गोषवारा :
जोतीराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा फुले या नावाने लोकप्रिय असणारे थोर समाजसुधारक.हे महाराष्ट्रातील एक विचारवंत, समताधिष्ठित समाजसुधारक आणि साहित्यिक होते. त्यांनी ‘सत्यशोधक समाज’ नावाची संस्था स्थापन केली, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.1890 या साली मिळाली. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. त्यांच्या साहित्यातून समाजाला दिशा मिळाली. प्रस्तुत शोध निबंधात महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यविषयक कार्याचा आढावा घेतला आहे.
बीजशब्द : महात्मा जोतीराव फुले, साहित्य, समाज, सुधारणा
प्रस्तावना :
एकोणिसावे शतक हे प्रबोधनाचे पर्व म्हणून ओळखले जाते. कारण भारतीय समाजजीवनाचे अर्धे अंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्त्री जीवनाच्या विकासाची मुहुर्तमेढ एकोणिसाव्या शतकात रोवली गेली. अज्ञानाच्या अंधारात परंपरेने चालत आलेल्या चालीरीतींचे, रूढी-परंपरांचे पालन करणारी भारतीय स्त्री ही चूल आणि मूल या मर्यादित कार्यक्षेत्रात वावरत होती. स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव तत्कालीन कालखंडातील नवशिक्षित तरूण वर्गाला झाली. एकोणिसाव्या शतकात ब्रिटीश भारतात आले आणि त्यांनी येथे शिक्षणप्रणाली सुरू केली. शिक्षण घेऊन सजग, सुशिक्षित झालेले तरूण आपल्या समाजव्यवस्थेविषयी विचार करू लागले. आपल्या समाजाचा विकास व्हायचा असेल, स्त्रीचा विकास व्हायचा असेल तर तिला शिक्षण देणे महत्त्वाचे होते. स्त्रीशिक्षणाची गरज ओळखून इथल्या स्त्रियांसाठी इंग्रजांनी जरी शिक्षणव्यवस्था सुरू केली असली तरी त्याला खरे स्वरूप आले ते क्रांतिबा जोतीराव फुले यांच्यामुळेच. महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाईंना प्रथमतः सुशिक्षित केले. 1848 ला पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले झाल्या. तिथूनच ख-या अर्थाने स्त्री – शिक्षणाला सुरूवात झाली. स्त्री शिक्षणाची पहाट ज्यांच्यामुळे झाली त्या महात्मा फुल्यांनी तिची अनेक जाचक रूढींमधून सुटका करण्यासाठी प्रयत्नही केले. एकोणिसाव्या शतकातील या थोर समाजसुधारकाच्या साहित्यविषयक कार्याचा आढावा प्रस्तुत शोध निबंधात घ्यावयाचा आहे.
उद्देश :
1 महात्मा जोतीराव फुले यांचा जीवन परिचय करून घेणे.
2 महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेणे.
3 महात्मा जोतीराव फुले यांचे साहित्यविषयक कार्य जाणून घेणे.
अभ्यास पध्दती :
सदर लेख हा दुय्यम सामुग्रीवर आधारित असून महात्मा फुले यांच्यावरील लिखित ग्रंथ, लेख यांच्या सहाय्याने प्रस्तुत निबंधातील महात्मा फुले यांच्या कार्याचा आणि साहित्यिक योगदानाचा आढावा घेण्यात आला आहे.
अभ्यासाची व्याप्ती आणि मर्यादा :
प्रस्तुत निबंधात महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकायचा असल्याने त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा थोडक्यात घेण्यात आला आहे.
विषय विवेचन:
सामाजिक कार्य:
महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोंविदराव असे होते. जोतीराव एक वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले त्यामुळे जोतीराव यांचे पालन-पोषण सगुणाबाईने म्हणजेच त्यांच्या वडिलांच्या मानलेल्या बहिणीने केले. तिने केवळ त्यांचे पालनपोषणच केले नाही तर त्यांच्यावर मानवतावादाचे सुसंस्कारही केले.
गोरगरिबांची सेवा करणे हे तत्व सगुणाबाईनेच जोतीराव यांना पटवून दिले होते. “आपल्या जोतिबाने ख्रिस्ती फादरसारखे व्हावे आणि त्याच्या हातून गोर-गरीब व अस्पृश्य समाजाची सेवा व्हावी.” अशी तिची इच्छा होती, म्हणून जोतिबांच्या वैचारिक जडणघडणीत तिचाही वाटा महत्त्वाचा आहे.
वयाच्या 7 व्या वर्षी त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले,परंतु त्यात खंड पडला त्यामुळे पुन्हा ते स्कॉटीश मिशनऱ्यांच्या इंग्रजी शाळेत जाऊ लागले. या इंग्रजी शिक्षणाचा प्रारंभ हीच जोतीरावांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना ठरली. या विद्यार्थिदशेतच ख्रिस्तीप्रणीत मानवतावादाच्या ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या समर्पित जीवनाचा त्यांच्या कार्यपध्दतीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यातून प्रेरणा घेऊन जोतीराव यांनी आपल्या सामाजिक कार्यास प्रारंभ केला
1. इ.स. 1848 ला मुलींची पहिली शाळा पुण्यात काढली.
2. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा काढली.
3. बालहत्याप्रतिबंधकगृह सुरू केले.
4. सत्यशोधक विवाहपध्दतीचा पुरस्कार केला.
5. विधवांच्या केशवपनाविरूध्द मोहिम उघडली.
6. अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला केला.
7. विधवांच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले.
8. अनाथ बालिकाश्रम चालविला.
9. मद्यपानास विरोध केला.
10. बालविवाह, जरठ- बाला विवाह, बहुपत्नित्व, केशवपन, सक्तीचे वैधव्य इत्यादी वाईट प्रथांविरोधात आवाज उठविला.
महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि आपल्या सामाजिक कार्यातून स्त्रीची जाचक असणाऱ्या रूढींमधून सुटका करण्यासाठी प्रयत्न केले म्हणून स्त्रीजीवनात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंपरेने चालत आलेल्या धर्मग्रंथांनी भारतीय समाजातील स्त्री- शूद्रातिशूद्रांच्या मनावर राज्य केले. या दृष्ट प्रभावातून स्त्री – शूद्रांना मुक्त केल्याशिवाय आपला विकास होणार नाही याची म. फुले यांना जाणीव होती. त्यांना सज्ञान केल्याशिवाय त्यांच्या मनातील अंघ्दश्रध्दा कमी होणार नाही हे जोतीरांवानी ओळखले होते. म्हणून शोषितांना, वंचिताना सज्ञान करून त्यांची जाणीव जागृत करणे हीच त्यांच्या लेखनामागची मूळ प्रेरणा असल्याचे दिसून येते.
साहित्यविषयक कार्य :
1 तृतीय रत्न
जोतीरावांनी 1855 मध्ये हे नाटक लिहिले. सर्व स्त्री – शूद्रातिशूद्रांनी सज्ञान व्हावे ही जोतीरावांची मनोमन इच्छा होती. ज्ञानाचे महत्त्वच या नाटकात मांडले आहे. ज्ञानप्राप्ती ही सर्व प्रगतीच्या मूळाशी आहे तीच उच्च वर्णीय समाजाने हिरावून घेतल्यामुळे शूद्रातिशूद्र समाज शतकानुशतके मागास राहिला आहे, असे मत जोतीरावांचे होते. मानवाला लाभलेली अन्न, जल आणि ज्ञान ही तीन रत्ने आहेत. त्यामुळे ज्ञान हे रत्न प्राप्त करून घेण्यासाठी बहुजन समाजाने प्रवृत्त व्हावे असे आवाहन महात्मा फुले या नाटकाच्या माध्यमातून करतात.
2 गुलामगिरी
संवाद रूपामध्ये केलेले हे गद्यलेखन आहे. धोंडिबा आणि जोतीराव यांच्यामधील हा संवाद असून धोंडिबा हिंदूंचे पौराणिक ग्रंथ, वेद, मंत्र, कर्मकांडे, इंद्राचे विविध अवतार, शोषणकारी मिथके आणि मुक्तिदायी मिथके अशा गोष्टींशी संबंधित प्रश्न विचारतो आणि जोतीराव त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत देत शकांचे निरसनही करतात. त्या दोघांमधील संवाद हा केवळ भूतकाळातील प्रश्नांवर चाललेला दिसत नाही, तर वर्तमानकालीन प्रश्नांवर त्यांच्यामध्ये चर्चा होते. या ग्रंथाच्या पहिल्या नऊ भागात पुरोहित वर्गाने केलेल्या पारंपरिक शोषणाचे वर्णन येते. तर अखेरच्या सात भागात इंग्रजी राजवटीतील अत्याचारावर प्रकाश टाकलेला आहे.
हजारो वर्षे परंपरेने चालत आलेल्या रूढीप्रथांमुळे स्त्री – शूद्रातिशूद्रांच्या वाटयाला जुलूम,अत्याचार, पिळवणूक आणि वर्तमानकालीन इंग्रजी राजवटीतही त्यांची या गुलामगिरीतून सुटका झाली नाही,त्यामुळे स्त्री-शूद्रांना शिक्षण देऊन त्यांची गुलामगिरीतून मुक्तता करावी असे आवाहन या पुस्तकातून महात्मा फुले राज्यकर्त्यांना करतात.
3 शेतकऱ्याचा आसूड
शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित या ग्रंथांचे लेखन महात्मा फुले यांनी 1883 मध्ये केले. शेतकऱ्यांच्या खालावलेल्या परिस्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन करून आपल्यापरिने त्याची कारणमीमांसा म.फुले यांनी या ग्रंथात मांडला आहे. शेतकरी वर्गाचा जीवनक्रम आणि शेतीविषयक प्रश्न यांचे अतिशय सखोल चित्रण जोतीरावांनी या ग्रंथात केले आहे. विशेषतः मध्यम आणि कनिष्ठ शेतकऱ्यांची भीषण दुरावस्था कशामुळे निर्माण झाली आहे आणि ती कोणत्या उपायांनी दूर होईल याचा विचार फुले यांनी या ग्रंथात केला आहे.
4 सार्वजनिक सत्यधर्म
या ग्रंथात त्यांना अभिप्रेत असलेल्या मानव कल्याणाच्या धर्माची रूपरेषा मांडली आहे. मानवाने परस्परांशी आणि सभोवतालच्या विश्वाशी कसा व्यवहार केला म्हणजे त्यांचे जीवन आनंदमय होईल याचे सर्व मार्गदर्शन त्यांनी या ग्रंथात केले आहे. महात्मा जोतीराव फुले यांनी मानवी जीवन सुखी होण्यासाठी या ग्रंथात मार्गदर्शन केल्यामुळे त्यांचा हा ग्रंथ म्हणजे मानवमुक्तीचा महान संदेश देणारा ज्ञानकोशच आहे.
‘महात्मा फुलेः समग्र वाङ्मयाच्या’ प्रस्तावनेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात- “जोतिबांच्या विश्वकुटुंबवादाचा सार्वजनिक सत्यधर्म हा जाहीरनामा आहे. भारतीय लोकशाही क्रांतीची मूलभूत तत्वे विशद करून सांगणारा तो जाहीरनामा आहे. सार्वजनिक सत्यधर्ममध्ये जोतिबांच्या महात्मतेचे तेजोवलय पूर्ण प्रकट झाले आहे. त्या तेजोवलयाचे तीन भाग आपल्या दृष्टीसमोर पडतात, ते म्हणजे मूलभूत मानवी हक्क, त्यावर आधारलेला विश्वकुटुंबवाद आणि जीवनाचे व विश्वाचे सत्यस्वरूप प्रकट करणारा बुध्दीवाद हे होत. या तीन प्रेरणांतच त्यांची लोकशाहीवादी दृष्टी सिध्द होते.” लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वरील वक्तव्यावरून या ग्रंथाचे महत्त्व लक्षात येते. धर्मग्रंथ, अनुष्ठान, नामसंकीर्तन, पूजाअर्चा यांसारख्या धार्मिक विधीपासून स्त्री-पुरुष संबंध, पाप-पुण्याच्या कल्पना, जातिभेद, विवाह विधी इ. विषयांची चर्चा महात्मा फुले यांनी मानवाला केंद्रवर्ती ठेऊन या पुस्तकात केली आहे.
5 सत्सार
1885 साली जोतीरावांनी सत्सार नावाचे नियतकालिक सुरू केले. याचे दोनच अंक आज उपलब्ध असून याच्या पहिल्या अंकात ब्रह्मसमाज आणि प्रार्थना समाज यांच्या विषयीचा संवादरूपी परामर्श घेतला आहे. तर दुसऱ्या अंकात पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे यांची निंदानालस्ती करणाऱ्या टीकाकारांचा समाचार घेतला आहे.
पद्यलेखन :
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा शिवाजी महाराजांच्या जन्मापासून स्वर्गारोहणापर्यंतच्या दरम्यान निवडक प्रसंग निवडून महात्मा फुले यांनी या पोवाडयाची रचना केली आहे.
1 ब्राहमणांचे कसब
हजारो वर्षापासून शूद्रांच्या मनावर रूढी या गैरसमजुतीचा जो प्रभाव आहे त्यामुळे ते भटांना कसे बळी पडतात या विषयावर 9 पोवाडयांचा या पुस्तकात अंतर्भाव आहे. उदा. शूद्राच्या घरी मूल जन्मले म्हणजे भट,भिक्षुक तेथे कसा पोहचतो आणि राशीचक्र, कुंडली मांडून कसा पैसा उपटतो. हा ब्राह्मण शुद्राच्या लग्नात त्याला कसा लुबाडतो. घरभरणीसारखे विधी करायला लावून आपल्या तुंबडया कशा भरतो. यांसारख्या विषयावर म.फुले यांनी विवेचन केले आहे.
2 अखंडादी काव्यरचना
संत मंडळीपैकी संत तुकारामांचा प्रभाव फुले यांच्यावर पडलेला दिसतो. तुकोबांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून कर्मकांड, जातिविषमता, सनातनीपणा याला जो परखड विरोध केला आहे त्याचा परिणाम म.फुले यांच्यावरही झाला, रचनेमध्ये अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केला आहे. मानव, स्त्री-पुरुष समता, आत्मपरीक्षण नीती, समाधान, सहिष्णुता, सद्विवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्य दक्षता या विषयांचा अंतर्भाव पहिल्या भागात आहे तर दुसऱ्या भागात भट, भटाची वाणी, आर्यब्राह्मणांचे कसब, त्यांचा भोंदूपणा, ढोंगी गुरू, शुद्रापासून फंड गोळा करण्याचा निषेध, दस्यूचा पोवाडा हे विषय आले आहेत. बळीराजा, मानव, महमंद यांचे स्तवन आणि बडोदे संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड तसेच दिवाण लक्ष्मण जगन्नाथ, गंगाराम भाऊ मस्के यांना केलेला पत्रव्यवहार तिसऱ्या अखंडामध्ये आला आहे. चौथ्या अखंडात शूद्रातिशूद्रांना उपदेश केला आहे. पाचव्या विभागात जोतीरावांची काही खंडीत स्तबके? उद्धृत केली आहेत. विठोजी भुजबळास पत्र, कुळांबावण म्हणून हिणवल्या जाणाऱ्या स्त्रियांचा कष्टप्रद जीवनक्रम आणि स्वामी बंधूने ख्रिस्ती धर्मावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर शब्दबध्द करणारे संकीर्ण सहाव्या अखंडात आले आहे. एकंदरीत सर्वच विषयांना स्पर्श करणाऱ्या अखंडाची रचना महात्मा फुले यांनी केली.
याशिवाय आणखीन काही रचना म. फुले यांनी केल्या आहेत. त्या अशा-
1 हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
2 मराठी ग्रंथकार सभेस पत्र
3 मामा परमानंद यांस पत्र
4 सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजाविधी
5 दुष्काळविषयक विनंतिपत्रक
6 सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकिकत
समारोप :
महात्मा जोतीराव फुले यांनी सामाजिक कार्यात जशी मोलाची भर टाकली त्याचप्रमाणे त्यांनी मराठी साहित्यातही फार मोठे योगदान दिले आहे.शूद्रातिशूद्रांचे कल्याण,त्यांची अन्यायातून, रुढी, परंपरांमधून सुटका व्हावी आणि अखिल मानव जातीचे कल्याण व्हावे हा हेतू ठेवून महात्मा फुले यांनी जे लेखन केले आहे ते अतुलनीय असे आहे.
निष्कर्ष :
1 महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्य विचारानुसार शिक्षण हे व्यक्ती व समाजाच्या प्रगतीचे मुख्य साधन आहे.
2 स्त्री-पुरुष समानतेसाठी शिक्षण आवश्यक आहे, तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती आणि समाजसुधारणेचे व्रत घेतले होते.
3 शूद्रांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांची साहित्य निर्मिती महत्त्वाची आहे.
4 महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यातून त्यांनी समानतेचा विचार मांडला आणि समाजातील अन्याय, जातीय भेदभावाविरुद्ध जनजागृती केली.
5 महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यातून समाजसुधारणेचा ध्वनी प्रतिबिंबित होतो. गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड हे साहित्य शेतकऱ्यांच्या समस्या आणि शोषणा विरुद्धची साहित्य निर्मिती आहे.
संदर्भ:
1 गव्हाणे, किशोर कुमार (संपा.) : ‘महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा इतिहास’, एज्युकेशनल पब्लिशर्स ॲण्ड डिस्ट्रीब्युटर्स, औरंगाबाद, आवृत्ती – 2014
2 बगाडे, उमेश : ‘महात्मा जोतीराव फुले’, श्री गंधर्व वेद प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती नोव्हेंबर 2010
3 भोळे, भास्कर लक्ष्मण : ‘महात्मा जोतीराव फुले’, साहित्य अकादमी, नवी दिल्ली प्रथमावृत्ती 1996
4 कीर, धनंजय (संपा.): ‘महात्मा फुले : समग्र वाङ्मय’, (मालशे ,स. ग.),महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
– गजानन भाऊराव घोंंगटे
मराठी विभाग प्रमुख,
श्रीमती सांळुकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय,वनोजा,जि.वाशीम-४४४४०२
सदस्य, वाणिज्य भाषा अभ्यास मंडळ, संगाबा अमरावती विद्यापीठ
E-mail:ghongategajananb@gmail.com
भ्रमणध्वनी: ९८२२४०६११५