बनाबाई शंकर हिवराळे एका ग्रामीण भागातील दाईनने (सुईणीने) आधुनिक वैद्यकीय सुविधा नसताना केवळ आपल्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर २० हजारांहून अधिक बाळंतपणे यशस्वीपणे केली, ही थक्क करणारी गोष्ट आहे.
बनाबाई ९९ वर्षांची ही म्हातारी आजही डोळ्यासमोर आली की, तिचं ते रूप काळजात घर करून राहतं. डोक्यावर पांढरे शुभ्र केस, मागून अगदी छोटासा बांधलेला बुचडा आणि त्यातूनही निसटलेले-विखुरलेले वितभर केस. चेहऱ्यावर झाडाच्या जुन्या बुंध्यासारख्या पडलेल्या सुरकुत्या तिच्या अनुभवाची खोली सांगायच्या. कंबर वाकलेली, दोन्ही भुवयांच्या वर असलेला काळा गोल टिका ती विधवा असल्याचे साक्ष द्यायचा. पान खाऊन लाल झालेले ओठ आणि दात, अंगात जुन्या पद्धतीची चोळी आणि नऊवारी लुगडं, अन् हातात आधारासाठी घेतलेली काठी… असा हा तिचा सात्विक पेहराव.
बनाबाईने आयुष्यभर एकच काम पुण्याचे केले, ते म्हणजे यशस्वीपणे बाळंतपण! त्यासोबतच तिने आयुष्यात कधीच कुणाला अपशब्दाने हिणावले नाही, दुखावले नाही. कधी कुणाला खोटी आश्वासने दिली नाहीत. जे काही प्रामाणिकपणे आणि कष्टाने मिळे, तेच ती आनंदाने स्वीकारत असे. तिच्या वाणीतून प्रत्येकासाठी नेहमी दुवाच निघायची आणि ती भरभरून आशीर्वाद द्यायची. ती जेवढी मायाळू, तेवढंच प्रत्येकाला प्रेम द्यायची.
बनाबाईचा जन्म १९२६ मध्ये झाला. इंग्रजांच्या अधिपत्याखाली, म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच्या काळात तिने डोळे उघडले. गरिबीची परिस्थिती, राहायला मातीचे घर आणि त्यावर कौलारू छत. पोटासाठी भटकंती करावी लागली, राब-राब राबावे लागले, तरीही स्वाभिमानाने जगणे तिला आवडायचे. वयाच्या २८ व्या वर्षापासून बनाबाई ‘दाईण’ (सुईण) झाली. तो काळ असा होता जेव्हा गावात दवाखाने नव्हते. बाळंतपण घरीच व्हायची. योग्य उपचार आणि सुविधा नसल्याने कित्येक वेळा बाळंतपणात बाळ किंवा बाळंतीण दगावायची. अशा कठीण काळात बनाबाई एकनिष्ठेने, जाणीवपूर्वक आणि स्वतःच्या हुशारीने बाळंतपण करू लागली. तिच्या हातात एक वेगळाच गुण होता. तिने अत्यंत कौशल्याने जास्तीत जास्त महिलांचे प्राण वाचविण्यात यश मिळवले.
तिचे हे अफाट काम पाहून पुढे तिला मानधनावर सरकारी दवाखान्यात घेण्यात आले, जिथे तिने डॉ. सोळंके यांच्या हाताखाली अत्यंत चोख काम केले. तिच्या हाताला असा काही सुटकार होता की, पिढ्यानपिढ्या तिनेच जन्माला घातल्या. माझे सासरे चंदु वाहुरवाघ यांचा जन्मही बनाबाईच्याच हाताने झाला. एवढेच नाही तर, पुढे माझी पत्नी भारती इंगळे आणि माझा मुलगा कौडिण्य यांचाही सुखरूप व योग्यरीत्या जन्म याच माऊलीच्या हाताने झाला. तब्बल ७० वर्षांच्या सेवेत तिने वीस हजारांपेक्षा जास्त बाळंतपणे केली. तिची बुद्धिमत्ता आणि अनुभव एवढा दांडगा होता की, कुठल्याही महिलेच्या बाळंतपणाआधी ती पोट बघून तंतोतंत सांगायची की मुलगा होणार की मुलगी!
एकदा तर सेवानिवृत्त झाल्यावरही ती अकोला येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात गेली होती. तिच्या एका आप्तेष्टाचे बाळंतपण होते. त्या गरोदर महिलेला पाहताच आणि पोटाला हात लावताच बनाबाई उद्गारली, “पोटात जुळी मुलं आहेत!”
तिचे ते जुन्या पद्धतीचे बोलणे ऐकून तिथल्या आधुनिक डॉक्टरांना राग आला. ते तिला उपरोधाने म्हणाले, “तुला काय मशीन समजते का? डोळ्यांनी बघून एवढं तंतोतंत सांगायला? चल, निघ इथून!” डॉक्टरांनी तिचा अपमान करून तिला तिथून हाकलून लावले.
बनाबाईने शांतपणे आपली काठी उचलली आणि तो अपमान पचवून ती मुकाट्याने तिथून निघून गेली. पण निसर्गाचा नियम बदलत नव्हता. काही तासांनंतर जेव्हा त्या महिलेची प्रसूती झाली, तेव्हा डॉक्टरांना मोठा धक्का बसला. त्या महिलेने खरोखरच जुळ्या मुलांना जन्म दिला होता!
आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सोनोग्राफी जे सांगत होती, ते या ९९ वर्षांच्या म्हातारीने केवळ आपल्या स्पर्शाने ओळखले होते. आता मात्र त्या डॉक्टरांचे डोळे उघडले. आपल्या अहंकाराची त्यांना जाणीव झाली. ज्या म्हातारीला त्यांनी हसून हाकलले होते, ती तर अनुभवाचे चालते-बोलते विद्यापीठ होती. तो डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी तातडीने त्या म्हातारीला शोधण्यासाठी बाहेर धावले. अकोला स्टेशन, बस स्टँड, आजूबाजूचे रस्ते सगळीकडे त्यांनी शोध घेतला. त्यांना त्या म्हातारीच्या पाया पडायचे होते, तिच्या अनुभवाचा आदर करायचा होता आणि आपल्या चुकीची माफी मागायची होती.
शेवटी एका झाडाच्या सावलीत ती माऊली संथपणे पान खात बसलेली दिसली. डॉक्टर धावत तिच्याजवळ गेले आणि त्यांनी थेट तिचे पाय धरले. “आम्हाला माफ करा आजी, आम्ही मशीनवर विश्वास ठेवला, पण तुमच्या ७० वर्षांच्या अनुभवाच्या ‘मशीन’ला ओळखू शकलो नाही. आम्हाला सांगा, तुम्ही हे कसं ओळखलं?”
बनाबाईच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमधून एक साधे, निरपेक्ष हास्य उमटले. तिने डॉक्टरांच्या डोक्यावर मायेचा हात ठेवला आणि म्हणाली, “लेकरा, तुमची मशीन पोटातलं बघते, पण माझी माया पोटातल्या जिवाचा ठोका ओळखते. यात माझा काही चमत्कार नाही, त्या भगवंताची कृपा आणि या हातांनी आयुष्यभर केलेली माऊलींची सेवा आहे.”
तिचे ते शब्द ऐकून डॉक्टरांचे डोळे पाणावले. आजही कानशिवनीच्या या माऊलीचे नाव निघताच हजारो मातांचे आणि त्यांच्या मुलांचे हात आदराने जोडले जातात. बनाबाई म्हणजे केवळ एक सुईण नव्हती, तर हजारो जिवांना या जगात सुखरूप आणणारी साक्षात ‘दैवी माऊली’ होती.
– मिलिंद अवचित इंगळे
टेलिफोन कॉलनी मुर्तिजापूर
मो.८४८५८६१६२०