मत ढुंढ मुझे रिवाजो में, मत ढुंढ मुझे नमाजो में, न मै व्रत में हूँ, न रमजान में।
बस्स ! इंसानियत को जिंदा रख, क्योंकि मैं बसता हूँ इंसानो में ॥
डॉ. बाबासाहेबांनी एकाही मराठी, हिंदू व मुस्लिम अशा कोणत्याही समकालीन संताचे नांव घेतले नाही, कारण संत कविच्या दैदिप्यमान मालिकेमध्येही कोणीही संत बाबासाहेबांना स्फूर्ती देऊ शकला नाही. त्यांना एकच संत आढळला तो ही उत्तरे मधला संत कबीर! बहुजन समाजाचा खऱ्याखुरा समाजवादी संत. त्यांनी आयुष्यभर जातीभेद, विषमता, दृष्टरुढी, विरुद्ध अत्यंत प्रखरपणे लढा दिला. आपल्या फटकळ वाणीच्या फटकाऱ्याने समाज विरोधी शक्तींना ठणकावले. ते निर्भय आणि निबैर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाव जीवनात त्यांना गुरु मानले. कारण डॉ. बाबासाहेबांचे घराणे कबीर पंथी असल्याने त्यांच्यावर ते संस्कार होतेच. कबीरांच्या जीवनाचा आणि तत्वाचाही बाबासाहेबांवर फार मोठा परिणाम झाला. त्यांच्या जीवनाशी व बाबासाहेबांच्या कर्तृत्वाशी बरेच साम्य होते. सत्यनिष्ठा, संघर्ष, आणि समर्पण ही दोघांच्या जीवनाची वैशिष्टये आहेत. गुरूंना दोन्ही अनन्य साधारण महत्व देतात. पण तो गुरु त्यांना बांधून ठेवत नाही, तर आत्म-दीप-भवं म्हणून मुक्त करतो. कबीरांना बुद्धाच्या तत्वज्ञानाचे रहस्य कळाले. त्यांचे ऋण अगदी मोकळ्या मनाने कृतज्ञतेने मान्य केले. कारण शूद्रातिशूद्रासाठी ज्वलजहालपणे लढणारे तेच एकमेव संत त्यांना वाटले. त्यांची स्वतःची श्रद्धा, करुणा, मानवता त्यांना पुरेशी होती.
भगवान बुद्धांचे, संत कबीरांचे बरेचसे तत्वज्ञान बाबासाहेबांनी भारतीय संविधानात एकत्रित गुंफून संपूर्ण देशात जातीवाद, असमानता यांना थारा दिला नाही. बालपणी झालेले योग्य संस्कार आणि तारुण्यात संस्काराचा बाह्य आणि आंतरिक, सामाजिक कर्मकांड, अंधश्रद्धा या सारख्या अनेक समस्यांपासून समाजाचे संरक्षण होऊ शकते. गरीब दीन दुबळ्यांची सेवा करण्याचे बळ मिळू शकते. लोकांना असाच सात्विक मार्ग दाखविण्यासाठी येथील महापुरुषांनी, संत महात्म्यांनी आपल्या आध्यात्मिक मार्गाने जागरण केले. त्यांच्या प्रयत्नाने समाज सशक्त, बलसंपन्न, भयमुक्त होण्यास मदत मिळाली त्यात संत कबीर अग्रणी आहेत.
विविध प्रकारच्या छटा या जगामध्ये आहेत या सर्वांचा आस्वाद या दोह्यात आपल्याला पाहायला मिळतो. हिच त्यांच्या अमरत्वाची साक्ष असून या दोह्याच्या माध्यमातून संत कबीर आजही जनमानसात प्रचलित आहेत. संत कबीर म्हणतात, “बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिला कोय। जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय।” लोकांची निंदा करणे, त्यांची चुगली करणे हे काही बरोबर नाही. ते सुद्धा चांगले आहेत हा विचार आपल्या मनी बाळगावा म्हणजे आपल्या लक्षात येईल की, आपण जो नकारात्मक विचार दुसऱ्या विषयी करतो तेच मूर्खपणाचे लक्षण आहे. म्हणजेच आपल्या विचारात सुधारणा होईल, लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, त्यालाच सम्यकदृष्टी म्हणतात.
लहानपणीच पालनकर्त्याचे निधन झाल्याने त्यांचा पिढीजात विणकराचा व्यवसाय कबीराने सांभाळला. परंतु मुळातच त्यांची वृत्ती विरक्त असल्यामुळे त्यांचे मन इकडे तिकडे भटकू लागले. शेवटी प्रपंचासाठी उद्योग करणे आवश्यक होते. उत्तर भारतातील तत्कालीन सर्वश्रेष्ठ प्रवर्तक स्वामी रामानंद निर्गुण भक्तीचे, भेदांचे कडवे विरोधक, आणि स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी त्यांचा अट्टाहास असायचा. त्यांच्या शिष्यवर्गात अनेक जातीचे संत होते. तेव्हा कबीराने सुद्धा स्वामीजींचे शिष्यत्व पत्करले. भक्ती पंथाच्या अध्वर्यूमध्ये रामानंदानंतर जर क्रम लागत असेल तर तो फक्त कबीरांचाच. त्यामुळे गुरुची वैशिष्ट्ये कबीरमध्ये प्रकर्षाने जाणवतात. हिंदू आणि इस्लामी धर्ममातंडांच्या दोषांवर, विसंगतीवर, चारित्र्यहीनतेवर ते कडाडून हल्ला करीत राहिले. त्यांनी संतांची धर्मपीठांची, पुरोहितशाहीची, मुल्ला-मौलवीची एवढी चिकित्सा केली की संपूर्ण पुरोहितशाहीच त्यांच्या विरुद्ध उभी राहिली. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव हा संपूर्ण देशभर पसरला. वैदिक धर्म तत्त्वज्ञान, अल्ला आणि मुस्लिम कट्टरतावादाला विरोध करणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे हिंदू त्यांना नास्तिक म्हणू लागले तर मुस्लिम काफिर समजू लागले.
तत्कालीन समाजाच्या नैतिक अधःपतनाने कबीर फार अस्वस्थ होत असत. धर्मविषयक अज्ञान, अंधश्रद्धा, भेदाभेद, रूढी परंपरेचे प्राबल्य व परस्पर विषमतेविषयी ते सतत आपल्या दोह्यातून, प्रवचनातून प्रबोधनाचे काम करीत असत. त्यामुळे जनजागृती होत राहिली. या त्यांच्या प्रयत्नातूनच त्यांना सामाजिक क्रांतीचे अग्रदूत व युगद्रष्टे कवी म्हणून मान्यता मिळाली. ते म्हणतात, “मूते इंद्रीय बांधे कान, कबीर कहे तेरा चोदू ज्ञान”? आपल्या इंद्रीयाने मनुष्य लघवी करतो, परंतु कानाला फाशी देतो, म्हणजेच जनेऊ (जानवा) बांधतो. तसे बघितले तर ३२ ग्रंथीने शरीर घाणेरडे आहे, पूर्ण शरीर दुर्गंधीयुक्त अपवित्र आहे. तरीदेखील लघवी करतेवेळी जानवे कानाला बांधणे, हे कुठले ज्ञान? ही तर अज्ञानता आहे.
महात्मा ज्योतिबा फुलेंना देखील ब्राम्हण पंडितांचे कपट कारस्थान उघडे पाडणारा पहिला पुरुष म्हणून महात्मा कबीराबद्दल आदर होता. कबीर म्हणतात, खाटीक तर जनावरांना कापतात पण पंडे-पंडित माणसासारख्या माणसास जीवनातून उठवतात त्यांना सर्वस्वी नागवतात. उच्च-नीच तत्त्वाचं स्तोम माजवून औडंबर उभे करतात. माणसा-माणसांत भेद निर्माण करणाऱ्या ब्राम्हण पंडितांना कबीर प्रश्न विचारतात. ते म्हणतात,
“एक बुंद, एक मलमूतर, एक चाम, एक गुदा,
एक ज्योती तौ उपजा कौन ब्राम्हण कौन शुदा.”
एका बीजापासून उत्पत्ती झालेली, जननी जठरी सारख्याच, यातनात झालेली वाढ आणि एकाच आत्मत्वाने सर्वांची जीवन ज्योती उजळलेली, मग हा ब्राम्हण व तो शूद्र हा भेद कसा? या अशा थोतांड कल्पनांना मूठ माती देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न होता.
साधु संताच्या सहवासात राहणारे कबीर मुळातच आत्यंतिक वैराग्य वृत्तीमुळे संसारात कधीच रममाण झाले नाहीत. तरीदेखील आईच्या आग्रहाखातर त्यांनी लग्न केले. त्यांना पुत्रदेखील झाला त्याचे नाव त्यांनी कमाल ठेवले. परंतु तो त्यांच्या विचारांशी सहमत होऊ शकला नाही तेव्हा मुलाविषयी दुःखोद्गार काढताना ते म्हणतात,
“दुर्बा वंश कबीर का उपजा पुत कमाल,
हरी का सुमीरन छाडी के भारले आया माल.”
आजही हिंदू, मुस्लिम, सिख इत्यादी धर्म पंथात कबीराला मान्यता आहे. जातीभेद विरहित समाजाची स्थापना हा कबीराचा ध्यास व जीवनध्येय होता. ते शिक्षित नसले तरीही साधुसंतांच्या सहवासातून देशाटन त्यामुळे कबीराची दृष्टी चौफेर तल्लख बुद्धी याचा फायदा म्हणून व्यक्ती व समाज या दोघांमध्ये समेळ घडवून आणण्यासाठी ते सदैव तयार असत. परस्पर प्रेम व मनाचे पवित्र हे ईश्वर प्राप्तीचे माहेरघर होय अशी अगाध श्रद्धा त्यांची होती. ईश्वरावर अव्यभिचारी निष्ठा आणि मानव जातीविषयी समत्वभाव या गोष्टींचाच कबीराचा सर्वधर्म समन्वय सामावलेला आढळतो. त्यामुळे कोणीही त्यांना समाजवादाचे समर्थक म्हणू लागले. तर काही क्रांतिकारी कर्मयोगी म्हणत असत. त्यामुळे त्यांना कसलाही फरक पडत नव्हता. परंतु एक महत्वपूर्ण संदेश त्यांनी संतांना दिला ते म्हणतात, साधू झाला तरी त्याने जीवननिर्वाहासाठी काही श्रमाचे काम केलेच पाहिजे, भीक मागून त्याने उदरपोषण करता कामा नये असा स्पष्ट आदेश होता.
“कबीरा! हम पैदा हुए जग हसा हम रोये,
ऐसी करणी कर चले हम हसे जग रोये.”
आईच्या पोटी जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मग तो मुलगा असो की मुलगी या दुःखी जगाला बघून रडते. परंतु त्याचा परिवार फार आनंदी असतो, कारण जन्माला आलेला कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाचा नातू, कुणाचा पुतण्या, त्यामुळे परिवारातील लोक आनंदीत असणे स्वाभाविक आहे. परंतु या दुःखी जगाला आनंदीत करण्याकरिता तो प्रयत्न करतो. लोकांची सेवा लोकांचे दुःख ते आपले समजून त्यांची काळजी करतो त्यामुळे त्याचे नाव त्याची कीर्ती दिगंत राहते. प्रत्येक व्यक्तीने शक्यतो चांगले काम करणे गरजेचे आहे. जेणेकरून समाजमनावर त्याचा ठसा उमटलेला दिसेल.
“मोको कहा ढूंढेरे बंदे, मैं तो तेरे पास में।
ना तीरथ में, ना मूरत में, ना एकांत निवास में,
ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे में, ना कैलाश में,
मैं तो तेरे पास में बंदे, मैं तो तेरे पास।”
स्वतःच स्वतःला परमेश्वर ओळखून त्याकडे प्रार्थना करण्याचे बळ आपल्याला प्राप्त होईल तेव्हा हे सारे जग भयमुक्त होऊन जाईल. कारण बाहेर शोधून काही मिळणार नाही ते सत्य, शिव, सुंदर स्वतःमध्येच दडून आहे.
“दुर्बल को ना सताये, जाकी मोटी हाय,
मरे बैल की चाम से, लोह भस्म हो जाय.”
दुर्बल असहाय गरिबाला कधीच त्रास देऊ नये. त्यांना त्रास असह्य झाला तर मग ते शाप द्यायला मागे पुढे पाहात नाही. मेलेल्या गाईच्या चामड्याचा भाता हवा उत्पन्न करून जसे लोखंडाला वितळवून टाकतो. त्याप्रमाणेच शाप असतो जो दिसेनासा, फक्त त्याची तीव्रता आपल्याला जाणवते.
सृष्टीने सर्वांच्या शरीराची रचना तर एकसारखी केली आहे. मग हा ब्राम्हण आणि तो शूद्र हा भेद कसा? किंवा कसा ओळखावा? म्हणून कबीर म्हणतात,
“देखो चतुरावो की चतुराई, चार वर्ण आप बनावे, ईश्वर को बतलाई!”
वर्णाश्रम पद्धतीवर एवढी घणाघाती पण अल्पाक्षरी टीका सापडणे कठीण आहे. या संदर्भात आपल्या ब्राम्हण्याचा तोरा अथवा मुस्लिम पणाची शेखी मिरविणाऱ्यांना विचारलेला हा कबीराचा निरुत्तर करणारा संवाद. ते म्हणतात,
“जो तु ब्राम्हण ब्राम्हणी जाया, तो आण बाट व्दै क्यों नही आया,
जो तु तुरक-तुरक की जाया, तो भितर खतना क्यों न करवाया.”
ब्राम्हणच काय किंवा मुसलमान काय, जनन मार्ग साऱ्यांचाच एकच. आणि सुन्नतेत मुस्लिम पण साठवलेलं असेल तर अल्ला ने जननी जठरातच उरकून का जीवाला या जगात पाठवित नाही?
कबीर केवळ संत वा भक्त नव्हते, त्यांच्या वेळचे ते क्रियाशील सुधारक, हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते आणि धर्मनिरपेक्ष अशा समाजाचे द्रष्टे होते. सर्वप्रकारच्या कर्मठपणापासून विमुक्त अशा आपल्या पंथाला “सहजधर्म” म्हटले आहे. या पंथातील निर्वैरता, भूतमात्र विषयी कणव, अविचल ईश्वर निष्ठा, निःस्पृह निर्भयवृत्ती, निर्मळ जीवन, सदाचार आणि साधुसंतांची संगती ही प्रमुख तत्त्वे आहेत. त्यानुसार जे आचरण करील तोच खरा धर्मशील मग जन्माने तो कोणत्याही जातीचा वर्णाचा किंवा धर्माचा का असेना.
त्यांच्या शब्दांचे कनव टणक असले पाहिजे, त्यांच्या आत सुकुमार मानवतावादी अंतःकरणाचे दर्शन घडते. मुळातच कबीर विनम्र होते. साधुसंतांविषयीचे त्यांचे हे उद्गार पहा –
“कबीर चेरा संत का, दसनी का परदास
कबीर ऐसे ह्वै, ज्यु पाउतली घास.”
पायातळीच्या गवतासारखा स्वतःला संतचरण रज मानणारा हा कबीर. सारा जन्म आत्मोद्धार इतकेच कबीराने लोकोद्धाराला महत्त्व दिले. कबीरांनी मानवामानवात भेद नको, आपण सर्व प्रभुची लेकरे आहोत, गुणागोविंदाने राहावे, या जगात माणुसकीखेरीज अन्य दुसरे कोणतेही सत्य नाही, याचे निरंतर शिकवण देणारा महान संत होता. त्याने समाजात एकोपा, सामंजस्य, सद्भावना निर्माण केली. अशा या महान संताला त्यांच्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम!
– प्रभाकर सोमकुवर
नागपूर
भ्रमणध्वनी : ०९५९५२५५९५२