मिरूग लागून गेला तरी, आभाळ कसे सुन्न आहे,
काळ्याभोर मातीलाही, तहानेचे दु:ख आहे.
पावसाळ्याचे दिवस आले, तरी कोरडीच वाट,
भेगाळलेल्या शिवारावर, नुसताच उन्हाचा थाट.
डोळे लावून आकाशाकडे, बळीराजा वाट पाही,
अंत पाहतोस किती रे, माझी काय चूक नाही?
नांगरून ठेवलीत रानं, बी-बियाणे सज्ज आहेत,
तुझ्या एका इशाऱ्यासाठी, आम्ही श्वास रोखलेत.
वाऱ्याची एखादी झुळूक, खोटीच आशा देऊन जाई,
पांढुरके ढग आकाशात, नुसतीच हुलकावणी देई.
सुकून चाललीये आशा, आटून चाललेत प्राण,
तुझ्याविना रे सावळ्या, कोण राखेल इथला मान?
किती पाहू वाट तुझी, डोळ्यांतही आता कोरड आहे.
तुझ्या येण्याच्या आशेवर, ही उभी हयात तरणार आहे.
माझ्या राबणाऱ्या हातांना, तूच देतोस रे बळ,
तुझ्या एका थेंबासाठी, तळमळतेय इथली दरवळ.
बरस रे माझ्या सख्या, आता नको करू उशीर,
सुटून जाईल नाहीतर, या बळीराजाचा धीर.
मातीच्या या आक्रोशाला, आता तरी धावून जाय!
हिरवा शालू नेसवून, सजव माझी काळी माय,
– विजय बेलखेडे
‘साहित्यामूलाग्र’ संपादक