उजेडाचा नवे वळण देणारे क्रांतिकारी चिंतन

 

       कविवर्य प्रमोद वाळके यांच्या ‘उजेडाचे नवे वळण’ या कवितासंग्रहातील कविता ह्या विचारकविता आहेत. त्यात त्यांचे अलीकडल्या काळातील चिंतन प्रकट झालेले आहे. 

       ‘उजेडाचे नवे वळण’ मधील ‘मूल्यांकन’ या पहिल्याच कवितेत कवीने उभे केलेले प्रश्न अत्यंत मूलभूत स्वरूपाचे आहेत. असत्याला सत्य मानणाऱ्या या काळात मूल्यांकनाचे निकषच पार बदलून गेलेले आहेत. इथे प्रामाणिक कष्टांचे मूल्यांकन होत नाही. जिद्दीच्या नेक धडपडींचे मूल्यांकन होत नाही. सत्याचे आणि सत्यनिष्ठेचे मूल्यांकन होत नाही. शाश्वत सौंदर्याचे आणि परिवर्तनस्वभावांचे मूल्यांकन होत नाही. त्याचे मापदंडच या काळाने बाद केलेले आहेत. 

     “बुद्ध, बाबासाहेब, पृथ्वी, आकाश, पक्षी

     पाणी, हवा, फुले, गवत आणि माझा बाप

     या सर्वांचेच मन एकसंध आहे

     हेच माझ्या कुटुंबाचे आदिबंध आहेत

  त्यांचे जीवनप्रमाणक मुठीत तरी कसे घेणार?

     कोणतेही निकष नसताना

     त्याचे मूल्यांकन तुम्ही कसे करणार?”

                                (मूल्यांकन, पृ.१९) 

असे मूलभूत प्रश्न उपस्थित करून कवीने मूल्यांकनाचेच फेरमूल्यांकन केलेले आहे. पारंपरिक मूल्यांकनपद्धतीच्या उलटतपासणीत अनेक तर्कविसंगत प्रश्न कवीने पुढे आणलेले आहेत. हे प्रश्न माणसाचे अवमूल्यन होऊ नये या उदात्ततेतून उगवलेले आहेत. हे उगवणे दुःखातून येते आणि दुःखांचे टाहो ऐकणारे तरल मन हे तलस्पर्शी कवीचेच मन असते. 

     “माझ्या वस्तीमधील घरांच्या हृदयातून

     निघतो बहिष्कृत धूर

     हृदयाच्या धुपटण्यात गुदमरणारे चेहरे

     होतात निर्विकार

     कोंदटलेले हतबल शब्द

     माझ्या कवितेकडे फिर्याद करतात

     मी हिंडतो धुपटणाऱ्या वस्तीत

     वेचत असतो आक्रंदन करणारी

     एक एक ओळ”

आणि माझ्या कवितेच्या झोळीत टाकत असतो 

                             (मी कवी आहे, पृ. ५६)

कवी आक्रंदन करणाऱ्या ओळी वेचतो आणि विखुरलेले सारे आक्रंदन एक व्हा, अशी सुगंधी हाळी देतो. कवीची निरोगी जगात राहण्याची इच्छा आहे. कवी त्राणवायू घेतो आणि प्राणवायू सोडतो. म्हणून ‘कोंदटलेले हतबल शब्द’ आणि जिभा छाटलेल्या वेदना कवीकडे फिर्याद करतात.  

     ‘वेदनांच्या फिर्यादीचे दायित्व

     माझ्या कवितांनी स्वीकारले आहे.”

                               (परिष्करण, पृ. ३५)

हे स्वीकृत दायित्व हतबल शब्दांना आणि मूक यातनांना नवी उमेद देतात. या शब्दांनी आणि या यातनांनी धाय मोकलून मने मोकळी करावी अशी कूस कवीचीच असते. कवीच्या मनाचे गर्भतळ हे अस्तित्वाच्या शोधासाठी भटकंती करणाऱ्या उपरेपणाच्या दुःखांचे माहेर असते. 

     “मी कवी आहे 

     संकटांच्या वावराचा आधारस्तंभ 

     ‘खुदकुशी’ च्या महासागरात

     डुबक्या मारणाऱ्या विचारांना

     आधार देणारे प्रकाशाचे छोटेसे अस्तित्व”

         (एक उद्ध्वस्त स्वप्ननगरी, पृ. ८८) कवी असल्याबद्दलचा कवीचा हा उदंड आशावाद म्हणजे विवंचनेच्या डोहात आकंठ बुडालेल्या गर्भगळीत मनाचे स्मित आहे. हे स्मित विवंचनांच्या ज्वाळांमध्ये होरपळून जाऊ नये म्हणून कवी माणसाला स्वयंप्रकाशित करणाऱ्या आतल्या सूर्याची महत्ता पटवून देण्याची धडपड करतो. कवी वाळके यांच्या कवितेत या सहृदयी धडपडीचे अनोखे दर्शन घडते. 

        या धडपडीचे मूळच इथल्या क्रांतिपरंपरेत आहे. इथली क्रांतिपरंपरा ही उजेडाचीच परंपरा आहे. काळोखाला पराभूत करणारा उजेड या परंपरेत आहे. उजेड वाटणाऱ्या हातांना या परंपरेचे मन होते तोपर्यंतच माणसाला भारतीय माणूस म्हणून सन्मान देणाऱ्या चळवळी इथे जोमात होत्या. इथे प्रतिक्रांती मुजोर झाली आणि माणसाच्या सन्मानासाठी संघर्षरत असणाऱ्या चळवळी कोमात गेल्या. कवी म्हणतो – 

     “सूर्य पिणाऱ्या फुलांवर छिडकला जातो

     दर्शनशास्त्राचा संस्कारशिरवा

     बुद्धत्वाचा उगम असलेल्या 

     भारतीय मातीची दरवळ

     पसरू दिली जात नाही भूतलावर.”

                          (बाबासाहेब …, पृ. ३८)

हेच आजचे वास्तव आहे. इथल्या मातीत माणसाला भारतीय माणूस करणारा बुद्ध उगवला. बुद्ध ते बाबासाहेब हे भारतीयत्वाचे आविष्कार उगवले; परंतु भारतीयत्व ही इथल्या लोकांची जीवनशैली होऊ शकली नाही. दर्शनशास्त्राच्या संस्कारशिरव्याने ते होऊ दिले नाही. दर्शनशास्त्राच्या विघातक संस्कारांमुळे माणसाला जाती-धर्माचे, पोटजातींचे कोंडवाडे फोडून राष्ट्रीयत्वाच्या मोकळ्या हवेत आणणारे भारताचे नागरिकत्व सिद्ध करताच आले नाही. हे सामर्थ्य इथल्या क्रांतिपरंपरेत होते. इथली क्रांतीची परंपरा ही माणसाला माणूस करणारी परंपरा होती. परंतु मानवत्वाच्या प्रस्थापनेच्या आड येणाऱ्या विघटनशील प्रवृत्तींवर चौफेर मारा करणाऱ्या या क्रांतिपरंपरेची लिपी कोणाला वाचताच आली नाही. 

      प्रमोद वाळके हे क्रांतिकुळाचे कवी आहेत. ‘उजेडाचे नवे वळण’ या संग्रहात बुद्धावर कविता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर पाच आणि एक कविता रमाईवर आहे. फिडेल कॅस्ट्रो, दाभोळकर यांच्यावरही प्रत्येकी एक-एक कविता आहेत. त्यांच्या कवितांचे हे विषयच त्यांचे कूळ सांगतात. याच संग्रहात कवीवर कविता आहेत. तसेच भारत, खैरलांजी, नामविस्तार, मा, बा, सूर्य, अंधार, समानता, आंदोलन, चळवळ, धम्म या विषयांवरही त्यांच्या कविता आहेत. हे विषय त्यांच्या सांस्कृतिक जडणघडणीचे पूर्वसंदर्भ देतात. शिवाय त्यांच्या दृष्टीतील विज्ञाननिष्ठ मानवतावादाच्या प्रस्थापनेच्या ध्येयाचे सूचनही करतात. कवीच्या या ध्येयाला आजच्या विघटनकारी सांस्कृतिक पर्यावरणाची पार्श्वभूमी आहे.   

      आजच्या प्रदूषित सांस्कृतिक पर्यावरणात लोकशाही, संविधान, विज्ञाननिष्ठा या महान मूल्यसंस्कृतीला फॅसिझमच्या घशात कोंबण्याचे दुष्ट कारनामे तेजीत सुरू आहेत. मॉब लिंचिंगचे प्रकार वाढत आहेत. दंडुकेशाहीच्या बळावर जबरदस्तीने ‘जय श्रीराम’ वदविले जात आहे. माणसांचे जनावरीकरण करणारे हे अघोरी प्रकार संवेदनांना बोथट करणारे आहे. वाळके म्हणतात –   

     “तुझ्या ग्रंथांमधून ऊर्जोत्पादन करणारे शब्द

     निर्माण करीत नाहीत सळाळ 

     बोधिवृक्षाच्या पानांना

     स्पर्श करण्याचे धाडसही

     माझ्यात उरले नाही

     माझ्यातील सूर्य आता

     उत्तरायणाकडे सरकत आहे”

                          (बाबासाहेब …, पृ. ८७)

या शब्दात वर्तमानकालीन संवेदनशून्यता कवीने विशद केलेली आहे. 

      लोकशाही, संविधान, समानता, स्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठा या मूल्यांचा उच्चारच आज देशद्रोह मानला जातो आहे. धर्माने सांगितलेली मूल्ये हीच खरी राष्ट्रहिताची मूल्ये आहेत असेच संस्कार आज केले जात आहेत. या विध्वंसक संस्कारांनीच पेरूमल मुरुगनमधल्या लेखकाची हत्या केली आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हे उजेड वाटणारे हात याच संस्कारांनी छाटले आहे. या अमानुषतेच्या काळात कवी वा प्रतिभावंत या नात्याने भूमिका घेणे, सत्याची बाजू घेणे हे भयंकरच अवघड झाले आहे. प्रतिभावंतांच्या सत्यनिष्ठेच्या कसोटीचाच हा काळ आहे. अशा संविधानद्रोही व लोकशाहीद्रोही पर्यावरणात –   

    “मी संविधन निर्मात्याच्या तर्जनीपुढील दिशा

     मला मंजूर नाही धर्माने प्रकट केलेली

     संस्कृतीची परिभाषा

     संस्कृती म्हणजे मानवी मूल्यांचे सौंदर्य

     अधोरेखित करणारी आचारसंहिता

     मला मान्य नाही विद्रुपीकरणाचा आविष्कार

     माझ्या सांस्कृतिक इतिहासाचे

     झाले आहे वैश्विकीकरण

     माझ्याच धरतीवर उगवतो सूर्य

     आणि सूर्याचे दायादपण स्वीकारलेले  

     प्रतिभावंत” (?)

           (मी नव्या युगाचे परमसत्य, पृ. ५५)

या प्रकारे कवी प्रमोद वाळके यांनी धर्मावर व धर्माने सांगितलेल्या संस्कृतीवर फुल्या मारीत आपली आंबेडकरवादी विचारमुद्रा ठाशीव केली आहे. त्यामुळे त्यांची कविता ही आंबेडकरवादी मराठी कवितेतील समंजस विद्रोहाची कविता ठरते. हा विद्रोह समर्पक प्रतिमांमधून अभिव्यक्त झालेला आहे.

        प्रमोद वाळके यांचे प्रतिमाविश्व संपन्न व प्रतिपाद्याला रेखीव करणारे आहे. प्रतिमा ही कवीची जीवनदृष्टी असते. ती जीवनानुभूतीतून प्रकटत असते. अनवाणी आयुष्य, अश्रूंची तिरडी, घृणवंशीय हात, भ्रष्ट रस्ते, हुकुमशाहीचे अग्निगृह, त्रासाची जनुके, दुर्मुखले आकाश, लोभांध हृदय अशा अनेक प्रतिमांमधून कवीचा यातनादायी आणि संघर्षमय जीवनपट साकार झालेला आहे. अंधश्रद्धेची अगरबती, दर्शनशास्त्राचे द्वारपाल, सूर्य पिणारी फुले या प्रतिमा कवीच्या वैचारिक भूमिकेवर प्रकाश टाकतात. कवीला अध्याहृत असलेल्या विज्ञाननिष्ठ मानवतावादाच्या बुलंद बांधकामात प्रतिमांचे योगदान फार मोठे आहे. प्रतिमांमुळे ‘उजेडाचे नवे वळण’ या कवितासंग्रहात कवीला मानवी जीवनाची समांतर नवरचना करणारे विचारविश्व उभारता आले. त्यामुळे ‘उजेडाचे नवे वळण’ हा कवितासंग्रह आजच्या बौद्धिक व वैचारिक व्यभिचाराला सशक्त उत्तर ठरेल, असा विश्वास वाटतो. प्रमोद वाळके या ‘युगंधर’ कवीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनप्रवासाला त्यांना अंतःकरणपूर्वक सदिच्छा !

                           * * *

                                    डॉ. प्रकाश राठोड

                         प्राचार्य, शांती विद्या भवन,

                                      डिगडोह, नागपूर 

                      भ्रमणभाष : ९९२३४०६०९२

                  _______________

कवितासंग्रह : उजेडाचे नवे वळण

कवी : प्रमोद वाळके

प्रकाशन : युरो वर्ल्ड पब्लिकेशन, मुंबई

प्रकाशन वर्ष : २६ जानेवारी २०१९

पृष्ठे : ८८

मूल्य : रुपये १२० /-

      ———————————————–

1 thought on “उजेडाचा नवे वळण देणारे क्रांतिकारी चिंतन”

  1. प्रमोद वाळके 'युगंधर'

    ”उजेडाचे नवे वळण” या माझ्या आवडीच्या कवितासंग्रहावर प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड यांनी लिहिलेल्या समीक्षेस जागा दिल्याबद्दल मी संपादकांचा आभारी आहे. समीक्षा लिहिताना डॉ प्रकाश राठोड नेहमीच वर्तमान डोक्यात घेऊन लिहितात. त्यामुळे त्यांचे समीक्षालेखन चटकन मनास भिडते. त्यांनी छानच लिहिले आहे यात वाद नाही. परंतु ”अंधार खणणे सुरू आहे” या कवितेवर प्रकाश टाकला असता तर मला अधिक आवडले असते.
    … प्रमोद वाळके ‘युगंधर’.
    दिनांक : ३१ मार्च २०२६.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top