धम्मसूर्या, तुम्ही धम्म दिला, अंधार सारा सरला,
नव्या युगाचा, नव्या आशेचा, सूर्य नभी अवतरला.
अस्पृश्यतेच्या शृंखला तोडूनी, दिला सुटकेचा श्वास,
माणूस म्हणून जगण्याचा, तुम्ही दिला आम्हा ध्यास.
खितपत पडलो होतो आम्ही, काळोखाच्या गर्तेत,
तुम्ही जागविले स्वाभिमानाला, आमच्या मरगळल्या रक्तात.
भेदाभेदाच्या भिंती पाडल्या, माणुसकीच्या नात्याने,
जगायला शिकविले आम्हा, बुद्ध-धम्माच्या वाटेने.
माणूस माणसाशी जोडला, प्रज्ञेच्या त्या प्रकाशात,
मैत्री आणि करुणेचा, दरवळ भरला या विश्वात.
समतेचा हा महामंत्र, काळजावर आम्ही कोरला,
तुमच्यामुळेच उद्धार आमचा, या मातीमध्ये ठरला.
चवदार तळ्याचे पाणी आता, अमृत होऊन वाहते,
तुमची लेखणी अन्यायाला, आजही सडेतोड उत्तर देते.
नतमस्तक आम्ही चरणी तुमच्या, भीमराया उपकार तुझे,
धम्म दिला अन् दिला सहारा, हेच भाग्य थोर आमुचे!
– विजय बेलखेडे