बाबा, बाबा म्हणताना, उमटती ओठांवर गाणी,
तिच्या साध्या शब्दांत असते, सप्तसुरांची मधुर वाणी.
बोल तिचे बोबडे अन्, निरागस ते रूप,
कधी मांडते कोडी, कधी होते ती चूप.
दुडूदुडू धावता ती, पैजणांचे घुंगरू वाजती पायी,
तिच्या एका हसण्याने, मरगळ निघून जाई.
सोडून देऊन खेळणी, जेव्हा मिठीत ती येते,
दिवसभराचा सारा क्षीण, क्षणात हरवून नेते.
कधी खोटेखोटे रडणे, कधी रुसवा तिचा भारी,
बाबाच्या गळ्याभोवती, मग हातांची मिठी न्यारी.
तिचे प्रश्न असतात अजब, जसे चांदण्यांचे जाळे,
तिच्या सोबतीने फिरती, आनंदाचे हे पाळे.
घराचे घरपण जपणारी, ही छोटीशी परी,
तिच्या पाऊलखुणांनी, नंदनवन झाले घरी.
बाबा शब्दाची गोडी, तिच्यामुळेच कळली,
जणू फुलांच्या ताटव्यात, कळी नवी फुलली.
– विजय बेलखेडे