पक्षांचा चिवचिवाट ना
माणसाचा गोंगाट
सूर्या आधीच बा माझा धरतो
शेतीची पायवाट
तिथं नाही, आठ तास ड्युटीचा नियम
पीएफ, पगार डब्बल
रविवार सुट्टी ना, मेडिकल रजा
याचा कुठलाच नाही क्लेम
चिकन फास्टफूट,
चहा, कॉफी ड्रिंक ना,
एशीचा वारा
दिवस रात्र, महिने साल
ऊन पाऊस गारव्यातूनही बाला
कधी नसतो सुटकारा
मीठाच्या खड्यासारखा बाप
हाडाचं काड, रक्ताचं पाणी करून
घामाच्या धारानं मातीत सोनं पिकवून
दोन वेळेच्या अन्नाला मौताद असणारा
बाप माझा असाच फाटका आयुष्यभर
शेतकरी होऊन, कुन्या कर्माची भोगतोय सजा
याचा कुठेच नाही गाजावाजा ना लेखाजोखा
अन्…
आयत घबाड दलाल लुबाडताना
दान्यासारखं मातीत मुरून कमवलेलं
आपल्याच कष्टाचं
पण,
नफा ना तोट्याचा हक्कदेखील नसणा-या
बाच्या शेतीचं गणितचं मला कळालं नाही.
– क्रांती गायकवाड
हंद्राळ, लातूर.
भ्रमणध्वनी – ९५२७९२७०४०