सारांश:
दूरसंचार क्रांतीतून जन्मलेल्या नवजात साधनांचा उपयोग सर्वप्रथम नर्वस नाईनटीतल्या तरुणांनी घेतला. त्यानंतर वायरलेसचा जमाना आला. त्याचा सर्वाधिक फायदा एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकाच्या उत्तरार्धात झाला. दूरसंचार क्रांतीची ऑर्कुट, गुगल, फेसबुक, ट्विटर अशी आधुनिक आंगडी टोपडी लेऊनच तरुण पिढी वावरू लागली. त्याशिवाय कोणती बातच नाही. वाद नाही आणि संवादही नाही! मनात नाही आणि जनातही नाही. या वितंडवादाची गती इथून पुढे चक्रीय चक्रवाढ पद्धतीने अफाट होत जाईल. टू जी, थ्री जी, फोर जी, फाईव्ह जी, सेवन जी अशा अफाट अचंबित करणाऱ्या ‘जीं’च्या बोटाला धरून आता सुरू आहे. लाईक करणं, कमेंट करणं, शेअर करणं. मात्र पुढे पुढे होणारी गंभीर गंमत पाहणंही गमतीचे ठरेल.
माझ्या मनात अशा प्रकारचे अनेक प्रश्न पावसाळी डबक्यात पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनी तयार होणाऱ्या बुडबुड्याप्रमाणे तयार होतात. विरतात. आणि संभाव्य उत्तरही त्या प्रश्नांच्या आडोशाला उभी राहतात. काय होईल या पिढीचं? पिढ्यांच? आणि त्यातल्या माझ्यासारख्या एका तरुणाचं हे सर्व प्रश्न अस्वस्थ करतात. प्रश्न उद्भवले की उत्तरही त्या प्रश्नांसोबत चिकटून येतात.
प्रास्तावना:
मला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं फक्त तुकोबाकडे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर यांच्याकडे आहेत असं मला वाटतं. आणि मला मिळालेल्या उत्तरांचा महाविद्यालयीन तरुणांना देखील त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता आणि अध्ययनाकरिता अतिशय उपयोग होईल अशी आशा आहे. तरी विज्ञान आणि अध्यात्मात शर्यत मात्र आहे. विज्ञानाच्या अति आहारी जाऊन ‘दिमाकाची भनभन’ सुरू झाली की ती शांत करण्याचं काम अध्यात्म करीत असतं. अध्यात्माचे डोस पचनासे झाले, त्याच्या रिएक्शन यायला लागल्या की वैज्ञानिकांकडे डोळे लावून बसावं लागतं. तपासून घ्यावं लागतं.
विज्ञानातल्या आणि अध्यात्मातल्याही प्रश्नांचे गुंते सोडवण्यासाठी तुकारामांच्या गाथेचं तत्त्वज्ञान आणि लीळाचरित्राचं तत्त्वज्ञान ‘मात्रा’ ठरणार आहे. तरुणांच्या ‘दिमाकाची भनभन’ तुकारामाने आणि सर्वज्ञ श्री चक्रधरांनी तरुणांसाठी सांगितलेल्या विचारांनी व जीवनमूल्यांचा अंगीकार आणि आचरणामुळे सुटू शकेल. प्रश्न एवढाच आहे की या संतद्वयींनी त्यांच्या साहित्यामध्ये तरुणांसाठी काय सांगितलेलं आहे हे तरुणांना ओळखता आलं पाहिजे. तुका केवढा? आकाशाएवढा! आकाश कस पेलायचं? आकाश पेलेल का?… ‘मे बी ऑर मे नॉट बी’. आकाशात सर्वच आहे. आपला इनबॉक्स केवढा, आपली स्पेस किती, त्यात मॅटर किती मावू शकेल, किती घेतल्यास झेपेल, तरुणांकडची प्रश्न मालिका थांबतच नाही. पण तुकोबांकडे आणि सर्वज्ञ श्री चक्रधरांकडे तरुणांना पडणाऱ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. आपणच त्यांच्याकडे सजगपणे आपले प्रश्न घेऊन जाण्याची आवश्यकता आहे.
लेखन साहित्याचा आढावा:
प्रस्तुत विषयाचे विवेचन करण्यासाठी संत “तुकाराम गाथा” आणि डॉ. पुरुषोत्तम नागपुरे संपादित “लिळाचरित्र” या ग्रंथाचा अभ्यास करून केवळ तरुणांसाठी उपयुक्त असलेले समग्र तत्वज्ञान जे अर्थातच, अभंग आणि लिळाच्या स्वरुपात उपलब्ध आहे त्याचे चिंतन करून या चिंतनाचा आढावा घेतल्यास या लेखन साहित्याचे विश्लेषण करून तरुणांसमोर पडणाऱ्या अगणित प्रश्नांचा गुंत्याची उकल करता येणे शक्य आहे. तसेच शं.गो. तुळपुळे संपादित महानुभाव गद्य” यासह प्रस्तुत लेखकाद्वारे लिखित ‘आत्ममग्न पुरुषाची लक्षणे’, ‘तरुणांचा तुकाराम’, तथा ‘चंद्रमोहर’ या ग्रंथांचा आढावा घेणे श्रेयस्कर आहे. उदाहरणार्थ, तुकोबांचे कितीतरी अभंग आणि सर्वज्ञ श्री चक्रधर यांच्या मुखारविंदातून प्रसृत झालेल्या लिळा यांमधून वेद पुराणे, स्मृती श्रुती, गीता भागवत इत्यादीच्या प्रमाणासह उधृत केलेले तथा जीवनमूल्यांचे चिंतन करणारे असे कितीतरी दाखले आणि उदाहरणे तथा दृष्टांत यांमधून तरुणांसमोर पडणारे अनेक प्रश्न सुटतील. तसेच तरुणांना योग्य दिशा मिळेल. तरुणांना कायिक, वाचिक आत्मिक, संतुष्टी मिळेल.
अभंग आणि लिळा यांमधून तरुणांना पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळतात. जसे कि, आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचे आहे, आपण का चुकतो, आपण कोणत्या गुणाचे असायला हवे, आपल्यात कोणते अवगुण आहेत, आपला स्वभाव कसा आहे, तो कसा बदलता येईल, संगती कोणाची धरावी – धरू नये, तरुणांचे आचरण कसे आहे, आचरण कसे असावे, मैत्री कोणाशी करावी – कोणाशी करू नये, आमिष-मोहाला बळी पडावे की पडू नये, बळी पडणारांचे काय होते, नित्यनेम काय असावेत, नित्य नियमांचे पालन कसे करावे, आचरण कसे असावे, एखाद्या गोष्टीत माणूस कसा फसत जातो, वाईटांच्या संगतीने लाभ आणि हानी काय, आयुष्यातल्या श्रद्धा-निष्ठा-सच्चेपणा-सचोटीचे महत्त्व, अनेक प्रकारचे स्वभाव गुण, उदाहरणार्थ, संसारीक, आळशी, अभागे, करंटे, सत्संगी, वाचाळ, गर्विष्ठ, निष्टुर, दयाळूपणा आदी स्वभाव गुणांना त्याजावे की भजावे, आणि हे न केल्यास काय करावे, यारी-दोस्ती, चांगुलपणा, स्वभावाची शुद्धाशुद्धता, तरुण-तरुणींना भुलवणारे प्रश्न, तरुणींना भुलवणारे तरुण, व्रत-उपवास, दृढ बुद्धी, सावधपणा, चुका झाल्यावरचे पश्चाताप, रस्ता चुकल्यानंतरचे भरकटणे, उध्वस्त होणे, यावरचा उपाय, काय घ्यावे काय टाळावे, फुगीरपणाचा त्याग कसा करावा, शांततेचे महत्व, वक्तेपण-श्रोतेपण, माता-पित्यांसाठी व्हीलन ठरणारे सासुरवाडीचे आशिक, लोभीपणाचे तोटे, समुद्रात पडलेल्या पाण्याच्या थेंबाचा शोध घेता येत नाही त्याप्रमाणे बेकारीच्या गर्तेत अडकून बेकार ठरलेल्या तरुणाला स्वतःचा शोध घेणे नकोसे वाटते, तो नास्तिक होऊ पाहतो, नास्तिक होतो, त्याच्यातल्या जगण्याविषयीच्या श्रद्धा संपतात, यावर आस्तिक राहून अस्तित्वाचा शोध घेणे हे जीवनाच्या दृष्टीने आवश्यकच आहे, असा विचार तुकोबा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर सांगतात. परंतु उभय संत महात्मे अंधश्रद्धेला कडाडून विरोध करतात व त्या ऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करतात, दुष्टांना केलेला उपदेश, सोंग ढोंग, बकवृत्ती, बकबक वृत्ती, गुणवत्ता-नम्रता-रसवत्ता, हितैषी-अहितैषी, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करण्याची वृत्ती, अशा अनेक प्रश्नांचे गुंते तुकोबा आणि श्री चक्रधर सोडवितात. अनेक अभंगांमधून तुकोबांनी आणि लिळांमधून श्री सर्वज्ञ श्री चक्रधरांनी हे प्रश्न सोडविण्याचे मार्ग दाखविले आहेत.
अश्याप्रकारे, आचरण, मैत्री, स्वभावगुण, आयुष्यात येणारे आमिष-मोहाचे प्रसंग, आयुष्य सफल होण्यासाठी आवश्यक नित्यनेम, नित्यनियमांचे पालन, चांगल्या वाईट संगतीचे लाभ आणि हानी, गुणवत्ता-नम्रता-रसवत्ता, इत्यादी एक ना अनेक जीवनमूल्यांचे पोषण करण्याचे सामर्थ्य तुकोबांचे अभंग आणि सर्वज्ञ श्री चक्रधर यांच्या लिळा मध्ये जागोजागी भरलेले आहे.
विश्लेषण :
तरुणांच्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनमूल्यांचे पोषण करणारे, उपरूलिखित प्रश्नांचा गुंता सोडवणारे दृष्टांत व उदाहरणे दाखले यांनी समृद्ध तुकोबांचे अभंग आणि सर्वज्ञ श्री चक्रधर यांच्या लिळा सार्थ पद्धतीने पुढीलप्रमाणे उधृत केल्या आहेत: (तथापि, विषयविस्तारभयास्तव अत्यल्प स्वरुपात सार्थ लीळा व अभंग यांचा परामर्श प्रस्तुत लेखकाने घेण्याचा प्रयत्न केला आहे.)
सर्वज्ञ श्री चक्रधर यांच्या लिळा:
१. ‘म्हाईंभटा उदग्रहनिकापुर्वक ईश्वर प्रतिती निरुपण’ या लीळेद्वारे कर्म ज्ञान वैराग्य विद्या अविद्या आदी अभ्यासाशी संबंधित लीळा सांगितली आहे. ती लीळा अशी “कर्म कीजे: कार्मातव सुध अंत:करण होए: सुधे अंत:करणी वैराग्य उपजे: वैराग्यी तव ज्ञान उपजे: ज्ञानोदये मोक्ष”- कार्य करीत राहा. कर्म करीत राहिल्याने अंत:करण शुद्ध होते. शुद्ध अंतःकरणामध्ये वैराग्य उपजते. वैराग्य आले की आपसुकच ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाले की मोक्ष मिळतो. त्यामुळे ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास करावा असे जीवनमूल्य तरुणांना या लीळेतून प्राप्त होते.
२. या उलट, युवकाने विद्या ग्रहण केली नाही व तो अविद्यायुक्त राहिल्यास त्यास कदापी ज्ञान मिळणार नाही अश्या अर्थाची समर्पक लीळा अशी, “अविद्यायुक्ता जीवा स्वतः ज्ञान ना संभवे”
३. ‘मार्गी म्हाईंभटा भेटी: निर्गमन श्रवण’ या लीळेद्वारे युवकांच्या मनात आस्तीकतेचा प्रकाश प्रज्वलित करण्याचे कार्य झाले आहे. या लीळेत सर्वज्ञ श्री चक्रधर परमेश्वराचे स्वरूप विषद करतात परंतु परमेश्वरापेक्षा चालता बोलता परमेश्वर (म्हणजे मनुष्य) मिळून येणे दुरापास्त आहे असे विवेचन केले आहे. या लीळेद्वारे जगभरातील समस्त नास्तिक युवक आस्तिक होतील एवढा मोठा संदेश या लीळेद्वारे अधोरेखित होतो. ही लीळा अशी, “परमेश्वरु परदृश्ये होती: अवर दृश्ये होती: परावर दृश्ये होती:” सर्वज्ञे म्हणितले: “आंतु जो असे: तो आंतुलचि देखे: बाहिरील कांहिची न देखे: बाहिरील तो बाहिरी देखे: आंतुल कांहिची न देखे: उंबरेयावरील जो असे: तो आंतुलही देखे: आणि बाहीरिलही देखे: तैसे परमेश्वरु: कछ होति: मछ होति: नगरामध्ये अवतरेति: तीयंच्यांमध्ये अवतरेति: नगरामध्ये देव अवतरला सांता: वेडे होति: पीसे होति: परि चालता बोलता देवो तो दुर्लभ कीं गा:” या लीळेचा अध्यात्मिक अर्थ असा की, जीवोद्धाराच्या आवडीने परमेश्वर मनुष्यावतार धारण करीत असतो. हा महानुभवांचा सिद्धांत असून, या तीन दृष्टांतात परमेश्वरी अवताराचे तीन प्रकार सांगितले आहेत. अवतार दृश्यामध्ये केवळ अवरशक्ती, परदृश्यावतारामध्ये केवळ परशक्ती तर उभयदृश्यावतारामध्ये अवर व पर या दोन्ही शक्ती स्वीकारल्या जातात.
४. आस्तिक नास्तिक सश्रद्ध संबंध स्पष्ट करतांना मात्र अंधश्रद्धेला कडाडून विरोध केला. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला. याचे सुतोवाच “भटां: महादाईसां: प्रकोपु:” या लीळेत समर्पक विवेचनासह केले आहे. ही लीळा अशी, “हे काइ: रुपै: तुम्ही एक रात्री एता: आणि एकी रात्री जाता: तुम्हा आलेयाते कव्हणे जाणावे: गेलेयाते कव्हणे जाणावे: हे अवघे वोखटे: तुम्हीचि केले:” “हा येथचिया जवळीका आन जाला असे: जैसा सिवेचा गुंडा असे: कव्हणी एकु सीवे गुंडा घाली: तेयासि सेन माती माखिली असे: तयावरि सुनी डुकरे मुतीती: तयावरि इळे कुऱ्हाडी लावीति: वरी वाहान वनी उभे ठाकेति: पाए पुसीति: कव्हणी तथा एखादा एकु: तेयासि तेल सेंदुर लावि: वरि पालापाणी घाली: मग तेयाचेया आंगा देवतपण ए: मग तो जगाचे चिंतिले मनोर्थ पूरवी: तथा लोकांचे चिंतिले मनोर्थ पूरवी: मग गाडाघोडेनसी तेथ जात्रा ए: तैसा हा एथचिया जवळीका आन जाला असे:” या लीळेचा अर्थ विशद करण्याची आवश्यकता भासू नये इतकी ही लीळा आकलनसुलभ आहे. तरीदेखील शिवेवर लावलेल्या धोंड्याला देव पण येते तोपर्यंतचा प्रवास अंधश्रद्धांना कसे पोसतो याचे विवेचन करून वैज्ञानिक दृष्टिकोनही विशद करण्यात आलेला आहे.
५. विषय त्याग ब्रह्मचर्य वैराग्य भिक्षाव्रत आचार विशेष ईश्वर स्मरण सत्संग ईशप्राप्तीची तळमळ ईश्वर कृपा इत्यादी आचार्य विषयक सूत्रांमध्ये देखील युवकांच्या आयुष्याला वळण देणारी नीती मूल्य स्पष्ट केलेली आहेत असे आपल्या लक्षात येते. युवकांच्या मनातील प्रेमभावना ही वयानुरूप व्यक्त होत राहते कधी ती प्रकट स्वरूपात असते तर कधी ती मुक स्वरूपात व्यक्त होते या संदर्भातील एका लिळेमध्ये प्रीती करावी पण प्रीती करताना विशिष्ट बुद्धी ठेवू नये असा संदेश देऊन प्रीती सोबत बाळगलेल्या व्यभिचारी बुद्धीचे खंडन केले आहे. ही लीळा अशी, “तुम्ही परमप्रीती कीजे: परी विसीष्ट बुद्धी न की जे बाइ: प्रीतिसी विखो होईल:”
६. ऐहिक सुखोपभोगांचा त्याग हे महानुभाव पंथाच्या आचारधर्माचे मुख्य सूत्र आहे. यामध्ये स्वदेश, स्वग्राम, व स्वकीय यांच्या त्यागासोबतच विषयोपभोगही धर्माच्या आड येत असल्याने त्याज्य मानला आहे. येथे विषय म्हणजे सर्व इंद्रियांचे उपभोग्य विषय असा व्यापक अर्थ आहे. युवकांच्या बाबतीत विचार केल्यास युवकांच्या आयुष्यातील अगणित उपभोग्य विषयांचा युवकांनी त्याग करावयास हवा अशी शिकवण लीळांमधून युवकांना मिळते. या अर्थाच्या अनेक लीळा उपलब्ध असून त्यापैकी काही मासल्यादाखल पुढील प्रमाणे दिल्या आहेत:
६.१. स्वदेश संबंधु त्याज्य: स्वग्राम संबंधु त्याज्य: संबंधीयाचा संबंधु तो विशेषता त्याज्य:
६.२. नावडतु नावडतु सेवी: तेचि आवडोनी ठाके: मग संडीताही न संडे:
६.३. प्रतिक्षणी प्रतीक्षणी त्यागु:
६.४. तुष्टला जनु तरि विखो संपादील: रुसला तरी प्राणा घतैल: भणोंनी उभयता जनसंबंधु त्याज्य:
६.५. हांगा: एथ शरण आलेया काइ मरण असे:
६.६. आचारे योग्यता: विचारे दृढता:
७. एखाद्या कार्यात किंवा अध्ययनात अपयश आले तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहणे हे युवकांचे कार्य आहे. म्हणून अपयशातून सावरण्यासाठी श्री चक्रधरांचा अध्यात्मिक प्रयत्नवाद युवकांच्या अत्यंत उपयोगाचा आहे. संत प्रारब्धवादी असले तरी प्रत्येक जीवाला अध्यात्मिक स्वातंत्र्य असल्याने तेवढ्यापुरते ते प्रयत्नाला मानतात. किंबहुना आध्यात्मिक ध्येयपूर्तीसाठी त्यांच्या मते प्रयत्न आवश्यक ठरतो. भक्ताने कार्यास प्रवृत्त होणे पुरेसे आहे; मग कार्य सिद्धी परमेश्वर करतो. या अर्थाच्या लीळा पुढील प्रमाणे आहेत:
७.१. पुरुषे आपुले करणिये करोनी असावे: मग देव करावे ते दैवचि करील:
७.२. तूं उभा ठाकलासीचा पुरे: सिद्धीते एथोनिची नेइजैल की:
७.३. घेईजे घोकीजे: मग काळे करोनी उपेगा जाए:
७.४. निरंतर परमेश्वराची आर्ति करावी:
७.५. चित्त: वित्त: काया: इये तीन्ही परमेश्वराशी अर्पावी:
७.६. परस्परे मथन कीजे: मग नूतन होए:
तुकाराम महाराज यांचे अभंग:
अनेक अभंगांतून तुकोबांनी तरूणांपुढील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मार्गदिग्दर्शन केले आहे. वेळोवेळी सुसन्मार्ग दाखविला आहे. म्हणून तुका थोर आहे. आकाशाएवढा आहे. आणि त्यामुळेच तुकोबांचे हे थोरपण तरूणांनी समजून घ्यावे. तुकोबांची थोरवी गात आपले स्वहित करून घेणे आवश्यक आहे असे वाटते. स्वहिताच्या, समाजहिताच्या, जगत् कल्याणाच्या अशा एक ना दोन गोष्टी तुकोबांनी सांगितल्या. म्हणून तुकोबांना ‘जगद्गुरू’ म्हटले आहे. त्यामुळेच तुकोबांनी केलेल्या उपदेशाचे आचरण करून भरकटलेल्या तरूणांना स्थिर होता येईल. स्वस्थ होता येईल. वारंवार उद्भवणारी अविचारांची अस्वस्थता शांत करता येईल. हे मी माझ्या अल्पानुभवावरून सांगू इच्छितो.
काही अभंगांचे विवेचन पुढीलप्रमाणे केले आहे:
१. कितीदाही सांगून ज्याला आपले हित कशात आहे हे कळत नाही त्याच्यासोबत किंवा मागे जाऊन काय उपयोग? ‘न म्हणावे जाला पंडित वाचक। करो मंत्रघोष अक्षरांचा’, ‘शिकविले हित नायिके जो कोणी। त्या मागे भल्यांनी जाऊ नये’
२. स्वत:जवळ सर्वकाही असतानाही ते सर्व हरवलेले आहे असे समजून त्याचा इतरत्र शोध घेत राहणे. ‘नाभी मृगाचे कस्तुरी। व्यर्थ हिंडे वनांतरी’
२.१. ‘मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास। ज्याचा असे त्यास नसे ठावा’ सगुण आपल्यात आहेत अशी स्व-ओळख होणे आवश्यक आहे.
२.२. ‘तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव भावापासि देव शीघ्र उभा’ श्रद्धापूर्वक कोणतेही काम करणे महत्वाचे आहे.l
२.३. ‘तुका म्हणे भाव धरूनि राहे चित्ती तरी तो श्रीपती उपेक्षिना’ श्रद्धा आणि निष्ठा ठेवून कार्य करीत राहिल्यास उपेक्षा होणार नाही.
२.४. ‘करावा कंटाळा नव्हे हे उचित । आधीच का प्रीत लावियेली’ धरसोड वृत्तीवर चिंतन.
२.५. ‘भावहिना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया’ अश्रद्धवृत्ती.
२.६. ‘तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा’ मनावर नियंत्रण ठेवणे.
२.७. ‘आले देवाजीच्या मना । तेथे कोणाचे चालेना’, ‘तुका म्हणे उगेचि रहा’ प्राप्त परिस्थितीचा स्विकार करणे.
२.८. ‘व्यालिचिये अंगी असती वेधना’ सृजनासाठी कष्ट घेणे.
३. शुभकर्मी सर्वजण पुढेमागे करतात. परंतु अशुभ कर्म केल्यास सर्वजण दुरावतात. ‘बरे जालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंती कोणी नाही’
३.१. ‘विठोबाचे नाम ज्याचे मुखी नित्य त्या देखिल्या पतित उद्धरती’ चांगल्या संगतीने वाईटाचेही चांगलेच होते.
३.२. आवड नावड. संगति –
३.२.१. ‘वेद जया गाती । आम्हां तयाचि संगति’,
३.२.२. ‘तुका म्हणे पुण्य गाठी । तरिच उचितासी भेटी’,
३.२.३. ‘कृपाळू सज्जन’,
३.२.४. ‘संताचिया पायी विश्वास’
३.२.५. ‘तुका म्हणे करी कीर्तन पसारा । लाभ येईल घरा पाहिजे तो’, ‘देव वसे चित्ती त्याची धरावी संगती’ सन्मार्गाची संगती धरणे आवश्यक.
३.२.६. ‘संगतीने होतो पंगतीचा लाभ’ संगत चांगली असेल तर परिणामही चांगला होतो.
४. एखाद्या विषयावर भक्ती नसेल तर जगण्याचे काय प्रयोजन? ‘भक्तीविण जिणे जळो लाजिरवाणे’
५. ‘संचित तैसी बुद्धी उपजे मनामधी’ तुम्ही आत्ता या क्षणी काय करीत आहात तेच कालांतराने तुमचे संचित बनते. त्याप्रमाणे बुद्धीची घडण होते. तुम्ही तसेच घडता. म्हणून वर्तमान सुवर्तनी करणे/घालविणे आवश्यक आहे.
६. ‘ज्याचा जैसा ठेवा तो त्यापासी धावे, न लगती करावे उपदेश’ तुम्ही आहात तसे घडत जाता.
७. ‘कोडियाचे गोरेपण तैसे अहंकार ज्ञान’ ज्ञानाचा अहंकार किंवा अहंकारवृत्तीतून मिळविलेले ज्ञान काय कामाचे?
७.१. ‘विद्या अल्प परि गर्व शिरोमणि मजहुनि ज्ञानी कोण आहे? अल्पज्ञानाचा गर्व करणे, अल्पज्ञानाने हुरळून जाणे.
७.१. ‘शुद्ध पाहुनिया भाव त्याचे ह्रदयी वसे देव’ निर्मळता असेल तरच सत्संगति घडते.
८. ‘काय बा करिसी पुस्तकाची मोट। घोकिता ह्रदयस्फोट हाता न ये। काय बा करिसी टाळ आणि मृदंग। जेथे पांडूरंग रंगला नाही’ वरून आतमध्ये रंगण्यापेक्षा अंतरंगाचा शोध घेणे आवश्यक आहे. पुस्तके वाचून घोकंपट्टी करून हाती काही लागणार नाही. आणि जिथे मन आनंदून जाणार नाही अशा भजनाची घसाफोड करून/केल्याने तिथे पांडूरंग भेटणार नाही. म्हणून अंतरी काय आहे, आपण कशासाठी तयार झालो आहोत याचा शोध घ्यावा. क्षणभर चिंतन करणे त्यात शोध घेणे आवश्यक आहे.
८.१. ‘तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ। तारिले पतित नेणो किती’ ग्रंथ अज्ञान दूर करतात. ग्रंथांनी अनेकांचे जीवन बदलून टाकले.
९. ‘नाना मतांतरे शब्दाची व्युत्पत्ती। पाठांतरे होती वाचाळते’ शब्दाने शब्द वाढत जातो. प्रत्येक जण वेगळा. विचार वेगळे. मत वेगळे. विविध विचार अनुसरून अविचारी होण्यापेक्षा एकच ठाम सुविचार घेऊन मार्गक्रमण करणे श्रेयस्करच होय.
९.१. ‘अर्थेविण पाठांतर कासया करावे। व्यर्थचि मरावे घोकूनिया। घोकूनिया काय वेगी अर्थ पाहे। अर्थरूप राहे होऊनिया’ बुद्धीला न पटणार्या गोष्टी करून काय उपयोग?त्याऐवजी बुद्धीला पटणारी एखादीच गोष्ट करणे श्रेष्ठच!
९.२. ‘प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही।एकही निदानी न घडे त्यासी।। दोन्ही पेचावरी ठेवू जात हात।शेवटी अपघात शरीराचा’ एकच गोष्ट करावी परंतु ती श्रेष्ठ कृती करावी.
९.३. ‘कागदी लिहिता नामाची साकर चाटिता मधुर गोडी नेदी’ प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा आहे. पुस्तकी ज्ञान काय कामाचे?
१०. ‘कोणी निंदा कोणी वंदा। आम्हा स्वहिताचा धंदा’ कुणी नावे ठेवली अथवा वंदन केले त्याचे मला काय?मी सन्मार्गाने स्वहित करून घेणे आवश्यक आहे.
१०.१. ‘तुका म्हणे निंदा स्तुती दोन्ही वाव। आपुलाला भाव फळा येतो’ कुणी स्तुती करो अगर निंदा त्यामुळे काही फरक पडत नाही. स्वभावाप्रमाणे वागणे महत्वाचे.
१०.२. ‘पापी तो नाठवी आपुल्या संचिता ठेवी भगवंता वरी बोल’ आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्याबद्दल इतरांना दोष देत बसणे.
११. ‘कलियुगामाजी थोर जाले बंड नष्ट लोक लंड जाले फार’, ‘संकोचतो जीव महत्वाच्या भारे दासत्वचि बरे बहु वाटे’ पदावर राहून निष्काम होण्यापेक्षा पद प्राप्ती ऐवजी काम करीत राहणे महत्वाचे.
११.१. ‘कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊनी येईल जन्मा’ पदाचा दुरूपयोग करून इतरांचे नुकसान करण्यात काय हशिल?
११.२. ‘सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे’ जेवढ्यास तेवढे कार्य करणे, वायफळात न पडणे.
१२. ‘तांबियाचे नाणे न चले खर्या मोले। जरी हिंडविले देशोदेशी’ खोटेपणा कुठेही केला तरीतो उघडाच पडतो.
१२.१. ‘तुका म्हणे काय नटोनियां व्यर्थ। आपुले हे चित्त आपणां ग्वाही’ दिखाऊपणापेक्षा, दिखाऊवृत्तीपेक्षा खरा स्व-भाव महत्वाचा.
१२.१.१ ‘अति जाले उत्तम वेश्येचे लावण्य । परि ते सवासीन न म्हणावी’ दिखाऊपणावर टीका.
१२.२. “चित्ता मिळे त्याचा संग रूचिकर” , “विजाति संग्रही धरू नये” एकाच गोष्टीचा ध्यास असावा.
१२.३. “खोटियाचे खोटे ऊरफोडी” खोटेपणाला खोटेपणाच प्राप्त होतो.
१२.४. ‘लाभेविण प्रीती’ प्रेमाच्या नावाखाली वाढणारा स्वार्थ.
१३. अमिषांचे आसा गळ गिळी मासा।फुटोनिया घसा मरण पावे।। मरणाचे वेळे करी तळमळ।आठवे कृपाळ तये वेळी।। अंतकाळी ज्याच्या नाम आले मु्खा।तुका म्हणे सुखा पार नाही’ लोभी वृत्तीमुळे नुकसानच होते. परंतु लोभी वृत्ती चांगली नाही हे कळल्यावर सुख प्राप्ती होते. आसक्ती सुटते.
१४. ‘अक्षरे आणिती अंगासी जाणिव’ शिक्षणाचे महत्व.
१४.१. ‘खादल्याची गोडी देखल्यासी नाही’ प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे.
१४.२. ‘ज्याचे जया ध्यान । तेचि होय त्याचे मन’ सत्विचारांचे आचरण करणे.
१४.३. “पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन । तेव्हा आले जाण फळ त्याचे” अभ्यासाशिवाय बोलू नये.
१४.४. “ज्याचिया बैसावे भोजन पंगती । त्याचिया संगती तैसे खावे” स्वत:ला वेगळे न समजता वेगळेपणात स्वत:ला मिसळित जावे.
१४.५. ‘बहुता छंदाचे बहु वसे जन । नये वाटू मन त्याचे संगे’ आपल्या मनास वाटते, बुद्धीस पटते ते समाजमान्य पद्धतीने करावे. कुणाचे अनुकरण केल्याने काय उपयोग?
१४.६. ‘करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा’ बुद्धीवर विश्वास ठेवून आवडीच्या क्षेत्रात प्रगती करावी, चित्ताचे समाधान.
१४.७. ‘आपण केले आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय’ स्वावलंबनाचे महत्व.
१४.८. ‘तुका म्हणे ज्ञान दिमाकाची भणभण’ मिळविलेल्या ज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग न केल्यास ते बुद्धीला पटणारच नाही उलट असे ज्ञान डोकेदुखी ठरते.
१४.९. “विकल तेथे विका माती नांव ठेवूनि बुका”, “जया चित्ती जैसा भाव । तयाजवळी तैसा देव” आपण जे कराल त्याप्रमाणे फळ मिळेल, आपण जी कृती कराल त्याप्रमाणे आपले विचार होतील, आपण जसे लोकांसी वागाल तसे लोक तुम्हाला वागवतील.
समारोप :
अशाप्रकारे, प्रमाणासह उधृत केलेले तथा जीवनमूल्यांचे चिंतन करणारे असे कितीतरी दाखले आणि उदाहरणे तथा दृष्टांत यांमधून तरुणांसमोर पडणारे अनेक प्रश्न सुटतील. तसेच तरुणांना योग्य दिशा मिळेल. तरुणांना कायिक, वाचिक आत्मिक, संतुष्टी मिळेल. सर्वज्ञ श्री चक्रधर आणि संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा वैचारिक अनुबंध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संदर्भात स्पष्ट करताना विस्तार भयाच्यादृष्टीने लीळा आणि अभंगांची निवड करताना हात आखडता घ्यावा लागतो. त्यामुळे येथे उल्लेख केलेल्या पेक्षा अधिक लीळा आणि अभंग याद्वारे अंकित होणाऱ्या जीवनमूल्य यांचा उहापोह येथे थांबविणे आवश्यक वाटते.
संदर्भ सूची :
१. महानुभाव गद्य, तुळपुळे शं,गो., व्हीनस प्रकाशन पुणे, जून १९६९.
२. संस्कृतीच्या पाऊलखुणा, भोसले द. ता., पद्मगंधा प्रकाशन पुणे.
३. नाथ संप्रदायाचा इतिहास, ढेरे, रा. चि., पद्मगंधा प्रकाशन पुणे, ऑक्टोबर २००१.
४. लीळाचरित्र संपादक प्रा. नागपुरे, पुरुषोत्तम, अभिनव प्रकाशन, अमरावती.
५. अभंग व भजने, ठाकूरदेसाई, शशिकला, केशव भिकाजी ढवळे, मुंबई.
६. तुकाराम गाथा, घैसास, दिवाकर, अनंत, मनोरमा प्रकाशन मुंबई, २००१.
७. श्री तुकाराम महाराजांची अभंग गाथा, ह. भ. प. देवडीकर बाबुराव, सारथी प्रकाशन, २०२३.
८. सार्थ श्री तुकाराम गाथा, वै. जोग महाराज सांप्रदायिक,
९. तरुणांचा तुकाराम, केकान, सुशील, सावित्री प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर.
१०. आज्ञा शिरसावंद्य, केकान, सुशील, सावित्री प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर.
– प्रा. सुशील संदिपान केकान
संपर्क – ९६६५९७९१३१