खंडाळपाटीउन निनगुर सात-आठ कोसावं हाये. बीड तालुक्यामदी निनगुरचा आयतवारचा बाजार दांडगा भरत व्हता. ह्या भागातला बळीराजा दुष्काळापायी, पावसा-पाण्याच्या झंजटीपायी कारखान्यावरच्या ऊसाच्या फडात जल्म घिई. हाडकं गळत नाहीत तव्हर मुकादमाच्या तळपायाची धूळ माथ्यावं घिऊन हितला बळीराजा मानानं फिरं. पोरी-बाळी उजवायच्या, जिमीन घियाची, कोर्टात भावकीला मातीत घातल्याचा झेंडा रवायचा, आन काक्र्या कमी जास्ती पेरल्या, बांदावरची काडी हिकडं-तिकडं झाली, की ह्या समद्या प्रश्नायचं उत्तर एकचं! घी उचल आन जा नंदीला!! ह्योच हितल्या बळी गेलेल्या राजाच्या धंदा! निनगूरचा बाजार खिल्ला-या बैलाच्या जोडीसाठी परसिद्ध ह्याच्यामुळंचं हाये.
तुळशीरामानं ह्यातलं कोणतंबी झेंगट नादाला लावून घेतलं न्हाई. तुळशीराबानं जिन्दगीतली नव्वद वर्सं निनगूरच्या बाजारात हेलपाटीत घालिवली. बाजारात मिरच्या इकत घे, कधी गुत्तं घे असं करत, दिसभर उन्हात तळून आल्याल्या किरकूळ नफ्यात सोताची ईड्याची तलफ पुरवायला तो मोठ्या हौसेनं नागिणीची पानं घेई. पानासाटी लागणा-या तंबाकू, कात, चुना अश्या समद्या जिनसा घेई. ईड्याच्या पानात तुळशीरामचा लई जीव व्हता. पानाचा तोबरा भरला आणि वरून तमाकूची चिमूट तोंडात टाकली की तुळशीरामाचा जीवात जीव यायचा. बाजारात मिरच्या गुत्तं घिऊन ईकायच्या पद्धतीत नव्वद वर्सं बदल झाला न्हाई. तुळशीराम संसार रेटीत व्हता. ह्या संसाराची एक मेड पारूनानी व्हती. पर तिला देवानी आगुदर बोलिलं. ती सवाशीन झाली. भरल्या कपाळानं गेली. त्यानंतर तुळशीराम म्हतारा आला दिवस कसा तरी पुढं ढकलीत व्हता. पाच भावाच्या खटल्यात माळवदाच्या खांडाची वाटणीत आल्याली दोन घरं आन पाच एक्कर जिमीन ह्यवडाच तुळशीरामाचा येलईस्तार! पुढं ह्या येलीवर तीन फुलं फुलली. थोरला तिरमक, सगुणा आन धाकला बजीरंग! बजीरंगला सम्दा गाव बजी म्हणत असे. बजीच्या पुढल्या जिन्दगीला काहीसुदीक रंग –हाणार न्हवता ह्याचा पोरवयातल्या बजीला कसा मेळ लागणार व्हता?
थोरला तिरमक कव्हा तुळशीरामावं, कव्हा भावाभैनीवं आरडावरडा करीत असे. त्यानी तुळशीरामाकडं घरादाराचं, जिमिनीचं वाटं घालायचा डाव रचला आन कावा साधून घेतला. सोताचं उखळ पांढरं करून घेतलं. तिरमकचं आसर नावाच्या पोरीबरं लगीन झालं. संसाराचा गाडा रेटत न्हवता. काही वर्सं कारखान्याची उचल घिऊन त्यानं ऊसापाई, उचलीच्या फेडीपाई फडात रगात आटीवलं. त्यामुळं त्याचा संसार सावरला. तिरमक निम्हई नेता छाप कापडं नेशीत व्हता. खांडभर शेळ्या घिऊन ईळानि्माळ डोंगर पालथा घालीत व्हता. ह्या धंद्यात त्याला बरकत आली. त्याचं नशीब ऊजारलं! देवानी त्याचं चांगभलं केलं. बजी एमए पस्तोर साळा शिकला. कुठंतरी सरकारी नौकरी लागाई म्हणून त्यानं जिवाचा लई आटापिटा केला. पण त्याला त्यात यास मिळालं न्हाई. यास मिळायसाठी त्यानं जग पालथं घातलं. पर त्याला म्हाईत न्हवतं, ‘जगायासाटी वारा लागतो तसा नोकरसाटी पैका! तरीबी बजीनं नोकरीपाई कराया लागणा-या खटपटीचा रस्ता सोडला न्हाई. ह्यो रस्ता त्यो सोडणार बी न्हवता.
‘मढं झाकून पेरा उरकिणारी बळीची जात’.ह्या पेरणीपायी, नांगरटीपायी, रानातल्या एका आड्यापायी, आल्याल्या चांगल्या संधीकडं त्यानं कव्हाच बघितलं न्हाई. ईटकरीवं उभं –हाईलेल्या ईट्ठलावानी संधी त्याच्यापुढं उभी –हायली. त्यो काळ्या आईच्या सेवेचं पुण्य मिळवीत व्हता. काळ्या आईच्या प्रेमाला त्यानं मिरविलं. अबीर बुक्क्यावानी त्याच्या कपाळावर घामाच्या धारा शोभून दिसत. पाच एक्करातला दीड एक्कराचा लंबर लंगुट्या पदरात पडायात तसा बजीच्या पदरात पडला. त्यात बी समंद जिमीन कुठंच न्हवती. बजी सव्वीस वर्साचा झाला. त्याच्या डोक्यावं आक्शिदा पडल्या. दोनाचं चार हात झालं. खुट्याला बांधल्यालं जनावर खुट्या भवताली चकरा मारतं तसं बजी संसाराच्या खुट्याभवती चकरा मराया लागला. लग्नाच्या मांडवात जोडीनं पाया पडतानी एका बी डंग-या माणसानी रूपया हातावं ठूला न्हाई ह्या गोष्टीचा दुखवटा बजीच्या मनात व्हता. लई दिस व्हता. बापानी घरात कधी खिळाजोती बघितली न्हाईत. पर बजी पोटापुरती पिकाची रास दरसाली रानात उगवित-फुलवित व्हता. पण चंगळ करायपुरता पैसा त्याच्या हातात खेळत न्हवता. कव्हा बी पोटाला चिमटा घेतल्याला हायेच! मिरा बजीच्या खांद्याला खांदा लावून रगात आटवित व्हती. जिमीन पडीक पडू न्हाई म्हणून बजी वर्सावर्साला तिला नांगराचा फाळ लावून काळ्या आईचं पांग फेडीत व्हता. तिरमक थोरला आसून बी बजीतून आन त्याच्यातून इस्तूबी जात न्हवता. पारूनानीच्या सरणाला आगीनडाग द्यायच्या कारणावरून तिरमकनी बापासंगं आणि गावासंगं वाद घातला व्हता. तिरमक बद्दल गाव न्हाई न्हाई ते बोलला व्हता. धाकल्या भावाच्या नात्याला धरून का व्हईना बजी तिरमकच्या हाताकडं कुठवर बघणार व्हता? एक दिवस सुखासमाधानात जाईल ह्यवडा पैसा मला कव्हा मिळंल? आपुण का कुणाचं वाकडं केलंय म्हणून असल्या भोगाला पचवावं लागतंय? एक ना दोन.. बजीच्या मनात हजारवर ईचाराच्या कोलांग्त्या डोळं चमकीत नाचत व्हत्या. बजीला कुणीतरी समजून घेणारं, धीर देणारं माणूस पाहिजी व्हतं.
चावडीजवळच्या वाही चौकातल्या खंबल्याखाली सांच्यापारी सुखदु:खाची देणी घेणी देत घेत माणसं, पोरंटोरं बसत. तिथं टवाळक्या व्हत्या तशाकुचाळक्या बी व्हत्या. जिन्दगीचा इस्कोट करणारा पत्त्याचा डाव माणसं तांबडं फटकूस्तव्हर मोडीत न्हवती. तिथं रानातल्या काक्र्याबिगर कसल्याच रेषा समजत न्हवत्या असला दैवान्या व्हता, आन बीएस्सीबीएड पस्तोर साळा शिकून नौकरीपाई हिंडणारा बाबाश्या बी व्हता. जगण्यासाठी लागणा-या अनेक भानगडीवं आशा ठिवून जगणारी बक्कळ माणसं, पोरं टवाळक्या करण्यात पटाईत झाली व्हती. बजीबी त्यांच्यातलाच एक व्हता. बाबाश्या शाळामास्तराचा पोरगा. पाठीवर सहा बहिणी. त्यातल्या तिघी शाळामास्तरनी झाल्या, तिघी शिकत व्हत्या. बाबाश्याचा बाप नोकरीतून रिटायर झाला. पण बाबाश्या मामाची राजदूत फटफटी घिऊन भैकल्यावानी फिरायचा. कुणाचं शहरात काम असलं तर बाबाश्या फटफटी घिऊन तयार! पण ज्याचं काम हाये त्यानं फटफटीत जाऊन येण्यापुरतं त्याल वतायचं आन एक दोनदा हाटलात च्या-पानी करायचं ह्यवडीच एक बाबाश्याची अट असे. बाबाश्या आन बजीचा मित्रपणा लई जिगरी व्हता. बाबासायेब आन बजी एकमेकायला केश्या आन नारायण म्हणीत. ह्या नावानं दुसरे कुणी त्यांच्याबरं बोलत नसत. गावातली पंधरवाडी एकादशीची वारी गावातली सम्दी माणसं एकमतानं बजी आन बाबाश्याकडं सोपवित व्हते. बजी आन बाबाश्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घिऊन माघारी येत. दोघाईनी फटफटीवं येढाईला बी चकरा मारल्या. बेकारीतून उजळावं म्हणून येढाबाईच्या नावानं पोत जाळले. शाळा शिकूनबी शाळा न शिकणा-यात त्यांची गणती व्हत व्हती. पुढच्या आयुष्याचं कसं व्हणार असल्या इच्याराची मव्हाळं बजीच्या मनात घोंगावत आणि त्याच्या मनाला पोखरून टाकीत.
संसाराच्या वाटण्या पडल्या तशी तुळशीरामाचीबी वाटणी झाली. काही दिस बजीकडं तर काही दिस तिरमककडं –हायाचं असा इचार झाला. सकाळच्या नेहरीवक्ताला तुळशीराम चावडीपशी म्हता-या दोस्तायसंगं गप्पा कुटी. दुपारच्या येळेला गंपू तात्याच्या मिसनीच्या वट्यावं बसे. आणि लोळत राही. सांच्यापारी टुकडा पोटात ढकलून रानात पडाया जाई. आसे दिवस तुळशीराम लोटीत व्हता. पण पारूनानीच्या आठवणीनं डोळ्यात फुपाटा गेल्याचं सोंग तुळशीरामाला करावं लागायचं. पोट जाळता जाळता सुनाची ग-हाणी आयकून तुळशीराम मनातल्या मनात जळत व्हता. पण म्हतारपणात इलाज चालत न्हवता. सक्क्या लोकायसाठी नाही पण नातायसाठी मया तुटत व्हती. म्हणून त्यो जगत व्हता. पानं खाणं म्हंजी तुळशीरामाचा राजेशाही थाट व्हता. पानं खायचा नाद इसरत चालला व्हता. पानं आणाया जवळ रूपया दोन रूपये नसत. पानं चावायला तोंडात दात राहिले न्हाईत. पानं आणून द्या रं कुणी अशी खुशामत करण्याह्यवडी ताकद तुळशीरामात –हायली न्हवती. वरवर त्याच्या मनात त्याच्या जवानीतल्या काळाचं चित्र रंगत व्हतं. निजामशाहीत धारूरच्या किल्ल्यामंदी, थितल्या ज्हेल मंदी बंद असल्याला दसरत बाबा. पुढं त्यो ज्ह्येल मधून सुटला. पळून गेला. आन डोंगरात लपत लपत जगला. ह्या दसरत बाबाला तुळशीराम स्वत:चा वंशज मानीत असे. दसरतबाबागत तुळशीरामाचं मन जेल मधी बंद व्हतं. आन जिवाला व्हणा-या कळा सोसत न्हवत्या म्हणून मन सरणाच्या कोलाग्त्याकडं धाव घेत व्हतं! ळ तुळशीरामाच्या नशीबानं, संचितानं त्याला हुलकावणी दिली व्हती. ते कुठं दडून बसल्यालं हाये ह्याचा पत्त्या तुळशीरामाला लागत न्हवता.
जिमिनीच्या चार काक्र्या संबाळाया लागणारी म्हेणत, त्यापाई घालाया लागणा-या ईर्जिका, कराया लागणा-या खुशामती, भरल्याल्या कणग्या जिमीन कसायपायी ईकून येणारी उपासमार, आबाळ, वढावा लागणारा संसाराचा पसारा, बेकारीचं भकास वाळवंट..! ह्या सा-या इचाराच्या काहूरात बजीचं काळीज फाटत चाललं व्हतं. बजीच्या जिन्दगीला वसान लागलं व्हतं, रानात चकरा मारून कुळवाच्या पासेला वसान लागतं तसं. पण ते काढाया गेलं तर नियती कोरडा वढीत व्हती. आन कोरड्याला असणारी नशीबाची इळद वसान काढायला कच खात व्हती.!
____________________
– प्रा. सुशील संदिपान केकान
संपर्क – ९६६५९७९१३१
गावरान भाषेचा गोडवा परत परत वाचण्यासारखा.