गुरू

शील सभ्यता अन् विद्वत्ता ज्ञानाचे तुम्ही महामेरू.

प्राणप्रिय या भारत भू चे भाग्यविधाते तुम्ही गुरू…

 

आदी अनादी काळापासून

विश्वधरेला शिकवन तुमची

आर्य अनार्यांच्या दिमतीला

परंपरेची टिकवन तुमची

वदता शास्त्राच्या पानोपानी

नीतिशास्त्र ते गुरू तुम्ही

क्रूरकर्मी अविचार मिटविला

तो प्रज्वल दीपक गुरू तुम्ही

तुम्हीच प्रज्ञा गौतमाची

अन् अहिंसा महावीरांची

तुम्ही चेतविल्यात ज्वाला

झालात प्रेरणा शूर वीरांची

अल्लाह चा संदेश घेऊनी

ते पैगंबर तुम्हात बसते

गुरू तुमच्या शब्दा शब्दांत 

प्रेम येशूचे आम्हा दिसते

युगायुगाला सावरण्याचे

कण कौशल्य तुम्ही गुरू..

प्राणप्रिय या भारतभू चे……

 

संत तुम्ही.. महंत तुम्ही..

तुम्ही प्रेरणा सत्संगाची

गोडी लावली तुम्हीच आम्हा

तुकारामांच्या अभंगाची

कबीरच्या दोह्या मधला

अर्थ आम्हा तुम्ही दावला

जनाबाईच्या ओव्यांमधूनी

सार्थ असा हा तूरू लावला

तो दोहा तुम्ही, अभंग तुम्ही

ओवी अखंड तुम्ही लावणी

कोटी कोटी त्या काव्यरसाची

तुम्ही प्रेरणा तुम्ही धनी

आरास मांडतो आजघडीला 

कवन तुमच्या चरणी गुरू…

प्राणप्रिय हा भारत भू चे….. ……

 

तुम्ही घडवले गांधी नेहरू

नेताजी अन् राजगुरू

फुले शाहूची तुम्ही प्रेरणा

समतेचे तुम्ही कल्पतरू

विवेकानंदांची दृढनिश्चयता

साता समुद्रा पल्याड नेली

लढण्या दीन दुबळ्या साठी

भीमरावांना ढाल दिली

झालात खडग शिवबांच्या हाती

स्वराज्याचा रचला पाया

तुम्ही घडविल्या सावित्री जिजाऊ

संस्कारांचे मोती द्याया

इंदिरा कल्पना किरण लक्ष्मी

तुम्हीच यांच्यात हिंमत फुंकली

अबला होती सबला झाली

हर नारी अन्याया मुकली

पुण्याईने तुमच्या हा

लढवय्यांचा लढा सुरू…..

प्राणप्रिय हा भारत भू चे……………

 

टागोर झाले गीतांजलीतून

लोकमान्यांची निधळी छाती

आदर्श देऊन सर्वपल्लवीचा

गुरू शिष्याची जपली नाती

विज्ञानवादी कलाम होऊन

तंत्रज्ञानाचे दिले धडे

शास्त्रज्ञांच्या हाती कौशल्य पेरले

यशोशिखरावर पाऊल पडे

अशीच असूद्या तुमची प्रेरणा

ग्रहा ग्रहावर गुढी उभारू…..

प्राणप्रिय हा भारत भू चे………..

 

गुरू असा एक मंत्र द्यावा 

मिटेल इथली वादावादी

नक्षल वक्षल दहशत गर्दी 

अन् संपूदे आतंकवादी

मुंबई दिल्ली बोधगया 

न हादरण्याची ग्वाही येईल 

भेदरलेल्या मना भोवती 

निर्भयतेची ढाल होईल

मानवतेला लाजवेल जे

असे कधी ना कृत्य घडो

तुटत चालल्या माणसांची

पुन्हा एकदा नाळ जुळो

माणसाला मानवतेची

नवी शिकवणी करा सुरू

प्राणप्रिय ह्या भारत भू चे………….

अनिल दंदाळे

– अनिल सी. दंदाळे 

छ. संभाजीनगर 

भ्रमणध्वनी – 91466 09368

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top