बाहेर तुफान वारा सुटला होता. विजाच्या कडकडाटासह धो धो मुसळधार पाऊस पडत होता. बाहेर मीट्ट काळोख होता. अगदी डोळ्यांच्या जागी खोबन्या असाव्यात आणि नुसता अंधार असावा असं वाटत होत. समोर काही सुद्धा दिसत नव्हतं. त्यात पावसाचे रुद्ररूप आणि तुफान वाऱ्यामुळे वीज सुद्धा गेलेली होती. अशा भयान रात्रीच्या वेळी जंगली श्वापदं सुद्धा बाहेर पडण्याची हिंमत करणार नाहीत, अशा वातावरणामध्ये त्या निर्जन रस्त्यांनी एक आकृती चालत होती. त्या मिट्ट काळोखात का? जिथे लोकांनी आपल्या घरामध्ये स्वतःला कैद करून घेतलं होतं आणि कोणीही बाहेर पडण्याची हिंमत करत नव्हता अशा निर्जन स्थळी ती आकृती पुढे पुढे जात होती. त्या पावसात सुद्धा हातात आपली बॅग घेऊन ती पुढे जात होती पाऊस आणि वारा तिला मागे लोटण्याचा प्रयत्न करत होता पण जणू काही खूप मोठा अन्याय अपमान सहन केल्याच्या नंतर येणार सामर्थ तिच्यामध्ये निर्माण झालं होतं आणि या रुद्ररूप निसर्गाला मागे सारत ती समोर निघाली होती. साधारणता साठ एक वर्ष वय असणारी ती महिला त्या पावसातून वाट काढत समोर समोर जात होती अगदी मागे किंवा पुढे बाजूला किंवा आजूला कोणी चिटपाखरू सुद्धा नव्हतं. अगदी रात्रीच्या मोकाट कुत्र्यांनी सुद्धा या भयानक वातावरणामध्ये कुठेतरी आसरा घेतला होता. ती एकटीच रस्त्याने जात होती. कुठे चालली होती? कशासाठी चालली होती? का चालली होती? या प्रश्नाचे उत्तर कदाचित तिच्याकडे सुद्धा नसावीत. काय गरज पडली असेल? अशा भयान रात्री तिला बाहेर पडण्याची. इतकी कोणती वेळ तिच्यावर आली असेल? तितकाच मोठा आघात सहन केला असेल? तिने म्हणून अशा भयान वातावरणाची तमान न बाळगता ती घराबाहेर निघाली होती. कुठे जाणार होती? काय करणार होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तिच्या गतकाळात असतील? या वादळापेक्षा भयानक वादळ तिने कदाचित आयुष्यामध्ये झेलली असतील. ती होती सुमित्राबाई.
मागच्या चार-पाच महिन्यापूर्वी सुमित्राबाईचे आयुष्य अगदी सुरळीत सुरू होतं. आनंदात व्यतीत होत होतं. पण अचानकपणे एका मागून एक आघात आणि वादळ तिच्या आयुष्यामध्ये आली. तिचे पती यशवंतराव एका खाजगी कंपनीत कामाला होते. तिला दोन मुलं होती. मुलांची आणि आपल्या नवऱ्याची काळजी घेणे, आपल्या मुलांना सुसंस्कारित करणे आणि घर छान पद्धतीने सांभाळणे हेच त्यांच्या आयुष्याच ध्येय होतं. पती सुद्धा अगदी मनमिळावू उत्साही आणि अगदी सर्वांना छान जपणारा होता. सुमित्राबाई सुद्धा मनाने खूप साध्या, सरळ आणि सालस होत्या. मुलं सुद्धा तशीच होती अजित आणि सुजित खूप शिकले. यशवंतराव आणि सुमित्राबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य अजित आणि सुचिताच्या भविष्यकाळासाठी खर्ची घातलं. दोन्ही मुलं आपापल्या मार्गी लागली होती. मोठा अजित डॉक्टर झाला होता. सुनेत्रा सोबत त्याचं लग्न झालं. धाकटा सुजित इंजिनियर झाला होता. सुमनशी त्याचं लग्न झालं. दोन्ही मुलं आपल्या पायावर उभी राहिली. आता आपल्याला भविष्याची चिंता नाही. आपली दोन्ही मुलं कर्तबगार आहेत आणि आपण त्यांच्यावर छान संस्कार केले आणि ती आपल्याला भविष्यात सांभाळतील या विचाराने सुमित्राबाई आणि यशवंतराव भारावून जात असत, पण मग असं काय घडलं की सुमित्राबाईवर आज ही वेळ आली चार महिन्यापूर्वी अचानक यशवंतराव हार्ट अटॅकने गेले. हा सर्वात मोठा आघात सुमित्राबाई वर झाला होता. अगदी सुरळीत आणि सुंदर पद्धतीने चालू असलेल्या आयुष्याला अचानक खीळ बसली. यशवंतरावांच अचानक जाणं हा खूप मोठा धक्का सुमित्राबाईंसाठी होता. अगदी ठणठणीत आणि उत्साही असणार हा व्यक्ती अचानकपणे जाईल, याची कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती, पण तसे घडले. मात्र त्यानंतर मोठा अजित आपल्या पत्नीसह अमेरिकेला निघून गेला.
अजित अमेरिकेला शिक्षणासाठी गेला आणि त्यांनी दोन ओळीची चिठ्ठी आपल्या आई-वडिलांना पाठवली की मी इथेच लग्न करीत आहे. यशवंतरावाच्या अचानक जाण्यामुळे तो शेवटची भेट घेण्यासाठी भारतात परतला होता आणि आता कायमचा आपल्या पत्नीसह अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यासाठी गेलेला. त्यानंतर सुमित्राबाईची संपूर्ण जबाबदारी ही सुजितवर येऊन पडली आणि ती जबाबदारी घेण्याची सुजितची आणि त्याच्या पत्नीची मुळीच तयारी नव्हती, हे सत्य आज सकाळी सुमित्राबाईंच्या कानावर पडलं. अजित शिक्षणासाठी गेला त्याच्या शिक्षणासाठी यशवंतराव, सुमित्रा वहिनी आपली असलेली संपूर्ण जमा-पुंजी लावली आणि त्याने तिथल्या एका बड्या बापाच्या मुलीशी लग्न केलं आणि पुन्हा वर अमेरिकेस स्थायिक होण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी यशवंतराव आणि सुमित्राबाईकडे पैशाचा तगादा लावू लागला. तीही त्याची मागणी त्यांनी पूर्ण केली. इकडे सुजितच्या इंजिनिअरिंग आणि त्याच्या व्यवसायाच्या सुरुवातीसाठी यशवंतराव आणि सुमित्रा वहिनी पैसा पुरवला. ते दोघेही आता आपापल्या ठिकाणी स्थायिक झाले होते. त्यांचा जम बसला होता आणि त्यामुळेच यशवंतराव आणि सुमित्राबाईंना आपल्या भविष्याची चिंता वाटत नव्हती, पण अचानक होत्याचं नव्हतं झालं.
यशवंतराव जाण्यालाही तसं तेच कारण होतं. त्यादिवशी त्यांचा कंपनीतला शेवटचा दिवस. आपल्या मित्रांचा आग्रहाखातर ते त्यांच्यासोबत पार्टी करत बसले होते. पार्टी करून उशीरा आनंदाने घरी आल्यानंतर मुलाच्या रूम बाहेरून जाताना त्यांच्या कानावर संवाद पडला. सुमन सुजितला म्हणत होती, “तुझे वडील आता रिटायर झाले. आता त्यांची कमाई बंद होणार. तुझ्या भावाने आधीच जबाबदारीतून हात झटकलेले आहेत. तो अमेरिकेत स्थायिक झाला आणि आपल्यावर या दोन्ही म्हातार्यांची जबाबदारी टाकली. आता आता कुठे आपला व्यवसायात जम बसत आहे आणि यांची रिटायरमेंट, आपण यांना कसं सांभाळायचं! तू त्यांना सरळ सांग, की आमच्याकडून शक्य होणार नाही, तुम्ही तुमची व्यवस्था पहा.” तो सुद्धा तिला म्हणत होता, “हो बाई, थांब थोडी. मी हळूहळू सगळं काही त्यांना समजावून सांगतो. काही दिवस फक्त शांत रहा. माझ्याच्याने सुद्धा त्यांची जबाबदारी पेलणे शक्य होणार नाही.” यशवंतरावांच्या कानावर हे शब्द पडले आणि ते शब्द इतके तीव्र होते की जणू कोणी आपल्या डोक्यात घनाने वार केले की काय असे त्यांना वाटले अचानक सुंदरशा तस्वीरीचे खडकन तुकडे व्हावे आणि जमिनीवर काचा सगळीकडे विखरून जाव्यात तशा त्यांच्या मनीच्या कल्पनावर पाणी पडले व त्यांचा भ्रम दूर झाला. त्यांना मोठा जबरदस्त धक्काच बसला. सुमित्राबाई तेव्हा आपला खोलीमध्ये होत्या. त्या अत्यंत आनंदात होत्या. आता रिटायरमेंट नंतरचं आयुष्य आपण तीर्थयात्रेत व्यतीत करायचं. मुलांवर सगळी जबाबदारी सोपवायची, या विचारात त्या गुंतल्या होत्या. त्यांना यशवंतराव घरी आल्याची कल्पना नव्हती. यशवंतराव तसेच घराबाहेर पडले आणि आपल्या मित्राला त्यांनी फोन केला. त्यांचा मित्र मनोहरराव जो आर्मीत डॉक्टर म्हणून रिटायर झालेला होता. यशवंतराव मनोहररावांना आपली सगळी दुःख सांगायचे, त्यांचा वेळोवेळी सल्ला घ्यायचे. ते दोघे एकमेकांना मदत करायचे आणि आजही ती वेळ आली होती.
यशवंतराव चटकन मनोहररावांकडे गेले. त्यांनी आपली संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगितली. भविष्यात काय होऊ शकते, याबद्दल दोघांनी वार्तालाप केला. यशवंतराव साठी हा जबरदस्त धक्का होता. त्यांनी आपली संपूर्ण जमापुंजी दोन्ही मुलांच्या भविष्यासाठी खर्च केली होती. आता ते सर्वस्वी आपल्या दोन्ही मुलांवर अवलंबून होते आणि अशातच त्यांच्या मुलांच्या मनातले भाव त्यांना समजले आणि त्यांच्या समोर आभाळ कोसळले होते. ज्या मुलांना तळ हाताच्या फोडासारखं जपलं. ज्यांच्या भविष्यासाठी आपल्या आयुष्याची संपूर्ण वर्ष खर्ची घातली, आपली संपूर्ण कमाई खर्च केली, यांचा त्यांना जबरदस्त अभिमान होता. त्यामुळे ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. त्यांनी आपल्या मित्राला विनंती केली, “मला जर काही झालं, तर माझ्या सुमित्राची संपूर्ण व्यवस्था तू लावावी.” मनोहररावांनी सुद्धा यशवंतरावांना तसं वचन दिलं. आर्मीतलाच माणूस तो. कडक शिस्तीचा. त्याने सुद्धा ही बाब मनावर घेतली आणि ठरवलं की सुजीत अजितला चांगली अद्दल घडवायची. तशी त्या दोघांची तयारी सुरू होती, पण यशवंतरावांना हार्ट अटॅक आला आणि ते निघून गेले.
यशवंतरावांचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर सुमित्राबाई एकट्या पडल्या होत्या. घरात त्यांना कोणी विचारत नव्हतं. सुनबाई तर घरात त्यांना मोलकरणीसारखं वागवत होती. घरातली सर्व काम करावी आणि थोडा वेळ बसलं की सुनेची बोलणी खावी. घरातलं संपूर्ण वातावरण बदललं होतं. कालपर्यंत घरात त्यांच्या शब्दांना मान होता आणि पतीच्या अचानक जाण्याने आज त्यांना घरात मोलकरीणपेक्षाही गलिच्छ वागणूक मिळत होती. त्यांना ह्या झालेल्या बदलाबद्दल काहीही लक्षात येत नव्हतं, पण त्या मन मारून दिवस ढकलत होत्या, पण आज कहर झाला. सुनबाई बाहेर फिरायला जाणार होत्या. त्यांनी घरात सगळी कामं करून ठेवण्यासाठी सुमित्राबाईंना सांगितलं. या म्हातारीला काय काम आहेत नुसती बसून खाते, “तुझ्या आईला सांग, जर कामं होत नसेल तर माझ्या घरात राहायचं नाही.” अशा कडक आवाजात ती आपल्या नवऱ्याला बोलत होती आणि तिचा मुलगा सुद्धा काहीही त्यावर बोलत नव्हता. उलट तो आईला म्हणाला, “आई तुला चार काम करायला काय होतात ग.” हे ऐकून सुमित्राबाईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. सून बोलत होती. त्याबद्दल त्यांना काही वाटत नव्हतं, असं नाही पण त्या तितकं मनाला लावून घेत नव्हत्या पण आज जेव्हा मुलांनी सुद्धा त्यांना सुनावलं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. तिला आपल्या येथे चार काम करायला होत नसतील, तर तिने ते स्वतःची व्यवस्था स्वतः लावावी, असं ती म्हणाली आणि मुलगा सुद्धा मला “राहायचं असेल तर नीट राहा, नाहीतर तुझं तू पहा.” हे एकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या गोष्टीची त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती. जरी त्यांचा मोठा मुलगा अमेरिकेत राहतो, तरीसुद्धा तो आपला आधार होईल आणि धाकटा तर आपल्याला जपतोच आहे, असं त्यांना वाटत होतं.
यशवंतरावच्या जाण्याने संपूर्ण परिस्थिती बदलली होती. सुनबाई रोज शिव्या शाप द्यायची, वाटेल ते बोलायची, घरची सगळी कामं केल्यानंतर त्या जेवायला बसल्या की त्यांना यावरून त्यावरून बोलायची. त्यांच्या घश्या खाली घास उतरत नव्हता, पण त्या काही बोलत नव्हत्या.
आज चार दिवस झाले त्यांना ताप होता, पण साधी चौकशी सुद्धा कोणी केली नाही. रोजच्या कामाची लिस्ट मात्र वाचून दाखवण्यात आली. संध्याकाळी ते बाहेरून फिरून परत आल्यावर, “आम्ही जेवून आलो, घरात काही करायचघी आवश्यकता नाही.” असं सुनबाई म्हणाली. म्हणजे आज सुद्धा त्यांना उपवासच घडणार होता. असं बऱ्याचदा व्हायचं. सुनबाई आणि मुलगा बाहेरून जेवण करून यायचे आणि घरी संध्याकाळी त्यांच्यासाठी काही बनवायचं म्हटलं की सुनबाई रागवत असे. “गिळायलाच पाहिजे नुसतं” हे तिचे रोजचे शब्द असायचे. त्या मनाने खचत चालल्या होत्या आणि शरीराने सुद्धा.
आज त्यांनी निर्धार केला की आपण यातून बाहेर पडायचं आणि त्याप्रमाणे त्या निघाल्या सुद्धा. पण अचानक एक गाडी मागून आली आणि ती करकचून ब्रेक दाबून त्यांच्या समोर बाजूला थांबली. त्यात एक त्यांच्याच वयाची महिला आणि पुरुष बसला होता. ती महिला गाडीतून खाली उतरली. सुमित्राबाईंच्या डोक्यावर छत्री धरत म्हणाली, “ताई माझ्यासोबत चला.” सुमित्राबाईंना काही कळेना पण अशा भयानक वातावरणामध्ये काय करायचं हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं आणि त्या मागचा पुढचा काही विचार न करता त्यांच्या गाडीमध्ये बसल्या. ती गाडी सुसाट वेगाने निघाली. ती गाडी एका आलिशान बंगल्यासमोर येऊन थांबली. आता रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. त्या दांपत्यांनी सुमित्राबाईंना घरात घेतलं. त्या संपूर्णपणे भिजल्या होत्या. त्या महिलेने त्यांना आपले कपडे दिले आणि फ्रेश व्हायला सांगितलं. त्याप्रमाणे सुमित्राबाई काहीही न बोलता त्यांच्या नुसत्या सूचनांचं पालन करत होत्या. तसेही त्यांचं डोकं जणू काही बंद पडलं होतं. विचार करेनासं असं झालं होतं. काय करावं अन् काय नाही? हे त्यांना सुचत नव्हतं. त्या आपल आवरून आल्या. त्या महिलेने त्यांना डायनिंग टेबलवर बसायची खूण केली. त्या तिथे बसल्या. नोकरांनी गरम गरम वाफाळलेला चहा आणून त्यांच्यासमोर ठेवला. आता त्याची त्यांना खूप गरज होती. त्यांनी तो चहा संथपणे घशात आड केला, जणू त्या वाफाळत्या चहाप्रमाणे त्यांच्या मनातही वेदनेचे डोंगर निर्माण झाले होते. आता त्या थोड्याशा सावरल्या होत्या. आपण कुठे आहोत? का आहोत? यांच्यासोबत का आलो होतो? या प्रश्नांची त्यांनाही आता उत्तर हवी होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते बदलणारे भाव पाहून तो पुरुष म्हणाला, “वहिनी मी मनोहर सुभेदार, यशवंत माझा खूप चांगला मित्र होता. तुम्हाला याची कल्पना नाही, पण आमची खूप वर्षापासूनची मैत्री होती. ही माझी पत्नी वैशाली.” हे ऐकून सुमित्राबाईंना थोड आश्चर्य वाटलं. यशवंतराव कधी याबद्दल त्यांच्याशी बोलले नव्हते. तशा काही मोजक्या मित्रांबद्दल त्यांना कल्पना होती, पण हा मित्र त्यांना माहिती नव्हता आणि आता त्यांना नवा प्रश्न पडला, की हेच आपल्या मदतीला कसे धावून आले? त्यावर मनोहर म्हणाले, “मला माहिती आहे, की तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, की आम्ही तुम्हाला येथे कसे घेऊन आलो. तुम्ही घरातून बाहेर पडल्या, हे कोणालाही माहीत नव्हतं, पण आम्हाला माहिती होतं, आम्ही बऱ्याच दिवसापासून तुमच्यावर नजर ठेवून होतो. तुमच्या सुनेकडून, मुलाकडून मिळणारी वागणूक आम्हाला माहिती होती आणि आम्हाला हा दिवस कधी ना कधी येईल याची कल्पना होती आणि म्हणूनच माझी दोन माणसे तुमच्या घराबाहेर होती आणि त्यांनीच मला सांगितले की तुम्ही घराबाहेर पडलेला आहात. यशवंतनी मला संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली होती आणि तुमची संपूर्ण व्यवस्था लावण्याच वचन त्यांनी माझ्याकडून घेतलं होतं, आता तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका, तुम्ही अगदी सुरक्षित आहात आणि इथून पुढचं तुमचं आयुष्य अगदी सुखात जाणार आहे, याची तुम्ही शाश्वती ठेवा.” वैशाली सुद्धा त्यांच्याजवळ आली. त्यांनी त्यांचा हात हातात घेतला आणि त्या मैत्रीपूर्ण भावनेने त्यांना म्हणाल्या, “ताई आता बिलकुलही चिंता करायची नाही, आम्ही आहोत ना तुमच्यासाठी.” त्यांचे ते शब्द येकून सुमित्राबाईंचा कंठ दाटून आला. त्या वैशालीच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. अगदी बाहेर धो धो पाऊस पडत होता त्याप्रमाणे सुमित्रा ताईंची अवस्था होती. वैशालीने सुद्धा त्यांना सावरलं नाही. त्यांचं मन मोकळं होऊ दिलं. जेव्हा त्या रडून रडून थकल्या व शांत झाल्या, तेव्हा वैशालीने हळूच त्यांना पाणी दिले आणि पाठीवरून मायेने हात फिरवत त्या म्हणाल्या, “आता पुन्हा कधीही डोळ्यातून पाणी काढायचं नाही, शांत व्हा. यानंतर रडायचे नाही, फक्त हसायचे, आनंदाने जगायचे दिवस आहेत. यशवंत भाऊजींच खूप प्रेम होतो तुमच्यावर, म्हणूनच यांना जाण्यापूर्वी त्यांनी तुमची संपूर्ण जबाबदारी घेण्याचं वचन घेतलं होतं. आता तुम्ही आराम करा, आपण या विषयावर उद्या बोलू, पुढे काय करायचं, कसं करायचं ते.”
दुसरा दिवस उजाडला सुमित्राबाईंना आता थोडं बरं वाटत होतं. सगळ्या चिंता व्यथा त्यांना सगळं आठवत होतं, पण आता त्यांनी सुद्धा मनाचा निर्धार केला होता, की आता पुन्हा मागे फिरून पाहायचं नाही, पण करायचं काय? या अनोळखी घरामध्ये कसं राहायचं काय करायचं हा प्रश्न होताच. सकाळी त्या आपलं आवरून बसल्या. वैशाली त्यांच्या खोलीत आली आणि त्यांना चहा नाश्त्यासाठी खाली घेऊन गेली. सुमित्राबाई अजूनही शांतच होत्या. त्यांनी शांतपणे नाश्ता केला आणि चहा घेतला. मनोहर म्हणाले, “आज आपल्याला एक नवीन कामगिरी करायची आहे.” त्यांना आश्चर्य वाटलं, कामगिरी कसली? त्यांनी सुमित्राबाईंच्या हातात एक पत्र दिलं, पत्र पाहून तर त्यांना मोठा धक्काच बसला. ते पत्र यशवंतरावचं होतं. यशवंतराव यांनी त्यांच्या नावे लिहिलेले पत्र त्यांनी आधाश्यासारखे फोडलं आणि त्या वाचायला लागल्या. त्या पत्राच्या प्रत्येक शब्दातून यशवंतराव यांची व्यथा समजत होती. यशवंतरावांना या गोष्टीची आधीच कल्पना होती, की आपल्या सोबत हे असंच होणार आहे, त्यांनी त्यात लिहिलं सुमित्र ज्या अर्थी तुझ्या हातात हे पत्र आहे, त्या अर्थी तू योग्य ठिकाणी पोहोचलेली आहेस. आता माझी संपूर्ण चिंता मिटली. तू सुद्धा कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. तुझ्यासोबत काय घडलं असेल, तू काय सहन केलं असेल आणि त्यानंतर तू घराबाहेर पडण्याचं पाऊल कसं उचललं असेल, याची मला कल्पना आहे, काळजी करू नको. अग असं सहन करणारे आपणच एकटे नाही. अशा खूप लोकांसोबत असेच घडते आणि या समस्येवर विचार करतच मी आणि मनोहरने एक छान सुंदर असा हॅप्पी होम नावाचा वृद्धाश्रम सुरू केला आहे. अशा जोडप्यांसाठी किंवा अशा लोकांसाठी ज्यांना आपल्या मुलांनीच नाकारलेलं आहे. आज पासून तू ‘हॅपी होम’चा एक भाग बनली आहेत. मनोहर आणि वैशाली तुझी योग्य काळजी घेतीलच, जसे आजपर्यंत आम्ही त्या सर्वांची काळजी घेत आलो. कोणतीही चिंता नाही. मनासारखं आता रिटायरमेंटचं आयुष्य जगता येईल. मुलांची चिंता नाही किंवा मुलांवर अवलंबून नाही. त्यांच्या जगात आपली जागा नाही, तर आपण त्यांना त्रास देऊ नये, हे मी तुला आधीच सांगणार होतो पण तशी वेळच आली नाही. मला वाटलं आपली मुलं संस्कारी आहेत, ते आपल्यावर अशी वेळ येऊ देणार नाहीत, पण काही दिवसापूर्वी मी या सगळ्या गोष्टी पाहिल्यात ऐकल्यात आणि म्हणूनच मनोहरला सांगितलं की आपणही त्यातलेच आहोत. माझ्या सुमित्राची तू आता काळजी घ्यायची म्हणून यापुढे काय करायचं हे मनोहर तुला सांगेलच. माझ्या जाण्याने तुला खूप मोठा धक्का बसलेला आहेच, पण आता यातून सावर, मी असताना आपलं आयुष्य सुंदर होतं, असं मी म्हणेन. पण आता त्यापेक्षाही सुंदर आयुष्य तुझं आहे. तुला तुझ्या सुखी आयुष्यासाठी अनेक आशीर्वाद. सुमित्राबाईंनी पत्र वाचलं आणि त्यांच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहायला लागले. वैशालीताईंनी त्यांचं सांत्वन केलं. मनोहरावांनी आता त्यांना सांगितलं, “वहिनी आता खचून जायचं नाही, धीराने घ्यायं यशवंताने तुमच्या आधीच सोय करून ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. मी एक योजना आखली आहे. त्यामध्ये मला तुमचा सहभाग लागेल” आणि लगेच त्यांनी त्यांच्यासमोर एक दुसरे पत्र ठेवलं. त्या पत्रावर अजित आणि सुजित दोघांची नाव होती. ते कालच्या डाकीचे पत्र होतं. जे त्यांनी अजित आणि सुजितला पाठवलं होतं. पत्रात लिहिलं होतं, की तुमच्या वडिलांनी आपल्या हयातीमध्ये तीन कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि ती कर्ज फेडण्याची जबाबदारी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांवर येते, जर ते त्यांनी केलं नाही तर त्यांच्या मालमत्तेची जप्ती होईल. आजपर्यंत तुम्हाला न शोधणारी मुलं तुम्हाला शोधत कशी येतात हे आपल्याला पाहायचं आहे. तसंही सगळी संपत्ती, घर हे तुमच्या नावावर आहे वहिनी तुमच्याशिवाय त्यांना विकता येणार नाही, तसे ते बेघर होतील. तिसरं पत्र त्यांनी पुन्हा त्यांच्यासमोर ठेवलं आणि त्या पत्रात लिहिलं होतं, माफ करा कर्जाची रक्कम नाही, तर तुम्हाला तीन कोटीची रक्कम मिळणार आहे. कंपनीकडून थोडी चूक झाली. सारखी नावं असल्यामुळे ते पत्र तुम्हाला पाठवण्यात आलं.
मनोहररावांची माणसं अजित आणि सुजितच्या हालचालीवर लक्ष ठेवूनच होती. दोघांपैकी कोणीही सुमित्राबाईंना शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यांच्या घरात आता पार्ट्यांचा माहोल होता. त्यांनी कोणालाही सुमित्राबाई घर सोडून गेल्याचा पत्ता लागू दिला नव्हता. घरात तसंच वातावरण होतं, जसं सुमित्राबाई असताना असायचं. त्यामुळे शेजाऱ्यांना सुद्धा सुमित्राबाई घरी नसल्याचं कळलं नव्हतं. एक दिवस शेजारच्या मनोहरे काकू जेव्हा त्यांच्याकडे सुमित्राबाईची चौकशी करायला गेल्या, तेव्हा त्या बाहेरगावी गेलेल्या आहेत, असं सुनेनं सांगितलं आणि आज जेव्हा हे पत्र हातात पडलं तेव्हा दोन्ही मुलांच्या पायाखालची जमीन सरकली. आपण आईला न शोधून खूप मोठी चूक केलेली आहे. तिने आपल्या जीवाचं बरं वाईट केलं असेल तर, पण केलं असतं तर आत्तापर्यंत पोलिसांमधून फोन आला असता किंवा काहीतरी चौकशी झाली असती. नाही ती कुठेतरी सुखरूपच असेल! या गोष्टीचा विचार करून त्यांना खूप आनंद झाला आणि लवकरात लवकर आईला शोधायचं आणि ही तीन कोटीची रक्कम कोणत्याही परिस्थितीत मिळवायची. असा चंग जणू दोघांनी मांडला.
अजित आणि सुजितची एकमेकांना फोनफोनी सुरू झाली. आणि आईला कसं शोधायचं यावर खलबत व्हायला लागली, पण सुरुवात कुठून करायची? आई घरातून निघून गेली, हे नातेवाईकांना कळलं, तर सर्व आपल्याला दोष देतील, याची सुद्धा त्यांना भीती होती आणि ही तीन कोटीची रक्कम मिळणार आहे, म्हणून मुलं आईला शोधतात. हे समजल्यावर तर आणखीच नाचक्की होणार होती. पण तरीसुद्धा पैसे हातातून जाऊ देता कामा नये, म्हणून दोघेही मुलं आईला शोधण्यासाठी सुरुवात करतात. नातेवाईकांना फोन करण्यात आले. त्यातून कळलं की आई कोणाकडेच नाही व पोलिसात तक्रार देण्यात आली. फोटो पेपरमधून छापण्यात आले. तिथून माहिती मिळवता येईल तिथून माहिती मिळवण्यात आली.
मनोहररावांनी स्वतःच मुलासोबत कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की तुमच्या आई आमच्या इथे आहेत. दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना धावत पडत इथे आल्या. आईला बघताच तिच्याकडे धावत जाऊन तिच्या पायात पडत खोटे खोटे अश्रू ढालत होते. सुमित्रा वहिनींना ते सगळं नाटकी वाटत होतं. तू घरातून का निघून गेली. आमची काही चूक झाली का? झाली असेल तर आम्हांला माफ कर. आमच्या सोबत घरी परत चल. इथे राहायची काही गरज नाही. तुला सांभाळण्यासाठी तुझे दोन्ही मुलं खंबीर आहेत, असं करू नको. अशा शब्दांत तिची विनवणी करत होते सुमित्राबाईंना सगळी नाटकं लक्षात येत होती. आता त्यांनी ठरवलं की कोणत्याही प्रकारे त्यांना प्रतिसाद द्यायचा नाही आणि त्यांनी आपल्या मुलांना बाजूला केलं आणि त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. मनोहर आणि वैशाली तिथे आले. दोन्ही मुलांनी दोन्ही सुना त्यांना म्हणाले, की “आमच्या आईला कसेही समजावा, तिला आमच्या सोबत परत पाठवा. आम्ही तिची नीट काळजी घेऊ, तिने घरातून असं निघून यायला नको होतं. आम्ही तिची खूप खूप काळजी घेऊ. तिची आम्ही खूप शोधाशोध केली पण आम्हाला ती कुठेच मिळाली नाही. तुम्ही देवासारखे भेटलात. आमच्या आईला तुम्ही इथे सुखरूप ठेवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मनोहरराव म्हणाले, “आमचे येथे येणाऱ्या व्यक्तीला परत जायचं असेल तर तो त्याच्या मनाने जाऊ शकतो, त्यात आम्हाला आनंदच आहे. तुम्ही तुमच्या आईची तुमच्यासोबत येण्याची तयारी असेल तर आम्हाला काही हरकत नाही, पण तुम्हाला आमच्या काही अटी मान्य कराव्या लागतील.आम्हाला त्यांची तुम्ही काळजी घ्याल हे बॉण्ड पेपरवर लिहून द्यावे लागेल. जर त्यांच्या जीवाला काही झालं, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल, हे सुद्धा तुम्हाला लिहून द्यावे लागेल. नाही हो तुम्ही खूप चांगली मुलं आहात पण काही काही मुलं आपला हेतू साध्य झाला की आई-वडिलांसोबत सुद्धा काहीही करायला मागे पुढे पाहत नाहीत, म्हणून म्हटलं आणि त्यात तर माझ्या कानावर अशी गोष्ट आली की सुमित्राबाईंना एक मोठी रक्कम मिळणार आहे म्हणे, आणि काय समजावे तुम्ही त्या लालसेने तर त्यांचा शोध घेत आले नसाल? मनोहररावांचे हे शब्द ऐकताच सर्वांच्या चेहऱ्याचे भाव बदलले, ते सर्व भांबावले आणि त्याच अवस्थेत एक सुरात म्हणाले, “नाही, आम्ही तर त्याच्यातली नाही आहोत, जे पैशासाठी आई-वडिलांना सांभाळतात, आम्हाला खरंच तिची खूप काळजी आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही तिला येथे घ्यायला आलेलो आहोत. सुमित्राबाई या सगळ्या गोष्टीवर विचार करत असतात. आधी त्यांना हा सगळा बनाव वाटला, की आपल्या मुलांना वटणीवर आणण्यासाठी मनोहर रावांनी हे केलं असेल पण मनोहर थोड्याच वेळात यशवंतरावरच्या त्या पॉलिसीचे कागद त्यांच्यासमोर घेऊन आले आणि आता त्यांच्या लक्षात आलं खरंच यशवंतरावांनी त्यांच्यासाठी ही सगळी एवढी मोठी इन्व्हेस्ट करून ठेवली होती, पण आता या रकमेचं करायचं काय? हा प्रश्न सुमित्राबाईसमोर होता. त्यांनी मनाचा निर्धार केला आणि दोन्ही मुलांच्या समोरच त्या पॉलिसीच्या पत्रांवर सह्या केला आणि वकिलाला बोलावून ती सगळी रक्कम त्यांनी त्यांच्या पतीचा असलेलं स्वप्न ‘हॅपी होम’च्या नावे करून टाकलं. मुलांना या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला. त्यांनी खूप मोठा अकाड तांडव केला आणि आपल्या आईने हे बरं केलं नाही, आपल्या हातातून एवढी मोठी रक्कम गेल्याचे त्यांना दुःख झाले. त्यांच्या वागण्यातून सुमित्राबाईना दिसलं की त्यांना आपल्याशी काही घेणं देणं नाही, उलट पैशाशी त्यांचा संबंध आहे, म्हणून यासाठी ते आपल्या सोबत चांगलं वागत आहेत, अशा मुलांना रक्कम देणे ही नको आणि त्यांच्यासोबत जाणेही नको. त्यांच्याशी पूर्णपणे संबंध तोडून त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. मुलं सुद्धा आल्या पावली दणादणा पावल आपटत निघून गेली. ज्या मुलांना आई वडिलांचे महत्त्व नाही त्यांच्या पैशाशी फक्त घेणे देणे आहे, त्या मुलांच्या नावे एवढी मोठी संपत्ती करू नये, काही फायदा नाही.
सुमित्राताईनं आपले इथून पुढच आयुष्य ‘हॅपी होम’मध्ये सुखाने घालवण्याचे ठरवलं. त्या पूर्णपणे बदलल्या आहेत. त्यांनी आपले आयुष्य संपूर्णपणे हॅपी होम मध्ये असणाऱ्या सर्व लोकांची मनापासून काळजी घेण्यात आणि त्यांनी नवीन नवीन गोष्टी शिकायला आणि आपल्या आयुष्यामध्ये राहिलेले सगळे छंद जोपासायला सुरुवात केली. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे आनंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी त्यासाठी तो प्रयत्न करायलाच पाहिजे असं त्या प्रत्येकाला म्हणतात..
-प्रा. मोक्षदा विजय बेलखेडे