अखंड साधना, अपार कष्ट आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर लीलया मात करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पुसदच्या फुलसिंग नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रल्हाद वावरे सर.नियत वयोमानानुसार सर ३१ ऑगस्ट २०२६ ला ३२ वर्षांच्या अखंड प्रामाणिक सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्त हा लेखनप्रपंच.
वावरे सरांचा जन्म अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील बोरखडी बु।। या चिमुकल्या गावचा.त्यांच्या गावात शाळा नव्हती,घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती,त्यांचे वडील ३ गावांच्या गायी राखण्याचे काम करायचे,तर आई शेतमजुरी करायची. ३ मुले,२ मुली,आई व वडील असा एकूण ७ लोकांचा परिवार,निवा-यासाठी चंद्रमौळी झोपडी,घरची शेतीवाडी नव्हती. गरिबीतही नेकीने संसार करून,सर्व भावंडांवर आई बाबांनी प्रामाणिकपणाचे व परिश्रमाचे संस्कार स्वत:च्या वागणुकीतून केलेत. अतिशय गरीब परिस्थितीत, कोणत्याही सुविधा नसताना व कुटुंबात शैक्षणिक वातावरणाचा अभाव असताना,सरांनी आपले प्राथमिक शिक्षण गावापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखडी खु।। येथे, उच्च प्राथमिक शिक्षण गावापासून ४ किलोमीटर अंतरावरील म्हैसपूर येथे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण गावापासून ६ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या खोलापूर येथे अनवाणी पायाने पायी चालत जाऊन पूर्ण केले.सुटीच्या दिवशी काम मिळाले तर शेतमजुरी, नाही मिळाले तर वडिलांसोबत गायी राखण्याचे काम सरांनी केले.
उच्च शिक्षणाचा प्रवास तर आणखीच खडतर होता.जिल्ह्याच्या ठिकाणी अमरावतीला आल्यावर शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी सरांनी एका प्रिंटिंग प्रेसमध्ये अर्धवेळ नोकरी पत्करली.दिवसा अभ्यास आणि नोकरी,तर रात्री पुस्तकांशी मैत्री,असा त्यांचा दिनक्रम होता.प्रचंड मेहनत करून त्यांनी एम.ए.(मराठी) आणि बी.एड.या पदव्या संपादन केल्या, किंबहुना अत्यंत कठीण समजली जाणारी ‘सेट’ (SET) परीक्षा उत्तीर्ण करून सरांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.
फुलसिंग नाईक सारख्या नावाजलेल्या महाविद्यालयात मराठी भाषा व साहित्याचे सहायक प्राध्यापक म्हणून वावरे सर रुजू झालेत.प्राध्यापकाची नोकरी करत, संसार सांभाळत,अभ्यासाची आणि संशोधनाची आवड जपत, कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी एम.फील.आणि पीएच.डी.या सर्वोच्च पदव्या प्राप्त केल्या.वावरे सरांचा शैक्षणिक प्रवास थक्क करणारा आहे तसाच तो अनेकांना प्रेरणादायी ठरणारा सुद्धा आहे.
ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना वावरे सरांनी सर्वोतोपरी मदत केली, मार्गदर्शन केले आणि स्वतःच्या उदाहरणाने ‘गरिबी हा शाप नसून संघर्षाची संधी आहे’, हा विचार त्यांच्या मनात रुजविला.महाविद्यालयात नेमून दिलेला अभ्यासक्रम तर त्यांनी पूर्ण केलाच सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले.
वाचन, लेखन,मनन आणि चिंतन हा वावरे सरांचा स्थायीभाव आहे.त्यांचे मराठी साहित्याशी नाते जुळले, उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेले व पुढे ती त्यांची जीवनरीतच बनली. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र, परिषदांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून सरांनी वाड्.मयीन विषयांवर दर्जेदार शोधनिबंध सादर केलेत.मराठी साहित्याच्या अभ्यासकांना व संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा ४ ग्रंथांची निर्मिती आजवर त्यांनी केली आहे.ग्रंथनिर्मितीचे त्यांचे कार्य यापुढेही सुरूच राहील असा मला विश्वास आहे.
मराठी भाषा, साहित्य,कला व संस्कृतीला वाहिलेले ‘भावमाला’ हे त्रैमासिक मागील १३ वर्षांपासून अखंडपणे वावरे सर चालवीत आहेत.कोरोना काळात संपूर्ण जग थांबलेले असतानाही त्यांनी हे त्रैमासिक थांबू दिले नाही,ही गोष्ट त्यांची साहित्याप्रती असणारी निष्ठा आणि कटिबद्धता अधोरेखित करणारी आहे.’भावमाले’चा वाचकवर्ग संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे,याचा सरांना सार्थ अभिमान आहे.’भावमाले’च्या माध्यमातून सरांनी अनेकांना हक्काचे विचारपीठ उपलब्ध करून दिले तसेच अनेकांना लिहिते सुद्धा केले.
‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’,असे म्हणतात, ते वावरे सरांना तंतोतंत लागू होणारे आहे.गरिबीच्या काळापासून ते आजच्या यशाच्या शिखरापर्यंत सौ.मालती वहिनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्यात.त्यांचा एकुलता एक मुलगा चिरंजीव प्रथमेश हा अतिशय हुशार,शांत, संयमी,मनमिळाऊ व सद्गुणी असून तो संगणक अभियांत्रिकीची पदवी घेऊन पुणे येथे उच्च पदावर कार्यरत आहे.
१९९७ मध्ये, अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे दोन दिवसीय अधिवेशन वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात होते.त्याठिकाणी वावरे सरांची आणि माझी ओळख झाली.आम्ही एकमेकांशी मित्र म्हणून जुळलो ते कायमचेच.भविष्यातही आमची मैत्री कायम राहील असा मला भरवसा आहे.संत गाडगे अमरावती विद्यापीठ, मराठी अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत वावरे सरांनी मला केलेले सहकार्य माझ्या कायम स्मरणात राहील.
महाविद्यालयात वृक्षारोपण,परिसर स्वच्छता, श्रमसंस्कार शिबिर,भीत्तीपत्रक, स्नेहसंमेलन, अभ्यास- सहल, वार्षिकांक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे अनेक उपक्रम सर राबवितात.वावरे सरांच्या नेतृत्वात नॅकमध्ये महाविद्यालयाला ‘ब’ दर्जा प्राप्त झाला.वावरे सरांना निसर्गाबद्दल प्रचंड आकर्षण आहे,ते आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस मेळघाटात मुक्कामी राहून साजरा करतात, तसेच निसर्गाला समृद्ध करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्नरत राहतात.
३० वर्ष प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख, आणि २ वर्ष प्रभारी प्राचार्य अशा एकूण ३२ वर्षांच्या या प्रदीर्घ कालखंडात वावरे सरांनी शेकडो विद्यार्थ्यांना घडविले.मराठी साहित्याची मनोभावे सेवा केली,एका महाविद्यालयाला आपले आयुष्य बहाल केले.प्रभारी प्राचार्य म्हणून काम करताना सरांनी महाविद्यालयाचा प्रशासकीय दर्जा तर उंचावलाच, सोबतच शिस्तबद्ध वातावरण तयार केले.मराठी प्राध्यापक परिषदेचे अधिवेशन असो की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सर आवर्जून उपस्थित राहतात.वावरे सर आचार्य पदवीचे मार्गदर्शक आणि परिक्षकही आहेत हे मला याठिकाणी अभिमानाने नमूद करावेसे वाटते.सेवानिवृत्ती ही केवळ एका शासकीय प्रक्रियेचा भाग असते,पण वावरे सरांसारख्या अभ्यासू आणि कार्यमग्न व्यक्तिच्या विचारांना व कार्याला निवृत्ती मानवेल, हे मनाला काही केल्या पटत नाही.
वावरे सरांची साहित्य साधना, लेखन आणि वैचारिक मंथन यापुढेही अखंडपणे सुरूच राहील, अशी मला खात्री आहे.
वावरे सरांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुख, समृद्धी आणि आरोग्यदायी राहण्याकरिता त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रा.डॉ.गजानन घोंगटे,
वनोजा
भ्रमणध्वनी – 98224 06115
very nice literature activity congratulation…
Thank you, Sir.