आई असते एक नातं
घरघरणारं जातं
दुभंगलेली माणसं
जोडणारं पातं असते आई
■■■
आई असते तारा
प्रेरणांचा पिसारा
चळवळीचा गाभारा
परिवर्तनाचा झरा असते आई
■■■
आई म्हणजे …
दूध पिऊन झोपलेलं बाळ
ढगाळून आलेलं आभाळ
धो – धो पडणारा पाऊस असते आई
■■■
आई म्हणजे मेणबत्ती
स्वतः झिजून
दुसऱ्याला प्रकाश देणारी
मनातील दुःख मनात गिळून
सुखाच्या सुहासाचा
श्वास सोडणारी
अगरबत्ती असते आई
■■■
आई म्हणजे प्रतिक्षा
नववधुला माहेरची
वासराला गाईची
भुकेल्याला अन्नाची
पोरक्याला ममतेची
परिवर्तनाची दीक्षा असते आई
■■■
आई म्हणजे कथा
तुकोबांची गाथा
दुखीतांची व्यथा
जीवनाची रेखांकिता असते आई
■■■
आई म्हणजे स्वातंत्र्य
समतेचं यंत्र
न्यायाचं तंत्र
बंधुत्वाचा मंत्र
समाजाचं चित्र असते आई
■■■
आई म्हणजे वाद
दुभंगलेली माणसं जोडणारी जात
मनामनात समता पेरणारी
अंधाराला चिरून प्रकाश देणारी
चिमणीची वात ही असते आई
■■■
आई म्हणजे नवा शोध
प्रबोधनातील बोध
असतो नवा विचार
क्रांतिकारकांचा प्रहार
परिवर्तनाची धार
शांतीचा समतेचा पेरत जाणारा
बुध्दाचा विचारही असते आई
■■■
आई म्हणजे समृद्धी
सुख शांतीची वृद्धी
शांती मानव धर्म हैं |
सांगणारा बोधी असते आई
■■■
आई म्हणजे पाऊस
शेतकऱ्याच्या मनातला
पृथ्वीच्या गालातला
चातकाच्या चोचीतला
नव वधूच्या डोळ्यातील
काहूर असते आई
■■■
आई म्हणजे निळं आकाश
लख्ख पौर्णिमेचा प्रकाश
शुभ्रतेचा प्रताप
कर्दन काळाचा घात
अमावसेची रात ही असते आई
■■■
आई म्हणजे गाणं
पोटातलं ओठात
ओठातलं पोटात गुणगुणणं
जात्याची घरघर , जीवनाची सरसर
लोखंडाचं परिस
परीसाचं सोनं असते आई
■■■
आई असते मैत्रीण जिवाभावाची
संकटसमयी धाऊन येणारी
तुटलेल्या मनाला …
धीर देणारी सहचरणी असते आई
■■■
आई म्हणजे चंचलता
निर्मळतेनं वाहणारी सरिता
निसर्गाची हिरवळता
उधानलेल्या समुद्राची
लहारात असते आई
■■■
आई काजवा ही असते
अंधाराशी खेळणारा
मीच मीच फिरणारा
हवेतील गारवा असते आई
■■■
आई म्हणजे वाणी
नारळातील पाणी
आकाशातील चांदणी
अजिंठयाची लेणी असते आई
■■■
आई म्हणजे प्रवाह
धो- धो वाहणाऱ्या विचारांचा
समता , न्याय ,स्वातंत्र्य
आणि बंधुत्वाच्या महासागराचा
तळ ही असते आई
■■■
आई असते पिंपळाचं पान
बोधिवृक्षाचं रान
ध्यानस्थाचं ध्यान असते आई
■■■
– देवानंद पवार
छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद
■ संवाद : 9158359628
■bodhiparnprakashan@gmail.com