काय सांगू गड्या तुले, माया खेड्याची रे गत,
काय होतं काय झालं, उरली नाही त्याची पत.
जातं गेलं, ओवी गेली, वासुदेवाची पहाट गेली,
मायच्या मुखातली ती, अमृताची गोट गेली.
पहाटेच्या त्या अंधारी, दळणाचा तो नाद होता,
माणुसकीच्या नात्यांचा तो, खंबीर असा साद होता.
कामठा गेला, पार गेला, उरलं नाही गोठान,
जिथं जमायची माणसं, तिथं पसरलंय स्मशान.
तिफन गेली, चाळं गेलं, उरलं नाही मसोबाचं ठाणं,
मातीमध्ये हरवून गेलं, पेरणीचं ते गाणं.
शेणसड्याचं ते अंगण, जिथं रांगोळी हसायची,
घराची ती पायरी, पावलांनी ठसायची.
विट्टी-दांडू, सुर-पारंब्या, खेळ रानातले गेले,
वडाच्या त्या पारंब्यांचे, झोके आता विरून गेले.
हाती आला मोबाईल, अन् बोटं झाली रे वेडी,
तुटून गेली काळजाची, जिव्हाळ्याची ती बेडी.
समोर असून माणूस, नजरा स्क्रीनवर झुकती,
माणुसकीची ही नाती, आता ‘डाटा’ मध्ये सुकती.
नव्हती कवाडं घराले, तरी मनं होती रे उघडी,
आता कुलूपं लागली दाराले, अन नियत झाली लंगडी.
प्रगतीच्या या पायी, आम्ही हरवून बसलो गाव,
सांगा आता या जगाला, काय सांगू आमचं नाव?
काय सांगू गड्या तुले, काळजाचा होतोय रे चक्का,
सुख शोधता शोधता, गाव झाला पार बुक्का!
– विजय बेलखेडे
संपर्क : editor@sahityamulagra.com
अप्रतिम शब्दांकन!
सुंदर ! वास्तव मांडलंय….
👌👍
छान माडणी
ही कविता वाचताना खेड्यातील जुनं आयुष्य डोळ्यांसमोर उभं राहतं… खूप सुंदर सर 👌🏻
खेड, संस्कृती, वहिवाट, रहणसहण बदले आहे. कालची घरे सारवणारी, सारवणारी आज टापटीप गुळगुळीत झाली आहे. अचूक वेध कविता घेते…
खूप छान कविता आहे सर…”शब्दाशब्दात गावाचा सुगंध आणि हरवलेल्या संस्कृतीची ओढ! मोबाईलच्या जगात आपण आपलं हक्काचं ‘माणुसपण’ गमावून बसलो आहोत, हे या कवितेतून आरशासारखं स्पष्ट होतंय. अप्रतिम रचना! ✍️✨”