आमच्या इकडे तुमच्या लॉटरीची भानगड आम्हाला जमत नाही . त्याचं काय हाय? आम्हाले पाहिजे रुपयात हिशोब, लॉटरी राहते करोडोत अन् अब्ज्यात. आमच्या कडच्या लोकांचा कायी बजेट बसत नाही. आमाले एवळे पैसे पाहिजेस कायले. आमच्याकडे राहते कामापुरतं रामायण. मग तुम्ही म्हणसान येईल पाहिजे तरी काय? तुम्हाले वाटन लॉटरी पायजे नाही, हे बरं हाय. जे पायजे तीचं नाव तुमाले कसं सांगू? तीनं – त आमच्या गावाच्या सुद्या सुद्याइले पिसं लावलं. काहीच कामाचं नायी ठुलं.
जवा पासून आमच्या गावात ईची हजेरी लागली, तवापासून गावाच्या लोकाईले नीरा सपनचं पडणं सुरू झाले. उलसक पोट्ट ज्याले… ते बी नाही समजत, सपनाचा हिसोब मांडते. दोन आने चार आने हानते. बंबईले तिचा देव राह्यते, काय पुजतेत हे लोक धरणीमाय जागा नायी, तीचे नाव बेजा हायत बापा तुम्हाले कोणतं सांगू? ‘राजधानी’च्या नावान तिची वडील बयीन, तीचं नाव बंबई,दुसरी बयीन कल्यान, मीलन, सग्गाभाउऊ डिलक्स लय लंबी दुकान हाय, किती सांगू? दारचा येल मांडवावर गेला. मांडवाचा देसावर गेला, तरी तिच्या पिरतीचा गोतावळा दररोज हजारानं वाढला.
याच येलाची साजरी मोठी डांग आमच्या गावाकळे आली. जो तो तिचा होऊन बसला. फुलं पॅंडापासून तं पायजाम्या परेन्त, धोतरवाल्यापासून लुगड्यावालीपरेन तिचं दिवाने हाय. राम्याबीन मांगं लागला. सपनाचं गणित मांडाले. त्यालेबिन साजरंच गटलं. दोन चार डाव त्याचं बजेट बसलं. जवापासून वरली लावाले भिळला, तवापासून त्याले दररोज सपनं पळे. कवा बवा त्याचं गणीत बसे जादा डाव हुकेस म्हणा. त्याले हीनं साजरसं झपाटलं. भळजीले दक्षिना देल्ली, अभिषेकाले त्याले पयसे देल्ले, पण पट्ट्याचा कायी बजेट बसला नाही. चार पाच डाव तीन देल्ला टोला. मगं त्यानं आपल्या सपनाचं पीसं सोळलं अन् गज्याच्या सपनाचा हिसोब लावनं सुरू केला. गज्या लय ईरसाल कारटं. एकडाव का आपला बजेट बसलं. मापल दळभदरी दूर, गाळी घीऊनस हिंडु, असी तसी नायी पिलेंडरचं घीऊ. दोघाची जवातवा गुट्टूर -मुट्टूर चाले, लोकातून जरा दूर जऊन कानात पुटपुटेत गजा म्हणे अरे लेका मले रातच्याले लय झकास सपान पडलं. सपनात देव म्हणे ‘तुले राणी मुखर्जी बायको भेटंन पन लेका मागून लय विपरीत घळलं. एका सरपानं तिले धरलं, त्याच्याच ते मेली अन् मी लग्न आधी विधूर झालो’
सपन आयकताच सुरू झाला, हीसोबाचा कागद, पेन काय करंन ते साबुत तसं वंगाळ बी लिवतच. मेलीची मेंडी, सर्पाचे सहा. मग आकडा सहाले मेंडी हजाराचा आला. मग गाजले मिठाई, लाडू मटन, जे पायजे ते एवढी सोय की त्याच्या बापानं नसनं पायली. ते होती गजाची थाप, पन रतन खत्रीले भोयली. तवापसून गजाचं सपन सऱ्या गावानं डोईवर घेतलं. जो नाही तो, त्याले च्या पाजे, राती कायी सपन दिसल का? बस एवळस ईचारे, गावात त्याचा बोलबाला. मोठे मोठे लोक, त्याच्या गोठी वर हाले, तो जे बोलंल ते सब्द लोक किरकेटच्या चेंडू वानी झेले. भेटे त्याले पायजे, त्याचे भरून भेटे पेले, त्याला सपन पळावं, मुन देवाला नवस बी केले.
एक डावच सपन हीसोबात एका दान्यान गेलं. आता हा दावा मोठा भारी. यानं केले समद्याचे खिसे खाली. दुसऱ्या खेपीनं झाली पलटी. ही मोठी खराब. भरला टरक होते पलटी; तसं नायी, आकड्यांची हेराफेरी होते. मग सरे लागले आपल्या किस्मताले कोसाले. गजाचं बराबर हाय, आपले ग्रह अंधारे हायत, असं म्हणून सोळलं.
गज्याच्या सपनानं फिलीम सिटी सोडली अन् आपला मोर्चा नेला, थो मसनाकळे, म्हणजे मेलेले लोक त्याच्या सपनात यायला लागले. काल याच्या सपनात नामाबुडा आला. त्याला मरुन बारावरस झाले. बुडा बाजीवर येवून बसला, तंबाखूचा बटवा काढला. अन् माह्या हातावर आठ आने देल्ले, दुकानातून बीड्या आणायला सागितले…
सकयी उठून सर सपन दोस्तायीले सांगतलं. त्याच्यावर लोकाईचा बेजा भरोसा, कोन आपली घरची जवारी इकली, कोन बायकोची पोथ ठुली. एकानं मनगटाची घडी गहान टाकली. कोन घरातल्या कापसाले चंदन लावल. त्या रोजी झुंडीच्या झुंडी वरलीच्या दुकानावर, पन पयल्या याच्यात यांचा बजेट काही बसला नाही. मग दुसरी तीन केल्या फटका; तसाच आबाले आला झटका. तिसरी धरली मिलन डे, तीनं दाखोला आगोंठा, जसं सांगितलं मन्यान, तसाच हानला गोटा, डोक फुटल्यावर त्यानच बांधली पट्टी. तसे समंधे निघाले घराकडे ईचारा ईचारात…
तसी वरलीवाल्याची थ्या दिवसी दिवयी झाली, पण माह्या गावात झाला शीमगा. वरली मटक्यानं असा देल्ला झटका, गज्यावर समध्यांन काहळला लट, पयता भूई थोडी झाली, त्यानं धरला घाट. गज्याच्या सपनानं एवढा घोय केला. समद्याची लागली वाट. तवापासून माह्या गावात वरलीची सीट झाली कट . मग माह्या गावाची विकासाची वाट निट झाली.
प्रा. श्रीकृष्ण शामसुंदर
भ्रमणध्वनी – ९२८४४८४२७९
बेंबळा ( मूर्तिजापूर, अकोला)