कशी ही जिंदगी गेली, गरिबीच्या सहाऱ्यावर,
किती राहायचे आता, घरकुलाच्या भरवशावर
तुफानी लाट प्रेमाची, कुठे घेऊन ही जाते,
सखे तू त्या किनाऱ्यावर, सखे मी या किनाऱ्यावर
कधी वादळ व्यथाचे बघ, सुखाचे स्वप्न उडवीते
मिळाले काय अंतिम या, नशीबाच्या जुगाऱ्यावर
कळाली ना कुणालाही, कधी ही भूक पोटाची
इथे ही धावपळ सारी, कुक्षीच्या ह्या निखाऱ्यावर
लुबाडाया तुला दाणे, असे त्या पिंजऱ्याभवती
कसा विश्वास ठेवावा, अमानुष त्या शिकाऱ्यावर
कुटुंबाला जगविण्या चालली कसरत जराशी बघ
स्वताच्या कामना जाळून इच्छेच्या ढिगाऱ्यावर
– मिलिंद अवचित इंगळे
मुर्तिजापूर
भ्रमणध्वनी – 8485861620