्राथमिक वयात अती अतिशय कृत्रिम आणि टोकाची शिस्त लादली जाते तेव्हा मुले आक्रमक होतात. शाळेतील अती दडपणामुळे मुलांमध्ये चिडचिड, शिक्षकांबद्दल व पालकाबद्दल अनादर अराजकता वाढीस लागते. आज आपण जर प्रत्यक्ष पहिले तर लक्षात येते की लहान मुले आपल्या आई वडील व इतरांचा मान सन्मान करत नाहीत. त्यांची वर्तणूक ही उद्धटपणाची असते, याचा अनुभव आपना सर्वाना आला असेल. किंबहुना दैनंदिन जीवनात दररोज येत असेलही. मी एक पालक म्हणून या समस्येने ग्रासलो आहे.
कॉन्व्हेन्ट संस्कृतीत केवळ अभ्यासातील टक्केवारी आणि सादरीकरण याला अती महत्व दिले जाते. पाठांतरावर भर दिला जातो. बऱ्याच मुलांना मातृभाषा आणि शाळेतील भाषा यात तफावत जाणवत असल्यामुळे मूळ संकल्पना समजत नाहीत, व त्यामुळे मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. अती अंतर्गत स्पर्धेमुळे मुलांमध्ये घट्ट मैत्री होण्याऐवजी एकमेकाबद्दल मत्सर आणि जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. अपयशाची भीती आणि पालकांच्या अपेक्षा यामुळे आजची मुले लहान वयातच टोकाचे पाऊल उचलतात किवा व्यसनाधीनतेकडे वळतात. हीच ती अराजकता आहे जी आजच्या पिढीला पोखरत आहे. यातून आपली मूळ भारतीय संस्कृती नष्ट होते की काय ही भीती निर्माण झाली आहे.
कॉन्व्हेट मधून मिळणारे शिक्षण हे विद्यार्थांना जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवत आहे, हे कौतुकास्पद आहे. मात्र या प्रवासात मुले स्वतःच्या मूल्यांपासून, संस्कृतीपासून दूर जाता कामा नये. इंग्रजी शाळांनी पाशिमात्य जीवनशैलीचे कौतुक करताना आपल्या भारतीय संस्कृतीतील आदर, कृतज्ञता आणि आध्यात्म या मूल्यांचीही ओळख मुलांना करून दिली पाहिजे. केवळ पोपटपंची इंग्रजी बोलणारी पण मनातून अशांत आणि अराजकतेकडे वळणारी पिढी घडविण्यापेक्षा, सुजाण सुसंस्कृत आणि भावनिकदृष्ट्या सक्षम नागरिक घडविणे, हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. शाळांनी केवळ करिअर ओरीएटेड विद्यार्थी न घडवता, विद्यार्थ्याच्या वर्तनातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडेल, असा आदर्श विद्यार्थी निर्माण केला पाहिजे.
– प्रा. राजेंद्र बापूराव वाकडे
मूर्तिजापूर
भ्रमणध्वनी: ९०२१५१२६६४
Email – rajendrawakade005@gmail.com
छान लिहिले सर अभिनंदन🎉🎊🎉🎊