बैलगाडी

    अंबरवाडीतल्या उखणत गेलेल्या रस्त्याच्या कडीला जगन येका खोपटात राहात होता. त्यानं येगयेगळ्या झाडायचं फोकारं काढून त्याच्या बंदाट्या लावून खोपट बांधलं व्हतं. त्याच्यावर उसाचं कस्पाट, पालापाचुळा टाकून शाकारल्यालं खोपाट इंद्राच्या महालावानी सजविलं व्हतं. उठता बसता खोपटातला परवर उदासून गेला व्हता. चुलीच्या धुपनानं खोपाट आतून काळंभंगार झालं व्हतं, त्याच्यावर जाळं लळमटं लोंबत व्हती, खोपाट चिमणीच्याधुरानंबी काजळून गेलं व्हतं. जगनचा इत्यासबी आन भूगोलबी तसा लई मोठा हाय सांगण्यासारखा पर ज्या कुणीबी माणसायनी राजा समजून जगनच्या गळ्यात आपली पोर बांधली व्हती ती जगनला तरूणपणातच सोडून गेली व्हती. तरूणपण सरलं, जगन चाळीशीकडं झुकला आन आजपस्तोर त्या खोपटात जगन एकलाच नांदत व्हता. अंबारवाडीतल्या समद्या जिमिनी बरड माळरानाच्या व्हत्या. काळ्या जिमिनीचा पट्टा त्या शिवारात कुठं नदरं पडायचा न्हाई. भावकीतल्या कुरबुरीवून वाद उभा राह्यला तव्हा कोर्टाच्या तारखापाई जगनची चाळीस पन्नास एक्कर जिमिन वजीवजी वकीलायच्या घशात गेली. जगनफकीर झाला. इथून पुढंचं आयु्‍ष्य त्यो सालाचा गडी म्हणून कसंतरी गुजारीत व्हता.

 सालकरी हुण्या आगुदर जगननं खिलार बैलाची जोडी जीव लावून संबाळली व्हती. घरच्या कालवडीचे खोंड असल्यानं जगनचा बैलावर लई जीव व्हता. आन त्यांच्यासाटी त्यानं साल धरलं व्हतं. राबत व्हता. बरडा माळाच्या जिमिनी, बेभरवशाचा पाऊसकाळ, जिथं माणसायच्या हातातोंडाची गाठ पडणं मुश्किल तिथं जनावरा- जित्राबायची काय गत! ह्या समद्या इचाराच्या येसकीत सापडून ‘आापुण इकून टाकाइत बैलं’ असा इचार जगनच्या मनात येई. पर आजवर भरल्या शिवारातून दाण्याची रास ह्याच जोडीनंच घरात आणून टाकली, चार सुखाचे दिस दावले, आपल्या वढातानीच्या काळात ह्यांनीच साथ दिली, अशा आठवणी जगनच्या मनात जाग्या व्हत राहात आन बैलं इकायचा इचार त्यो पुढं पुढं ढकलीत रहायचा. दुष्काळामुळं, कर्जाच्या बोज्यामुळं गावात –हानं न्हाई जमत, त्यापरीस शे-हात जावून धंदा बघावा एखांदा, मिळंल त्यो टुकडा गिळावा आन जिवात जीव हाई तव्हर बैलं जगवाईत असा इचार जगनच्या मनात उतरला. दुसर दिशी तांबडं फुटायच्या वक्ताला जगननं गाडी जुपली. कोपटात शेवटाची एक चक्कर टाकली. किडूक मिडूकबारदाना गाडीत ठुला. कासरा हातात घेतला. ढकलीवर चढून गाडीत उडी मरली तशी बैलं धन्याच्या हुकमाची वाट न बगता शे-हाच्या वाटाला लागली.

 जगननं गाव सोडलं. उन्हाची रखरख वाढली व्हती. मधीच येखादा व्हला भुर्रकन उडून दिसेनासा व्हत व्हता. झाडीची दाट सावली हेरून फाटीवर बसून येखादं पारवं घुमत व्हतं. त्याच्यामुळं वातावरण आणखीनच भकास वाटत व्हतं. दुपार टळून गेली. चलून चलून बैलाइच्या तौंडाला फेस आला व्हता. गाडीवाटच्या चकारीवं बैलं मुतले व्हते त्यो वला भाग नक्ष‍ी काढल्यावानी दिसत व्हता. ‘बैलं तान्ह्याजले आसतेल’ आसं जगनला वाटलं म्हणून गाडीत उभा राहून त्यो पाण्याचा शोध घ्यायला लागला. रस्त्याच्या कडीला काळ्या जिमिनीत झळाया मिरवत व्हत्या. नेहरीवक्तालाच अंबारवाडीची शिव वलांडली व्हती. कुण्या वारक-यानं रस्त्याच्या बाजूला पाण्याचा हौद बांधला व्हता तिथं जगननं कासरा आखडला. येसनी वढल्या गेल्या तशा बैलायनी जिभा भायेर काढल्या. बाजूला झाडाची सावली बघून जगननं गाडी सोडली. तशी बैलं पाण्याच्या हौदावं पडली. आतापस्तोर तहान लागल्याची कळ पाणी दिसल्यावर थोपली न्हाई. बैलायनी घटाघटा दोनचार घागरी पानी वढलं. पाण्यावून तोंड हाटिवलं तसं जगननं शीळ घालयला सुरूवात केली. शीळ ऐकून बैलायनी पाण्यावर तोंड टेकविल्यासारकं केलं आन माघं हटले. जगननं झाडाबुडी बैल बांधले, कडब्याच्या दोन पेंढ्या आळा सोडून मोडल्या. बैलापुढं टाकल्या आन समाधानानं बैलायकडं बघत जगन पारूखभर बसून राहिला. शहर कोसभर लांब हाये, सांजपस्तोर जाणं व्हईल अशा इचारातच जगनला डुलकी लागली. डोळं उघडलं तव्हा तिसरा पहार झाली व्हती. जगननं बैलं पुन्हा पाण्यावर नेले. स्वताचेबी हातपाय तोंड खंगाळले. जू बैलाच्या खांद्यावर टेकवून जुपन्या घातल्या. कसारा माघं फेकला. ढकलीवून गाडीत उडी मारली तशी बैलं जोमानं चालाया लागली. नवा गाव, नवं काम, नवी माणसं, नवा रोजगार ह्या हिशेबानं जगन मनातल्या मनात खुश व्हता.

‘रामपारी पोटात अंधार घिऊन जगणा-या शे-हातल्या पाखराची गाणी’ जगनला आता ऐकाया 

मिळणार व्हती!

 जगन शे-हात घुसला तव्हा कडूसं पडलं व्हतं. शे-हात दोन्ही बाजूला रस्ता सोडून मधूमध खंबल्यावर दीपमाळा लावल्यावानी उजेड दिसत व्हता. सडकावर लांडगा माघं लागावा आन वाट फुटल तशी मेंढरं रेटारेटी करीत पळाईत तशा मोटराच मोटरा पळत व्हत्या. दोन चाक्या, चार चाक्या, सायकली, मोठाल्या टरकाह्यवडाल्या गाड्या लाइटं चमकीत पळत व्हत्या. जगन शे-हात पयल्यांदाच आल्याला, त्याला थोडं बावचळल्यासरकं झालं. बैलायलाबी सडक नवी व्हती. त्यामुळं बैलं भायेर पडत व्हते. येकमेकायच्या हमरीतुमरीवर येवून भायेर वढायचा प्रयत्न करीत व्हते. झकपक सडकावर खूर टेकत नव्हते, सारखे सटकत व्हते. बैलं आळीपाळीनं एकदोनदा घसरले. तसा गाडीत बसल्या बसल्या जगनला हाबाडा बसला. जिकडं तिकडं पळापळ करणारी वाहनं, पळापळ करणारी माणसं दिसत व्हती. समदीकडं डांबरी सडक उजेडात चकमत व्हती. पर गाडीवाटाची चकार कुठं नदरं पडत नव्हती. आशे इचार जगनच्या मनात चालू व्हते तशी पुढल्या चौकात वाहनं तुंबल्याली दिसली. पुढं गाडी दापायाजोगी जागा नव्हती म्हणून जगननं कासरा आखडला तशी बैलं शेपटं फिरवीत जाग्यावर उभी राहिली. जगनच्या नशीबाचं स्टेरिंग फिरलं व्हतं आन जगन शे-हाकडं वळला व्हता. ‘तुंबल्याली वाहनं म्होरं का धकत न्हाईत?’ आसं त्यानी एका माणसाला इचारलं. त्या माणसानी जगनला खोलवर न्हेळून बघितलं आन म्हणला, ‘शहरात नवीनच दिसतोस! अरे बाबा, याला सिग्नल म्हणतात. आणि वाहतूक नियंत्रीत करण्यासाठी ती अशी प्रत्येक चौकात बसविलेली असतात.’ ‘तुला तो लाल दिवा दिसतोय का?’ हे शहरी माणसाचं बोलणं समदंच्या समदं डोस्क्यात आलं न्हाई पर म्होरं लाल दिवा लागल्याला दिसत व्हता. काहीतरी बोलायचं म्हणून जगन बोलला, 

‘त्या लाल दिव्याचा वाहनं तुंबण्याबरं काय समंद?’ तव्हा त्यो माणूस बोलला, ‘अरे वेड्या! लाल दिवा लागला म्हणजे थांबावे, व काही क्षणांत हिरवा दिवा लागल्यावर चालू लागावे असा त्याचा अर्थ!’ जगन डोळं फाडून त्यो माणूस बोलत असल्यालं कौतुकानं ऐकत व्हता. प्रत्येक गोष्ट भिरभिर नदर फिरवून त्यो समजून घेत व्हता. लहान्या वाहनापसून मोठाल्या वाहनापस्तोर समदी वाहनं गुरगुर करीत धूर सोडीत व्हती. समदीकडं धूरच धूर दिसत व्हता. लाइटाच्या उजेडात रातचा अंधार उजळून निघाला व्हता.

 लाल दिवा हिरवा झाला. वाहनं धुसपुसत, गुरगुरत भन्नाट निघून गेली. जगननी गाडी दापली. आता त्यो लई लांबवर आला व्हता. रस्त्याच्या कडीला मोकळं पटांगन दिसलं. येका बैलाचा कासरा आखडून गडी पटांगनात वळवून उभी केली. ‘सडकावरच्या दगदगीतून जीव सुटला’, आसं जगनला वाटलं. थोड्या येळातच त्यानं बैलं जुपण्यातून मोकळी केली. जांघात घोंगावणा-या माशा जिभा काढून, मान वळवून हाकलून लावायचा प्रयत्न बैलांनी एकमतानी चालविला. जगन समद्या पटांगनावर नजर फिरवित व्हता. चहूकडं पसरल्याला पाल-पाचुळा, तीन दगडं मांडून चुली केल्याच्या खुणा, जिकडं तिकडं शेणाचे पव्ह, हे समदं त्याच्या नजरातून सुटलं न्हाई. कुणीतरी गावातली माणसं हितं उतरून गेल्याली असायला 

पाहिजीत! अशा इचारानं जगनचा जीवात जीव आला. ‘ही शे-हातल्या बाजारतळाची जागा हाय’ असं थोड्यायेळानं त्याच्या ध्यानात आलं. लांबचा पल्ला चलून आल्यानं भुक्याजल्याली बैलं पालापाचुळा हुंगाया लागली. जगननं मंग दोन कडब्याच्या पेंढ्या बैलायपुढं टाकल्या. वैरण कडाकडा फोडीत बैलं खुशीनं धन्याकडं बघत व्हते. रातीनं आंधाराचं पांघरून वढलं व्हतं. समदीकडं अंधारगुडूप झालं व्हतं. जगननं दशम्या सोडल्या. कुटका पोटात ढकलला. घोंगडं आंगावं घेतलं. गारवा वाढला व्हता. जगन कव्हाच झोपीच्या कुशीत शिरला व्हता.

___________________

प्रा. सुशील केकान हे मराठी साहित्यातील ख्यातनाम लेखक आहेत.

– प्रा. सुशील संदिपान केकान

भ्रमणध्वनी – ९६६५९७९१३१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top