बायोमेट्रीक जगणे

आदिम संस्कृतीच्या युगात माणूस शाकाहारी होता. मग अग्नीचा शोध लागला. अन्नाची भूक वाढली. मग माणूस मांसाहारी झाला. आणि आता ट्वेंटी फोर बाय सेव्हन कर्मसंस्कृतीच्या युगात अधिकाधिक अन्न मिळविण्यासाठी यंत्राहारी झाला. नव्हे चैनीच्या जगण्यासाठी यंत्राहारी झाला आहे. हे सत्य कुणीही खोडून काढू शकत नाही.

  पूर्वी माणसाला जगण्यासाठी केवळ अन्नाचा शोध पुरेसा होता. अन्न मिळविण्यासाठी आणि टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता माणूस अन्नासाठी दाही दिशा भटकंती करायचा. मग पुढे तमा जागी झाली. लज्जारक्षणासाठी माणूस वल्कले पांघरू लागला. वल्कले आली तशी तम्मा तम्मा पण जोडीला आली. तम्मा तम्मा जोडीला आल्यावर माणूस स्थिर झाला. माणसाच्या स्थिरीकरणाला एग्रीकल्चर हे नाव मिळालं. इथून पुढे एग्रीकल्चर पासूनच माणसाला सर्व प्रकारच्या कल्चरचा शोध लागत गेला. आणि माणसाने सर्व प्रकारच्या कल्चरला आपल्या सोईप्रमाणे, काळानुरूप वाट्टेल तसे वागविले, वाढविले आणि घडविले व बिघडविले सुद्धा..

 आताचा माणूस वर्क कल्चर नावाच्या कल्चर मध्ये जगतो आहे. कारण एग्रीकल्चर करणारा शेवटचा माणूस शिल्लक राहिलेला आहे. सध्या एग्रीकल्चर म्हणजे आतबट्याचा खेळखंडोबा झालेला आहे. म्हणून सध्या एग्रीकल्चर मध्ये कोणालाही पडावे वाटत नाही. एग्रीकल्चर वाल्यांना आपल्या पोरांनी नोकरीच करावी असे वाटते. आणि पांढरपेशे, काळेपेशे आणि इतर पेश्यांमध्ये पडलेल्यांनाही नौकरीच प्रिय वाटते. असं आजच्या ट्वेंटी फोर बाय सेव्हन कल्चरचं जगणं झालेलं आहे. सरसकट सगळ्यांनाच इतर सर्वच कल्चर गाडून टाकून फक्त नौकरीच हवी आहे. 

  कुठून आणायच्या नौक-या? हा देखील मोठाच प्रश्न आहे. जगातल्या सर्व सरकारी नौक-या सोडल्या, या नौक-यातले अनुशेष, रिक्त पदे, सरकारी तिजोरीत खडखडाट असल्यामुळे नौक-यांचा खडखडाट या सगळ्या जटील प्रक्रियेमधून जी मिळेल ती सरकारी नौकरी तर हवीच आहे. पण या व्यतिरिक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भांडवल वादाशी हातमिळवणी करून नौक-यांच्या नवीन शोषण व्यवस्थेत निशिदिन-अहोरात्र पिळवणूक करणा-या नौक-याही सर्वांना हव्याच आहेत. नौकरी म्हणजे पगार. पगार म्हणजे पैसा. पैसा म्हणजे 1 ते 9 पर्यंतच्या आकड्यावर शून्यांची खैरात. शून्यांची खैरात जितकी जास्त तितका जास्त पगार. शून्यांची खैरात जितकी अधिक तितके पॅकेज बाळसेदार. बाळसेदार पॅकेज महागाईचे बाळूते नेसून प्रत्येकाच्या घरात तान्ह्या लेकरासारखे ट्यांव ट्यांव करीत असते. बरं तान्हं लेकरू मांडीवर हागलं काय आणि त्याने चोवीस तास ट्यांव ट्यांव केलं काय, त्यामुळे तान्हुल्याच्या गळ्याला नख लावणारी जमात अजून जन्मायची आहे असे म्हणावे लागेल. 

  ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या वर्क क ल्चर मध्ये नौकरी हवी आहे मग नौकरी करणा-या प्रत्येकाला बहुराष्ट्रीय कंपन्या, भांडवलवाद, पॅकेज, शोषण आणि पिळवणूक या चक्रातून फिरावंच लागेल. आणि हे फिरणं अपरिहार्य आहे. ते टाळता येणार नाही. ते टाळायचा एकमेव उपाय आहे. तो म्हणजे पुन्हा एग्रीकल्चर कडे जाणे. परत कधीही कोणत्याही कल्चर च्या खुळ्या नादाला न लागण्याचा नाद सोडून एग्रीकल्चर कडे जाणे..

एग्रीकल्चर मध्ये बायोमेट्रीक लावले तर आहे नोकरदारांची तयारी एग्रीकल्चर मध्ये जाण्याची? या प्रश्नाचं उत्तर ठामपणे कदाचित होय असंच असेल. इतकी माणसाला बायोमेट्रीक जगण्याची सवय लागलेली आहे. माणूस यंत्राहारी झाला आहे. बायोमेट्रीकच्या तालावर जगणारा माणूस अधिकाधिक यंत्राहारी झाला आहे. कोणता कर्मचारी कधी कामावर आला याची सत्यासत्यता पडताळण्यासाठी हजेरीपटावर आल्याच्या आणि गेल्याच्या वेळा असंबद्धपणे टिपल्या जावू लागल्या याचा तपास लावता लावता एचआर मंडळींना सर्वांपेक्षा अधिक जास्त गरज भासलेलं यंत्र म्हणजे बायोमेट्रीक. नौकरशहीमध्ये आले एचआर च्या मना तेथे कोणाचे चालेना अशी परिस्थिति. म्हणून मग सर्वात आधी सॉफ्टवेयर वाल्यांनी बायोमेट्रीक यंत्राचे सॉफ्टवेयर तयार केले. कर्मचा-यांच्या नोंदी घेणे, त्या जपणे, संग्रहीत करणे याचे फंडे नंतर नंतर विकसित होत गेले. आता आधार कार्ड वरूनच त्या त्या नौकरदाराचा डेटा बायोमेट्रीक यंत्राच्या सॉफ्टवेयर मध्ये संग्रहित केला जाऊ लागला. सगळं जगणं कसं पारदर्शक बायोमेट्रीक जगणं झालं.कामावर येण्याच्या आणि जाण्याच्या वास्तव वेळा नोंदविण्याच्या हिशोबाने दैनंदिन वापरात आणलेल्या बायोमेट्रीक यंत्राने माणसाचे जगणेच बायोमेट्रीक करून टाकले आहे. भरीस भर म्हणून ट्वेंटी फोर बाय सेव्हन कल्चर मध्ये सूर्याच्या उदयामुळे आणि अस्तामुळे दिवस रात्र होतात ही कल्पनाच आता खुळचट ठरलेली असून बायोमेट्रीक वर थंब इंप्रेशन मारलं की दिवस उगवला आणि मावळला असं प्रत्येक माणसाचं समीकरण झालेलं आहे. बायोमेट्रीक यंत्राच्या रूपाने यांत्रिकीकरणाच्या भूताचं पिल्लू असं माणसाच्या माणगुटीवर बसलेलं आहे.

बायोमेट्रीक मध्ये व्यक्तिची ओळख महत्वाची असते. बायोमेट्रीक व्यक्तिची ओळख पटविते. बायोमेट्रीक शोधाच्या बाबतीत माणसाची अशी ओळख पटविण्याचं श्रेय इजिप्त आणि चीन च्या प्राचीन संस्कृतींना दिलं जातं. पुढे 14 व्या शतकात जोओ डि बॅरोस नं यंत्राच्या आधारे जगात सर्वप्रथम बोटांचे ठसे प्राप्त करण्यात यश मिळवलं. त्यानंतर अल्फोंसे बर्टील्लॉन नावाच्या पॅरीस मधल्या एका पोलिसानं गुन्हेगारांच्या शरीराचं यंत्रशास्त्र जाणून घेण्यासाठी बायोमेट्रीक चा आधार घेतल्याची नोंद आढळते. अलिकडच्या काळात जॉन दाऊगमॅन नावाच्या भौतिकशास्त्रज्ञानं बायोमेट्रिक बुबुळ ओळख प्रणाली विकसित करण्याचं मोलाचं काम केलं आहे. त्याच्या अचूकतेमुळे बायोमेट्रिक प्रणालीचा वापर दहशतवाद्यांना पकडण्यासाठीच्या मदत कार्यात केला जात आहे ही जगाच्या कल्याणाची एक गोष्ट आहे. आणि ऐकून आश्चर्य वाटेल पण अफगाणिस्तानकडून सीमावर्ती दहशतवाद्यांची तपासणी करण्यासाठी पाकिस्तानने अलीकडेच बायोमेट्रिक सिस्टिमची स्थापना केली होती. असा हा बायोमेट्रीकचा अगाध महीमा आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव निरनिराळ्या प्रकारच्या बायोमेट्रीक यंत्रांचा वापर जगभरात केला जातो. मानवी जणुक संरचना, अविशिष्टत्व पावलेले मानवी अवयव, लकबी, वर्तन, रंध्रगंध आणि आवाज ही एकमेवाद्वीय वैशिट्ये घेऊन जन्मलेल्या प्रत्येक मानसाला याच पद्धतींनी विकसीत केलेल्या बायोमेट्रीक यंत्रानी ओळखण्याची पद्धत जगात विविध देशांमध्ये स्वीकारलेली आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास वापरकर्त्यांना प्रवेश देण्यासाठी जनुकांच्या विभागांचे विश्लेषण करणारे रासायनिक बायोमेट्रिक यंत्र, प्रवेश मंजूर करण्यासाठी मानवाचे बुबुळ, चेहरा, बोटांचे ठसे आणि डोळयातील पडदा इत्यादी दृश्य वैशिष्ट्यांचे विश्लेषण करणारे व्हिज्युअल बायोमेट्रिक यंत्र, प्रत्येक मानवाची व्यक्त होण्याची वेगळी क्षमता आणि स्वाक्षरी (चिन्हांची गती, चिन्हांची रुंदी, चिन्हांचे दाब) विश्लेषित करते असे वर्तणुकीचे मापन करणारे बायोमेट्रिक यंत्र, भिन्न वापरकर्त्यांमध्ये फरक करण्यासाठी रंध्रगंधाचे विश्लेषण करणारे घाणेंद्रिय बायोमेट्रिक यंत्र, आणि प्रवेशावर नियंत्रण मिळविण्यासाठी बोलणा-याची ओळख निर्धारित करून आवाजाचे विश्लेषण करणारे श्रवण बायोमेट्रिक यंत्र असे बायोमेट्रीक यंत्रांचे वेगवेगळे प्रकार सांगता येतील.

भारतामध्ये 2006 मध्ये स्थापन झालेली मंत्र सॉफ्टेक इंडिया प्रा.लि. ही भारतातील बॉयोमीट्रिक्स आणि आरएफआयडी उद्योगातील अग्रगण्य कंपनी आहे. 

ताजा कलम: 

सुसंस्कृत कुटुंबातली सौ. (अपवादात्मक एकत्रित) तितक्याच सुसंस्कृत कुटुंबातल्या त्यांच्या श्रीं. च्या प्रत्येक गोष्टीवर वॉच ठेवून असते. अस्सल सौ जन्मजात बायोमेट्रीक यंत्र असते. नव्हे नव्हे बायोमेट्रीक यंत्रालाही लाजवतील असे सौ चे सर्व जनुकीय सेंसर आपल्या श्रीं च्या सक्तीने सेंसॉर लावावे लागतील अशा एक ना अनेक करामतींची साक्ष टीपत असतात. पण वर्षानुवर्ष श्रीं च्या करामती टिपून कुठेही अवाक्षर न काढणा-याच केवळ सुसंस्कृत सौ होत. या व्यतिरिक्त बाकी सगळ्या सौ सो-सो च म्हणाव्या लागतील. कुटुंब सुसंस्कृत असल्यामुळे आणि केवळ वॉचडॉग ची संशयी वृत्ती असल्यामुळे अशा सौ आणि श्री दांपत्यांमध्ये दैनिक वेळा जुळवून न घेण्यापुरती (आणि तीही तात्पुरत्या स्वरूपाची) आणिबाणी घोषित होत असते. बाकी सर्व जैसे थे. क्षेम कुशल चालत असते. अशा बायोमेट्रीक सौ धन्य होत. 

सकाळी खाल्लेल्या पदार्थांचा, डब्यात दिलेल्या पदार्थांचा आणि बाहेरून येणा-या पदार्थांच्या सुवासाचे गंध पकडण्यात सौ बायोमेट्रीक यंत्रालाही चाट पाडतील. हीच बाब (बोंब- अर्थात श्रीं च्या दृष्टीने..) कपडे, श्रीं नी बॅग मध्ये तस्कराला लाजवतील इतक्या सराईतपणे आणि साळसूदपणे लपून-छपून आणलेले ऐवज, घेऊन गेलेली चिन्हे (अपवादात्मक, आणि ते ही चोरट्या पद्धतीने) आणि उमटवून आलेली चिन्हे, आवाजातील बदल, हातांना भरलेलं कापरं, डोळ्याला डोळा न भिडविता केलेला संवाद, रूमालाच्या घड्या, चुरकळलेले टाय, शर्ट, बुटांची अवस्था, लकबींमधले बदल, वर्तन अशा श्रीं च्या एक ना अनेक करामतींची साक्ष सौ च्या कोर्टात झाल्याशिवाय राहात नाही. आणि त्यातून निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय चाणाक्ष श्री पुढे जात नाहीत. सौ चे बायोमेट्रीक बिघडविणारे श्री पाहून वंदावे त्यांचे पाय किंवा तेथे कर माझे जुळती या संतऊक्तीही फिक्याच काय बेचव होऊन जातात. धन्य अशा बायोमेट्रीक सौ. आणि धन्य ते बायोमेट्रीक सौं च्या तपसण्यांना निर्भिडपणे सामोरे जाणारे श्री. बाकी अशी श्री शिल्लक दुर्मिळात दुर्मिळ झालेली आहे.

प्रा. सुशील केकान हे मराठी साहित्यातील ख्यातनाम लेखक आहेत.

– सुशील केकान 

छ. संभाजीनगर 

भ्रमणध्वनी: 9665979131

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top