भीमा तू होतास म्हणून,
आम्ही आज आहोत तरी…..
तू नसतास,
तर तशीच पडून राहिली असती आम्हची कलेवर
गावकुसाबाहेर आणि कुत्र्यानंही शिवलं नसतं आम्हाला.
भीमा तू होतास म्हणून,
आम्हाला मान आहे,
जगात आमची शान आहे.
तू नसतास,
तर निघत राहिल्या असत्या आमच्या धिंडी,
गाढवालाही लाज आणणाऱ्या.
भीमा तू होतास म्हणून,
राहायला माडी आणि फिरायला गाडी आहे.
तू नसतास,
तर पाण्याच्या थेंबासाठी पडले असते आमचे मुडदे
आणि बाटवल्याही नसत्या आपल्या चोची गिधाडांनी.
भीमा तू होतास म्हणून,
दिली समता, स्वातंत्र्य, न्यायाची भाषा.
तू नसता,
तर आम्हाला माहीतच पडलं नसतं, आमच्या कंठातही आहे वाणी.
भीमा तू दिलं शिक्षणरुपी शस्त्र हाती,
म्हणून आमच्या जगण्याला नवी दिशा मिळाली,
नाही तर जगत पडलो असतो त्याच वनव्यात आपलं प्राक्तन म्हणून.
भीमा तू दिलस
शांती संयमाच बुद्ध रूप आम्हाला म्हणून,
आम्ही जगतोय ‘अत्त, दीप, भव’च्या मार्गाने.
भीमा तू होतास म्हणून…….
– मोक्षदा विजय बेलखेडे