मानवी मन हे एखाद्या जुन्या वाड्याच्या कोपऱ्यात साठलेल्या कोळ्याच्या जाळ्यासारखे असते; सुरुवातीला ते केवळ धुळीचा भाग वाटते, पण हळूहळू तेच जाळे प्रकाशाला अडवू लागते. स्वातंत्र्य ही संकल्पना जेवढी थोर आहे, तेवढीच ती महाग आहे. आपण स्वतःला मुक्त समजतो, पण प्रत्यक्षात आपण आपल्याच गरजांच्या आणि इतरांच्या अपेक्षांच्या साखळदंडांनी जखडलेले असतो.
प्रविणच्या आयुष्याची कथा अशाच एका शोषणाच्या प्रकरणाने सुरू झाली, जिथे शाई काळी नव्हती, तर घाम आणि थकव्याने काळवंडलेली होती.
शहराच्या गजबजलेल्या बाजारपेठेत शेठजींचे ‘किराणा भांडार’ नावाचे एक दुकान होते. तिथे प्रविणने पाऊल ठेवले, तेव्हा आभाळात सूर्याचा तांबूस गोळा नुकताच उगवत होता. जणू त्याच्या आयुष्याची नवी पहाट होत होती. त्याने शर्टाच्या बाह्या खोचल्या आणि कामाला सुरुवात केली.
सुरुवातीला सर्वकाही एखाद्या संथ वाहणाऱ्या नदीसारखे होते. प्रविणचा स्वभाव म्हणजे साखरेचा खडा कुठेही टाका, तो विरघळून गोडवाच देणार. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्याचे हात यंत्रासारखे चालत. साखरेच्या गोण्या वाहणे असो किंवा बारीक मोहरीचे दाणे तोलणे, प्रविणच्या चेहऱ्यावर कधीही आटी नसायची.
शेठजींच्या नजरेत प्रविण म्हणजे केवळ एक मजूर नव्हता, तर एक अडाणी ‘कामधेनू’ होती, जी चारा कमी खात होती आणि दूध जास्त देत होती. प्रविणला वाटायचे की हेच त्याचे कर्तव्य आहे. “दुसऱ्याच्या उपयोगी पडणे म्हणजे पुण्य,” या जुन्या संस्कारातच तो वाढला होता.
हळूहळू दिवस पालटले. प्रविणच्या कामाची व्याप्ती वाढू लागली. आता तो केवळ दुकानाचा नोकर राहिला नव्हता. शेठजींच्या घरच्या भाज्या आणणे, त्यांच्या मुलाला शाळेत सोडणे आणि रात्री उशिरापर्यंत दुकानातील हिशोब तपासणे, हे सर्व त्याच्या नशिबी आले.
एके दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. आकाशात ढगांची दाटी झाली होती, जणू निसर्गच प्रविणच्या मनातील गोंधळाचे प्रतिबिंब दाखवत होता. दुकानात ग्राहकांची गर्दी होती. प्रविण एका हाताने साखर मोजत होता आणि दुसऱ्या हाताने कोणाचे तरी ओझे उचलत होता.
त्याला जाणीव झाली की, त्याचे स्वतःचे अस्तित्व आता त्या दुकानाच्या धूळकट रॅकवर पडलेल्या एखाद्या जुन्या हिशोबाच्या वहीसारखे झाले आहे, ज्याची पाने दररोज उलटली जातात, पण ज्याची किंमत कोणालाच नसते.
माणसाचा चांगुलपणा हा अनेकदा त्याच्या नाशाचे कारण ठरतो. प्रविणच्या बाबतीतही तेच झाले. ‘ना’ म्हणण्याची कला त्याला अवगत नव्हती, आणि याच गोष्टीचा फायदा सभोवतालचे लोक घेऊ लागले. “अरे प्रविण, जरा हे बघ,” “प्रविण, तेवढं ते पोहोचवून ये,” या वाक्यांनी त्याच्या दिवसाचा ताबा घेतला होता.
त्याच्या मनाची अवस्था एखाद्या कोमेजलेल्या फुलासारखी झाली होती, ज्याला पाणी तर मिळतेय, पण सूर्यप्रकाश मात्र नाही. त्याला जाणवू लागले की, त्याची ऊर्जा, त्याचे तारुण्य आणि त्याची स्वप्ने ही शेठजींच्या तिजोरीतील नाण्यांसारखी खणखणत आहेत, पण ती नाणी त्याची स्वतःची कधीच नव्हती.
एकदा रात्री उशिरा, जेव्हा तो आपल्या खोलीत परतला, तेव्हा त्याने आरशात स्वतःला पाहिले. त्याचे डोळे थकलेले होते, पण त्या थकव्याच्या मागे एक तीव्र चीड होती. ही चीड स्वतःवर होती की परिस्थितीवर, हे त्याला समजत नव्हते.
दुसरीकडे, शेठजींची वृत्ती अधिकच टोकदार होत गेली. “कामात कुचराई नको,” हा त्यांचा नेहमीचाच दम असायचा. प्रविणला वाटे, ‘मी माणूस आहे की केवळ एक बैल?’ त्याच्या अस्तित्वाचा सूर्य आता शोषणाच्या ढगांआड पूर्णपणे लपला होता.
एके दिवशी त्याने थोडे लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली. त्याच्या आईची तब्येत बरी नव्हती. पण उत्तर आले, “काम सोडून कुठे पळतोय? आधी ही ऑर्डर पूर्ण कर, मग काय ते बघू.”
त्या क्षणी प्रविणच्या काळजात काहीतरी तुटले. तो नकार देऊ पाहत होता, पण शब्द ओठांच्या उंबरठ्यावर येऊन परतले. त्याला आता समजून चुकले की, इतरांच्या अपेक्षांचे हे ओझे आता त्याच्या सहनशक्तीच्या कोसो दूर गेले आहे.
प्रविणच्या स्वभावात आता बदल होऊ लागला होता. त्याच्या बोलण्यातील गोडवा कमी झाला आणि त्या जागी एक कोरडेपणा आला. हा कोरडेपणा म्हणजे त्याच्या जीवनातील बदलाचे पहिले पाऊल होते.
त्याला आता स्वतःचे आयुष्य हवे होते. त्याला हवे होते असे एक आकाश, जिथे तो स्वतःच्या पंखांनी उडू शकेल, मग ते उड्डाण कितीही लहान का असेना. गुलामीचे सोन्याचे अलंकार घालण्यापेक्षा स्वातंत्र्याची फाटकी झोळी त्याला अधिक प्रिय वाटू लागली.
एका दुपारी, जेव्हा उन्हाचा तडाखा वाढला होता आणि दुकानातील हवा गुदमरवून टाकणारी होती, तेव्हा शेठजींनी त्याला एका क्षुल्लक कारणावरून सर्वांसमोर अपमानित केले. “तुला काम जमत नसेल तर चालता हो, तुझ्यासारखे हजारो मिळतील,” हे शब्द प्रविणच्या कानात तळलेल्या तेलासारखे टोचले.
तेवढ्यात, प्रविणने हातातले काम बाजूला ठेवले. तो आवाज त्या शांत दुकानात एखाद्या स्फोटासारखा घुमला. त्याने शेठजींच्या डोळ्यांत पाहिले त्या डोळ्यांत आता भीती नव्हती, तर एक थंड निर्धार होता.
“शेठजी, हजारो मिळतील हे खरं आहे, पण प्रविण मात्र एकच होता, जो आता अथी थांबणार नाही,” तो शांतपणे म्हणाला. त्याने आपली पिशवी उचलली आणि त्या दुकानाच्या पायऱ्या उतरला.
मागे वळून न पाहता तो चालत राहिला. त्याच्या पावलांखालील जमीन आता त्याला जास्त आपली वाटत होती. ‘म्हशीला काही तिचे शिंगे भारी नसतात’, आता त्याला कोणाचेही प्रमाणपत्र नको होते. त्याला स्वतःची ओळख निर्माण करायची होती.
दुकानाच्या पायऱ्या उतरताना प्रविणच्या मनात एक विचित्र पोकळी होती. ही पोकळी भीतीची नव्हती, तर एका अशा अथांग अवकाशाची होती जिथे आता त्याला स्वतःचा मार्ग स्वतःच निवडायचा होता. मागे राहिलेले ते किराणा दुकान आता त्याच्यासाठी एका जुन्या झालेल्या सदऱ्यासारखे होते, जे त्याने झटकून दिले होते.
बाहेर पडल्यावर ररस्त्यावरचा उजेड त्याला अधिक प्रखर वाटला. स्वातंत्र्य हे एखाद्या धारदार तलवारीसारखे असते; ते तुम्हाला संरक्षण तर देते, पण ते नीट हाताळता आले नाही तर स्वतःलाच जखम होण्याची भीती असते. प्रविणकडे भांडवल नव्हते, पण त्याच्याकडे अनुभवाचे अस्तर आणि कष्टाची शिदोरी होती.
“ज्या हातांनी पोती उचलली, ते हात आता स्वतःचे नशीब का लिहू शकणार नाहीत?” या विचाराने त्याच्या मनात घर केले. त्याने ठरवले की, तो गुलामी करणार नाही. मग तो रस्ता कितीही खडतर का असेना.
शहराच्या एका कोपऱ्यावर, जिथे मजुरांची आणि कष्टाकरी माणसांची ये-जा जास्त होती, तिथे प्रविणने एक छोटीशी जागा शोधली. ती जागा म्हणजे केवळ चार लाकडी खांब आणि वरून टाकलेले एक जुने ताडपत्रीचे छप्पर होते.
प्रविणचे पोट आता त्याच्या जिद्दीवर अवलंबून होते. त्याने आपल्या जवळील साठवलेल्या तुटपुंज्या पैशातून एक पितळी हंडा, काही काचेचे पेले आणि थोडी चहाची पावडर विकत घेतली.
सुरुवातीचे काही दिवस शांततेत गेले. लोक त्याच्याकडे बघायचे आणि पुढे निघून जायचे. शेठजींच्या दुकानात असताना तो केवळ एक ‘नोकर’ होता, पण इथे तो ‘मालक’ होता, भले ते साम्राज्य एका साध्या चहाच्या टपरीचे का असेना. त्याच्या चेहऱ्यावर आता एक वेगळेच तेज होते, जसे रात्रीच्या काळोखात एखादा छोटासा दिवा मंद का असेना, पण स्वबळावर वाऱ्याशी झुंजत जळत असतो, तसा त्याचा उजळून निघाला होता.
प्रविणचा चहा केवळ साखर आणि दुधाचे मिश्रण नव्हता, तर त्यात त्याच्या कष्टाचा अर्क उतरला होता. तो चहा बनवताना इतक्या तन्मयतेने बनवायचा की बघणाऱ्याला वाटावे जणू तो एखादे शिल्प कोरत आहे.
हळूहळू लोकांची पावले त्याच्या टपरीकडे वळू लागली. तिथे येणारा प्रत्येक माणूस हा प्रविणसारखाच कुठेतरी शोषला गेलेला, थकलेला असायचा. कुणी हमाल, कुणी रिक्षावाला, तर कुणी रोजंदारीवर काम करणारा मजूर.
“प्रविणभाऊ, एक कडक चहा द्या,” ही हाक जेव्हा त्याच्या कानावर पडायची, तेव्हा त्याला वाटायचे की त्याला त्याचे नाव आणि ओळख परत मिळाली आहे. शेठजींच्या दुकानात तो केवळ ‘ए प्रविण’ होता, पण इथे तो ‘भाऊ’ झाला होता. मानवी बोलण्यातील बदल त्याच्या मनाला उभारी देऊन गेला.
एके दिवशी दुपारच्या वेळी एक ओळखीची आकृती त्याच्या टपरीसमोर उभी राहिली. तो शेठजींचा मोठा मुलगा होता. त्याला बघताच प्रविणच्या मनात जुन्या आठवणींची वावटळ उठली. ते अपमान, तो थकवा आणि ती रात्र जेव्हा त्याला घरी जाऊ दिले नव्हते.
“प्रविण, बाबांची तब्येत ठीक नाहीये. दुकानात हिशोबाचा मोठा गोंधळ झालाय. तुला पगार वाढवून देऊ, पण परत चल,” तो मुलगा म्हणाला. त्याच्या आवाजात विनवणी होती, पण त्यामागे आजही तोच स्वार्थ दडलेला होता.
प्रविणने संथपणे चहा गाळला, कप समोर ठेवला आणि म्हणाला, “हा चहा प्या. याचे पैसे नका देऊ, कारण तुम्ही पाहुणे आहात. पण परत येण्याचं विचारू नका. कारण पिंजऱ्यातून सुटलेला पक्षी जर पुन्हा पिंजऱ्यात गेला, तर तो उडणं विसरतो. मला आता पुन्हा उडाणं विसरायचं नाहीये.”
काळ पुढे सरकत राहिला. प्रविणच्या त्या छोट्या टपरीचे रूपांतर आता एका टुमदार ‘गोडवा’ हॉटेलमध्ये झाले होते. तिथे आता केवळ चहा मिळत नव्हता, तर तिथे येणाऱ्या प्रत्येकाला एक आदर मिळत होता.
प्रविणने आपल्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी अशाच मुलांना ठेवले, ज्यांना समाजाने नाकारले होते किंवा ज्यांचे शोषण होत होते. त्याने त्यांना एकच शिकवण दिली,”काम करा, पण कोणाचे गुलाम होऊ नका. स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून मिळालेली भाकरी विषासमान असते.”
त्याच्या आयुष्याचा पट आता पूर्णपणे बदलला होता. निसर्गातील ऋतू जसे बदलतात, तसे प्रविणच्या आयुष्यातील कडाक्याची थंडी संपून आता वसंत आला होता. पण हा वसंत त्याने स्वतःच्या हातांनी फुलवला होता.
एका संध्याकाळी, जेव्हा पाऊस ओसरला होता आणि आकाशात इंद्रधनुष्याची पुसटशी रेख उमटली होती, प्रविण आपल्या हॉटेलच्या बाहेर एका खुर्चीवर बसला होता. समोरून शेठजींची गाडी गेली. शेठजींनी खिडकीतून बाहेर पाहिले; त्यांच्या डोळ्यांत आजही तोच अहंकार होता, पण प्रविणच्या डोळ्यांत आता केवळ ‘करुणा’ होती.
त्याला समजले की, खरा शोषक तो नसतो जो काम करून घेतो, तर खरा शोषक तो असतो ज्याला वाटते की तो कोणाचे तरी आयुष्य विकत घेऊ शकतो. प्रविणने आपल्या आयुष्याचे कासरे स्वतःच्या हातात घेतले होते.
त्याने चहाचा एक घोट घेतला. तो चहा आज त्याला पूर्वीपेक्षा जास्त गोड लागला. कारण त्या गोडव्यात साखर कमी आणि ‘स्वातंत्र्याचा सुगंध’ जास्त होता.
रात्रीचा अंधार पडू लागला होता, पण प्रविणच्या हॉटेलचे दिवे लख्ख जळत होते. ही केवळ विजेची रोषणाई नव्हती, तर एका शोषिताने स्वतःच्या आत्मसन्मानासाठी पेटवलेली मशाल होती. प्रविण आता जागृत झाला होता. त्याचे शोषण थांबले होते, कारण त्याने स्वतःला ओळखले होते.
माणसाचे मोठेपण त्याच्या संपत्तीवर नाही, तर तो आपल्या पायावर किती ताठ उभा राहतो, यावर अवलंबून असते. प्रविण आज ताठ मानेने उभा होता, आपल्या स्वतःच्या जमिनीवर, स्वतःच्या छताखाली.
विजय बेलखेडे
संपर्क : editor@sahityamulagra.com
कथा वाचत असताना पुढे काय होईल याची उत्सुकता लागलेली असते.
आत्मसन्मानाची जाणीव , अपमान व शोषणातून निर्माण झालेली मनातील आग, स्वतःच्या स्वातंत्र्यातून सुरू होऊन स्वराज्या पर्यंत पोहोचलेली ही
कथा वाचत असताना राज्यशास्त्रातील स्वातंत्र्याची संकल्पना आठवली.
शब्द सामर्थ्य व शब्दांची मांडणी अप्रतिम.
👌👍
छान माडणी