आठ दिवसातनी आमचा बाजाराचा एक दिवस. त्या दिवशी मोटारीत वज्जर धूम असते; अन् आजच्या बाजाराले तालूक्याले जायची हुक्की जाना आबाले आली, बुडा मले ईचारे कारे नातु अजनायी, चालला शायीत ? म्या म्हणलं होजी ,तुमाले काय काम, हाय “मले याचं हाय बाजाराले तिकडून काही कपडंलत्त आणतो म्हणतो अन् अडक मडक पीठ, मीठ, हे बी आणावं”. या नाबापा मले का डोयीवर न्या लागते.
जाना ,आबाची तयारी झाली, पोयातल्या बैला सारखा सजला. डोईवर फेटा, अंगात बांडीस, दुटांगी धोतर, पायात बोडखी, हातात सोटा, ओठावरची मीशी ते नंदीतून काढलेला तागासारखी पांढरीफटक, दाडी जवारी सोंगल्यावर राह्यलेल्या फनफटा सारखी वाढलेली, असा हाय बुड्याचा अवतार.
गावातल्या पयल्याच गल्लीत बुड्याची अन आमची सवारी निघाली इस्टानावर तिथं जाताच जामगर्दी होती. मोटार आल्या आल्या जानाआबाले कसाबसा मोटारीत धसोला. चढणाऱ्याच्या धामधुमीत बुड्या फेटा अटकला वर अन बुडा आतनी मी आपला फेटा घेऊन गेलो. तालुक्याले जाता-जाता बुडा कुटारासारखा कुटला, जशी मोटर चाले, तसा बुडा हाले. आमच्या गावच्या झेडपीच्या सौजन्यखात्यातील रोडवर जसा जसा डायवर बीरेक दाबे तसा बुडा चेपे, नवसाची एकच गाडी असल्याच्यानं सगळ्या इस्टापवरचे लोक घेते. या सगळ्यातून झुंजत जानाआबा तालुक्याला पोहोचला जसा जानाआबा खाली उतरला, तसा “मले म्हणे काय लेका नातू, साजरी खातर, काहळली मोटरीन, चाल घोटभर च्या घीऊ”.
मंग जानाआबा जरासा बसून बाजाराच्या वाटेने गेला. मी आपला कालिजात गेलो. दोनचार इकडे तिकडे चक्कर काटले. रायल्या सुयल्या मैतराची भेट घेतली. बायमूळ करून इस्टानार हजर त माह्या आधी बुड्यान हजेरी लावली. बुड्याजवळ खताच्या पोत्यात भरलेला बजार त्याचं तोंड दोरीन बांधलेलं त्यातनी भाजी ,पाला, गुळ, तेल
बुडीसाठी लुगडं ,बुड्याले नवं धोतर,बाडीस बुडीचा चोयीचा खन ,दुसरा सरटाचा झोरा त्यात तिकट मीठ तेलाची धळी, अटन मटन,अन् थंडपाण्यासाठी एक मटक घेतलं होतं.
तालुक्याच्या इस्टानावर मुंगासारखी गर्दी, साऱ्याईच्या गाड्या लागायच्या; पण आमची नवसाची भवानी अजून लागलीच नोती, तीत कवास टईमावर लागत नोती म्हणा. वाट पाह्यता पाह्यता बुड्याची चुळबूय चालू झाली होती. बुड्याले सजग करत म्या हुशार केलं. पाह्यजो आबा अज हाय बजार जाम धूम हाय, जरा धवसीने घेजो नाहीत, राह्यसीन खाली, समावून घेजो, तुयावरच मही भीस्त हायलेका ,बुड्यान मलेच कैचीत धरलं .
मोटार लागली बाजाराची पुटळी मळकं सोटा घेवून बुडा मोटारी जवय आला. गच पाहून बुडा खाली मले म्हणे, मायले लेका यातनीत, मायले लेकरू भारी हाय,बजार माह्यजवय ठेवून बुडा मडकं घेवून कसाबसा मोटारीच्या दरोज्यात धसला. बुडा आतनी पण मडकं अटकल दरोजाले वर रेटारेटीत मडक वर लागून त्याची टीकर पडलीत. लोकायीच्या डोक्यावर घनगळ गेलं, बुड्याच्या हातात.
बहिरच्याईन बुड्यालेच दोनदा शिव्या हासडल्या. आतनी बुड्याले आगीतून निसटून फोफाट्यात सापडल्यागत झालं. तिथूनच बुडा कल्ला करे माही तिकीट काहळजो रे.म्या म्हणल हो…
मोटारीतल्या धुमीत बुडा घामाघुम चुलीवरच्या तांदुया सारखा शिजला. उखयातल्या दयी सारख्या ठेसून ठेसून मोकया झाला. घामान फेटा बांडीस धोतराचा सोंगा मीरगातल्या पाण्यासारखा भीजला. गाव आल्यावर बुडा खाली उतरत डसाडसा दोन गीलास हापशीवर पानी पेला. हातातली मडक्याची घनघडी पाहून म्या म्हणलं हे काह्यले गा, अंबे पोट्टयायईची डफळी होते याची, बुड्याले बाजाराहून घरी घेऊन आलो, बुडीजवय बाजार देल्ला. हातातला काठी बाजूला ठेवून डोक्यावरचा फेटा उललत बुडा म्हणाला. नातू तालुक्याच्या बाजारानं माही आकान्त काहळली; पन तुवा माही भिस्त ठुली गळ्या.
दुसऱ्या बजाराच्या खेपीले बुड्याले माह्या पैशानं याच आवतन देलं; पण बुडा काही केल्या मानेच नायी, सोळला रे तुया बजार, त्या मोटारीनं माणूस सारा कुटला, अन आपला तालुक्याचा बाजार पुरा सुटला….
प्रा. श्रीकृष्ण शामसुंदर
– प्रा. श्रीकृष्ण शामसुंदर
भ्रमणध्वनी – ९२८४४८४२७९
बेंबळा ( कारंजा, वाशीम )