ओळख जुनीच आपुली… नव्याने होत आहे,
सुटलेले बंध मैत्रीचे… पुन्हा घट्ट होत आहेत!!
दुराव्याच्या वाटेवरती… पाऊल थांबले होते,
मनातले कित्येक शब्द… ओठांवरती राहिले होते,
आज पुन्हा त्या आठवणींचे… मनात गंध दरवळत आहे,
ओळख जुनीच आपुली… नव्याने होत आहे!!
काळाच्या ओघात सारे… बदलून गेले होते,
तरी मनाच्या कोपऱ्यात… काही क्षण जपले होते,
जुन्या त्या आठवणींना… नवे रंग मिळत आहेत,
सुटलेले बंध मैत्रीचे… पुन्हा घट्ट होत आहेत!!
किती ऋतू सरले तरी… आपुलकी तीच आहे,
न बोलताही समजणारी… मैत्री अजूनही तीच आहे,
हरवलेले ते हसू पुन्हा… ओठांवरती फुलत आहे,
ओळख जुनीच आपुली… नव्याने होत आहे!!
नको आता मोजूया… कोण चुकलं, कोण हरलं,
जपायचं आहे फक्त… जे मनाने पुन्हा मिळवलं,
जुनं अंतर विसरून… आज मन जवळ येत आहे,
सुटलेले बंध मैत्रीचे… पुन्हा घट्ट होत आहेत!!
जुन्या वाटेवरती पुन्हा… नवी पाऊलवाट झाली,
मनाच्या कोऱ्या पानावर… मैत्रीची नवी ओळ झाली,
काळाने दूर नेलं होतं… मनाने पुन्हा जवळ आणलं आहे,
ओळख जुनीच आपुली… नव्याने होत आहे!!
— सुवर्णा केदार
वारणी – बीड