रखरखत्या उन्हात आता, तापली ही काळी आई,
आभाळाकडे लावून डोळे, बळीराजा वाट पायी.
मेघ दाटून येती वरती, परी थेंब ना गळे,
हिरवीगार स्वप्ने सारी, डोळ्यांदेखत जळे.
मातीच्या कुशीत रोपे, तडफडून सुकून गेली,
करपणाऱ्या पानांवरती, निष्ठूर वेळ ही आली.
वाऱ्याच्या उष्ण झळा, देती वेदनेचे चटके,
पावसाच्या आशेवरती, प्राण पाखरांचे भटके.
काळे ढग येती नुसते, आशेचा खेळ मांडून,
जातात निघून दूर, वाऱ्याच्या रथावर बसून.
चातकाची आर्त हाक, विरून जाई आसमंतात,
पाणी नाही, उरले आता, फक्त अश्रूच डोळ्यांत.
बरस रे घननीळ्या आता, नको पाहू अंत असा,
सोन्यासारख्या पिकांचा, का कोरडा पडे घसा?
तुझ्या एका थेंबासाठी, शिवार सारे आसुसले,
जीवन द्यायला मातीला, का रे आभाळ असे रुसले?
– विजय बेलखेडे
संपादक (साहित्यामूलाग्र)
Email – editor@sahityamulagra.com
Pingback: साहित्यामूलाग्र मासिक अंक ऑगस्ट - २०२६ - साहित्यामूलाग्र