मव्हाचं फूल

राजाचा जल्म शे-हातला. जलमल्यापसून राजाला शहरं ज्या गतीनं इस्तारत गेली त्या गतीत राजाचं जीवनं बांधलं गेलं. घरची परिस्थिती अगदी बेतास बात! बापाचा जल्म सरकारी नौकरीबिगर गेला. वाण्याचा जल्म! पर दुकानाच्या गल्ल्यावर बसायच्या जागी हमाल्या करीत बसायची पाळी त्याच्यावर आली व्हती.

 काळाच्या गतीबरं राजा गतीनं वाढत व्हता. राजाचं डोस्कं शाळात गुतत न्हवतं पर व्येवहारातल्या हिशेबात त्याचा हात कुणीबी धरू शकत न्हवतं. बालबुद्धीचा इकास व्हत गेला. त्याला जगात जगायचं गिन्यान मिळत गेलं. आन नेमका हितंच घात झाला. साळात त्याला गचकं मिळाया लागलं. तरीबी दहावी पासचं लेबल माथ्यावं चिकटलं आन राजा बेकारीच्या महापुरात आपसुकच वढला गेला. आळीतल्या चार पोरायमदी बसून टवाळ्या करणं असला धंदा राजाला कव्हाच जमला न्हाई. राजा कुठं काम मिळल ह्या हिशेबानं बाजारातल्या दुकानात फिरायचा! पर त्याच्या रूपाकडं बघून त्याला कुणी कामावं ठिवून घिईना. जिन्दगीभर आंगावं ढगाळी कापडं, नाकावं कायम घसरणारी चष्म्याची बसकन, कपाळापसून वर डोक्यावरचं केस उडाल्यानं पडलेलं टक्कल आन मोठ्ठलं डोळं! आन बगलात कायम एक पिशवी आडकिवल्याली! असल्या इद-या ध्यानाकडं बघून कोण राजाला काम देणार व्हतं?

    वय झाल्यावं सा-याची लग्नं व्हत्यात तसं राजाचं बी लगीन झालं. राजा राणीच्या फुलायेलीच्या संसाराला बेकारीचं गिरान लागल्यालं. लगन झाल्यावर जी समद्यायची इच्छा असती त्या इच्छेकडं लक्ष न देता राजा कामं बघत हिंडायचा. अशातच बापानी कमरात लाथ घालून बापानी राजाला घराभायेर काढलं आन म्हणला, ‘स्वोताच्या पायावं उभं रहिल्याबिगर तोंड दावू नगंस’. राजा कपाळावरचा घाम पुशीत फिरत व्हता. नौकरीसाठी तरसत व्हता. संसारासकट राजा बापाच्या घराभायेर पडला. तव्हा बापाचा आधार हारपल्यावानी झाला व्हता. राजानं मनात एक इचार पक्का केला, ‘जिवाला कितीबी कष्‍्ट पडले तरी चालंल, पर जगातल्या समद्या सुखाला, समद्या सोयीला जव्हर पायाखाली लोळण घियाला लावणार नाही तव्हर मी चैन बसणार नाही!’. राजाच्या मनात मव्हचं फूल फुलाया लागलं.

 राजानं मोंढ्यातल्या एका भुसा-याच्या दुकानावर नौकरी धरली. मालचे समदे हिशेब लिहायचे, उधारी ठूणा-या गि-हाइकाकून मालक सांगिन तसं पैसं गोळा करायचं अशी फिरतीरची नौकरी राजाला मिळाली व्हती. तांबडं फुटायच्या वक्ताला राजा दुकानात हजर व्हायचा आन राती आंधार पडूस्तरवर हिशेबाच्या चोपड्यात तोंड खुपसून बसायचा. आतुनात घाम गाळायचा पर त्याच्या म्हेणतीच्या बदल्यात म्हणतीचं दाम लई कमी मिळत व्हतं. म्हणून दुसरीकडं चांगल्या पगाराची नौकरी कुठंतरी हुडकाया पाहिजी अशी आशा राजाच्या मनात फुलत व्हती.

 राजाची कामं चालू व्हती, घाम गळत व्हता. अशातच खाजगी शाळावं चपराश्याच्या नौकरीची आडर राजाच्या हातात पडली. ‘कायमचा कष्टातून सुटलो’ या आनंदात राजा बुडून गेला. मोंढ्यातल्या दुकानात त्यो बरीच दुकानदारी शिकला. त्याचा उपेग त्याला पुढल्या काळात व्हयाला लागला. राजानं इचार केलता की, ‘चपराश्याचं काम म्हंजी आरामशीर हेड मास्तराच्या हापिसाच्या भायेर टुलावर बसून डुलक्या काढायच्या!’ राजा ह्याच खुशीत व्हता. पर जव्हा साळा सुरू झाली आन तिथली कामं माघं लागली तव्हा त्यो पार चक्रावूनच गेला. औांगबादाउन नव्या नौकरीचं गाव लई लांब व्हतं. रेलवीनी शाळाच्या गावाला जावं लागायचं. मिळणारा पगार जाण्यायेण्याच्या हेपाट्याच्या खर्चातच गेला त्ं खायाचं काय? असा इसा करून ह्याच्यातून तोडगा निघावा म्हणून राजा शाळाच्या गावातच बि-हाड घेऊन रहायला गेला.

 हेडमास्तराचा टेबल फडकं मारून पुसायचा, त्याच्यावर पाण्याचा गिलास भरून ठिवायचा, मास्तरायच्या खुर्च्या पुसायच्या, साळातले सम्दे वर्ग झाडून काढायचे, साळात लावल्याल्या झाडा झुडपायला पाणी घालायचं, रोज निघणा-या नोटीसा घिऊन वर्गा-वर्गावं फिरायचं अशी पार झेलेक-यागत राजाची अवस्था झाली. ह्या झेलेपणामुळं राजाचा जीव लवकरच आंबट झाला. पर ज्यास्त कष्ट पडत न्हवते म्हणून राजा आनंदानं समदे कामं करीत व्हता. साळा सुटल्यावं सांच्यापारी साळाला कुलपं घालून घरी जायाचं आन राती भाकर खाऊन राती पुन्ना साळाची राखन करायला यायचं अशे हेलपाटे मारण्यात त्याचे दिवस जात व्हते. इमानदारीत केल्यालं कामचं माणसाला प्रगतीच्या उंब-यावर नेऊन उभं करतं. राजाची इमानदारी साळातल्या समद्या लोकाईच्या मनात भरली आन राजाला साळातच कारकून म्हणून नव्या नौकरीवर बढती मिळाली.

 चपराश्याच्या कामापरीस हे काम सोपं! बसाया टेबल- खुर्ची, साळाचं रिकाड ठिवाया कपाटं, मास्तरायची पगार बिलं काढायचा धंदा राजावं आला. त्याच्यामुळं राजा थोडसाक भाव खायाचा. सम्दी मास्तर मंडळी राजाबरं गोड बोलत असत. हितून पुढं राजानं बघितल्याली स्वप्नं फुलायया पैसा मिळाया लागला. राजाच्या मनात फुलत चालल्याल्या मव्हाच्या फुलाचा सुगंध दरवळायला आता सुरूवात झाली व्हती. त्याचं कारण राजानी पैल्यापसून पै-पै करून पैसा जमवून ठुला व्हता. त्याची इमानदारी त्याला साथ देत गेली. राजा कारकूनाचा मुख्य कारकून झाला. तशी त्याची बदली खेड्यातून शे-हात झाली. खेड्यात कितीबी काबाडकष्ट करूनबी स्वप्नं फुलत न्हाईत, पर शे-हात थोड्या कष्टात स्वप्नाचे बंगले उभे करता येतात. राजा स्वप्नाचे बंगले बांधू शकत न्हवता पर स्वप्नाच्या बंगल्यातल्या अपारमेंटात एक फिल्याट घिऊन रहायचं स्वप्न त्यानं आपल्या म्हेणतीच्या जोरावर पूर्ण केलं, सत्यात आणलं. राजाच्या जगण्याला आता एक नवी दिशा मिळाली. मनाजोगता पैसा त्याला मिळाया लागला. पर भौतिक सुविधांच्या हव्यासापायी पाण्यासारखा पैसा खर्च व्हयाला लागला. कोणतीबी गोष्ट घियाची ठरलं की हप्त्या हप्त्यानं ती गोष्ट मिळविता येती ह्यो नियम झाला. राजा हळूहळू सुलभ हप्त्याच्या मव्हात गुतला. खोल खोल गुतत गेला. घरातली फरशी, फर्निचर, दिवान, सोफा, शोकेस, रंगीत टीव्ही ह्या सगळ्या जिनसा त्याच्या जगण्याचा श्वास झाल्या. पण ह्या श्वासाचा सगळा मोबदला हप्त्या हप्त्यानं भरावा लागत व्हता. ही गोष्ट राजाला जानवली तव्हा राजा अर्धमेला व्हऊन गादीवर पडल्याला व्हता.

 राजा नावापुरताच राजा व्हता, पर सुलभ हप्ता नावाच्या शत्रूद्वारे राजा पछाडला गेला, भौतिक सुविधा मिळविण्याच्या दलदलीत राजा फसत गेला. आन राजाचं राजा व्हयाचं स्वप्नं धुळीला मिळाल्यासारखं झालं. कारण त्याच पगार व्हता सात हजार आन हातात पडत व्हते चार-पाचशे रूपये! हा सगळा सुलभ हप्त्याचा परिणाम व्हता. सकाळी सहाच्या ठोक्याला राजा घराभायेर पडायचा, स्टेशन गाठून साळात येळेवर हजर रहायचा. साळातल्या पोरांच्या फियांचे हिशेब, त्यांच्या दाखल्यावरच्या जन्माच्या नोंदी असली दप्तरे संबाळता संबाळता राजाच्या नाकी नऊ आले. राजा मेताकुटीला आला. पण करणार काय? मव्हाच्या फुलातल्या अर्काची नशा चढती तशी नशा राजाला चढत गेली. राजाचा मोह वाढत गेला. मव्हाचं फूल राजाला पुरून उरलं. राजाची प्रतिज्ञा पूर्ण झाली. राजा स्वोताच्या पायावर उभा –हायला. पर तोंड दाखिवण्याच्या आधीच राजाचा बाप निघून गेला व्हता.

प्रा. सुशील केकान हे मराठी साहित्यातील ख्यातनाम लेखक आहेत.

– सुशील संदिपान केकान 

छत्रपती संभाजीनगर 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top