एक छोटसं बीज मातीमध्ये पडलं…
लगेच घाबरलं… थोडसं रडलं…
आता सगळं संपलं असं त्याला वाटलं
गंभीर शांतता काळोख सर्व बाजूला… प्रकाशाला प्रवेश नव्हता…
बीज भयभीत झालं.. निराश झालं
आता सगळं संपलं असं त्याला वाटलं
माती म्हणजे शेवट…माती म्हणजे थांबणं नसतं… तर थोडा वेळ स्वतःसोबत घालवणं असतं हे त्याला
कळलं नव्हतं..
दिवस चालले पण अजून काहीच घडले नाही… असं त्याला सतत वाटत होतं…
पण कुठेतरी हळुवार बदल सुरू होता… जे तुटल्यासारखं वाटत होतं तेच खरं तर जुळत होतं… जे गमावल्यासारखं वाटत होतं तेच नव्याने सापडत होतं…
बीजेला आता धीर आला स्वतःची मुळे तो ओळखायला लागला…
सगळं लगेच समजेलच असं नाही…
सगळं लगेच दिसेलच असं नाही… हे आता त्याला उमजायला लागलं…
आणि जेव्हा त्याने स्वतःला मातीवर सोपवून दिलं तेव्हा स्वशंकेचं कवच अखेर तडकलं…
आतून आत्मविश्वासाचं कोवळं अंकुर फुटलं…हिरव्या स्वप्नांना आता आकार मिळू लागला…
भयभीत बीज आता निर्भय झाड झालं… कारण जे शेवट वाटलं ते सुरवात ठरलं…जे हरवल्यासारखं वाटलं तेच स्वतः होणं ठरलं…जे गाडलं गेल्या सारखं वाटलं ते तर पेरलं जाणं होतं हे त्याला आता स्पष्ट झालं ….
– श्रीया तांबडे
मूर्तिजापूर (अकोला)
खूप छान मॅडम