ढीगभर बाया……..
काळ्या नि कुळकुळित ..
रस्ताभर जात – येत होत्या
कुणालाही न समजणाऱ्या त्यांच्या भाषेत स्वतःचे जगणं – मरणं गात सरकत होत्या बाया ………..
त्यांच्या डोकीवर घमेलित काल कमावलेले ‘पोट’नि उद्याच्या ‘पोटासाठी’…
आजचं घमेलं ..
बाया सरकत होत्या..
नि अख्खा दिवस त्यांना खात होता ….. वाळू सिंमेट.
नि विटांची घमेली उचलून.
येताना त्यांच्या चोची नि शरीरं मुकी झालेली…….,
रात्री चूल पेटवून भाकरी भाजून स्वतःलाही करपवून घ्यायच्या बाया.
त्यांच्या जगण्याची उमेदच इतकी दांडगी..की सकाळी पुन्हा गाणी गायच्या बाया.
नि स्वतःला राबवत.. सडवत …संपवत.. ओरबाडून घेत होत्या बाया.
कधीकाळी ढीगभर बाया एक एक स्वतःला संपवून घेत जळून जात होत्या बाया.
‘त्या’ बाया आता गेल्या नि त्यांच्या जागी दुसऱ्या बाया आल्या स्वतः ला जाळून खाक करण्यासाठी बाया.
आताश्या त्यां गात नाही..
गाणीच मुकी झाली त्यांची..
वीटा घमेली उचलताना, त्यांचे डोळे थिजले नि आतून फुटल्या बाया.
उंच शिडीवरून जाताना खालून डोळे, नि दमून भागून वर चढल्यावर वरचे दोन डोळे नखशिखांत खात होते बाया..
विस्फारून डोळे पित होते त्यांचे विस्कटलेले स्तन, बायांना का हे ठाऊक नव्हते ? तरीही बाया शिड्या चढत-उतरतच होत्या.
स्वतःचे मरण वेचत होत्या.
सोसत दिवसागणिक जगतच होत्या बाया.
भोगाच्या लालसेत त्यागाचे डोंगर चढत-उतरत होत्या बाया. आणि कधीकाळी आपली हरवलेली गाणी शोधण्यासाठी भूईतच गुप्त झाल्या एक -एक बाया.
आकाशात विरून गेलेली ‘त्यांची’ गाणी भूईत शोधित ‘सीतामाय’ झाल्या बाया.
ढीगभर बाया,
– बाळकृष्ण रामचंद्र लळीत.
पुणे, भ्रमणध्वनी: ९६६५९९६२६०