साठोत्तरी कालखंडात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जनआंदोलनातून प्रेरणा घेत विविध जातीजमातीतील लेखक लिहिते झाले. त्यांनी आपल्या समाजाचं खर जगणं निर्भीडपणे मांडलं हे सर्वश्रुत आहे.
याच दलित पठडीतील अशोक जाधव यांचे २०१७मध्ये मनोविकास प्रकाशन,पुणे यांनी ‘भंगार’हे आत्मकथन वा स्वकथन प्रकाशित केलं. पुन्हा एकदा ‘गोसावी’ या भटक्या जमातीचं उघडनागड जगणं चव्हाट्यावर आलं. ‘भंगार’ या स्वकथनातील स्त्रीया आणि लहान मुले- मुली यांची भूकेसाठी दिवसभर चाललेली पायपीट अधिक चटका देणारी आहे.या जातीतल्या स्त्रीया दिवसभर उकिरड्यावर जाऊन भंगार गोळा करतात. भंगार गोळा करताना शरीराची होणारी लाईलाई सहन करतात.भंगार विकून आलेल्या पैशातून घरखर्च भागवतात. पुरूष मात्र कुचकामी असतो. उलट त्यांना दारुसाठी पैसे द्यावे लागते एखादेवेळी पैसे न दिल्यास स्त्रीयांना त्यांच्याकडून मरेस्तोवर मार खावा लागतो. हे आत्मकथन वाचत असताना माणूस आतून हादरून जातो. ‘गोसावी’ या जमातीतील लहान मुले-मुली सकाळी सकाळी दारोदारी जाऊन भीक मागतात.. लग्नप्रसंगी ठिकाणी घुटमळतात..पंक्ती उठल्यावर फेकलेल्या अन्नावर कुत्रे डुकरांसह तुटून पडतात.भूक व्यक्तीला काहीही करण्यास भाग पाडते.दुपारी हीच मुलं भंगार गोळा करण्यासाठी वणवण भटकतात. यांची दैनंदिनी अशाप्रकारची असल्याने या मुलांचा शाळेशी काडीमात्र संबंध येत नाही.
‘गोसावी’ या जमातीतील सर्व महत्त्वाचे निर्णय जातपंचायत घेते या जातपंचायतीचे निर्णय कधीच न्यायाला धरून नसतात. यात कुठलाही दोष नसणा-या स्त्रियांवर अन्याय होतो.आत्मकथनातील अनेक प्रसंग मांडण्याची लेखकांची भाषिक शैली प्रभावी आहे. ती वाचकांना खिळवून ठेवणारी आहे.म्हणूनच अल्पावधीतच या आत्मकथनांच्या पाचही आवृत्या विकल्या गेल्या. भंगार प्रत्येकांने आवर्जून वाचावं इतकं ते दर्जेदार आहे.लेखक अशोक जाधव यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा देतो.
प्रा. दिलीप वानखडे
भ्रमणध्वनी – ९३५९३३८८४५