खोटेपणाचे मुखवटे

चेहऱ्यावरती हसरा मुखवटा,

शब्दांतून पाझरतो गोडवा,

मनात मात्र फणा काढतो,

स्वार्थाचा विखारी कावा.

 

विश्वासाच्या पालवीवरती,

हे अलगद निखारे ठेवतात,

आपुलकीचा आव आणूनी,

थेट मुळावरतीच घाव घालतात.

 

निरागसतेचा बळी जातो,

वाहतात नयनांतून धारा,

विश्वासघाताच्या या वणव्यात,

राख होतो तो बिचारा.

 

रात्र-रात्र अश्रू ढाळत,

तो स्वतःलाच जाळत राहतो,

निरपराध असूनही रोज,

गुन्हेगाराची शिक्षा भोगतो.

 

ज्याने हे खोल घाव दिले,

तो मात्र निर्लज्ज हसतो,

दुसऱ्याची राखरांगोळी करून,

आरामात हात शेकतो.

 

पाषाणाच्या त्या काळजात,

करुणेचा पाझरच नसतो,

कुणी प्राण जरी सोडला,

तरी तो निर्विकारच असतो.

 

ना खेद, ना कोणती खंत

दुसऱ्याच्या तडफडण्याची,

त्याला सवय जडलेली असते,

केवळ स्वतःची पोळी भाजण्याची.

 

दुसऱ्यांचे हुंदके ऐकूनही,

त्याची झोप कधीच मोडत नाही,

अशा त्या कोडग्या मनाला,

कोणतीच वेदना टोचत नाही.

 

तो सहज पुढे निघून जातो,

शोधत नवी स्वार्थाची वाट,

शून्य पश्चात्ताप, अन्

चेहऱ्यावर तोच खोटेपणाचा थाट.

 

माणसातला माणूस आज,

गर्दीत असा कसा हरवला?

भावनांच्या या बाजारात,

आता केवळ बाजारू स्वार्थ उरला!

विजय बेलखेडे 'साहित्यामूलाग्र' मुख्य संपादक

– विजय बेलखेडे 

साहित्यामूलाग्र (संपादक)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top