आपल्या अस्तित्वाच्या शोधात ती उभी…

         निसर्गाची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री व पुरुष. निसर्ग स्त्री व पुरुष या दोघांनाही महत्त्व देतो, म्हणूनच त्याने त्याच्या सृष्टीनिर्मितीमध्ये फक्त पुरुषालाच किंवा फक्त स्त्रीलाच स्थान न देता दोघांनाही निसर्गाचा अविभाज्य भाग म्हणून सामावून घेतले. निसर्गातच स्त्री व पुरुष (नर व मादी) यांना महत्त्व आहे. वनस्पती, प्राणी, मानव यामध्ये नर आणि मादी आढळतात. काही वनस्पतीत नर व मादी हा लिंगभेद होत नसला तरी स्त्री-पुरुष यांचे महत्त्व सर्वच क्षेत्रात आढळते. स्त्री आधी की पुरुष आधी याचे उत्तर विज्ञानाचा आधार घेतला तर असे दिसून येते, की पुरुषांची निर्मिती होण्याआधी स्त्री निर्माण झाली. स्त्री शरीरातील एक्स, एक्स मध्ये बदल होऊन वाय निर्माण झाला. यातून पुढे पुरुषांची निर्मिती झाली. प्राचीन ऐतिहासिक संदर्भ शोधले की असे आढळते, स्त्री आणि पुरुष ही समाजाची गरज आहे, समाजाचे अस्तित्व टिकून राहायचे असेल तर कुटुंब व्यवस्थेत स्त्री पुरुष असणे महत्त्वाचे आहे. समाजाचे सातत्य हे कुटुंबावरच अवलंबून असते व कुटुंब हे स्त्री आणि पुरुष या दोघांतूनच बनत असते. वैदिक काळापासून स्त्री-पुरुष व्यवहार, अधिकार, कार्य इत्यादींचा संदर्भ घेतला, तर असे आढळते की वैदिक काळामध्ये पुरुषांप्रमाणेच स्त्रीचा दर्जा समान होता. स्त्रीलाही ऋचा ,यज्ञ करण्याचा संधोवधू म्हणून राहण्याचा अधिकार होता. पुढे मात्र भारतावर अनेक आक्रमणे झाली आणि स्त्रीचे वैदिक काळातील असणारे स्वातंत्र्य, अधिकार ,समानता हळूहळू लयास गेली. स्त्रियांची होणारी विटंबना नको म्हणून शत्रूच्या हाती स्त्रिया लागू नयेत म्हणून बालविवाह, सती, जोहर परंपरा निर्माण झाल्या. राज्यस्थानात प्रचलित असणारी समाजमान्यपरंपरा जलजोहर, अग्नी जोहार, विष प्राशन ही काही स्त्रीचे अस्तित्व मिटवण्याचीच काही उदाहरणे. स्त्रीला एके ठिकाणी देवी म्हणून देव्हाऱ्यात स्थान द्यायचे व दुसऱ्याच ठिकाणी गुलामांची गुलाम म्हणून हिनवायचे. पुरुष जसा रूढी, प्रथा ,परंपरांचा गुलाम असतो, त्याचप्रमाणे पुरुषाची गुलाम स्त्री असते. रूढी, प्रथा ,परंपरा टिकवण्याचे काम स्त्रीचे मानले जाते. पुरुषाला मात्र याचे उत्तरदायित्व दिले जात नाही. एखाद्या पुरुषाने कर्तबगारी केली तर त्याच्या पराक्रमाचे दाखले लिहून ठेवले जातात. युगांत योग्य सांगितले जातात पण स्त्रीच्या पराक्रमाबाबत मात्र असे क्वचितच होताना दिसून येते. स्त्री स्वयंपाक घरात असताना जितकी शोभून दिसते, तितकीच ती एखाद्या सिंहासनावर बसलेली असतानाही शोभून दिसते, पण तिचे अस्तित्व समाजाला मान्य नसते. स्त्रियांनी चौकटी बाहेर जाऊन काम करू नये, पण आपातकालीन परिस्थिती आली की मात्र आपली स्त्रीत्व सोडून पुरुष व्हावे अशी समाजाची मानसिकता दिसून येते. त्यावेळी तिला तू पुरुषाप्रमाणे निर्णय घे, पुरुषाप्रमाणे भावना बाजूला ठेव, असे उपदेश केले जातात. पतीच्या मृत्यूनंतरही मुलांना वडिलाप्रमाणे वागव असे सांगितले जाते. ती आई असून सुद्धा तिचे आईपण तिथे उणे पडताना दिसून येते. पुरुषाच्या पराक्रमाला जसे पुरुषार्थ म्हटले जाते तसे स्त्रीच्या पराक्रमाला स्त्रियार्थ असं म्हटलं जातं का? तिथेही तिची तुलना करत असताना पुरुषाची करून स्त्रीच्या पराक्रमालाही पुरुषार्थ केला असेच म्हटले जाते. स्त्रीसुद्धा पुरुषाप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका कुटुंबात वडीलधारे असो अगर नसो, आपली भूमिका पार पाडते, त्यावेळी तिला तिने स्त्रियार्थ केला असे म्हटले पाहिजे . संसारात आपली भूमिका पार पाडणे हे स्त्रीचे काम आहे, ते तिने केलेच पाहिजे, असी सक्ती तिच्यावर होताना दिसते. त्या सक्तीत तिचे अस्तित्व तिला शोधूनही सापडत नाही . पुरुषाला न जमणारे असामान्य काम, स्त्रीने केले तरी, तिने काम केलेच पाहिजे, असे म्हणून तिचे कर्तुत्व तिथं नाकारले जाते. स्त्रिया ह्या गुलामांच्या गुलाम आहेत व त्यांना गुलाम करण्यामध्ये प्रामुख्याने पुरुषांनी लिहिलेले धर्मग्रंथ कारणीभूत असलेले दिसून येतात एकाही धर्मग्रंथांची निर्मिती स्त्रीने केलेली नाही, कारण शिक्षण, अस्तित्व, समता, न्याय ,स्वातंत्र्य ही मूल्ये तिला सांगण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा वारसा कोणी चालवलाच नाही. शिक्षण हे प्रथम पुरुषांनाच दिले गेल्यामुळे पुरुषांनी आपल्या पद्धतीने धर्मग्रंथ लिहिले, या धर्मग्रंथांमध्ये पुरुषांनी आपले स्थान वरिष्ठ व स्त्रीचे स्थान कनिष्ठ केले, त्यामुळे धार्मिक कार्यामध्ये पुरुषाच्या हाताला नुसता हात टेकवण्या पलीकडे स्त्रीची कोणतीच भूमिका नसते. एखाद्या देवीच्या मंदिरात देखील पुरुष पुजारी देवी स्त्रीला साडी नेसवतो, तिथे स्त्री पुजाऱ्याला मज्जाव असतो, याचं आपणास काहीच वाटत नाही, स्त्री पुजारी ऐवजी, पुरुष पुजारी कित्येक वेळा भाव खाऊन जातो. स्त्रियांचे पौराहित्य घरात जितक्या कौतुकाने सांगितले जाते, तितके मोठ्या देवस्थानांमध्ये पाहणे दुर्मिळ आहे. काही ठिकाणी तर मासिक धर्माच्या काळाला तो स्त्रीचा विटाळ समजून तिला मंदिर प्रवेश, प्रसाद बनवणे, शनीच्या ओट्यापर्यंत जाणे, हनुमानाच्या मंदिरात जाणे, प्रतिबंधित केले जाते. मंदिरात जर देवी असेल तर तिला साडी नेसवण्यासाठी शृंगार करण्यासाठी स्त्री पुजारी पाहिजे. स्त्री-स्त्रीचं मन व्यवस्थित समजू शकते, हे मात्र समाज व्यवस्था समजत नाही. सावित्रीबाई फुले या भारतीय स्त्रीवादाच्या खऱ्या अर्थाने जनक. महात्मा फुलेंनी स्त्रीला ‘मानव’ म्हंटले आणि त्यानंतर कुठेतरी स्त्रीकडे ‘माणूस’ म्हणून पहावयास सुरूवात झाली.

         भारतातील स्त्रियांना शिकायला व पुरुषांच्या बरोबरीने समाजात वावरण्याचा दर्जा मिळाला, तो केवळ महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. स्त्रीसुद्धा पुरुषांच्या तुलनेत कुठेच कमी नाही, हे सांगण्याकरिता ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी स्त्रीचे स्थान कसे वरिष्ठ आहे, हे दाखवलेले आहे. पुरुष जाणीवपूर्वक स्त्रीला दुय्यम लेखून त्रास देतो, याची त्यांनी केलेली मांडणी आजही ते पुस्तक वाचले, की समाजाला सहन होत नाही. पुरुषांच्या दुटप्पी वर्तणुकीवर आपल्या लेखनातून परखड टीका करून त्या स्त्रियांची बाजू घेतात. आपल्या भोवताली आपण पाहतो, की स्त्रीला गृहलक्ष्मी, गृहमंत्री, घराची राणी असे म्हटले जाते, ते केवळ स्त्री पोटी असणाऱ्या प्रेमापोटी. तिने कुटुंबात कोणतीही नकारात्मक भावना न ठेवता कुटुंबातील सदस्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळावे, कुटुंबातील सर्व गोष्टी व्यवस्थितरीत्या कुरकूर न करता कराव्यात, घराचे अस्तित्व टिकवून ठेवावे, संसार मार्गी लावावा, मुलाबाळांचे, सासू-सासर्‍यांचे सर्व काही करावे. त्याचबरोबर पती सेवेत कुठेही खंड न पाडता, काम करावे, म्हणून तिला गृहमंत्री, घराची राणी, घराची लक्ष्मी असे म्हटले जाते थोडक्यात स्त्रीला शोषक बनवण्यासाठी, तिला वेगवेगळी विशेषणे देऊन, तिच्या अस्तित्वाची जाणीव होऊ न देता, गुंडाळून ठेवले जाते. स्त्री ही अशा विशेषनांना बळी पडून आपले स्वतःचे अस्तित्व, शिक्षण विसरून कुटुंबासाठी झिजवताना दिसून येते. तेच कुटुंब, त्या स्त्रीची आवड-निवड पाहते का? हा देखील मोठा प्रश्न आहे. स्त्रीला वेगवेगळी विशेषणे लावून, तिच्यावर शब्दांची भुरळ पाडून, घराच्या चार भिंतीतच कोंडले जाते, ही वस्तुस्थिती समाजात पाहत असताना, ते नाकारण्याचे धाडस करता येत नाही.

         आज राजकारणाचे क्षेत्र जर आपण पाहिले तर स्त्रियांचा शिरकाव तिथे खूप कमी दिसतो. राजकारणात सहभागी होण्यासाठी स्त्रिया आजही कुठेतरी कचरताना दिसून येतात. स्त्री उंबरठा ओलांडून घराच्या बाहेर आपले कर्तुत्व दाखवण्यासाठी बाहेर पडते, त्यावेळी समाजाला स्त्रीचे अस्तित्व कुठेतरी खटकते, तिने मैत्री व आपुलकीच्या भावनेने एखाद्या परपुरुषाशी साधे संभाषण जरी केले तरी त्याचे अनर्थ लावले जातात आणि त्या स्त्रीच्या चरित्रावर शिंतोडे उडवले जातात. त्यामुळे स्त्रिया कुठेतरी राजकारणात येण्यास व पात्रता असूनही सहभाग दाखवण्यास कमी पडताना दिसून येतात. आज ज्या स्त्रिया आपणास राजकारणात दिसून येतात त्या केवळ त्यांचे वडील, पती, मुलगा ,भाऊ , सासरे,राजकारणात आहेत म्हणूनच. त्या कुटुंबाच्या राजकीय वारशामुळे, सत्तेवरती आलेल्या आहेत. स्वतःच्या कर्तुत्वावर निवडून आलेल्या स्त्रिया, हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच दिसून येतात. समाजाचे धोरण स्त्रियांच्या बाबतीत नेहमी दुटप्पी राहिलेले आहे. सततच्या होणाऱ्या युद्धांमध्ये ज्यावेळी पुरुष सैनिक मोठ्या प्रमाणात मारले जाऊ लागले, त्यावेळी अपत्यहीन विधवा स्त्रियांकडून नियोग पद्धतीने समाजाने पुत्रप्राप्ती करून घेतलेली दिसून येते. समाजाचे हे स्वरूप गरजेनुसार बदलणारे असते. समाज बदलत नाही, असे म्हणतात पण समाज देखील हळूहळू बदलत असतो. पण त्यातील बदलाचे प्रमाण मंद गतीने असते, ते सहज पचनी पडत नाही. मध्ययुगीन काळामध्ये स्त्रीचा पती निधन पावला, की त्या स्त्रीला सती जाणं हा एकमेव मार्ग होता. विधवा जीवनामध्ये असणारे कडक नियम, समाजापासून क्षणोक्षणी होणारी अवहेलना, सुखमय क्षणांची वंचितता, क्षणोक्षणी विवाह, बारसे, मुंज, शुभकार्य, प्रसंगानुरूप येणारे गौणत्व नको म्हणून बहुतांश स्त्रिया ह्या सती जात असत, पुढे मात्र छत्रपती शिवाजी महाराज, राजा राम मोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे स्त्रीच्या सती जाण्याला कुठेतरी प्रतिबंध आला, त्यातच ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यांमुळे विधवा स्त्रीला काही प्रमाणात माणूस म्हणून जीवन जगणे शक्य झाले.
पण समाजाने स्त्रीला दुसऱ्या विवाहाला प्रतिबंध करून तिच्या स्वातंत्र्यावर, तिच्या आवडी निवडीवर,  तिच्या विचारांवर प्रतिबंध घातलेला दिसून येतो. उत्तराधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरुषांच्या एकूण लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. आजच्या काळातही समाज आपले स्वरूप बदलताना दिसून येतो. कधीकाळी विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अपत्य असलेल्या स्त्रियांना आपली पत्नी बनवण्यास कोणी तयार होत नव्हते, असे लग्न समाज सहज स्वीकारत नव्हता, पण मुळातच स्त्रियांची लोकसंख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्यामुळे आज सर्रास विधवा, घटस्फोटीत, एका मुलाची आई असणाऱ्या स्त्रीचे विवाह समाज स्वीकारतो, ही आनंदाची बाब आहे. समाजाने अशी परिवर्तने नेहमी स्वीकारली, तर स्त्रियांचे अस्तित्व ध्यानात येईल.
         स्त्रियांमध्ये आर्थिक सक्षमीकरण नसल्यामुळे त्यांना पुरुषी मानसिकतेला बळी पडून अनेक प्रकारचे अन्याय सहन करावे लागत होते. आज सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणामुळे स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली आहे. समाजामध्ये स्त्रीला शिक्षणामुळे मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकामध्ये सिमोन द बोउआर असे म्हणतात की ,”स्त्री कधी जन्माला येत नाही ती घडवली जाते” एखाद्या पुरुषालाही लहानपणापासूनच स्त्रीप्रमाणे वागवले तर पुरुष सुद्धा स्त्री होऊ शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीला लहानपणापासून पुरुषासारखे वागवले तर ती पुरुषार्थ गाजवू शकते. समाजात होणारा भेदाभावच त्यांच्या पुरुषार्थाला कुठेतरी दुय्यम लेखताना दिसतो. आज मुली सुद्धा कुटुंबाचा आधार बनत आहेत. मुलाचा हव्यास कमी होऊन, मुलगी जन्माला प्राधान्य दिले जाते. काही कुटुंबात मुली हेच अपत्य असलेले दिसून येते, ही गौरवाची बाबा आहे. आपल्या अस्तित्वाच्या शोधात असणारी स्त्री, आपले अस्तित्व शोधत असताना शिक्षण व आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर पुरुषांवर अन्याय, अत्याचार करतात, त्याच्या भावनेचा विचार करत नाहीत, तिला घडवणाऱ्याचेच अस्तित्व नाकारतात, हे अतिरेकी सक्षमीकरण महिलांना रसातळाला नेणारे आहे. पुरुष कितीही दुष्ट झाला, तरी स्त्री ही दुष्ट होऊ शकत नाही, कारण तिच्याकडे मन, भावना, संवेदना, हृदय असते. तिला लहानपणापासूनच जे संस्कार दिले जातात त्या संस्कारांमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन चालावे, सगळ्यांचा सन्मान करावा, दुसऱ्याचे मन जपावे, भावनांचा आदर करावा, स्वतः उपाशी राहून दुसऱ्याचे पोट भरावे, असेच तिला शिकवले जाते, पण थोड्याशा आर्थिक सक्षमीकरणामुळे स्त्रिया दुसऱ्याला दुय्यम लेखत असतील तर त्या स्वतःचा आत्मघात स्वतःच करून घेत आहेत, असेच म्हणावे लागते. स्त्रीला उंबरठ्यावर जाऊन कार्य करण्यासाठी कोणताही पुरुष अडवत नाही, तिला प्रोत्साहन देतो, पण उंबरठ्याबाहेर जाण्याआधी तिला सांगितले जाते की आपली संस्कृती, परंपरा, खानदान त्यामुळे तिची इच्छा असूनही, खूप साऱ्या गोष्टींचे बलिदान करावे लागते. स्त्रीला चंद्रापर्यंत जाण्याचे स्वातंत्र प्राप्त जरी झाले असले तरी तिला चंद्रावर जाण्याआधी घरातील पोळ्या, धुनी, भांडी करूनच जावे लागते व या पोळ्या, धुनी, भांड्यातून चंद्रापर्यंत जाण्याचे स्वप्न तिचे अर्धवटच राहते. घरातून मुक्तता होत नाही, म्हणून ती चंद्रापर्यंत पोहोचत नाही. अशा कितीतरी स्त्रिया ज्या बुद्धिमान, पराक्रमी आहेत, त्यांचे करियर खोट्या प्रतिष्ठेच्या नादात बरबाद झाल्याचे दिसून येते. आज स्त्रीला अडवले जात नाही पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी घरातील सर्व कामे करून जा, असे मात्र सांगितले जाते. त्या कामांमध्ये तिला कोणतीही मदत केली जात नाही. असे पतंग सारखे स्वातंत्र्य स्त्रीला मिळाले आहे, ज्या पतंगाची दोरी कुठल्यातरी पुरुषाच्या हाती आहे, त्यामुळे तो जितकी ढील देईल तितकेच तिला उडता येते, ढील संपली की पतंग ओढून घेतो. स्त्रीच्या अस्तित्व असेच असते, आकाशातल्या पतंगासारखेच, जोपर्यंत धागा कोणाच्या तरी हातात आहे, तोपर्यंत स्त्रीच अस्तित्व असते, एकदा हातातून धागा तुटून गेला की दिशाहीन पतंगासारखे चिंध्या चिंध्या होईपर्यंत स्त्रीला अस्तित्व शोधावे लागते. तिचे अस्तित्व कुठून सुरू होते, कुठे संपते, हेच समजत नाही. पारंपरिक कथा, दंतकथांमध्ये स्त्रीचा वडिलांच्या घरी जन्म व पतीच्या घरी मृत्यू असाच मानला गेलेला आहे.लहानपणी वडिलांच्या धाकात, मोठेपणी भावाच्या धाकात, लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या धाकात, वृद्धपणी मुलाच्या धाकात तिला राहावे लागते, त्यामुळे तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग तिचे अस्तित्व. तिला विनासायास गवसत नाही, आपल्या अस्तित्वाच्या शोधात ती आत्ताही क्षितिजाकडे टक लावून उभी आहे.

प्रा. डॉ. मनीषा यादव

– प्रा. डॉ. मनीषा यादव 

श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर.

1 thought on “आपल्या अस्तित्वाच्या शोधात ती उभी…”

  1. समाजातील वास्तव मांडणी आपण लेखात केली आहे. भेद अचूक टिपले आहेत. मते खंभीरपणे मांडणे स्वाभाविकच यातून जाणवते . अभिनंदनीय लेख …….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top