‘मिलिंदचा सुवर्णपुत्र’

        नवीनच गावात शाळा सुरु झाली होती. सध्या दोनच मास्तर होते. अन दोनच वर्ग. त्यायले शाळा चालून दाखवायची होती. गाव तसं लय मोठं नोतं, व्हती दोनक हजार लोकवस्ती.साऱ्या समाजाचे लोक व्हते. कुणबी, बोद्ध, मुसलमान, बंजारी, धनगर, मातंग अन् भटक्या जातींचेबी येत जात रायाचे.

        गावात येकी व्हती. देशात जाती जातीचं राजकारण चालू व्हतं. पण या गावाची खाशियतच व्हती, त्यायची एकता. गाव गुण्यागोविंदान रायत व्हता. कोण्याबी समाजाचा कार्यक्रम असो सार गाव स्वतःहून झटाले यायचा. मरणाधरणाले, लग्नाले, संकटाले लोक पुढेच मदतीले येत. त्याच्या च्यान गावातल्या पोरासोरायले परकं वाटत नव्हतं.

         जानरावचा महादेव एकूलता एक होता. तेबी नवसासायाचा असल्या वानी. माय त त्याले लयचं जपत व्हती. त्याच्या पयले तिले पाच लेकरं झालती अन् झाल्याझाल्या मरण पावली व्हती या वक्ताले तीन महादेवाले साकडं घातलं व्हतं त्यायच्या गावात नदीच्या वर्तल्या टेकडीवर जागृत महादेवाचं देऊळ व्हतं. पाचव्या लेकराचं मड पुरून मनावर दुःखाच मनभर वज घेऊन ती पाटलाच्या वावरात तुरीच्या खयावर गेली व्हती. तिचा चेहरा उतरला व्हता. पांढरा ठीकर पडला व्हता. कायजीन भाकर गोड लागेना तिले. सासू भलकशी बोले. झपीतून उठल्या तवापासून रामपायऱ्यातच इच्या माग चराट लावे भलकशी शिव्या दे. पोराले दुसरं लगन करासाठी रोज सांगे एक दिवस त शेजारच्या गावचा पावनाचं घेऊन आली. घरी त्याच्या मामाची पोरगी हाये मने लग्नाची. सोयरीक पक्की करूनच जाच तीन ठरोल व्हतं. महादेवाचा बाप देव माणूस त्याचा बायकोवर लय जीव व्हता. त्यानं पाव्हण्याले समजावलं, माफी मांगतली अन् वाटी लावल. तवापासून तर बुडी अजूनच मायवर खार खाऊन व्हती. त्याच्यान तीचं कायच्यातच मन ना लागे. ती पायटीच उठे अन कामं करून वावरात जाये. आज तिच्या हातात तुरीच्या पेडीतला सरपं आला तरी तीचं ध्यान नव्हतं, गयाबुडीन ते पायल म्हणून बरं झालं तीन लगोलग पेडी हातची दूर फेकली. नायत तिले मडच न्या लागलं असत घरी. बुडी त म्हणाली, “असं काय करत हरणे कुठे ध्यान आहे तुय? एवढा मोठा नागोबा तुले दिसला नाई आता केवढ्यान डसला असता.”  डोयात पाणी आणून ती म्हणाली

“बरं झालं असतं आजी काय करावं या जिंदगानीच रोजचाच जीवाले घोर झाला एक नवरा बर पायते म्हणून बरं आहे. सकाय त्यांच्याही मनानं दुसरं लगन कराच घेतलं तर कुठी तोंड दाखवावं.” 

गयाबुडीन तिले जवळ घेतलं पाठीवरून मायेन हात फिरवला, “हे दिवस निघून जातील, तू धीर सोडू नोको, तुया नवरा भला माणूस हाये. तो साथ सोडत नाही तुयी.” 

“होणं आजी म्हणून त धीर देतो मनाले अन् दिवस ढकलतो. या दोघीचं बोलनं वावरातल्या साऱ्या बाया ऐकत होत्या. सगुनाच दुःख पाहून त्याही चूक चुकत होत्या. त्यांना या गोष्टीचा वाईट वाटलं होतं पण कोणाचे काही इलाज चालत नाही‌. आता दिवस मावळतील आला होता. साऱ्या बायांची घरी जायची लगबग सुरू होती. घरोघरी मातीच्या चुली त्याप्रमाणे प्रत्येकीचा आपलं वेगवेगळे दुःख होतं.     

          गयाबुडी सगुनाले आपल्या संग कामाला नेत होती आणि तिला सांभाळून पण घेत होती. तिला माहीत होतं तिची सासू लय सासुरवास करते म्हणून त्याच्या लेकीसारखी माया करे. गयाबुडीचं मन भरून यायचं इतकी गुणाची पोरगी आणि तिच्या नशिबी हे काय भोग आले, असं तिला वाटून गेलं.     

         दिवस कलला होता. पाखरं घरच्या ओळीने निघाली होती. माणसं, ढोरं वासरं घराच्या दिशेने चालले होते गयाबुडी अन् सगुणांनं आपल्या पसाऱ्याची बांधा बांध केली आणि दोघी निघाल्या. गयाबुडीनं जरासा इचार केला अन् सगुणाले म्हनाली, “सगुणे एक सांगू तुले, करशील काय माय माया मताऱ्य मानसाची खुळी समजूत हाय बुडत्याले काठीचा अधार तस समज  जमीन त पाय आपल्या नदीच्या वरतल्या टेकडीवर महादेवाच मंदिर हाये का नाही, त्या मंदिरात कानी लेकरासाठी नवस कर. रोज सूर्यनारायणाच्या पहिले उठायचं अन् त्या नदीतून भरली घागर घेऊन वलीत्यानं त्या महादेवाला अभिषेक करायचा, भोळा आहे ते महादेव, त इनंती मान्य करीन आणि तुया पदरात लेकराच दान टाकीन, करून त पाय पण एक ध्यान ठेव, कोणाले आपून दिसलो नाही पायजे, झाकटीतच जाचं.”  सगुनाने मनावर घेतलं हे करून पहा आणि तिचा नेम सुरू झाला . रोज पायटी उठायचं, नदीत अंघोळ करायची अन् पिंडीवर जाऊन अभिषेक कराचा. असा नित्याचा क्रम तिचा सुरू होता. महिने सरले वर्ष उलटले पण महादेव काही तिले पावला नाही.

         आज चार वर्षांपोटी तिच्या घरादाराले हरिक झाला. एक दिवस सगुना  हुल्यावकाऱ्या देतच उठली. तिले दिवस गेलते. घरादाराला आनंद झाला. सासूनं आता बडबड करणं बंद केलं. गयाबुडीले त बेज्या हरिक आला. तिला वाटलं महादेवच पावला पण सगुणांनं महादेवाचा अभिषेक कव्हाचाच बंद केला होता, कारण एक दिवस जानरावच्या ध्यानी आलं की सगुणानं नवस बोलला, त्यानं तिचं मंदिरात जाणं बंद केलं, कारण की त्यानं एका महाराजाच्या कीर्तनात तुकाराम महाराजांचा अभंग ऐकला व्हता, नवस सायासे पुत्र होती मग काहे करणे लागे पती’ असी समजूत काढली अन् तिले ते पटलं व तिनं आपला  अभिषेकाचा नेम बंद केला.

          दिसमागून दिस जात व्हते. जानराव सगुणाचा नवरा तिची लय काळजी करी. आता तिले वावरातही जाणं त्यानं बंद केलं होतं अन् एक दिवस महादेवचा जन्म झाला. मागच्या सारखंच याले बी काय होऊ नये हे भेव दोघांच्या मनात होता पण महादेव वाचला आणि महादेवाच्या नवसानं तो झाला म्हणून त्याच्या मायले गयाबुडी म्हने, “त्याचं नाव महादेव ठेव” बुडीच मन तिले मोडावं वाटलं नाही.

           आता महादेव सहा वर्षाचा झाला होता. जानरावच्या घरी मास्तर आला. मास्तरनं त्याले “महादेवला शाळेत टाका साठी सांगितलं” जानराव शिकेल नव्हता पण शिकले पाहिजे आणि शिकल्याने आपली जिंदगी सुधारते हे गोट त्याला माहीत होती. मास्तरकडे पाहून तर त्याला आपला महादेव बी मास्तर झाला पाहिजे, असं वाटलं. महादेव तसा हुशार होता. सहा वर्षाचा झाला तर त्याले वानसामान कसं आणावं हे समजे. जानरावले बी वाटलं मास्तर म्हणते ते गोट खरीच हाये. आपण आपल्या महादेवला शाळेत टाका. महादेव बी हरिकला होता. त्याच्या सोबतीले त्याचे दोस्त बी शाळेत जाणार होती. महादेवनं शाळेत जाण्यासाठी एकच गलका केला. मास्तरांनी त्याचं नाव शाळेत घेतलं. दुसऱ्या दिवसापासून महादेवची शाळा सुरू झाली. पाटी सोडून महादेव शाळेत जायची तयारी करे. माय त्याले शिदोरी बांधून दे. आपल्या दोस्तांसंग ते गावाच्या पारावर भरत असलेल्या शाळेत जाऊन बसला. शाळा नव्याने सुरू झाल्याने शाळेला काही इमारत नव्हती, पारावर शाळा भरे. सारी गावातले पोट्टे शाळेत येऊन बसत मास्तर त्याला त्याला अ,आ,ई.  एक, दोन शिकवे. गावाले एक लय भारी मास्तर आला होता. दोन्ही मास्तर लय सुधी होते. लेकराले जीव तोडून शिकवत. त्यात महादेव तर छोटी छोटी साऱ्या गोष्टी शिकत आहे. त्याच्या न मास्तर लिहिलंय हरी की महादेवला सांगितलेली गोष्ट लय ध्यानात राहील दीपक ध्यानात ठेवून दुसऱ्या दिवशी मास्तरले म्हणून दाखवेन लिव्हायले बसला की बातच लिहून दाखवे त्याच्याने दोन्ही मास्तर त्याचा लय हरिक करत.

          महादेव पहिलीतून दुसरीत गेला, दुसरीतून तिसरीत गेला, तिसरीतून आता चौथीत गेला होता महादेव संग शाळा पुढच्या पुढच्या वर्गात जात होती, गावात चौथी लोक शाळा होती पाचवीच्या वर्गात शेजारच्या गावला की महादेव लागला आता आपली शाळा बंद होते का काय तसे गुरुजी एक दिवस जानरावला भेटायला आले म्हणले जानराव भाऊ तुमचा महादेव लय हुशार आहे त्याची शाळा सोडू नका. करू शेजारच्या गावले त्याची सोय. “बोर्डिंग आहे त्या बोर्डिंगात त्याला टाका.” एकुलता एक असल्यानं मायचं म्हण, त्याला बोर्डिंगात ठेवायला धजत नव्हतं पण गुरुजींनी लय समजावलं, तव्हा कुठं त्याची माय तयार झाली. मग शेजारच्या गावच्या शाहू बोर्डिंगात त्याचं नाव टाकलं. पाचवीपासून तर बारावीलोक तो बोर्डिंगात शिकला. पहिले पहिले त्याला त्या बोर्डिंगात राहावच ना वाटे. घराची लय याद येई. माय बापाची याद आली की त्याला तिथून पवूनच या वाटे, मग त्याला दोस्त मित्र भेटले. शाळेतले मास्तर हुशार होते, त्याच्यावर त्यांनी लय जीव लावला. त्याला पैशाची काही गरज पडली तर मदत करत. त्याच्यानं ते शिक्षणात पुढे पुढे जात राहिला, पण  असं झालं बारावीची परीक्षा तोंडावर आली अन् महादेवले टायफाईड झाला. टायफाईडमदी हे इतका खंगून गेला होता  का  झालं  आता याचं काही खरं नाही, असं वाटते. बापानं त्याला घरी आणलं. सारी इलाज करून पाहिले, पण याले काही बरं वाटेना. मग बाप म्हणे, “आता राहू दे बाप्पा परीक्षा, पुढल्या साली पाहजो” पण त्यानं काही आयकलं नाही. त्यानं जिद्दीनं अभ्यास केला.

         टायफाईडले हरवलं. आणि बारावीत पहिला नंबरात पास झाला. सारे त्याचं लयच कवतिक करत व्हती, पोराची इतकी तब्येत खराब असून त्यांनं बारावीत नंबर काढला होता. मायबापाले त अभाय ठेवणं झालं.  पोराले कुठे ठेवू न कुठे नाही, असं त्यांना वाटे. त्यांच्या घरातलं एकुलता एक शिकलेलं पोरगं होत ते. आतापतोर तर शिक्षण पार पडलं, पण आता इथून पुढच्या शिक्षणाचा काय करा?  शिक्षणाले त लय पैसा लागते, इतके दिवस कसं तरी बोर्डिंगाणं भागवलं. त्याच्या घरी ना जमीन जुमला, ना काही. मग आता पोराला पुढच्या शिक्षण देऊन, मास्तर कसं करावं याची काळजी जानरावला  लागून राहिली होती. इतके साल दोघा नवरा बायकोनं त्याच्या शिक्षणासाठी लय खस्ता खाल्ल्या होत्या. महादेवले त्या सऱ्याची जाण होती बरं, ते बी सुट्ट्यात घरी आला की माय बापा संग कामाला जाये, मायबाप त्याला नाही नाही म्हणंत, पण तरीही ते मायबापा संग कामाला जायचा. 

         मायबापाले न सांगता होस्टेलातून कामाला जाई. कोणाच्या किराणा दुकानवर काम कर, नाही तर हॉटेलच्या प्लेटा घासून, चहाची कप धूत हॉस्टेलवर राहून हे सारे काम त्यांनी केले. याच्यातून त्यांनं नवीन पुस्तकं खरेदी केली. पुस्तकात लय  जीव होता महादेवचा. त्यानं ऐकलं होतं की बाबासाहेबांनी लय पुस्तकं वाचले आणि  त्याचं नाव साऱ्या जगात झालं. हे सारं शिक्षणाने शक्य आहे, आपण शिक्षणाणं तरू शकतो, आपली गरीबी हटवू शकतो. आपल्या समाजाला सुधारू शकतो हे त्याच्या मनाने पक्क घेतलं होतं, म्हणून तेबी पुस्तकासाठी पडेल ते कामं करे, पैसा जमा करे. त्याच्या घरी, माय बापाला याचा पत्ताच नव्हता, पण एक दिवस बाप महादेला बोर्डिंगात भेटायला आला आणि सुट्टीचा दिवस होता पण महादेव काही जागेवर नव्हता, तवा त्याच्या दोस्तांनी सांगितलं, “ते, त्या हॉटेलवर कामाला आहे.”  अन् बापानं तिथे जाऊन पाहिलं तर महादेव तथी कप घासत आहे. त्याले कप धुतांनी पाहून बापाला लय वाईट वाटलं. बापानं त्याले विचारलं, “बाबू तू अभ्यास सोडून हे काय करतो?” त्याने सांगितलं, “बाबा तुम्ही दिलेले पैसे मला काही पुरत नाहीत आणि हे सारं मी खाण्यासाठी नाही करत तर मी पुस्तकसाठी ती कामं करतो” बापाला त्याचा लय अभिमान वाटला. 

           महादेव आता बारावी पास झाला होतो. त्याच्या पुढच्या शिक्षणाला कुठे पाठवावं म्हणून पाटलाचं पोराचा सल्ला घ्याव म्हणून ते दोघंही बाप लेक पाटलाच्या घरी गेले. पाटील भला माणूस. त्याचा लेक शिकून मोठा प्रोफेसर झाला होता. त्यांना सांगितलं, “बाबू तू असं कर, औरंगाबादले जा, बाबासाहेबांनी सुरू केलेलं तिथे एक मोठं कॉलेज अन् बोर्डिंग आहे. त्या कॉलेजमध्ये आणि बोर्डिंग तुला घालून देतो” पाटलाच्या पोराने सांगितलं. तसं दोघा बाप लेकान केलं.

         फर्स्ट इयरच्या वर्गात मिलिंद कॉलेजमध्ये त्यांनं ऍडमिशन घेतलं. मिलिंद कॉलेजचा तो भव्य दिव्य परिसर पाहून त्याला गहिवरून आलं ज्या माणसाबद्दल आपण ऐकलं, ज्यांनी शिक्षणाचे  महत्त्व सांगितलं त्याच बाबासाहेबांनी उभारलेल्या कॉलेजमध्ये शिकायला भेटतं, याचं त्याला अभिमान वाटला. बापाची छाती फुगून आली.

         महादेव रोज कॉलेजला जाऊ लागला. पडेल ते कामं करून लायब्ररीत जाऊन भली मोठी मोठी पुस्तकं वाचून, मन लावून अभ्यास करू लागला. बाबासाहेबांचे विचार समजून घेतले आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ‘शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’. हा मंत्र त्यांनं मनात पक्का बसवला आणि खूप शिकला. एम. ए. झाला. मराठी विषयात त्याने सुवर्णपदक मिळवलं. त्याचं मोठं नाव झालं. यामुळे मिलिंद कॉलेजमध्येच त्याला प्राध्यापकाची नोकरी मिळाली. त्यांनी ती नोकरी स्वीकारली, कारण गावाकडची गोर गरीबाची मुलं मिलिंद कॉलेजमध्ये शिक्षणासाठी यायची. आपल्या जिंदगीचा उद्धार करण्यासाठी यायची. बाबासाहेबांनी दिलेला उच्च शिक्षणाचा मंत्र सर्वांनी अंगीकारला होता आणि त्यामुळेच त्या मुलांना योग्य मार्ग, योग्य वाट दाखवण्याची संधी त्याला मिळाली होती, म्हणून त्याने ती नोकरी आनंदाने स्वीकारली. बरीच वर्ष तन-मन-धनाने त्याने ती नोकरी केली. होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना तो नेहमी मदत करत असे. त्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करे आणि पुढे जाण्याचा मार्ग दाखवी. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्याची महाविद्यालयात ओळख होती. त्याचे अनेक विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदांवर रुजू झाले होते आणि ते नेहमी त्याचं नाव  काढत, त्याला भेटायला येत आणि सर तुमच्यामुळे आम्ही या पदावर आहोत असं म्हणून त्याच्या पायावर नतमस्तक होत, त्यामुळे त्याला गहिवरून येत असे.

         महादेव इतक्यावरच थांबला नाही तर तो आपल्या गावाकडे आला आणि आपल्या गावातल्या आणि पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी म्हणून त्याने गावाकडे एका मोठ्या संकुलाची स्थापना केली. ज्यामध्ये पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सोय त्याने केली. आज त्याच्या महाविद्यालयामधून, शाळेमधून अनेक विद्यार्थी घडले आहेत आणि देशाचं नाव मोठं करत आहेत, हे सगळं वैभव पाहून त्याला खूप आनंद होतो, त्याच्या आई-वडिलांना त्याचं हे यश पाहून आपल्या महादेवचा खूप खूप अभिमान वाटतो. महादेवची जिंदगी बाबासाहेबांच्या विचाराला धरून बदलली असे अनेक महादेव डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन त्या काळात उच्च पदावर गेले आणि समाजाला सुधारण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप मेहनत केली…..

– प्रा. मोक्षदा विजय बेलखेडे 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top