…त्याला जाग आली, तेव्हा त्याच्या आजूबाजूने धडाधड गोळ्यांचा वर्षाव होत होता. आपण कोण आहे? कुठे आहे? आत्ता या क्षणी काय करायला हवे? त्याला समजत नव्हते!
त्याने इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न केला… आजूबाजूला किर्र अंधार, वर काळंभोर आभाळ… डोळ्यात बोट घालून पाहीले तरी काहीच दिसत नव्हतं.
‘एक्सो’, एक सोल्जर डेअरडेव्हिल. अत्याधुनिक कॅमोफ्लाज युनिफॉर्म, सिक्स पॅक ॲब्ज्, पॉकेट्समधे लोडेड K87 सेमी ऑटोमॅटीक पिस्तूले, आणि त्याचा दोन्ही हातात लोडेड फुल्ली ऑटोमॅटीक GK7 मशिनगन, एका लेदर पॉकेट्समधे ग्रेनेड्स, विशिष्ट पद्धतीचे नाईट व्हिजन गॉगल्स… सगळं अपटूडेट….
“डोक्यावरचे गॉगल्स डोळ्यावर चढवावेत का?”
या विचारात असतांना पाठी वरच्या सॅक मध्ये ॲमोज आहेत. हे त्याच्या लक्षात आले. अंधारातच त्याने चाचपडले. ‘फारच थोडे ॲमोज् आहेत.”
विचारांच्या नादात त्याला परत गाढ झोप लागली. थोडा वेळ झोपेत गेला अन्…. त्याच्या कानाजवळ फास्ट टायपिंगचा आवाज येवू लागला. आवाजाने त्याला जाग आली.
बाजूला कोणीतरी बोलत होते. तो संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करत होता. कोण बोलतोय! काही कळत नव्हतं.
“थँक यू, जॉन अंकल… थँक यू व्हेरी मच! फॉर गिव्हिंग मी सच अ नाईस बर्थडे गिफ्ट!”
थोड्याच वेळात दुसरा आवाज ऐकू आला.
“ओके, माय लिटल चॅम्प! यू नो… धिस पेड व्हर्जन इज व्हेरी कॉस्टली. हँडल इट विथ केअर… अँड डोन्ट प्ले विथ हिम फॉर टू लॉंग. ओन्ली वनस् इन अ विक ॲड ओन्ली वन अवर. ओके माय सन.”
“ओ… येस्स, अंकल! थँक्स वन्स अगेन… लव्ह यू!”
“जॉन? कोण जॉन? आणि ‘हिम’ म्हणजे कोण?” एक्सो विचार करत होता की, पुढच्या क्षणी एकदम आकाशातून चकचकीत विज कोसळावी तसा फ्लॅश चमकला, तसे सगळे स्वच्छ मोकळे झाले. पण वरचे आकाश कुठेय? कुठेय आपण ?…
एका मजबूत बंद जाड काचेच्या स्क्रीन मध्ये होता तो! त्या स्क्रीन मागून एक तेरा चौदा वर्षाचा चुणचुणीत मुलगा त्याच्याकडे मोठ्या कुतुहलाने बघत होता.
“ओss अच्छा! मी मघा आवाज ऐकला तो याचाच! पण मग हे जाॅन अंकल कोण? हा सारखा काय टाईप करतोय? किती मोठा आवाज येतोय! कानठळ्या बसवणारे कसले आहे हे म्यूझिक?
ऐवढयात स्क्रीन वर त्याला त्याचे नाव दिसू लागले. ‘एक्सो’…
“वेलकम एक्सो”
“माझे नाव एक्सो!”
आता पर्यंत हायबरनेशन मध्ये असलेला एक्सो ताडकन उठून उभा झाला.
तो मुलगा टाईप करत होता आणि तसं त्या स्क्रीन वर काहीतरी उमटत होतं. एक्सोला मात्र ती स्क्रीनवरची अक्षर उलटी दिसत होती.
“रस्टमा द जीडि”
एक्सो वाचायचा प्रयत्न करत होता.
“डिजी द मास्टर”
“ओsss, डिजी! या मुलाचे नाव आहे तर!”
“येस, मी एक्सो आणि हा डिजी… ग्रेट.”
डिजी आता सरसावून बसला. पुढे अजून काहीतरी टाईप करत होता.
एक्सोच्या पाठीवरची सॅक जड होऊ लागली. त्यात ॲमोज भरले जाऊ लागले. एक्सोच्या हातातल्या मशीन गन सोबत आणखी एक सेमी ऑटोमॅटीक शॉटगन खांद्यावर येवून बसली. एक्सोला आश्चर्य वाटत होते.
स्क्रीनवर परत उलटे शब्द दिसू लागले. वाचायला त्रास होत होता. जेमतेम वाचून होत होते… तेवढ्यात…
“र्टस्टा मगे”
स्क्रीनवर दिसले.
“ओs होs…..’गेम स्टार्ट’ म्हणजे आता गेम खेळायचा आहे”. एक्सो उत्साहाने पुटपुटला.
विदीन अ फ्रीक्शन एक्सोच्या काना जवळून एक बुलेट सणसणत गेल्याची जाणीव त्याला झाली.
स्क्रीनच्या मागे डिजी का कोण होता! त्याने बटन प्रेस करताच एक्सो एका क्षणात मागे वळला… आणि दुसऱ्या क्षणी शॉटगन त्याच्या हातात आली. नेहमीच्या सवयीनं त्याची बोटं ट्रिगरवर गेली, ट्रिगर दाबला आणि समोर काळा ड्रेसवाल्या सोल्जरचा कपाळमोक्ष अन स्क्रीन वर रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. एक्सो दचकला.
सगळे कंट्रोल्स् स्क्रीन पलीकडे असलेल्या डिजीकडे आहे, हे त्याला समजले.
डिजी चपळाईने कीबोर्डवर बोटे फिरवी, तसा एक्सोचा देह फुर्तीने हलत होता.
“आपल्या हातात काही नाही?” एक्सो नाराज झाला. पण…
“ठिक आहे….इट्स ओके.”
मग रोजचेच झाले. डिजी शाळेतून आला की, आपला लॅपटाॅप घेऊन बसे. सुरुवातीला डिजी प्रत्येक लेव्हल जिंकला की आनंदाने उड्या मारत खुश होत होता.
पहिले काही दिवस एक्सोलाही मजा वाटत होती. प्रत्येक लेव्हलचं जग वेगळं होतं. कधी बर्फाच्छादित पर्वत, जिथे पाय घसरला की हजारो फूट खोल दरी; कधी दाट जंगल, जिथे प्रत्येक झाडामागे शत्रू दबा धरून बसलेला; तर कधी रणगाडे, हेलिकॉप्टर आणि क्षेपणास्त्रांनी भरलेलं रणक्षेत्र.
एकदा तर लोकांच्या गर्दीने भरलेल्या माॅल मध्ये एका छोट्या मुलीला वाचवण्यासाठी एक्सो पाच – सहा गुंडांशी एकटा लढला होता. गर्दीतील कोणालाही इजा न होता एक्सोने त्या मुलीला वाचवले होते.
प्रत्येक वेळी डिजीच्या बोटांबरोबर एक्सोचा वेग वाढत होता.
एका मिशनमध्ये संपूर्ण बर्फाच्या गुहेतून मार्ग काढत एक्सोला एका अडकलेल्या सैनिकाला सोडवायचं होतं. गुहेचं छत सतत कोसळत होतं. वेळ कमी होता.
डिजी इतका तल्लीन झाला होता की, त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते.
शेवटी त्या सैनिकाला वाचवण्यात एक्सोला यश आलं होतं.
अशा मिशनस् कंप्लीट झाल्या की, प्रत्येक वेळी स्क्रीनवर मोठ्या अक्षरांत चमकत होतं…
‘मिशन कंप्लीट’
डिजी दोन्ही हात हवेत उंचावत आपला आनंद व्यक्त करीत होता.
“येस्स…!”
एक्सोला वाटत होतं, “हा मुलगा जिंकला की मनापासून आनंदी होतो.”
आता पर्यंत खुप मिशनस् झाल्या होत्या. एक्सो आता कंटाळत होता.
त्यादिवशी समुद्राच्या मध्यभागी असलेली एक गुप्त लष्करी पाणबुडी होती. तिच्यात घुसून माहिती चोरण्याचं मिशन होतं. पाण्याखाली श्वास रोखून, प्रकाश टाळत, शत्रूंच्या नजरेत न येता पुढे सरकताना एक्सोला पहिल्यांदाच भीती वाटली. पण डिजीचा हात कीबोर्डवर विजेसारखा धावत होता.
त्याला आता एक गोष्ट लक्षात यायला लागली होती…
प्रत्येक विजयाबरोबर डिजीचा आनंद पहिले सारखा नव्हता. तो थोडा कमी होत होता.
पहिल्या दिवशी आनंदान उड्या मारणारा डिजी, आता फक्त पुढची लेव्हल शोधत होता. एक मिशन संपलं, की लगेच दुसरं. दुसरं संपलं, की तिसरं. त्याच्यासाठी विजय आनंदासाठी नाही, तर पुढच्या विजयाची भूक वाढवण्यासाठी होता.
एकदा त्याने स्क्रीनपलीकडे पाहिलं. टेबलावर दूधाचा भरलेला ग्लास तसाच होता. कोणीतरी तो आणून बराच वेळ झाला असावा. डिजीचं त्याकडे लक्षही नव्हतं. एक्सो स्वतःशीच पुटपुटला,
“युद्धात सैनिकांना खाण्यापिण्याची विश्रांती मिळते… या मुलाच्या युद्धात तीही नाही.”
हळूहळू डिजीला त्या गेमशिवाय चैन पडत नव्हते. जिंकल्याचे समाधान नाहीसं झालं होतं. पुढची लेव्हल… एवढंच त्याच्या डोळ्यांत असायचं.
डिजीच्या इच्छा आणि अटीं वर एक्सो दिवस-दिवस खेळत असे. डिजीला सुटी असली की, एक्सो पंधरा-सोळा तास न थकता लढत होता. मात्र तो कंटाळत होता. त्याच्या हातात काहीच नव्हते. डिजीने कीबोर्डवरची बटणे दाबायला सूरवात केली की, एक्सोला खेळावेच लागे.
कधीकधी डिजीच्या बोटांच्या आणि डोळ्यांच्या हालचालीची गती पाहून एक्सोला डिजीची काळजी वाटे. डिजीच्या मनावरचा ताण एक्सोच्या लक्षात येत होता, पण तो काहीच करू शकत नव्हता.
आकाश, भुयारे बर्फ, पाणी, आग आणि जमीनीवरच्या सगळ्या प्रकारच्या एकूण एक लढाईत हर एक सोल्जर्सला मारून एक्सो पुढे पुढे जात होता. एक एक लेव्हल पार करत होता.
बाहेरून एकदा आवाज आला,
“डिजी… जेवण वाढलंय…”
डिजीने ऐकलंच नाही. एक्सोला आश्चर्य वाटलं.
“डिजीला कोणी बोलवतय! हा जात का नाही?”
पण डिजी लॅपटाॅप पासून दूर होत नसे. आता पर्यंत त्याच्या पंधरा लेव्हल पार झाल्या होत्या. डिजी खुपचं एक्साईट होता. का? ते कळत नव्हतं.
एक्सो एका अभेद्य किल्ल्याच्या भक्कम परकोटाच्या बंद दारापाशी येऊन थांबला… पुढची वाट बंद! त्या बंद दारावर अंदाधुंद फायरिंग केली, पण दरवाजाला काहीच क्षती नाही. त्यावर धडका मारून एक्सो इतका थकला की, अक्षरशः तो तुटू लागला. पण परकोटाचा दरवाजा उघडणे दूर, दार साधे हलले नाही.
एक्सोला डिजीचा हताश चेहरा पाहून वाईट वाटत होते. पण, खरं म्हणजे, आता त्यालाही जरा आराम हवा होता.
काही वेळातच डिजीच्या लक्षात आले. त्या गंज चढलेल्या मजबूत दारावर एक भली मोठी रक्कम लिहिलेली आहे…
म्हणजे, आता जाॅन अंकलने दिलेल्या या फ्री लेव्हल संपल्या… एक्सोला वाटले आता आराम मिळेल. पंधरा-सोळा वर्षाचा डिजी एवढे पैसे कसे देणार!
स्क्रीन बंद झाली. एक्सो हायबरनेशनकडे वळला. भयंकर थकला होता तो. झोप येतेय न येतेय तोवर पुन्हा स्क्रीन प्रकाशमान झाली.
समोर डिजी. चेहर्यावर आनंद नाही, टेशन होतं. नजर स्थिर नव्हती. सारखा रूमच्या बंद दाराकडे बघत होता. काहीतरी गडबड आहे! पण एक्सो काही करू शकत नव्हता. एक्सोच्या पाठीवर ॲमोजची बॅग गच्च भरली. हातातल्या जुन्या गन्स निघून, नवीन भारी भक्कम आणि हेवी आणि अडव्हास् आधुनिक गनस् आल्या. एकाच फायर मध्ये त्याचे शेकडो राऊंड्स होत होते. अजून दोन विचित्र बंदुका होत्याच. खांद्यावर एक कम्प्लीट लोडेड रॉकेट लॉंचर आले.
एक्सोचे मसलटोन अजून टणक आणि मजबूत झाले. डोळे शार्प झाले, गाॅगलचा शेप बदलला. जूना युनिफॉर्म बदलून नविन वेगळा युनिफॉर्म आला. तो आता पुर्णपणे बदलला होता.
“डिजी जवळ एवढे पैसे आहेत?”
एक्सोला आश्चर्य वाटत होते.
“ते सिटी बॅंक लिहिलेलं काय होतं?”
एक्सोला काही समजतं नव्हतं…
डिजी ब्रोशर वाचून काहीतरी टाईप करत होता. डिजीच्या हातात ‘सिटी बॅंक’ लिहिलेले कुठलसं कार्ड होतं. तो कार्ड कडे बघत स्क्रीनवर टाईप करत होता. खेळाच्या पुढच्या पायऱ्या कठीण होत्या. तरी, त्याला खेळायचे होतं.
एक्सो रेडी होता.
मग दोन प्रॅक्टिस ट्युटोरिअल्स झाले.
आता गेम स्टार्ट होणार होता.
अचानक तो अभेद्य परकोटाचा गंजलेला मजबूत दरवाजा प्रचंड आवाज करत उघडला. त्यावर लिहिले होते,
“वेलकम टू डार्क अंडरवर्ल्ड”.
त्या क्षणी डिजीच्या चेहऱ्यावरचे अपराधी भाव गळून पडले. नजरेत चमक आली. डिजी सरसावून बसला.
दरवाजा पूर्ण उघडला आणि एक कुबट, ओलसर वास एक्सोच्या नाकात शिरला. समोरचा रस्ता काळ्याभोर दगडांनी बांधलेला होता. दोन्ही बाजूला मोडकळीस आलेले खांब. त्यावर अर्धवट विझलेल्या मशाली. दूरवर कुठेतरी साखळदंड ओढल्यासारखा आवाज येत होता. मध्येच एखाद्या जखमी माणसाची किंकाळी घुमे आणि पुन्हा सगळी भयाण शांतता.
एक्सोने पहिल्यांदाच मागे वळून पाहिलं. तो आत आला होता. पण मागचा दरवाजा दिसत नव्हता.
“माघारी जाण्याचा रस्ता कुठे गेला?” त्याने स्वतःशीच विचारलं.
इतक्यात एक कमालीची रेखीव, ब्लॉन्ड हेअर आणि बिकिनी सारखा ड्रेस घातलेली पावरफुल मुलगी आली. ती एक्सोला म्हणाली,
“हाय, आय एम मॅकी… यु’र न्यु गेम पार्टनर…” एक्सो तिच्या कडे पहातच राहीला. तिच्याकडची शस्त्रे काही वेगळीच आणि जास्त घातक होती. दोघेही आत पॅसेज मध्ये होते. खाली पायऱ्या होत्या. अंधारात लालसर प्रकाश दिसत होता.
स्क्रीनवर डिजीचा सावध चेहरा आणि चौकस नजर सगळीकडे फिरत होती. तो काही शोधत होता? काही कळायच्या आत, विचित्र चेहऱ्याचा, मस्क्युलर प्राण्याने सरपटत येवून एक्सो वर हल्ला चढवला….
डिजी सावध होता.
एक्सो स्तब्ध.
पण मॅकीने हातातील चाकूने त्या प्राण्यावर हल्ला केला. एक्सो भानावर आला आणि त्या प्राण्यावर प्राणघातक हल्ला केला. तब्बल दहा मिनिटं, तिघांची जोरदार मारामारी… शेवटी तो भयानक प्राणी संपला.
मॅकी, एक्सो जबर जखमी झाले. त्यांना आरामाची गरज होती.
पुन्हा डिजीने कार्ड हातात घेतले, की बोर्डाची बटने दाबली. स्क्रीनवर काहीबाही उमटत राहीले आणि दोघेही पुन्हा पूर्ववत झाले.
नंतर मात्र दोघांना, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी परिस्थिती होती.
एक्सोला परत जायचं होतं. मॅकी हळूच हसून म्हणाली,
“डार्क अंडरवर्ल्डमध्ये एकच नियम आहे, इथं आत येणारे पुढे जातात… मागे फिरत नाहीत.”
एक्सो तिच्याकडे पाहतच राहिला.
“म्हणजे?”
“म्हणजे, जो जितका पुढे जातो, तितकाच बाहेरच्या जगापासून दूर जातो.”
मॅकीच्या आवाजात एक विचित्र गंभीरपणा होता.
दोघे पुढे निघाले. थोड्याच अंतरावर एक मोठी खोली होती. भिंतींवर हजारो शस्त्रं होती. मोडलेली, रक्ताने माखलेली, तर काही चमचमत होती. मध्यभागी लोखंडी पिंजऱ्यात सैनिक बंदिस्त होते.
“हे कोण?” एक्सोने विचारलं.
मॅकी शांतपणे म्हणाली,
“जे बाहेर पडू शकत होते… पण पडले नाहीत.”
एक्सोला तिचं उत्तर समजलं नाही.
इतक्यात स्क्रीनपलीकडे डिजीचा उत्साह वाढला. त्याची बोटं सराइतपणे कीबोर्डवर होती. प्रत्येक नवीन शस्त्र मिळालं की त्याच्या डोळ्यांत चमक येत होती. ती भूक होती. अजून… आणखी… पुढचं…
एक्सो लढत होता. मॅकी लढत होती आणि स्क्रीनपलीकडे डिजीही लढत होता. फरक एवढाच की, ती दोघं शत्रूंशी लढत होते आणि डिजी स्वतःशीच.
त्या रात्री घड्याळाने दोनचा ठोका दिला. मग तीन. मग चार. खिडकीबाहेर अंधार विरायला लागला. पहाटेचा फिकट प्रकाश पडद्याच्या फटीतून खोलीत शिरत होता. पण डिजीला त्याचं भान नव्हतं. त्याच्या डोळ्यांत लाल झाले होते. ओठ कोरडे पडले होते. बोटं मात्र थांबत नव्हती.
एक्सोने मॅकीकडे पाहिलं.
“हा झोपत नाही का?”
मॅकीने हलकंसं हसत उत्तर दिलं.
“इथे येणारे सुरुवातीला गेम खेळतात… नंतर गेम त्यांना खेळवतो. आता आपला हा गेम डिजीला खेळवतो आहे.”
एक्सो काही बोलला नाही.
तेवढ्यात बाहेरून मोबाईलचा रिंगटोन वाजला.
“लुकास काॅलींग…”
डिजीने एक कटाक्ष टाकला आणि कॉल कट केला. क्षणभराने पुन्हा रिंग. पुन्हा कट. तिसऱ्यांदा मेसेज चमकला,
“तू आज शाळेत का आला नाही? उद्या गणिताची टेस्ट आहे. अभ्यास झाला का?”
डिजीने मेसेज न वाचताच मोबाईल बाजूला सारला. एक्सोला काहीतरी तुटल्याचा आवाज ऐकू आला. गेममध्ये नाही. तो आवाज स्क्रीनपलीकडे होता. मॅकी हळूच म्हणाली,
“ऐकलंस?”
“काय?”
“एक मैत्री तूटली. त्याचा आवाज….”
पुढचे पूर्ण पंधरा दिवस डिजीच्या तालावर एक्सो-मॅकी घमासान युध्द खेळत होते. त्यांना जराही उसंत घेता येत नव्हती.
पहिल्यांदाच एक्सोला जाणवलं, डिजीच्या डोळ्यांत लाल रेषा उमटल्या आहे. बोटं वेगाने चालत होती. त्याच डोकं थकलं होतं.
त्या दिवशी डिजी बसल्या बसल्या टेबलवर डोकं ठेऊन झोपून गेला होता. लॅपटाॅप पाॅज होऊन बंद झाला होता. आत एक्सो-मॅकी ताटकळत उभे होते. तब्बल सहा तास… डिजी गायब होता.
मॅकी म्हणत होती..
“एक्सो… तुला माहिती आहे का? आपण इथं जिंकतो, पण आपल्याला खेळायला लावणारे हरत असतात.”
आजकाल डिजीने नविन प्रकार सुरू केला. स्क्रीन समोर पुस्तक उघडं ठेऊन गेम खेळायचा.
एक्सो म्हणतो,
“देशासाठी युद्ध करणारे सैनिक पाहिले. आता गेमसाठी अभ्यास सोडणारा पाहू.”
” चलो ये भी देख लेते.”
मॅकी गंमतीने म्हणाली,
“तसंही, आपण शेवटच्या लेव्हलवर आलोय.”
“हाss हाs… नाही… शेवटची लेव्हल अजून बाकी आहे.”
एक्सो, मॅकीला चिडवत म्हणतो.
…अठरा तास होऊन गेले, तरी एक्सो आणि मॅकीचं युद्ध थांबत नव्हतं. दोघांचेही हात शस्त्रं चालवत होते; पण मन मात्र थकलं होतं.
समोरचं रणांगण अचानक शांत झालं. एकही गोळी झाडली जात नव्हती. किंकाळी ऐकू येत नव्हती. त्या शांततेने एक्सो अस्वस्थ झाला.
“मॅकी… इतकी शांतता का?”
मॅकीने पुढे बोट दाखवलं.
“शेवटच्या युद्धाआधी नेहमी अशी शांतता असते.”
दोघं सावधपणे पुढे निघाले. रस्ता संपला.
समोर काळ्या दगडांचा एक प्रचंड दरवाजा होता. त्यावर कुठलेही कुलूप नव्हतं, कुठलाही पहारेकरी नव्हता. फक्त एका कोपऱ्यात मंद लाल प्रकाशात काही शब्द चमकत होते,
‘फायनल लेव्हल’
डिजीचा श्वास वाढला. त्याची बोटं पुन्हा वेगाने धावू लागली. एक्सोने मागे वळून स्क्रीनपलीकडे पाहिलं. डिजीच्या टेबलावर पुस्तक उघडं पडलं होतं. त्यात बुकमार्क तिथेच अडकलेला. पेन्सिल जमिनीवर पडलेली. जेवणाची रिकामी ताटली अजूनही उचलली नव्हती.
खिडकी बंद. खोलीत गुदमरल्यासारखं वातावरण. क्षणभर एक्सोला वाटलं…
“हे डार्क अंडरवर्ल्ड बाहेर आहे की आत?”
मॅकी त्याच्याकडे पाहून मंद हसली.
“कळलं?”
“काय?”
“या अंडरवर्ल्ड मध्ये आपण चालत आलो नाही…”
“मग?”
“डिजी आपल्याला इथे घेऊन आला.”
एक्सो काही बोलला नाही. दोघांनी दरवाजा ढकलला.
कररररर… मोठा आवाज करत तो हळूहळू उघडला. आत पूर्ण शांतता. ना शत्रू… ना स्फोट… ना गोळ्या… फक्त एक प्रचंड हॉल. रिकामा… मध्यभागी… भलामोठा आरसा.
आरशात कोणीच दिसत नव्हते, ना मॅकी, ना एक्सो, ना आजूबाजूचे काही दिसत होते. दिसत होता तो फक्त डिजी. जिता जागता जिवंत डिजी. ते पाहून एक्सो-मॅकी घाबरले. तेवढ्यात स्क्रीनवर लाल अक्षरं उमटले.
‘फायनल टार्गेट’
‘टार्गेट डिजी.’
एक्सोने गन उचलली. टार्गेटवरचा लाल गोल डिजीच्या छातीवर चमकत होता.
एक्सोच्या अंगावर काटा येतो.
“हा शत्रू नाही…”
डिजी स्क्रीनकडे निट पाहतो. एक्सोने त्याच्यावर नेम धरलेला.
गेमचा हिरो एक्सो जिवंत… आणि स्क्रीन बाहेरचा खेळाडू डिजी हरलेला.
डिजीच्या हातातला माऊस थरथरतो. स्क्रीन विचारत असतं,
“आर यू शूअर?”
डिजी घाबरला होता, चेहरा घामाने थपथपला होता. त्याच्या मनात प्रश्न होता.
“हू कंट्रोल हुम?”
त्याची कीबोर्डवरची बोटं थांबतात. पहिल्यांदाच. तो त्या आरशातल्या डिजीकडे परत पाहतो.
हो! तो.. तोच स्वतः होता.
लाल डोळे. डोळया भोवती काळी वर्तुळं, केस विस्कटलेले, थकलेला चेहरा, पसरलेली अभ्यासाची पुस्तकं, कोपऱ्यात पडलेली शाळेची बॅग, अस्ताव्यस्त खोली. डिजी शाॅक….
कीबोर्डवर बोट हलतात. निमिषार्धात स्क्रीनवर टाईप होतं…
‘अनइन्स्टाॅल्’
एक्सो अजूनही डिजीवर नेम धरून होता.
स्क्रीनवर येतं,
‘नो’ / ‘येस’
एक्सो कडे पहात, डिजीचं बोट ‘येस’ वर टेकतं.
एक्सो-मॅकी एकमेकांकडे पाहत म्हणतात,
“अलविदा डिजी…”
दोघे प्रकाशात विरघळून जातात.
” गेम ओव्हर”
म्हणत स्क्रीन काळी होते. त्या बंद काळ्या स्क्रीनवर डिजीचं प्रतिबिंब… पण आता त्याच्या छातीवर टार्गेटचा लाल गोल नसतो.
-: समाप्त :-
– माधुराज, नागपूर
भ्रमणध्वनी:9422807026