हूल

आज अभिरामच्या कंपनीत मुलाखत देणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. खरं तर कंपनीला फक्त दोन कर्मचाऱ्यांची गरज होती; पण अर्ज आले होते पाचशे! 

रिसेप्शन बाहेर मुलाखतीसाठी सकाळी नऊ पासून तरुण-तरुणींची रांग होती. कोणाच्या हातात फाईल, कोणाच्या हातात लॅपटॉप, तर कोणाच्या चेहऱ्यावर रात्रभर झोप न झाल्याच्या खुणा. प्रत्येकाच्या डोळ्यांत एकच प्रश्न —”आज माझं आयुष्य बदलेल का?”

काचेच्या भिंतीतून अभिराम हे सगळं शांतपणे पाहत होता.

हातात फाईल, खिशात बसभाड्यापुरते पैसे आणि डोळ्यांत स्वप्नं घेऊन याच रांगेत तो दहा वर्षांपूर्वी उभा होता. पण आज परिस्थिती बदलली होती. एका मल्टी नॅशनल कंपनीत आपल्या मेहनतीने आणि हुशारीने मोठ्या पदावर पोहचला होता. तिथे त्याचा मोठा मान होता. शेकडो कर्मचारी, देश-विदेशातील क्लायंट्स त्याच्या हाताखाली काम करत होते. यशाबरोबर त्याचाही अनुभव समृद्ध होत गेला. लोकांच्या स्वभावाचा अंदाज येऊ लागला. चेहऱ्यामागची माणसं ओळखता यायला लागली.

‌कोण घाबरलंय, कोण आत्मविश्वासाने भरलंय, कोण फक्त अभिनय करतंय… हे तो नीट ओळखू शकत होता.

एका नविन प्रकल्पासाठी त्याला अजून दोन कर्मचाऱ्यांची गरज होती— एक सेल्स विभागासाठी आणि दुसरा प्रॉडक्ट विभागासाठी.

एचआर मॅनेजरने दरवाज्यावर हलकेच टकटक केली.

“सर… पहिली बॅच तयार आहे.”

“येस… पाठवा.”

एकामागोमाग एक उमेदवार आत येऊ लागले.

प्रश्न, उत्तरे, तांत्रिक चाचणी, थोड्या गप्पा… सगळं नेहमीसारखंच चाललं होतं. दिवस संपला तरी इंटरव्यू संपले नाही. पण त्याला दोन चांगले उमेदवार मिळाले होते. त्यांच्या नियुक्ती पुर्वी एका उमेदवाराला विचारलं गेलं,

“तुम्ही परदेशात कामाला गेलात आणि स्थानिकांनी एखादी सूचना दिली, तर तुम्ही काय कराल?”

मुलगा आत्मविश्वासाने म्हणाला, “सर, मी स्वतः निर्णय घेणारा माणूस आहे. मी परिस्थिती पाहून ठरवेन.”

अभिराम हलकं हसून म्हणाला, 

“कधी कधी स्वतःच्या निर्णयापेक्षा दुसऱ्याचा अनुभव अधिक मौल्यवान असतो.”

तेव्हा त्या मुलांना या वाक्याचा अर्थ कळला नाही.  

ट्रेनिंग लगेच उद्यापासून सुरू होणार होते. इतक्या चांगल्या कंपनीत काम करायला मिळणार म्हणून ती दोघेही खूप उत्साही होती. त्यांच्यासाठी कंपनीचे वातावरण नविन; त्यात अभिरामच्या व्यक्तीमत्वाचा दबदबा… 

त्याचं व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी होतं. 

परदेशात प्रवास करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना अभिराम स्वतः ट्रेनिंग देत असे. त्यात तो प्रवासातील काही अदृश्य जोखीमींची जाणिव करून देत असे.

अभिराम शांत, संयमी, शिस्तबद्ध अधिकारी होता. आज सिंगापूर, उद्या जर्मनी, परवा दक्षिण आफ्रिका… विमानतळ, हॉटेल्स, मिटिंग्ज, नवीन भाषा, नवीन संस्कृती आणि नवीन माणसं.. तरीही त्याची भारतीय संस्कारांवरील श्रद्धा अढळ होती. परदेशातही भारतीय शाकाहारी जेवण शोधणारा. हात जोडून नमस्कार करणारा, बुद्धीनं हुशार पण वृत्तीने साधा. 

ते नव्याने रुजू झालेले तरुण त्याच्याकडे आदराने पाहत होते.

कंपनीला साऊथ आफ्रिकेचा एक मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. मीटिंगस्, प्रेझेंटेशन, काॅलस्… ऑफिसमध्ये गडबड असली तरी मोठा प्रोजेक्ट मिळाल्याचा उत्साह होता. 

आज कॉन्फरन्स हॉलमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरस् ची महत्त्वाची मीटिंग सुरू होती. अभिराम प्रेझेंटेशन देत होता. हॉलमध्ये सगळ्याचं लक्ष अभिरामच्या प्रेझेंटेशनकडे खिळलं होतं; तिथे पूर्ण शांतता होती. प्रेझेंटेशन संपलं. चहा नाश्ताच्या वेळेला सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. काही त्याच्या प्रेझेंटेशनच्या, काही नविन प्रोजेक्टच्या, काही इतर देशांच्या. सगळेच जण आपापले अनुभव सांगत गप्पां करत होते. त्या नादात अभिरामने नकळत आपला साउथ आफ्रिकेचा एक जुना अनुभव सांगायला सुरुवात केली. सगळे कमालीच्या शांततेने ऐकत होते. अभिराम बोलत होता…

“तो डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता…ख्रिसमसचा..

एका महत्त्वाच्या प्रकल्पासाठी साऊथ आफ्रिकेला गेलो होतो…

दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ… अथांग निळ्याशार समुद्री किनाऱ्यावरचं देखणं शहर. सकाळी समुद्राच्या निळ्या लाटा आणि संध्याकाळी रंगीबेरंगी दिव्यांनी उजळलेले रस्ते. 

ख्रिसमस नुकताच सुरु झाला होता. पर्यटकांनी शहर गजबजून गेलं होतं. नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज होतं.

नेहमी ज्या हॉटेलमध्ये मी उतरायचो, ते हॉटेल पर्यटकांनी पूर्ण भरलेलं होतं. त्यामुळे माझी सोय दुसऱ्या एका हॉटेलमध्ये केल्या गेली. हॉटेल साधं; पण सुरक्षित होतं.

कंपनीचा तिथला नेहमीचा स्थानिक टॅक्सी ड्रायव्हर राशिद. उंच, धिप्पाड शरीरयष्टी, रंगाने काळा पण हसऱ्या चेहऱ्याचा, बोलण्यात कमालीचे मार्दव असलेला… आमची छान मैत्री जमली होती .

रशिद गप्पीष्ट तितकाच इंडियाचा फॅन होता. त्याला दिवाळी, गणेशोत्सव, गंगेची आरती, हिमालय, केरळचे बॅकवॉटर्स, राजस्थानचं वाळवंट याबद्दल खुप उत्सुकता होती. भारताबद्दल तो भरभरून विचारत असे. मलाही त्याला भारताच्या गोष्टी सांगण्यात मजा येत होती. तो त्याच्या देशाबद्दलही बरेच काही सांगत असे. पण एक वाक्य कायम त्याच्या तोंडी होतं,   

” सर… इथले सगळे भाग सुरक्षित नाहीत.”

एक दिवस त्याने सहज सांगितलं,

“इथे संध्याकाळ नंतर शक्यतो एकटं चालत बाहेर पडू नका. विशेषतः पर्यटकांसाठी ते धोक्याचे आहे.”

मला त्याचे गांभीर्य समजले नाही. कारण जगातल्या अनेक शहरांमध्ये अशा सूचना आपण नेहमी ऐकतो.

३१ डिसेंबर… वर्षाचा शेवटचा दिवस.

आज अपेक्षेपेक्षा ऑफिस लवकर संपलं. सगळ्यांना नववर्षाच्या स्वागतासाठी घरी जायचं होतं. सर्वांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

मी घड्याळाकडे पाहिलं. संध्याकाळ होत आली.

मला आठवलं—जवळच एक भारतीय दुकान आहे. विचार केला, तिथून रात्रीचं जेवण घेऊ आणि थोडं चालत हॉटेलवर जाऊ. राशिदला तसं सांगितलं. त्याने त्या दुकाना समोर सोडलं. गाडीतून उतरताना त्याने मला परत सावध केलं. तो पुन्हा म्हणाला,

“सर… प्लीज, परत फोन करा. आणि शक्यतो चालत जाऊ नका.”

मी हसत म्हणालो,

“फक्त दहा मिनिटांचा रस्ता आहे रे!”

राशिदचा चेहरा गंभीर होता.

“सर… दहा मिनिटं पुरेशी असतात.”

हे शब्द माझ्या कानावर पडले; पण मनात उतरले नाही.

भारतीय दुकानातून थोडी खरेदी केली आणि गरमागरम जेवण केलं. कितीतरी दिवसांनी मसाल्याचा परिचित सुगंधानी परिपूर्ण, तृप्त जेवण झालं होतं. चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं होतं. हवेत मस्त गारवा होता. दूरून संगीताचे मंद स्वर येत होते. आकाशात रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई होती. सगळीकडे उत्सवाचे वातावरण होतं. 

मी निवांत चालू लागलो. रस्त्यावर रहदारी नव्हती. मी एकटाच पायी चालत होतो. त्या निवांत चालण्याचा आनंद घेत होतो. अंधार दाटून आलेला लक्षातच आला नाही. पण थोड्या वेळातच जाणवलं…

आपल्या मागे कोणीतरी चालतंय… दबक्या पावलांचा आवाज येत होता. मी सावध झालो. लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न केला; जाणवलं, एक नाही तर दोन व्यक्तींच्या पावलांचा आहे. मागे न वळता जाणीवपूर्वक ऐकत राहिलो. एका क्षणी अनावधानाने सहज मागे वळून पाहिलं…आणि दचकलो….

दोन उंच धिप्पाड पुरुष.. पुर्ण काळे कपडे.. चेहरा झाकलेला, डोक्यावर मोठ्या फेल्ट हॅट…  

पाठलाग!!!  

‘नाही! नसेल!’ असा विचार करत पुढे निघालो. पण खात्री करण्यासाठी, काही अंतरावर मुद्दाम थांबलो. तर ते दोघेही थांबले. छातीत धस्स झालं. मी उजव्या बाजूच्या रस्त्याने वळलो. तेही वळले. आता शंका उरली नाही. मी मुद्दामच रस्ता क्रॉस केला. तर तेही माझ्या मागे होते. 

‘माझा पाठलाग सुरू झाला होता… ‘

माझा चालण्याचा वेग वाढवला. आजूबाजूला नजर फिरवत मदतीसाठी कोणी आहे का?कोणाला हाक मारावी? बघत होतो. त्या निर्मनुष्य रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सुंदर बंगल्याचे प्रत्येक गेट, दरवाजे बंद होते. खिडक्यांमध्ये फक्त प्रकाश होता. दूरवर फटाक्यांचे आवाज अन् नववर्षाचा जल्लोष होता.

आणि इथे…

एक भारतीय जीव मुठीत घेऊन भीतीने चालत होता.

राशिदचं ते वाक्य मनात फिरत होतं… “सर, दहा मिनिटं पुरेशी असतात.”

त्याचा अर्थ आत्ता कळत होता. मनात भीतीने घर केलं होतं. माझं चालणं आता धावणं झालं. मागच्या पावलांचाही वेग वाढला. ते आवाज देत काहीबाही बोलत, मला अजून घाबरवत होते. 

‘काही झालं तर…? त्या क्षणी मला माझ्या आईचा चेहरा आठवला.’

 घराबाहेर पडताना बाबां नेहमी सांगत —

“नको तिथे धाडस नको. वेळीच सावध होणं, जास्त शहाणपणाच असतं.”

माझं इकडे काही झालं तर घरच्यांना कसं कळेल…?

हजारो किलोमीटर दूर असलेला भारताच्या आठवणी मनात दाटून येत होत्या. पासपोर्ट, कागदपत्रांची अधिक काळजी होती. माझ्या हृदयाचे ठोके मला ऐकू येत होते. 

जगातील अनेक देश फिरलो. विमानतळ… मोठमोठी शहरं…

परदेशातील रस्ते… पण त्या अंधाऱ्या रस्त्यावर माझ्या सगळ्या अनुभवाची, हुशारीची किंमत शून्य होती. पाय लटपटत होते. मला माझाच राग येत होता.  

का रशिदच मी ऐकलं नाही! का चालत जाण्याचा निर्णय घेतला? ही किती मोठी चूक होती? पण वेळ निघून गेली होती.”

अभिराम बोलता बोलता थोडा थांबला.

समोर बसलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि उत्सुकता होती. ते घाबरले होते. सगळ्यांना उद्देशून तो म्हणाला, 

“तुम्हा सगळ्यांना हे एवढ्यासाठी सांगतो की, अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये. पण आलीच तर त्यासाठी काय दक्षता घ्यायला हवी, याचं भान तुम्हाला राहावं. घाबरून जाण्याचं कारण नाही.” 

“सर, पुढे काय झालं! सांगा ना!” 

त्या दोन नवीन नियुक्त झालेल्या तरुणांनी विचारलं….

अभिराम पुढे सांगू लागला…

“तेवढ्यात मला एक बंगला दिसला. त्याच लोखंडी गेट पूर्ण बंद नव्हतं. जणू नियतीने माझ्यासाठी एक छोटी फट उघडली होती. क्षणाचाही विचार न करता मी गेट ढकललं. ते अलगद उघडलं. मी आत शिरलो. धावतच मुख्य दरवाजापाशी गेलो आणि बेल दाबली.

एकदा…

दोनदा…

तिसऱ्यांदा…

आतून पावलांचा आवाज ऐकू आला…आणि आतलं दार हळूहळू उघडलं… दार उघडलं पण सेफ्टी डोअर बंद ठेवूनच.

समोर साठीच्या आसपासची एक गोरी ख्रिश्चन महिला, तिचा फक्त चेहरा दिसत होता. तिचा चेहरा सावध होता. डोळ्यांतले प्रश्न सहज वाचता येण्यासारखे होते.. 

नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्रीच्या वेळी एका अनोळखी माणसाने घराची बेल वाजवणं, तिच्यासाठी अस्वस्थ करणारी गोष्ट होती.

माझा श्वास धाप लागल्यासारखा चालू होता. घामाने कपाळ थपथपलं होतं. तिने दार उघडलं तेव्हा मी एक शब्दही बोलू शकलो नाही.

ती माझ्या कडे फक्त पहात होती. क्षणभरात मी सावरलो आणि म्हणालो, 

“अं…अ.. आय ॲम फ्रॉम इंडिया… आय थिंक… टू मेन आर फॉलोइंग मी… आय विल कॉल माय ड्रायव्हर. कॅन आय स्टे हिअर फॉर अ फ्यू मिनिट्स?”

तिने सेफ्टी डोअरची आणखी एक झडप उघडून तिथूनच बाहेर डोकावून पाहिलं. रस्त्यावर काही अंतरावर बाहेरच्या अंधारात दोन आकृती हलल्यासारख्या तिला दिसल्या. बहुदा तिला परिस्थितीचा अंदाज आला.

तरीही तिने घराचा दरवाजा पूर्ण उघडला नाही. ती झडप मात्र परत बंद केली. म्हणाली,  

” या.. बट फ्यू मिनिट्स…. अँड स्टे अंडर द लाईट,” 

ती शांतपणे म्हणाली. 

“डोन्ट कम इन… माय आईज ऑन यु.”

तो नकार नव्हता; तिच्या सुरक्षिततेची काळजी होती. त्याच वेळी एका संकटात सापडलेल्या माणसाला तीने एकटं सोडलं नाही. तिच्या प्रत्येक हालचालीतून इथे लोकं किती असुरक्षित आहे, हे कळत होतं.

पोर्च मधील पिवळसर दिव्याखाली मी उभा होतो. थरथरत्या हातांनी मोबाईल काढला. बोटं स्क्रीनवर नीट पडत नव्हती. कसाबसा राशिदचा नंबर लावला.

“राशिद…”

पलीकडून लगेच आवाज आला.

“यस, सर?”

“आय… आय ॲम इन ट्रबल… प्लीज हेल्प मी… कम बॅक..”

मी घाईघाईने सगळं सांगितलं. लोकेशन शेअर केलं.

राशिदचा आवाज एकदम ठाम होता. मला धीर देत म्हणाला,

“सर, डोन्ट मूव्ह, आय ॲम कमिंग विथ माय फ्रेंड. ओन्ली इन फाइव्ह मिनिट्स.”

फोन कट झाला.

आता त्या पाच मिनिटांचं ओझं मला आयुष्या इतकं मोठं वाटत होतं.

मी परत एकदा रस्त्याकडे पाहिलं. ते दोघे अजूनही गेले नव्हते. अंधारात उभे राहून माझ्या कडे पाहत होते. त्यांना खात्री होती, हे माझं घर नाही. हा माणूस बाहेर नक्कीच पडणार.

माझ्या मनात अनेक विचार येत होते. किती देश फिरलो! नेहमी एकटाच होतो! कधी काही घडलं नाही.. 

संकटं माणसाला सांगून येत नाही.

“मी राशिदचं ऐकायला हवं होतं…” तोच विचार मनात होता.

घराच्या दारात उभी असलेली ती आत गेली नाही. तीची नजर रस्त्याकडे आणि माझ्यावरही होती. तिच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. 

एका अनोळखी भारतीय व्यक्तीने आणि एका ख्रिश्चन वृध्द महिलेने त्या रात्री एका बंद सेफ्टी डोअरने आधार दिला होता. 

धर्म वेगळा…

देश वेगळा…

भाषा वेगळी…

पण माणुसकीचं नातं जिवंत होतं.

आणि… आणि… 

दूरवर कारचा आवाज आला. कान सावध झाले. रस्त्याच्या वळणावर दोन हेडलाईट्स चमकले.

“राशिद…” तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.

क्षणात टॅक्सी गेटसमोर येऊन थांबली.

गाडी थांबताच समोरचे दोन्ही दरवाजे एकदम उघडले. रशीद बरोबर अजून एक माणूस होता. उंच धिप्पाड.. ते दोघेही झटकन खाली उतरले. त्यांना धोक्याची जाणीव होतीच. त्यांच्या हातात जाड लाकडी बॅटन होत्या. ते क्षणाचाही विलंब न करता मोठ्याने ओरडत दोघांच्या दिशेने धावले.

“हे…यू…!”

अचानक झालेल्या या प्रतिहल्याने त्या दोघांना अशी हूल बसली की अंधाराचा फायदा घेत मागे वळूनही न पाहता त्यांनी पळ काढला. रस्त्यावर काही वेळ धावपळीचा आणि ओरडण्याचा आवाज घुमला. पण ते काही सेकंदांतच दिसेनासे झाले. पुन्हा शांतता पसरली…

एक मोठा सुटकेचा श्वासासह माझा ताण बाहेर पडला. राशिद जवळ आला.

“सर… आर यू ऑल राईट?”

  नकळत मी त्याला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत भीती होती…

सुटकेचा आनंद होता… सगळ्यात जास्त रशीद विषयी अपार कृतज्ञता होती.

त्या अनोळखी महिलेचे आभार मानले. 

“थँक्यू मॅम.. थँक्यू… यू सेव्ड मी.”

ती मंद हसली, हलक्या आवाजात म्हणाली,

“दोन वर्षांपूर्वी माझ्या शेजाऱ्याला अशा प्रकारे लुटलं होतं. म्हणून मी दार पूर्ण उघडलं नाही. पण तुला बाहेर सोडू शकत नव्हते. तू खरच घाबरला होता. मला दिसत होतं.”

तिच्या आवाजात भीती होती; पुढे ती म्हणाली, 

“अँड नो नीड फाॅर थँक्यस् यंग मॅन… बट.. यू… जस्ट बी केअरफुल नेक्स्ट टाइम.”

बस, इतकंच. ना मोठेपणा, ना उपकाराची जाणीव. तिने दार हळूच बंद केलं. तिच्या या छोट्या मदतीने माझा माणुसकीचा अनुभव अधिक समृद्ध झाला.

आमची टॅक्सी हॉटेलकडे निघाली. रस्त्यावर आता गर्दी वाढू लागली होती. घड्याळात बारा वाजत आले. आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. लोक एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत होते. 

राशिदने गाडी चालवताना हलकसं हसून विचारलं,

“सर… नाऊ यू बिलीव्ह मी?”

“यस, माय फ्रेंड… आय डू.”

“फ्रेंड्स, आय रियली मस्ट थँक्यू.. तुम्ही दोघं आला नसता तर माझं काय झालं असतं!”

आम्ही तिघेही निशब्द होतो. त्या रात्री मला एक मोठा धडा मिळाला. दोन प्रकारची माणसं भेटली होती. एक – माझ्यावर हल्ला करण्यासाठी अंधारात दबा धरून बसलेले, ते चेहरा नसलेले दोन माणसं…

आणि दुसरे – कोणताही स्वार्थ नसताना मदतीला धावून आलेले, हे तीन माणुसकीचे चेहरे.

मृत्यूची सावली पडली होती… पण नियती माझ्या बाजूने होती.

जगात वाईटापेक्षा चांगली माणसं अधिक आहे.. नाही का!

तुमच्यासाठी महत्त्वाचं हे आहे की, आपण जिथे जातो, तिथे स्थानिकांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करायचे नाही. त्या लक्षपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक त्याचं पालन करा. परदेशात असताना हे आवश्यक आहे. सावध रहा, काळजी घ्या.” 

त्याने समोर बसलेल्या त्या दोन नवीन कर्मचाऱ्यांकडे पाहत म्हटलं..

“आज तुम्ही या कंपनीत रुजू होताहेत. उद्या तुमच्यापैकी कुणी जर्मनीला जाईल… कुणी आफ्रिकेला… कुणी अमेरिकेला… एक गोष्ट लक्षात ठेवा. परदेशात तुमचं ज्ञान, तुमची पदवी आणि तुमचं पद उपयोगी पडेलच… पण प्रत्येक क्षणी तुम्ही सावध हवे.”

“काळ कधी हूल देइल हे ठाऊक नसतं. विवेक, सावधपणा आणि माणुसकी— आपल्या सोबत असेल, तर काळ रिकाम्या हाती परततो.”

कॉन्फरन्स हॉल मध्ये गंभीर शांतता पसरली होती. सगळयांच्या मनात अभिरामच्या अनुभवाची नोंद झाली होती. 

हळूहळू कॉन्फरन्स हॉल रिकामा झाला.

खिडकीजवळ जाऊन उभा राहिला.

कंपनीच्या आवारातून हसत-खेळत बाहेर पडणारे कर्मचारी बघतांना अभिरामच्या मनात विचार आला,

‘अनुभव माणसाला मोठं करत नाही; आलेल्या अनुभवातून घे

तलेला धडा व्यक्तीला मोठा करतो.’

– माधूराज(माधवी भूत)

नागपूर.

भ्रमणध्वनी : 9422807026

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top