ती एक प्रसन्न सकाळ होती. घरात नेहमीसारखीच लगबग सुरू होती. विनय नुकताच उठून हॉलमध्ये खेळत होता. त्याची आई किचनमध्ये चहा-नाश्ता करण्यात मग्न होती, तर पप्पा सोफ्यावर बसून सकाळचा वर्तमानपत्र वाचण्यात दंग होते.
त्याच वेळी, बेडरूमच्या उंचावर असलेल्या खिडकीतून एक चिमणा आणि चिमणी पंखांची फडफड करत आत-बाहेर येरझारा घालत होते. खोलीत वरचा पंखा अगदी संथ गतीने फिरत होता. दुसऱ्या भिंतीवर भगवान बुद्धांचे एक शांत, प्रसन्न चित्र लावलेले होते जणू सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करण्यासाठी दोन्ही हात पुढे सरसावले आहेत.तो चिमणा आणि चिमणी आपल्या चोचीत गवताच्या काड्या आणि सुकलेली पाने आणून, त्या बुद्धांच्या फोटोमागे आपले नवीन घरटे विणण्याच्या तयारीत होते. नवीन संसाराची ती लगबग पाहण्यासारखी होती.
पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. चोचीत गवताची काडी धरून घरट्याकडे झेपावताना, चिमणीचा अंदाज थोडा चुकला आणि फिरत्या पंख्याचे पाते तिला जोरात लागले. एका क्षणात ती चिमणी थेट खाली बेडवर येऊन पडली.
“मम्मी! पप्पा! लवकर या… बघा काय झालं!” विनयने अत्यंत घाबरून आणि रडवेल्या आवाजात जोरात हाक मारली.
विनयचा तो आवाज ऐकून आई-पप्पा धावतच बेडरूममध्ये आले. बेडवर निपचित पडलेली चिमणी आणि तिच्याभोवती व्याकुळ होऊन, खोलीभर गोल फिरत जोराने चिवचिवाट करणारा तो चिमणा… हे दृश्य पाहून साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. प्रत्येकाचे मन दुःखाने भरून आले.
पप्पांनी लगेच चिमणीला हातात घेतले. आईने तिच्या चोचीला पाण्याचे थेंब लावले, जखमेवर हळुवार औषध लावले. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. त्या चिमणीने काही वेळातच आपले प्राण सोडले. तिचा तो जोडीदार मात्र अजूनही तिथेच भिंतीवर बसून केविलवाण्या आवाजात ओरडत होता, जणू तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता.
त्याच दिवशी दुपारी, विनय आणि त्याच्या पप्पांनी त्या चिमणीला अंगणातल्या परसबागेत नेले. तिथे एका कोपऱ्यात छोटासा खड्डा करून तिला आदराने पुरले. तिच्या आठवणीची आणि प्रेमाची खूण म्हणून विनयने अगदी त्याच जागेवर एक आंब्याचे लहानसे रोपटे लावले.
त्यानंतरचे काही दिवस खूप जड गेले. तो चिमणा रोज सकाळी यायचा. परसबागेतल्या त्या आंब्याच्या रोपट्याभोवती, जिथे चिमणीला गाडले होते, तिथे बसून तासभर चिवचिवाट करायचा. जणू तो आपल्या जोडीदाराशी संवाद साधत होता. एक महिना हे रोज चालले… आणि मग अचानक तो चिमणा यायचा बंद झाला. दिवस सरत गेले, महिने उलटले.
आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले होते.
परसबागेत लावलेले ते आंब्याचे रोपटे आता छान वाढले होते, त्याला सुंदर हिरवीगार पाने आली होती. आज सकाळी विनय नेहमीप्रमाणे बागेत गेला आणि अचानक आनंदाने ओरडला, “मम्मी, पप्पा! लवकर इकडे या… बघा काय आहे!”
आई आणि पप्पा धावत बागेत आले. विनयने आंब्याच्या झाडाच्या फांदीकडे बोट दाखवले. तिथे पानांच्या आडून एक सुंदर, नीटनेटके नवे घरटे आकारास आले होते. आणि त्या घरट्यात एक चिमणा आणि चिमणी आनंदाने चिवचिवाट करत बसले होते.
तो चिमणा दुसरा कोणी नसून, आपला जुनाच मित्र आहे हे ओळखायला कोणालाच वेळ लागला नाही. त्याने आपल्या नवीन जोडीदारासोबत त्याच आंब्याच्या झाडावर नवीन संसार थाटला होता, ज्या झाडाची मुळे त्याच्या जुन्या प्रेमाच्या आठवणींवर घट्ट रोवली गेली होती.
घरातल्या सर्वांचे चेहरे आनंदाने आणि कृतज्ञतेने फुलून आले. एका चिमणीच्या जाण्याने जे घर कधीकाळी उदास झाले होते, आज त्याच झाडावर ‘नवीन घर’ बसल्याचा आणि एक नवीन जीवन सुरू झाल्याचा सुखावह आनंद संपूर्ण कुटुंबाला मिळाला होता.
– मिलिंद अवचित इंगळे
मूर्तिजापूर
भ्रमणध्वनी – ८४८५८६१६२०