तशी ती रोज सकाळी साडेपाचला उठायची, पण आजची सकाळ काही वेगळी होती. तिला रात्रभर झोपच लागली नव्हती, तिला मुळी सकाळी सकाळी कुठे तिचा डोळा लागला, पण पाचलाच उठली आणि लगबगिनी कसातरी आपला तोल सावरत गोठ्यात गेली. कारणही तसंच होतं म्हणा. रात्रभर तिची आवडती कालवड विवडत होती. तिला काय झालं होतं? कुणास ठाऊक, पण तिचा रात्रभर हंबरण्याचा सपाटा सुरू होता. त्यामुळे तिचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. रात्री कितीदा तरी ती गोठ्यात जाऊन आली शेवटी एकदाचा आत्या आजीचा ओरडा खाऊन कशी तरी अंथरुणावर पडली. अंथरुणावर पडली कसली तिकडे ती हंबरून हंबरून कासावीस होत होती आणि इकडे ही आपली कूस बदलून. रात्रीच्या त्या गर्भात काय होत, कुणास ठाऊक? त्या दोघींची कर्म कहाणी सारखीच. ती तिच्या घरच्या गाईची कालवड होती. तिचं नाव त्यांनी सोमवती ठेवलं होतं. हो सोमवतीच ‘सोमवती अमावस्ये’ला तिचा जन्म झाला होता ना म्हणून. या सोमवतीच्या आणि सोनीच्या जन्माची कहाणी सारखीच. सोमवतीची आई जेव्हा गर्भवती होती तेव्हाच सोनीची आई सुद्धा गर्भवती होती आणि दोघींचा जन्म एकाच दिवशी झाला, म्हणूनच एकीचं नाव सोनी आणि दुसरीचंचं सोमवती ठेवलं नऊ महिने नऊ दिवस, दोन्ही आयांनी कडा सोसून आपल्या दोन्ही बाळांना जन्म दिला, पण काय सांगावे दोघींचं नशीब कसं काय सारखं होतं, कुणास ठाऊक! दोघींचा ही जन्म होताच दोघींच्या आया देवा घरी गेल्या. दोघीही पोरक्या झाल्या. आता त्यांचे हाल कुत्रही खाणार नाही, अशी अवस्था होती. कारण सोनीच्या वडिलांना वंशाचा दिवा पाहिजे होता, पण तो उपाय आता खुंटला होता आणि सोमवतीची आई इतके वर्ष सतत त्या घराला गोऱ्याचे दान पदरात देत होती. कितीतरी मोठे मोठे खोंड त्यांच्या घरी तयार झाले. किती समृद्धी आणली; त्यांच्या घराला त्यांनी. त्यांच्या घरच्या प्रत्येक खोंडाला बाजारात खूप मागणी असे. आजपर्यंत त्या गाईने कधीच कालवडीला जन्म दिला नव्हता. ही पहिलीच वेळ. सोमवतीच्या जन्माची. तिच्या जन्माने त्यांच्या घरात आनंद झाला असता पण सोमवतीचा जन्म झाला आणि ती ‘धनाची पेटी’ असलेली त्यांची गाय मृत्युमुखी पडली. ‘दडभद्री’ सोमवती म्हणून तिच्याकडे पाहिलं जायचं. इतक्या वर्षांनी घरामध्ये नवीन गाय जन्माला आली पण जुन्या गाईला खाऊन गेली, असं तिला म्हटलं जायचं आणि सोनीच्या बाबतीतही तेच. चार बहिणी नंतरची ती. तिच्या जन्माच्या वेळी त्या तीन बहिणींना भावाची अपेक्षा कारण मुली असल्याने त्यांना घालून पाडून बोललं जायचं, त्यांना कामालाच लावल जायचं, आईची सततची बाळांतपण चालूच असायची अगदी सर्वात मोठी मुलगी व आई एकाचवेळी बाळांतनीच्या खोलीत खाटेवर होत्या. घरच्यांना वंशाचा दिवा हवा होता म्हणून.
तिच्या आईने अंगारे धुपारे नवससायास केले होते. होतं नव्हतं सारं केलं. यावेळी तरी घराला वंशाचा दिवा मिळावा, यासाठी कित्येक उपवास तापास केले. किती सोसलं होतं, त्या माऊलीनं. घरच्यांची टोमणी, समाजात होत असलेली नाचकी सहन केली, सासूचा आणि नवऱ्याचा जाच सहन केला, मुलगा होत नाही म्हणून घरातून काढून देण्याच्या धमक्या, धमक्याच कसल्या कितीदा तरी तिला माहेरी धाडून देण्यात आलं होतं. यावेळी एक विशेष नवस करण्यात आला. वंशाच्या दिव्यासाठी आणि तो फळाला येईल, अशी त्या बाबाची धारणा होती, पण झालं मात्र वेगळच.
‘नाव सोनी, पण लक्षण खोटं,’ अशी अवस्था होती. सोनीच्या वडिलांना चारही मुलींचा फार राग यायचा. त्यात भर पडली ती या दोघींचा जन्म अमावस्येला झालेला. अमावस्येच्या त्या रात्री भयानक काळोख पसरलेला. घुबडाचा घूS घूSS करणारा आवाज, कुत्र्याचं ते बेसूर ओरडणं आणि भुताटकी निर्माण करणारी ती रात्र, सोबतच जोराचा सुटलेला सुसाट वारा आणि धो धो कोसळणारा पाऊस. तशातच त्यांच्या घरात एकच लगबग सुरू झाली. मीट काळोख पसरला होता व कंदिलाच्या उजेडात गोठ्यात आणि घरात दोन्ही इकडे सर्वांची लगबग सुरू झाली. पुरुष माणसांनी गोट्याचा ताबा घेतला, तर लगबगिनी सुईनीला बोलावून महिलामंडळींनी बाळातनीच्या खोलीचा ताबा घेतला. त्याकाळी गावात डॉक्टर नव्हते बाळातपण सुईनीच्या हातूनच होई. तीच डॉक्टर असे. गोठ्यात गाय ओरडत होती आणि घरात सोनीची आई. अगदी असह्य वेदनेने दोघीही तळमळत होत्या. जिवाच्या आकांताने विव्हळात होत्या. मरणाच्या वेदना आणि सुटकेसाठीची तळमळ, जनू मृत्यूशी झुंज देत होत्या. एक वेळ सुईनीला वाटलं, की पोटातलं बाळ दगावलं पण दुसऱ्या क्षणी सोनीच्या आईने कसातरी जोर लावला नि सोनीचा जन्म झाला, पण ती खूप थकली होती. तिला ग्लानी आली. त्यातही तिच्या कानावर शब्द पडले. ‘मुलगी झाली’ हे कळतात तिच्या छातीत एक प्रचंड कळ आली, तिने हातपाय ताणले, डोळे पांढरे झाले. काही कळायच्या आतच त्या कळेने घात केला. सोनीला जीवनदान देताच तिचा प्राण उडून गेला. सोनीच्या आईचा देह निपचित पडला होता, आणि गोठ्यात एक गगनभेदी हंबरडा फोडून ती गाय शांत पडली होती. दोन्हीकडे नवनिर्मितीचा जन्म होता. सृजनाची चाहूल होती, पण आनंद हरवला होता.
त्या नवजात मुलीला आपल्या जन्माने काय घडलं याचा याची पुसटशी कल्पनाही नव्हती पण वडिलांनी तर मुलीच्या जन्माची बातमी ऐकताच डोक्याला हातच मारून घेतला. ते मटकन खालीच बसले. तिकडे आपली बायको गेली, इकडे गोठ्यातली गाय. मुलीचं तोंड पाहण्याची सुद्धा त्यांची इच्छा नव्हती, “द्या उकिरड्यावर फेकून” असं ते म्हणाले. तसंही कधी त्यांना आपल्या बायका मुलींबद्दल कधीच प्रेम वाटलं नाही. वारंवार मुलीच होणं, हा काय त्या बाईचा दोष होता? पण ही बाब पुरुषी अहंकार कसा मान्य करेल. वारंवार मुलीच होतात म्हणून त्यांना आपली समाजात नाचक्की होते, असं वाटायचं. त्यामुळे त्यांची बायको म्हणजे त्यांच्या घरातली मोलकरीण आणि त्यांच्या गरजा भागवण्याचे साधन आणि त्यांच्या वंशाला दिवा मिळावा यासाठीची जणू काही मशीन होती. असे कित्येक वेळा झाले होते. तिची तीन मुलीनंतर सात गर्भ पोटात राहिले, त्यांचा पोटातच गळा दाबण्यात आला. कधी मारूनमारून तर कधी गावठी दवाई पाजून. आजवर सात मुलींच्या मरणाचं पातक त्यांच्या डोक्यावर होत. सोनीचाही पोटातच अंत झाला असता, पण बाबांनी गॅरंटी घेतली होती म्हणून सोनीचा जन्म झाला. “दळभद्री कार्टी जन्माला आली अन् मायला खाऊन बसली, आधीच्या तीन काय कमी होत्या ही आता आमच्या डोक्यावर येऊन पडलीये, आपलं तर नशीबच फुटकं” असा टाहो तिची आजी फोडायला लागली. मुलींनाच तितकं काय वाईट वाटलं होतं. त्यांनी आक्रोश मांडला होता. त्यांचा आधारच हरवला होता. आईच्या मायेची सर कशालाच येत नाही.
दुसऱ्या दिवशी त्या इवल्याशा जीवाला एका कपड्यात गुंडाळून घराच्या एका कोपऱ्यात ठेवण्यात आलं. तिच्याकडे कोणी पाहत नव्हतं. तिने रडून रडून आकांत मांडला होता. तिचे ओठ सुकून गेले होते. चेहरा मलूल झाला होता. पण “खबरदार कोणी तीला हात लावाल तर” अशी सक्त ताकीद तिच्या वडिलांनी दिली होती, त्यामुळे तिच्याकडे बघण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. पोरी आपल्या नवजात बहिणीकडे पाहायच्या पण जवळ जात नव्हत्या. वडिलांचा धाकच तितका होता. घरातल्या सगळ्या महिला तिच्या वडिलांना भिऊन असायच्या. फक्त त्यातली एकच जी तिच्या वडिलांची आत्या होती, तीच थोडासा काय धीर करायची. तिच्या आजीचा तर तोंडाचा पट्टा सुरू होता. तिच्या आईच्या अंत्ययात्रेची तयारी झाली. तिन्ही मोठ्या मुली रडत टाहो फोडत होत्या. त्यांची समजूत शेजारच्या बायका काढत होत्या व चुकचूकत होत्या. बाई चार पोरींना सोडून गेलीव मायS, लेकरं पोरकी झाली. पण तो इवलसा जीव रडून बेसूद झाला, तरीही कोणी त्याला उचलून घेतले नाही. गाईला सुद्धा त्यांच्या शेतात पुरण्यात आलं. दोन्हीही माया अनंतात विलीन झाल्या. आता त्यांच्या लेकराचं काय? गाय ‘तेहतीस कोटी देवां’चे स्थान म्हणून तिला थोडी तरी किंमत मिळाली पण सोनीचं त्या घरात कोणी करायला तयार नव्हतं. मग थोडा धीर करून आत्याआजी जी चांगलीच म्हातारी होती तिला सोनीची कणव आली. त्या इव्हल्याश्या जीवाची काय चूक, तिला का वाऱ्यावर सोडता, म्हणत तिने तिला पोटाशी धरलं. घरच्याच दुसऱ्या गाईच्या दुधात कापसाचा बोळा बुडवून तिच्या ओठांशी धरला. ते मीटिक मिटीक करत ते दूध प्यायली आणि शांत झोपी गेली. तिला काय खबर तिची आई या जगात नाही म्हणून.
आता त्या म्हाताऱ्या आत्या आजीवरती तीची संपूर्ण जबाबदारी आली होती. ती तिचं सगळं करायची तिच्या दोन बहिणींची लग्न झाली होती, अर्थातच कमी वयात त्यांच्यापेक्षा वयस्कर असलेल्या पुरुषांशी त्यांची लग्न लावून दिली होती. हिच्या जन्माच्या दुसऱ्या वर्षी तिसऱ्या बहिणीचं सुद्धा लग्न झालं. आताही घरात एकटीच होती. तिच्या बहिणी सुद्धा तिच्याशी हसत खेळत बोलत नव्हत्या. कधीच हिच्यामुळे आपले वडील आपला आणखी जाच करतात, असं त्यांना वाटायचं. गोठ्यात कालवड आणि घरात सोनी दोघेही मोठ्या होत होत्या. एकाच दिवशी जन्मलेल्या होत्या. म्हणून की काय त्यांची अगदी बहिणीसारखी नाड जोडली होती. सोनी सतत गोठ्यातच असायची. सोमवतीशी खेळणं, तिला खाऊ-पिऊ घालणं, यातच तिचा दिवस जायचा. तिच्या आजीच्या तर ती अगदी डोळ्यात सलायची. तिला ती आपल्या डोळ्यांसमोर चालायची नाही. ती समोर आली, की आजी तिच्यावर खेकसायची आणि तिच्या पाठीत एखादा धपाटा पडायचा; म्हणून ती आजीपासून थोडी वचकून असायची आजी दिसली की गोठ्यात पळत जायची. सोमवतीला आणि तिला एकमेकींचा खूप लडा लागला होता.
दिसामासाने दोघी मोठ्या होत होत्या. दरवर्षी वसुबारसेला गायींची पूजा केली जाते पण सोमवतीची पूजा होत नव्हती. झुंजीचे खोंड देणारी त्यांची ती गाय तिच्या जन्मामुळे गेली, हेच कारण होतं. सोनी आणि सोमवतीला या गोष्टीचं वाईट वाटत नव्हतं. बाकीच्या मुलींच्या घरी त्यांना सणाला नवे कपडे घेऊन दिले जायचे, पण सोनीला मात्र ते कधीच मिळाले नाही. लोकांकडे ‘कन्या पूजना’ला तिला कधीच बोलवलं जात नव्हतं. असेच दिस-मास सरत होते.
सोनी आता चौदा वर्षांची झाली होती. आता मात्र आत्या आजीला काळजी लागून राहिली. सोनीला अजूनही ‘ऋतूप्राप्ती’ झाली नव्हती. कसं व्हायचं या पोरीचं? या काळजीत आजी होती. आजीनं बाकी सर्व कामात तिला तरबेज केलं होतं, पण ‘पोटी पिकनं’ बाईच्या जन्मचं सार्थकच आहे, असं ते म्हातारं खोड समजायची, म्हणून सोनीचा विचार करून ती कासावीस व्हायची, तर तितक्याच वर्षाची सोमवती होती इतके प्रयत्न करूनही अजूनपर्यंत तिनेही एकदाही एकाही पिल्लाला जन्म दिला नव्हता. त्यामुळे घरातल्या लोकांचा त्या दोघींवरचा रोष आणखी वाढला. अशातच सतत मुली होतात, म्हणून तिची मोठी बहीण तिला सुद्धा घरच्यांनी माहेरी धाडून दिली. आता तर सगळ्या गोष्टीचा राग सोनीवरच निघायला लागला. तिच्या जन्मामुळे घरातली सुख-शांती नष्ट झाली. ती ‘पांढऱ्या पाया’ची असं सतत तिची आजी तिला म्हणायची. ती आपली आत्या आजीच्या कुशीत जाऊन रडत असे. नाहीतर मग सोमवतीकडे जाऊन आपलं दुःख व्यक्त करे. सोमवतीलाही जणू काय तिचं बोलणं समजायचं. तिच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहायला लागायचे आणि ती बरेच तिला म्हणे “तुला काय ग तू काय रडते वेडी माझ्यासाठी” आणि मग तिच्या गळ्यात पडून स्वतःच रडायला लागायची.
एक दिवस अचानकच त्यांच्या घरी लगबग सुरू झाली. सोनीला काहीच कल्पना नव्हती. त्या दिवशी पहिल्यांदा आजी तिच्या खोलीत आली. सोनी आत्या आजी सोबत राहायची. आजी एक नवकोर लुगडं हातात देऊन गेली. मनाली छानशी तयार हो. तिला या गोष्टीचं आश्चर्यच वाटलं. आज पहिल्यांदा आजी आपल्या सोबत गोड बोलली. तिच्या मोठ्या बहिणीने तिला तयार व्हायला मदत केली. तिला काही कळेच ना, नेमकं काय सुरू आहे. थोड्यावेळाने चार बायका आणि तीन वयस्कर माणसं त्यांच्या घरी येऊन बसले. त्यांचा मानपान, आदर सत्कार करण्यात आला आणि हातात चहाचा तबक घेऊन सोनीला त्यांच्या पुढे पाठवण्यात आलं. सोनी अगदी रूपाने देखणी होती. चवळीची शेंग जणू. गोरापान रंग, नाकीडोळी सरस, त्यातला ५० वर्षाचा असलेला एक गृहस्थ तिच्याकडे पाहून हसत होता. तिने सर्वांना चहा दिला आणि तिला आतल्या खोलीत पाठवून देण्यात आलं. तिथल्या तिथे एकदम बैठकीत हशा पिकला. त्या गृहस्थांनी बसल्या जागी सांगून दिलं, “तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे.” “कधीचा मुहूर्त धरता” बैठकीच्या खोलीतून येत असलेला गप्पांमधून सोनीला लक्षात आलं. आजी सुद्धा लगबगिनी तिच्याकडे आली तिच्यावरून हात फिरवून बोटं मोडत म्हणाली, “नशीब काढलं.”
पुढच्या आठ दिवसात घरामध्ये लगीनघाई होती. आठ दिवसांनी सोनीची वरात आली. त्या पन्नास वर्षाच्या गृहस्थाशी तीचं लग्न झालं. सोनी आपल्या नवऱ्याच्या घरी गेली. जाताना आत्या आजीच्या गळ्यात पडून खूप रडली. गोठ्यातली सोमवती हंबरत दाव्याला हिसडे देत होती. ही आपली लग्नाच्या विधित गुंग. तितक्यात मांडवात एकच गलका झाला. गाय मांडवात शिरली होती. महिला-पुरुष, पोरसोर पळापळ करत होते. सोमवती थेट सोनीजवळ गेली आणि तिचे हात चाटायला लागली. तिचा तो खरबरीत मायेचा स्पर्श सोनीचं मन गलबलून आलं, ती तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. आता सोनीची पाठवणी होणार होती, पण घरात फक्त आत्या आजी व सोमवती सोडली तर तिच्या मायचं असं कोणी नव्हतंच. ती त्या दोघींच्या गळ्यात पडून खूप रडली; मग एकदाची डमनीत बसली. सोमवती तिच्या गाडीमागून खूप दूरपर्यंत गेली. मग रात्र झाल्यावर गाडी खूप दूर गेल्यावर हंबरत घरी आली. त्या रात्री ती नुसती हंबरतच होती. इकडे तिच्या नवऱ्याला तिच्याच वयाच्या दोन मुली होत्या. भातुकलीचा खेळ खेळायच्या वयात सोनीचं लग्न झालं होतं. तेही तिच्या पेक्षा कितीतरी मोठ्या गृहस्थाशी. दिवसभर सोनी घरची काम करायची, तिच्याच एवढ्या असणाऱ्या त्या मुलींचं सारं करायची. थोडं काही चुकलं की तिचा नवरा तिला मरेस्तोवर मारायचा आणि रात्रीचा तिचा छळ होत होता, ती बाब निराळीच.
लग्नाला आता सहा महिने झाले होते. एक दिवस तिच्या नवऱ्याने तिला मरेस्तोर मारलं. या मारामध्ये तिचा एक हात मोडला, तोंडातले चार दात पडले, शरीरावर ठीक ठिकाणी चटक्यांचे निशाण दिसत होते. गलीतगात्र झालेली सोनी तिच्या नवऱ्याने आपल्या घरच्या नोकराकरवी गाडीत टाकून एखाद्या गाठोड्याप्रमाणे बापाच्या घरी फेकून यायला सांगितलं. त्या बापड्या नोकराने तसेच केले. सकाळी सकाळी आपल्या दारात तिला पाहिल्यानंतर बापाचा पारा चढला, “कुठून आली ही ब्याद” असं त्याला वाटलं. बापाने सुद्धा तिला लाथा बुक्क्यांनी मारलं. आपल्यावरचं ओझं उतरवावं या अपेक्षेणं त्यांनी करून दिलेले हे लग्नसुद्धा यशस्वी झालं नव्हतं. पुन्हा तेच आपल्या दारात येऊन पडलं, याचा त्यांना खूप राग आला. “माहेरी येण्याचं कारण काय?” हे जेव्हा त्यांनी आत्या आजीला विचारलं, तेव्हा तिने रडत रडत त्याला सर्व कहाणी सांगितली. सहा महिन्यानंतर तिच्या नवऱ्याला कुठून तरी माहिती मिळाली, आपण ज्या मुलीला लग्न करून वंशाचा दिवा मिळावा यासाठी आणलं, तिला ऋतुप्राप्ती झालेली नाही, म्हणजे ती वांझोटी आपण घरात आणली, आणि याचा राग म्हणून त्यांनी तिला या अवस्थेत माहेरी धाडली होती. वडिलांना सुद्धा ही बातमी आजच कळाली. संतापाने त्यांनी दोन लाथा आणखी तिच्या पेकाटात हाणल्या आणि त्यांनी तिची रवानगी सोमवतीच्या शेजारी केली.
दोघींचा सहा महिन्याचा विरह. सोमवतीने या सहा महिन्यात अंग टाकलं होतं. ती म्हणावं तसं काही खात नव्हती. नुसती दावणीला गोल गोल फिरत असायची. ती खंगत चालली होती. सोनीला पाहताच ती आपल्या दाव्याला हिसका द्यायला लागली; दाव तोडून कधी एकदा सोनी जवळ जातो, असं तिला झालेलं. सोनीसुद्धा तिच्याकडून गळ्यात पडून आपला आक्रोश व्यक्त करायचा प्रयत्न करत होती, पण तिला जाता येत नव्हतं, शेवटी एकदाचं सोमवतीने दाव तोडलं आणि ती धावतच सोनीजवळ आली. तिचं अंग चाटायला लागली. सोनीने आपला थरथरता हात तिच्या गळ्यात टाकला. सोमवती तिच्यासमोर बसली. दोघीही रडायला लागल्या. किती तरी जन्मांपासून एकमेकींचा विरह सहन करत असल्यासारख्या त्या एकमेकींना बिलगल्या होत्या. त्या मुक्या जीवाला तिचं नसणं सहन झालं नव्हतं. जिथे रक्ताच्या नात्यातल्या लोकांना सोनीची काळजी नव्हती, तिच्याबद्दल आत्मीयता नव्हती. तिथे तो मुका जीव तिच्या भेटीसाठी आतुरला होता. कितीतरी वेळ त्या दोघी एकमेकींना कुरवाडत होत्या.
थोड्यावेळाने आत्या आजी गोठ्यात आली. सोमवतीला तिच्या जागी बांदलं. तिला प्यायला पाणी दिलं. थोडसं वैरण तिच्या समोर टाकलं. सोनीच्या केसांतून मायेनं हात फिरवला. सोनीला हृदयाशी कवटाळलं. आत्या आजी रडत होती सोनीचे हाल पाहून तीचा जीव तीळ तीळ तुटत होता. सोनीला थोडसं पाणी दिलं आणि हळूच सोनीला आधार देत ती तिला घराच्या मागच्या बाजूने आपल्या खोलीत घेऊन गेली. तिने तिच्या वडिलांची समजूत घातली होती. “अशा अवस्थेत ही पोरगी, ती गोठ्यात कशी राहील तिचा एक हात मोडलेला, तिच्या शरीरावर ठीकठिकाणी जखमा. थोडीशी दया दाखव तिच्यावर,” असं ती म्हणाली. अगदी तिच्या वडिलांच्या सोनीसाठी तिने पाय धरले, तेव्हा कुठे वडील “जा करा काय करायचं ते” म्हणतं तावातावांनी घरातून निघून गेले आणि आजी तिला घ्यायला गेली होती. आजीनी तिला घरात आणलं एका गोधडी वरती बसवलं. थोडसं खायला दिल्यानंतर तिला थोडी हुशारही आली, पण मनाच्या वेदनांचं काय? ती पुन्हा एकदा आजीच्या गळ्यात पडली आणि हंबरडा फोडून रडायला लागली. तिच्या त्या आकांताने गोठ्यातली सोमवती सुद्धा जोरजोरात हंबरायला लागली होती, त्या रात्री त्या कशातरी झोपी गेल्या. गेल्या आठ दिवसापासून तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. आत्या आजी खूप प्रयत्न करायची पण पाणीसुद्धा तिच्या पोटात राहत नव्हतं. काहीही खायला गेली, की सगळं उलटून यायचं. तिकडे सोमवतीने सुद्धा चारापाणी सोडलं होतं; ती वैरणीला तोंड सुद्धा लावत नव्हती आणि पाणी पीत नव्हती. दोघीही खंगत चालल्या होत्या.
त्यादिवशी तर कहरच झाला, तिचा नवरा तिच्या वडिलांच्या घरी आला आणि जोरजोरात शिव्या, शाप देऊन भांडायला लागला. “तुम्ही अशी दडभद्री कार्टी आमच्या गळ्यात बांधली, तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा अशी धोंडा आमच्या गळ्यात बांधली. आमची फसवणूक केली.” त्यावर तो नुकसान भरपाई म्हणून पैशाची मागणी करायला लागला तुम्ही जर नुकसान भरपाई दिली नाही तर जात पंचायततीकडे जाण्याची धमकी देऊ लागला. तिच्या वडिलांनी पाच हजार देऊन कशी तरी त्याची बोडवण केली. समाजात नाचक्की झाली ती वेगळीच, याचा संताप म्हणून तिच्या वडिलांनी आत्याच्या खोलीत येऊन तिला जिवजाईतोवर पुन्हा मारलं. आज पुन्हा ती सोमवती अमावस्या होती. सोमवती आणि सोनी दोघीही तळमळत होत्या. सोमवतीला तर जणू वाईटाची चाहूल लागली होती. तिने हंबरून हंबरून आकांत केला होता. तिच्या हंबरण्यांनी त्रासलेल्या वडिलांनी तिच्या पाठीवर खूप फटके हाणले होते. त्यात तिचा पाय मोडला, ती मटकन खाली बसली. आता ती नुसती कन्हत होती. दोघी आपल्या जागी जणू काही शेवटच्या घटका मोजत होत्या. भेसूर अंधार पसरला होता. रात्रीचे बाराचे ठोके झाले. सोमवतीचा आवाज आता येईनासा झाला. सोनी कासावीस झाली. तिला दरदरून घाम फुटला. सोनीला काय झालं? या काळजीने तिला कसंतरीच व्हायला लागलं. तिला उठणं सुद्धा शक्य होत नव्हतं, ती कशीतरी घुसत घुसत गोठ्यात गेली. सोमवतीने मान टाकली होती. तिच्या तोंडातून फेस यायला लागला होता. सोनी तिच्याजवळ गेली. तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. तिच्या गळ्यात गळा घालत ती सोमवतीला म्हणाली, “तुझी माझी अवस्था सारखीच, आपण दोघीसुद्धा ‘वांझोट्या.’ सोमवतीच्या शरीरावरून तिने मायेने हात फिरवला. तिचं अंग थरथरलं, डोळे किलकीले करत तिने आपली जीभ बाहेर काढून सोनीच्या हाताला स्पर्श केला, सोमवतीने पाय ताणले. एक आकडी दिली, सोनी तिला हळूच म्हणाली “आपल्या दोघींची सोबत इतकीच, तू मला खूप माया लावली पुढच्या जन्मी मी तुझ्याच पोटी जन्म घेईन,” असं ती भरल्या गळ्याने कातर स्वरात म्हणाली आणि तिने डोळे पांढरे केले, श्वास कोंडला गेला. तिने सोमवातीला घट्ट पकडलं. पुढच्या जन्मात ती मिठी घट राहावी……. म्हणून आणि दोघींनी आपले प्राण सोडले…….
– मोक्षदा विजय बेलखेडे.
खूप छान , प्रसंग समोर उभे करणारी कथा.