तुझ्या माझ्या जिंदगीची

कविता: तुझ्या माझ्या जिंदगीची/शिवाजी वाठोरे

लिहावं वाटतं काहीतरी 

दिसामाजी काही बाही! 

फडके – खांडेकरी वळणाचे

की स्वप्नरंजनसे काही

प्रसवावे की न प्रसवावे?

जणू हॅम्लेटचे ‘टू बी ऑर नॉट टू बी’

 चंद्र तारे तोडून आणीन… 

तुला हवे ते देईन…

तू माझी लाडोराणी 

सर्व अर्पेन तुझ्या चरणी

मी हे करेन मी ते करेन

अशासारख्या

कपोलकल्पित खोट्या – नाट्या बाता 

 केल्या नाही कधी

अतिशयोक्तीच्या आशा पल्लवीत 

झाल्याच नाही कधी

तू कधीच नाही म्हटले की मज हे दे, ते दे

तुझं नि माझं 

जीर्ण- शीर्ण झालेलं 

जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून गेलेलं

मन आकाशाला गवसणी घालणार कशी?

ते तर ‘ठेविले अनंते ‘ च्या पठडीतलं.

अनुभवल्यात आम्ही राकट हाताच्या 

मजुरांच्या कष्टकथा

वंचितांच्या दीर्घव्यथा

शोषितांच्या शोषणकथा

चार्वाक, शंभूख, कबीर, तुकाराम, पोचीराम कांबळे

प्रतिगामी वणव्यात बेचिराख सगळे

पुन्हा एक कोपर्डी, पुन्हा एक निर्भया, बिल्कीस बानो इत्यादी

पुन्हा एक इटावा, आणखी एक मणिपूर

नामांतर वणवा, देशमुखचा संतोष

सर्वहारा असंतोष

कलबुर्गी, दाभोळकर, लंकेश, पानसरे 

सोमनाथ सूर्यवंशी, गौतम वाघमारे,

 साळसकर , करकरे

सगळेच कसे हतबल 

व्यवस्थेचे बळी

बळी तो कानपिळी. 

उन्हात जळते सारी जिंदगी 

साखळदंडातली उतरंड जणू 

वेदनांची बरसात बारोमास 

ना कशाचा ठिकाणा कशास

दुःखावर कशी करावी मात?

मकाबी अशी दिनरात…

कुठवर पेलावे उतरंडीचे ओझे

खालच्या मडक्याने?

कसले हे इहलोकीचे येणे – जाणे?

सब झूठ काथ्या कुट!

आम्ही काय

उधळलेला आकांत पचवत

रडवेले होऊन अडखळतो आहोत

दुर्मुखले अन् ठेचाळत आहोत

बेईमान ऋतुंच्या संगतीत 

हातातोंडाच्या लढाईत ओझ्याखाली…

 विषारी विळखे आम्हाभोवती

आम्ही ग्लानिमय

सरपटणारे य:कश्चित ढेकूण – बिकून

पीडित वगैरे त्यांच्या लेखी

त्यांनी भिजवून भिरकावलेली प्रलोभनअफू 

आणि निसरड्या जागा 

आम्ही नाकारतोय  

आमच्या अंतर्मनाचे संथागार 

महास्थविरांच्या काफिल्याकडे वळते आहे

आता मरणाचे भय 

पाय लावून पळते आहे 

वाचतो आहोत आम्ही 

जाळ्यासह पक्षी उडून गेल्याच्या जातककथा

आणि वाजविलाय सनदशीर लढ्याचा बिगूल

अंगावर आल्यास बिनदिक्कत शिंगावर घेणारे आम्ही

 झोपडीच्या गर्भदेठावरील विद्रोहमूळ  

अंधत्व भंजक  

तथागतांच्या शांतीचे पूजक …

….दूर कुठेतरी भोर – विभोर आपल्याच दिशेने

 किंचितसे कवडसे आणि अंधुकशी लालाई पूर्वेकडे

वाट गवसली आहे आता…

प्रतिक्रांतीला तिलांजली देत 

अंधाराचा निषेध करू या 

हे सूत्र रूढ करून 

आता हेच मांडू या 

त्याचीच होईल दीर्घ कादंबरी, उत्तम कथा, कविता

तुझ्या माझ्या जिंदगीची…

प्रा. शिवाजी वाठोरे

 

– प्रा. शिवाजी वाठोरे

     संभाजीनगर 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top