तुझ्या नशीली डोळ्यांत अता, बुडतो आहे हळूवारसा
माझाच मनावरचा ताबा, सुटतो आहे हळूवारसा
नकोस देऊ अता तरी तू, सौंदर्याची कबुली मला,
रोज चांदवा तुझ्या रूपाने, फुलतो आहे हळूवारसा
तुझे बोलणे मधाळ वाटे, धून जणू ती संगीताची ,
श्वासांमध्ये सुगंध तुझाच, मिळतो आहे हळूवारसा
कधी वाटले नव्हते मजला, असेच काही घडू शकणार,
तू भेटलीस आणि काळ हा, लपतो आहे हळूवारसा
मज शब्दांना जणू लाभली, आज तुझी ती गार सावली,
प्रत्येक शेर माझा तेव्हा, सजतो आहे हळूवारसा
– मिलिंद अवचित इंगळे
मूर्तिजापूर (अकोला)