कसला तरी भिसूर आवाज माझ्या कानी पडला.
“तू येणार होतास काय झालं?”
‘हो !… येतोय, नेमकीच तर माझी मौत झाली.’
मौत झाली तसं मला कपड्यात गुंडाळल्या गेलं. माझ्या हातपायाला धरून लेकरं रडू लागली. माझी पत्नी धायमोकलून रडल्याने घायाळ झाली. काळोखाशिवाय तिला तिच्या आयुष्यापुढे काहीच दिसेना. मला ती आवाज देत उठवू लागली. माझी मुलं ‘पप्पा उठाना, उठाना’ म्हणून रडतच मला हलवू लागली. सारी वस्तीच पत्नीच्या आवाजानं हादरून गेली. ती इतकी रडली की शेवटी बेशुद्ध झाली. कामधंदे सोडून घरी आलेल्या स्त्रिया माझ्या पत्नीला समजावू लागल्या. काय झालं… काय झालं म्हणून शेजारी-पाजारी गोळा होऊ लागले. फारवेळानंतर माझी पत्नी शुद्धीवर आली. अचानक काय घडलं म्हणून स्त्रिया तिला विचारू लागल्या. तिची मनस्थिती ठिकाणावर नव्हती. ती फक्त रडतच होती. तिला काहीच समजेना तरी एक स्त्री पुन्हा पुन्हा विचारतच होती.
‘मंदा, अचानक असं काय घडलं वं?’
‘काय सांगू’
शांत हो बरं पहिले’
‘काय होणार माय शांत, आता पुढं कसं,’ म्हणून ती रडतच होती.
‘होईल ठीक, धीर धर, लेकरांकडे बघ.’
‘कसा धीर धरू.’
‘जसं पुढं येईल, तसं निभवायचं, शांत हो !’
‘माझ्या लेकराचं कसं’
‘लेकरं शिकतायत, हुशार आहेत की.’
‘नाही माय, पुढं सारा अंधारच, कसं होईल त्यांचं.’
‘बस, पुरे झालं, शांत हो !’ म्हणून बसलेल्या स्त्रिया तिला शांत करीत होत्या. तिचा स्वभाव चांगला असल्याने तिचे संबंध घरी आलेल्या स्त्रियांशी जवळीकीचे होते. तिला त्या धीर देत. तरी पण तिच्या रडण्याचा आवाज थांबत नव्हता. ती लेकरांना जवळ घेऊन रडतच होती. मी मात्र डोळे मिटून संसाराचं वाटोळं मीच केलं म्हणून मनाला कुरतडून आठवत होतो.
होतं तरी काय माझ्याजवळ मायबापानं शिकवलं, त्यामुळे माझी मास्तरकी सुरू झाली; घरात सुखाचे दिवस येतील अशी आशा मायबापाची वाढली. मोल मजुरी करणं सुटून जाईल. त्यांना वाटलं, मी नोकरीला लागलो साऱ्या नात्यागोत्यात झालं. नात्यातीलच सोयरीक जमवून लग्न उरकून टाकावं, माझ्या मायबापाला वाटायचं, पण माझ्या पसंतीनं कुळाशी अन् कसल्या नात्याशी संबंध नसणाऱ्या मंदाशी मी लग्न केलं. कॉलेजला सोबत असल्यानं मंदाची अन् माझी ओळख होती. तिनं तिच्या घरच्यांना सांगून नातं जोडलं. माझ्या मायबापाचा हिरमोड झाला. पण मी म्हणतोय म्हणून होकार दिला आणि माझं लग्न उरकून टाकलं. तीन मुलांचा बापही झालो. कर्जावर घर घेतलं. सारं सुखात चाललं. ‘आत्याला, मामजीला इकडे घेऊन या’ मंदा दोन-तीन वेळेस बोलली. माझ्या मायबापाची काळजी करायची. त्याच्या खर्चासाठी तिच पोस्टानं काही पैसे पाठवायची. मी कसा काय
इतका निसंग झालो मायबापालाही भेटणं माझं मुश्किल झालं.
‘घेऊन येईल’
‘पण कधी ?’ ती म्हणाली.
पुढच्या महिन्यात म्हणून मी पुढे बोलणं टाळायचो.
ही सारी नोकरदारांची वस्ती, इथं गाड्या बंगल्यातली माणसं, चित्रविचित्र बनियन, हाफ पॅँट घालून स्वतःला स्टँडर्ड समजणारी माणसं, हातात कुत्रे धरून सकाळीच फिरण्यासाठी निघतात. रात्र झाली की धाब्यावर जेवतात. इथं माय-बापाला आणणं मला संकुचित वाटायचं. कधीमधी भेटण्यास त्यांना गावाकडे जायचो. ‘मजुरी करणं थांबवा’ म्हणायचो तरी हातचं काम त्यांचे सुटत नव्हतं. एकदा भेटण्यास ते माझ्याकडे आले. मंदानं पाहुणचारही केला. त्यांना चार-पाच दिवस इथं राहायचं होतं. सुखाचा संसार लेकाचा बघायचा होता, पण मीच त्यांना त्याच दिवशी सायंकाळी गावाकडे पाठविलं त्यांच्यामुळेच मी मास्तर झालो, याचा मला विसर पडला. मला मायबापाची लाज वाटू लागली. मला शहरी वातावरणाशी जुळवून घ्यावं, असं नेहमी वाटायचं. आकर्षित करणाऱ्या गोष्टीकडे मी आकर्षित व्हायचो.
पूर्वी दोन वेळचं जेवण भेटणं कठीण असायचं. पण, इथल्या नवीन जीवनशैलीमुळे टॉमीसाठी मी मांसाहारी खाद्य आणायचो, टॉमी… माझा कुत्रा, त्यावर माझा फार जीव राही. फिरण्यासाठी सकाळीच त्याला घेऊन जाई. ड्युटीवरून आल्यावर रात्री मित्रासोबत बारमध्ये राही. बहीण, भाऊ, नातेगोते मी विसरलो. विसरून गेलो. एका नव्या स्टाईलनं जगू लागलो. इथं मायबाप कशाला असं वाटायचं. परंतु मंदाला त्यांची काळजी वाटायची. याचा मला अभिमान असायचा. पण, मीच तिला काळ ठरलो. विचारांची रेलचेल व्हायची जसजशी गर्दी वाढली तसतशी मंदा जोरात ओरडायची हे आतून मला सतवायचं, तिच्याजवळ बसलेल्या स्त्रिया तिला आवरायच्या, शांत करायच्या, तिथलं सारंच वातावरण शोकाकुळ बनलं.चारचौघांनी उचलून मला अंगणात नेलं. शेवटची अंघोळ करून तिथं ठेवलेल्या दोन बांबूला आवळून बांधलं. हार तुरे अंगावर टाकून मला माझ्याच गाडीत टाकलं. मी नुकतीच मोठी नवीन गाडी घेतली होती. बँकेचे हप्तेही सुरू होते. श्रीमंतासारखं दिसावं नेहमी मला वाटायचं पण, तिच गाडी मला स्मशानभूमीकडे घेऊन जात होती. बाजूला बसलेली मंदा भविष्याचा वेध घेत होती. स्मशानाकडे येत असणाऱ्या माणसाकडे बघून ती कावरी-बावरी झाली होती. व्याकूळतेनं बघत माझी मुलं मंदाला चिपकून बसली होती. हे सारं मला माझ्या मिटलेल्या डोळ्यातून दिसायचं. घडलेल्या घटनेस मीच जबाबदार म्हणून मनाला खात राहायचं. मीच अपराधी, दोषी, मी चुकलो, चुकून गेलो, चूक सुधारलीच नाही. मास्तर असूनही बिघडत गेलो. मंदा कधीकधी चिडून बोलायची, मी ऐकायचो नाही. मी माझ्या सुखी संसाराची राख-रांगोळी केली. दुःखाच्या खाईत लोटलं. जगात मूर्ख माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. का केलं मी हे? कशासाठी केलं? माझे मलाच प्रश्न पडत आणि स्मशानभूमीजवळ येणाऱ्या गिट्टीच्या खडबड रस्त्यानं गाडी गचके घ्यायची. त्यामुळे मलाही झटके बसायचे. ‘नीट धरा ताई, नीट पकडा,’ ड्रायव्हर माझ्या पत्नीला म्हणायचा. तिने मला पकडून धरलं. माझ्या काळजाला स्पर्श झाल्यासारखं वाटलं. नाही ते विचार मनात यायचे. मी मनानं खचलो, कुठून बुद्धी सुचली मी वाम मार्गानं लागलो. त्या मार्गाची धुंदी इतकी चढली की त्याची नशा साऱ्या अंगात शिरली. मी माझ्या लेकरात फार काही वेळ नसायचो. मंदाचीही फसवणूक करायचो. काही कारणं सांगून बाहेर पडायचो. घरात अडचणी निर्माण व्हायच्या पण, बाहेरचे लाड पुरवायचो, एकदा मंदानं समजही दिली होती.
“लोक काय म्हणतात, ते माझ्या कानी आलयं,”
“कशाचं ?”
“तुमच्या वागण्याचं,”
“काय म्हणतात ते, मी मूर्ख आहे की दुसरी एखादी ठेवली,”
“तुमच्या तोंडून निघालं ते,”
“बावळट तर नाहीस तू,”
“तसं नाही, लोकात चर्चा होती, तुमच्या बाबतीतली,”
“लोक काहीही म्हणतील, तुला ही तेच वाटतं का?,”
“हो, उगीच लोक चर्चा करीत नाहीत. काय करणार तुम्ही ओरडून ती बोलली. ‘काय करणार म्हणजे, माझ्यावर संशय घेते, तोंड सांभाळून बोल, थोबाड फोडील.’ मीच तिला धमक्या देऊन तिचं तोंड बंद करायचो. पण, तिची भीतीही वाटायची. मंदा ठीक बोलती मनाला पटायचं अन् पुढे वस्तीत मी बदनाम होत गेलो. तिथली माणसं संशियत नजरेनं बघत. ती माणसं अबोल होत गेली आणि मग वस्तीच नकोशी झाली. तिथे करमेना, कशात जीव लागेना अन् इथून दुसरीकडं जाणं जमेना. मी अडकलो, पेचात पडलो असलं जगणं नको या विचारानं माझी झोप उडून गेली. सततच्या त्याच त्याच विचारानं आयुष्य संपून टाकावं असं वाटायचं अन् आज नेमकं तेच घडलं. ड्युटीवरून घरी आल्यावर एकदमच डोळ्यावर अंधारी आली. अंगातली सारी शक्ती छातीत एकवटली मला चक्कर येऊन मी धाडदिशी अंगणात कोसळलो, तिथंच माझी मौत झाली. सारं मागचं आठवायचं. माझं काळीज तडफडू लागलं, ‘मंदा मला तू पकडून धरू नकोस, सरणावर जाऊ दे, मीच तुझ्या दुःखाचं मूळ आहे.’ मी बोलता होऊन गाडीही स्मशानभूमीत पोहचली. नात्याची, वस्तीतल्या लोकांची गर्दी तिथं जमा झाली. ठेवलेली ती तिथं दिसू लागली. लोक तिच्याकडं बघू लागले. ठेवलेलीच्या मुळं मंदाच्या संसाराला आग लागली, त्या आगीतच तिचा संसार उद्ध्वस्त झाला. तिथली जमा झालेली काही माणसं बोलू लागली. मला सरणावर चढवलं, ते पेटविल्या गेलं. मी तडफडू लागलो. पुन्हा तो भिसूर आवाज माझ्या कानी आढळला. मी शेवटची जोरात आरोळी ठोकली अन् दनकल् टवकी फुटून गेली. तेवढ्यात, ‘बेट्या भोग तुझ्या कर्माची फळं,’ म्हणून स्मशानभूमी खदखद जोरजोरानं हसू लागली अन् तिथली माणसंही घराकडे चालती झाली. धीट मनानं मुलांना घेऊन मंदा उभ्या आयुष्याकडे बघू लागली.
– प्राचार्य एकनाथ खिल्लारे
छत्रपती संभाजीनगर
भ्रमणध्वनी – 91581 50156