सिंधुदुर्गचे माणिकमोती…! कविवर्य आ. द. राणे

*(मुळचे बापर्डे देवगडचे-*

*पण कर्मभूमीने*                  

*माणगाव (कुडाळ)चे* 

  *कविवर्य आ.द.राणे.*

—————————————-

 एक मालवणी मुलखातील आवस शेजारणिक इच्यारता..,

 

*रासनार जावचा हुता,*

 *पैशाची नाय भर*

 *देतस काय गे पार्बावती*

*धा रूपये तवसर ?*

 

-आणि पुढे गरीब परिस्थितीमुळे सुचलेले शहाणपण ती प्रभावतीबाईना कसे सांगते पहा-

 

*नायतर असा असा करीनस ?* *माझी साकार घे तुका*

 *मगे आपला येवाराक बरां,*

*पैशे देवक नको तुका*

 

आपल्या मालवणी कवितेत शेतकऱ्याच्या बायकोची व्यवहारिक दृष्टी टिपणारे ‘आद’राणे कुठेही भेटले की एक मला प्रश्न विचारत –

‘कसेआहेत लळीत गुरूजी ? बाळकृष्णा,नमस्कार सांग हा…! मोठा भला माणूस….तुझे बाबा..!’

माणगाव खो-याचे नि माझे ऋणानुबंध आजही घट्ट आहेत. कालेली,माणगाव,आंबेरी परिसरात माझ्या वडिलांनी एकोण्णिशे साठच्या दशकात केलेल्या ज्ञानदानाने ते घट्ट विणले आहेत.

 अशा माणगावी रहाणारे कविवर्य आकाराम दत्तात्रेय ऊर्फ आ.द.राणे गुरुजी… यांचा जन्म बापर्डे ता. देवगड येथे १५ जुलै १९३१साली झाला. बालपण-

 प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते वडिलांसोबत आपल्या मालवणी प्रथेप्रमाणे ‘मुंबै’गेले. शिकले. पण माघारी गावी परतले. काही काळ आईसोबत गावी राहिले आजही बापर्डे गावी त्यांच्या जन्मगावी घर आहे बंधू आत्माराम यांचे चिरंजीव तेथे वास्तव्य करतात. बापर्डे गावी राहून तरुणपणी ‘आद’नी मग कुडाळ परिसरात नोकरी केली व शिक्षक म्हणून माणगावच्या सेंट जोसेफ प्राथमिक शाळेत हजर झाले आणि ‘माणगावकर’च झाले.

भटवाडीतील दीपक कोनकर यांच्या शेजारी ‘आद’नी आपले घर बांधले. बन्सिधर ,उत्तम, माधुरी आणि वृंदा अशी चार मुले घरात बागडू लागली . माणगावच्या शाळा नं. एकमध्ये ते सेवानिवृत्तीपर्यन्त अध्यापन करत. यांच्या विषयी लिहिताना मन भारावून जात आहे.

अशीच स्मृतींची पाने चाळतात त्यांनी लिहिलेली अस्सल मालवणी कविता आठवली-

हा अस्सल लालमातीचा कवी आपल्या कवितेत तरुणमुलीला चार हिताच्या गोष्टी आईच्या भुमिकेत जावून सांगताना किती तळमळीने रोखठोक बोलीत सुनावतो कसा ते पहा-

 

*टिको भांगो करून आता जावचां आसा खंय ?*

*ऊट सूट घराभायर…*

 *तुजा झाला आसाच लय ।*

*आडवाटेन पांदीतसून लगालगा जातस*

*लाजलज्जा भाजुन सगळी,* 

*कशी रांडग्या खातस ?* 

*तरनाताटा पॉर तू… असा वागना बरा न्हय ।*

*वाटेवरचा घर आपला… केरवारो काड*

 *आता माका झेपना नाय पानी तरी हाडे*

 *बापुस गेल्यापासुन तुका, कोनाचोच ना भय ।* 

 *सांगाक गेला रितीचा तर,* *झोंबतस माज्या तोंडाक*

 *माका बाये घोपान नाय… तुजे वांगडा भांडाक*

 *औंदा तुका ठेवचाच नाय…* *इल्ल्या ‘वरा’क देतय ।* 

 समकालीन वास्तवला ‘आद’कसे भिडत याचे ही म्हणजे एक उत्तम

उदाहरण आहे असे मला वाटते.

++

 माझे वडील माणगाव शाळा नंबर एक मध्ये शिक्षक होते. तेव्हापासून येथे रहाणा-या

 आ.द. राणे गुरुजींशी वडिलांचा परिचय होता.

अलिकडे प्रकाशित झालेल्या सिंधुसरिता या व्यक्तीपरिचय ग्रंथात श्रद्धा वाळके यांनी ‘आनंदयात्री ‘म्हणून त्यांच्या उल्लेख केला आहे तो यथार्थच आहे.अध्यापनाबरोबरच त्यांनी सानेगुरूजी कथामाला ,

प्रौढसाक्षरता या क्षेत्रात कार्य केले. प्रौढांसाठी त्यांनी ‘गोवळचा देवमाणूस’ हे’पुस्तक लिहिले. 

असे समजते की एका प्रसंगाने ते काव्यलेखनाकडे वळले.’श्रीक्षेत्र माणगाव ‘वर त्यांनी उत्स्फूर्त काव्य रचले. ते उत्तम हार्मोनियम वाजवत… त्यामुळे काव्यलेखनाला सहजपणे ‘लय’ प्राप्त झाली. कवितेचे शब्द मूळातच गेयतानुकूल झाले. दै. तरूण भारत मधील ‘प्रतिबिंब’हे सदर त्यांनी सातत्याने लिहिले पुढे त्यातील निवडक लेखांचा ‘रूजवा’ लेखासंग्रह ‘चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला. शिवाय सा. सत्यप्रकाश,व्याध,

वैनतेय,नवशिक्षण अशा नियतकालिकांतून त्यांनी लिहिले.’विंरगुळा’ या बालगीत संग्रहातील कवितांना शिरिष पै,अनंत काणेकर यांच्यासारख्यांनी दाद दिली. विशेष म्हणजे ‘गुरूजीं’ना अभिप्रेत संस्कार देणाऱ्या बालकविता त्यांनी लिहिल्या. भारतदेशा,पावसाळ्यातील मज्जा, मयुराचा सत्कार इ. 

गो. ग. राजाध्यक्ष यांनी ‘रुजवा’च्या निमित्ताने त्यांच्या गद्य लेखनाचे स्वरूप व विशेष नोंदवले आहेत.ते लिहितात “आ. द. राणे यांच्या लेखनात निसर्गाचे ताजे, प्रसन्न, झळझळते रंग पहावयास मिळतात.लेखकाचा ऋजू आणि स्नेहमय स्वभाव त्यांच्या लिखाणातून प्रगट होतो.कुठेही रुक्षता,दुर्बोधता जाणवत नाही. त्यांच्या लिखाणात निसर्ग सौंदर्य तर पदोपदी दिसतेच,त्याचबरोबर कोंकणातील प्रसन्न वातावरण, व्यक्तिचित्रण आणि कोकणवासियांच्या स्वभावाचे दर्शन घडते.त्यांच्या प्रत्येक वाक्यांत शब्दालंकार आढळतात. चित्रण आणि वर्णन करताना त्यांनी वाड्मयमूल्य अबाधित राखले आहे.निसर्ग वर्णन करताना त्यांची भावना,कल्पना व दृष्टी बालकवींची बनते, तर ललित लेखनाच्या स्वरुपात ते वि. स. खांडेकर यांची आठवण करून देतात.

श्री. राणे यांनी ‘दिवसाची अशीही सुरुवात’ या लेखात आपू अवसरे याच्या भाबड्या मनातील राग, संताप, वैताग, चीड आणि असहाय्यता दाखविली आहे, तर ‘दबलेले दुःख’ या लेखात ‘धिक् जिणे’ लाभलेल्या वृत्तपत्राच्या रद्दीची सुद्धा एके काळी कशी ‘सिद्दी’ होती हे जुन्या –

 

 *मालवणी गाव नि घर-*

“राणे कोंकणातील घरांचे घरपण सांगताना त्या घराच्या आसपासचे वातावरण, घरासमोरील तो रस्ता, भोवतालची झाडे, माड, बागायत, त्यावर हुंदडणारी पाखरे, पक्षी, चिवचिवणाऱ्या चिमण्या, काव काव करणारे कावळे,पोपटांची कर्णमधुर शीळ,भारद्वजाची चंचल हालचाल,धिटुकल्या खारीची धावपळ, झाडांच्यामधून चरणारा कुक्कुट मेळा वगैरे सांगत ते झाडांचे व घरांचे नाते जुळवून देतात. झाडांची शीतल सावली, मर्यादशील सळसळ आणि जिवाभावाची राखणदारी सांगून ही झाडे आपल्या सुखदुःखाची साथीदार दान करणारी आणि समर्पित जीवनाचा आदर्श असलेली ही झाडे आपण कुठेही असलो तरी आपल्या सर्वांगात आपल्या शाखाभारासह हर्षोत्फुल्ल होऊन डोलत असतात असे ते म्हणतात.

सांजसखी’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘हिरवे दिवस’, ‘निसर्गाचा आनंदयात्री’ यासारखे ललित लेख वाचताना लेखक राणे निसर्गाशी कसे तन्मय होताता हे दिसून येते. ‘हिरवेपण’ सरकले की, आपोआप ‘पिकलेपण’ प्रगट होऊ लागते. हिरव्या दिवसांची फुलपांखरे दूर दूर जाताना दिसतात आणि मग त्या हिरव्या कालखंडातील अगणित आठवणी अधूनमधून डुश्या मारीत राहतात. न कळत आपले हिरवेपण आतल्या आत कुरवाळीत राहण्याचा मोह काही आवरत नाही असे ते प्रामाणिकपणे कबूल करताना दिसतात.”

  “निसर्गाचे लावण्य लाभलेल्या एका स्वप्नरम्य गावाचे वैशिष्ट्य आणि त्या गावाचे अंगभूत सौंदर्यं वर्णन करताना ते वातावरणाशी इतके समरस होतात की, सागराचे व गावाचे अतूट नाते सांगत असताना अथांग सागराची घनगंभीरता आणि अल्लड अधिरता त्यांच्या रसिक वृत्तीला

राणे कोंकणातील घरांचे घरपण सांगताना त्या घराच्या आसपासचे वातावरण, घरासमोरील तो रस्ता, भोवतालची झाडे, माड, बागायत, त्यावर हुंदडणारी पाखरे,पक्षी, चिवचिवणाऱ्या चिमण्या,काव काव करणारे कावळे,पोपटांची कर्णमधुर शीळ,भारद्वजाची चंचल हालचाल, धिटुकल्या खारीची धावपळ,झाडांच्यामधून चरणारा कुक्कुट मेळा वगैरे सांगत ते झाडांचे व घरांचे नाते जुळवून देतात. झाडांची शीतल सावली, मर्यादशील सळसळ आणि जिवाभावाची राखणदारी सांगून ही झाडे आपल्या सुखदुःखाची साथीदार दान करणारी आणि समर्पित जीवनाचा आदर्श असलेली ही झाडे आपण कुठेही असलो तरी आपल्या सर्वांगात आपल्या शाखाभारासह हर्षोत्फुल्ल होऊन डोलत असतात असे ते म्हणतात..

‘सांजसखी’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘हिरवे दिवस’, ‘निसर्गाचा आनंदयात्री’ यासारखे ललित लेख वाचताना श्री.राणे निसर्गाशी कसे तन्मय होताता हे दिसून येते. “हिरवेपण’ सरकले की, आपोआप ‘पिकलेपण’ प्रगट होऊ लागते.हिरव्या दिवसांची फुलपांखरे दूर- दूर जाताना दिसतात आणि मग त्या हिरव्या कालखंडातील अगणित आठवणी अधूनमधून डुश्या मारीत राहतात. न कळत आपले हिरवेपण आतल्या आत कुरवाळीत राहण्याचा मोह काही आवरत नाही असे ते प्रामाणिकपणे कबूल करताना दिसतात.निसर्गाचे लावण्य लाभलेल्या एका स्वप्नरम्य गावाचे वैशिष्ट्य आणि त्या गावाचे अंगभूत सौंदर्यं वर्णन करताना ते वातावरणाशी इतके समरस होतात की, सागराचे व गावाचे अतूट नाते सांगत असताना अथांग सागराची घनगंभीरता आणि अल्लड अधिरता त्यांच्या रसिक वृत्तीला विक्षिप्त वल्लीचे दर्शन घडविताना फालतुगिरा करून आयत घास गिळण्यास सवकलेला गंग्या,पन्नाशीच्या उमरीचे आणि उत्तम तंदुरुस्ती लाभलेले अनगळ मास्तर, अल्लीसाहेब महंमद शेख हे पोस्टमन अशांची त्यांनी व्यक्तिचित्रे रंगवली आहेत. ‘टाळ्या’, ‘ बहुरूपी’, ‘ पाहुण्यांचा परिचय’, टोपण नाव’, ‘कुरापत नीती’, ‘व्यासपीठावरील मान्यवर’, वगैरे लेखातून उपरोध, उपहास जाणवला तरी त्याला विनोदाची छटा आहे.यातूनही वाचकांना बरेच काही सांगण्याचा श्री. राणे यांनी प्रयत्न केला आहे. त्यांच्या लिखाणातून दातृत्व,अल्पसंतुष्ट भावना,निसर्गाशी समरस झालेले त्याचे व्यक्तित्व आणि कोकणचा निसर्गरम्य परिसर याचे यथायोग्य दर्शन घडते. या संग्रहातील लेख विविध प्रसंगावर असले तरी लेखनशैली सारखी आहे. त्यामध्ये शब्दांचे सौदर्यं दिसून येते. शर्टाचा किंवा पँटचा खिसासुद्धा त्यांच्या लेखनाचा विषय बनतो. हा खिसादेखील व्यावहारिक जीवनाचा कसा अविभाज्य साथी आहे आहे हे ते अनेक उदाहरणे देऊन सांगतात. हा खिसा अंगाशी सतत बिलगून जीवाभावाची जाणीव देणारा अद्वैताचा अनुभव देत असतो असे ते म्हणतात.

श्री. राणे यांच्या लिखाणामध्ये कृत्रिम आत्मपरता किंवा साचेबंद सौंदय नाही. त्यामध्ये लघुनिबंधाचा आविष्कार दिसून येतो. वैचारिकता आढळते. विनोदाबरोबर जिव्हाळा आणि काहीसे तत्वज्ञानही पहावयास मिळते.आपला एखादा मार्मिक विचार,मजेदार कल्पना किंवा मनाला चाटून गेलेला चटकदार अनुभव ते हसत खेळत सांगून जातात. श्री.आ.द.राणे यांच्या ललितरम्य लिखाणाचे हेच खरे वैशिष्ट्य ठरावे.” (पृ. ३५)

‘रुजवा’ हे त्यांच्या ललित निबंधाचे पुस्तक स्मरणात राहिलच, पण त्यांच्या कविता व माणगावचे राणे गुरुजी म्हणून त्यांच्या स्मृती सदैव जपल्या पाहिजेत.

++

कणकवलीच्या पाचव्या मालवणी बोली साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला नाव देण्यात आले होते.’आ.द. राणे सभागृह’

आमच्या मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्राने त्यांच्या वाङ्मयीन सेवेला केलेला तो ‘सलाम’होता. सतीश लळीत यांनी ते सुचविले होते.

 २९जानेवारी २०१८रोजी त्यांचे माणगाव- भटवाडी येथे निधन झाले या घटनेला आता चार वर्षे होत आहेत .

 

———————————-

संदर्भ –

१.आरती मराठी मासिक,सावंतवाडी,डिसेंबर १९९८ ‘ग. गो. राज्याध्यक्ष यांचा लेख , पृ.३५,३६)

 २.आरती,१९८६.

३.सिंधुसरिता,संपा. सुरेश ठाकूर ,आचरा मालवण.

३.विशेष सहकार्य -वृंदा राणे,वृंदा कांबळी,विठ्ठल कदम,विशाल धुरी, अविनाश बापट.



डाॕ. बाळकृष्ण लळीत

पुणे 

भ्रमणध्वनी:९६६५९९६२६०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top