महाराष्ट्राला प्रभावित करणारे नेते आदरणीय अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

आदरणीय ॲड. प्रकाश आंबेडकर

जगविख्यात ज्या सहा प्रज्ञापुरूषांची नावे आहेत, त्यापैकी एक असलेले नाव म्हणजे आपले आदर्श, प्रेरणास्त्रोत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! अशा समृद्ध परंपरेचा सूर्यकुळातील वारसा लाभलेले पुण्यशील माता रमाई- बाबासाहेबांचे नातू त्यांच्या दिव्यत्वाचा प्रकाश अर्थात, आदरणीय प्रकाश (बाळासाहेब) यशवंत आंबेडकर! माता रमाई आणि डॉ. बाबासाहेबांच्या त्याग, समर्पणाला जगात तोड नाही. आंबेडकर दांपत्याच्या पदरी ‘यशवंत’ नावाचा मुलगा आला. माता रमाईने मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. लहानपणी त्याचीही प्रकृती बरी राहायची नाही. रमाईचा जीव कासावीस व्हायचा. कारण त्या माऊलीची पुढे जन्माला आलेली मुलं काळाने हिरावून नेली. बाबासाहेब विलायतला शिक्षणासाठी असतांना ‘गंगाधर’ गेला ‘रमेश’ गेला. मुलगी ‘इंद्र’ गेली. बाबासाहेबांचा जीव की प्राण असलेला ‘राजरत्न’ त्याला डबल निमोनिया झाला आजार वाढला व तोही सोडून गेला. काळजावर दगड ठेवून समाजोद्धारासाठी त्यांनाच आपले कुटुंब मानून एकमेव जगलेला मुलगा ‘यशवंत’ त्या बाबासाहेबांच्या रमाईच्या काळजाचा तुकडा यशवंत त्या यशवंतचा प्रकाश आहे, जो आंबेडकरी समाजासाठी दिशादर्शक आहे. अर्थात त्यांचे बंधू आपापल्या क्षेत्रात क्षमतेने काम करीत आहेत.

श्रद्धेय, प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर संबंध महाराष्ट्राला प्रभावित करणारा प्रभावशाली नेता आहे. आंबेडकरी राजकारणामध्ये पहिल्या श्रेणीतले नाव म्हणजे प्रकाशजी आंबेडकर! त्यांच्या नावाभोवती आपले सर्वोच्च आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याचे फार मोठे वलय आहे आणि ते कायम राहणार आहे. त्यांच्या एवढा वजनदार नेता महाराष्ट्रात कोणीही नाही. लाखोंची सभा घेणारा एकमेव नेता आहे. तो म्हणजे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर! साधने- संसाधनांची कमी असतांनासुद्धा वेगप्रसंगी जनता मिळेल त्या साधनाने नियोजित सभेला पोहचते आणि देशाचे सर्वोच्च नेते समजले जाणारे मोदीजी त्यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या राहतात हे गतनिवडणुकीत आपण जाणारे मोदीजी त्यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या राहतात हे गतनिवडणुकीत आपण अनुभवले आहे. आदरणीय बाळासाहेब रोखठोक बोलतात ते कोणाच्या बापाला घाबरत नाहीत कारण ते स्वतः विधीतज्ज्ञ आहेत, कायद्याचे जाणकार आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी ज्याप्रमाणे लंडनची बॅरिस्टरी मिळवून कोणतीही वरिष्ठांसारखी पार्श्वभूमी नसतानी जेधे – जवळकर खटला असेल, महाडच्या चवदार तळ्याशी संबंधित दिवाणी न्यायालयातला खटला असेल इ. केसेस स्वतः हाताळल्या आहेत व जनतेला न्याय मिळवून दिला आहे. त्यांचा नातू जेव्हा अ‍ॅड. प्रकाशजी भीमा कोरेगाव व खटला असेल किंवा परभणीचे सूर्यवंशी प्रकरण असेल तेव्हा तळमळीने ती बाजू कोर्टात लावून धरतात तेव्हा न्यायाधीशालाही घाम फुटत असेल. (दबाव येत असेल या अर्थाने) मला व्यक्तिशः आदरणीय बाळासाहेबांच्या त्यांच्या अशा कार्याचा मनःपूत आनंद वाटतो. आंबेडकरी जनतेसाठी ते अभिमानास्पद आहे. एक संयत राजकारणी म्हणून अ‍ॅड. बाळासाहेबांचा लौकिक आहे. हे सर्वविदित आहे की, भारतातील सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष तथा संघटनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. ‘मजबुरीका नाम महात्मा गांधी’ असे बोलण्याचा एक प्रघात आहे परंतु डॉ. बाबासाहेबांच्या नावाला पर्याय नाही. ते अपरिहार्य आहे. ‘बाबासाहेब’ हे एक कलदार खणखणीत नाणं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात (इंटरनॅशनल पॉलिटिक्स) मध्ये वर्तमानात डॉ. बी. आर. आंबेडकरांचे नाव आहे तर इकडे अखिल भारतीय राजकारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आणि त्यांच्या संबंध कार्याचा मागोवा स्वतंत्र भारताच्या आजपर्यंतच्या राजकारणात सर्वात उल्लेखनीय बहुचर्चित नाव ज्या नामोल्लेखाशिवाय कुणाचीही राजकारणाची डाळ शिजत नाही ते नाव ‘मुंबई’त स्थित राजगृहाच्या मालकाचं अर्थात परमपूज्य डॉ. बाबासाहेबांचे आहे! त्या बाबासाहेबांच्या कुटुंबातला राजकीय वारस म्हणून महाराष्ट्रातील विशेषतः आंबेडकरी जनता आदरणीय अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना आपला नेता मानते आहे. किती मोठा, गौरवशाली वारसा आदरणीय प्रकाशरावांना आहे. महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाच्या राजकारणाचे सूत्र बदलविण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. आंबेडकरी राजकारणातला एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याशिवाय दुसरे नाव दिसत नाही. त्यांच्या व्यक्तित्ववातली एक मोलाची बाब प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे ह्या माणसाला सत्तेची हाव नाही. सत्तेसाठी इतर पक्षासारखी साम, दाम, दंड भेद ही नीती ते वापरत नाहीत हे आपल्या नैतिकतेत बसत नाही याची सजग जाणीव आदरणीय प्रकाशरावांना आहे. ह्या त्यांच्या कृतीशिलतेचा आंबेडकरी समाज समुहाला नितांत गौरव वाटतो. आदरणीय साहेबांना आंबेडकरी समाज समुहातील लेखक ह्या प्रातिनिधीक नात्याने विनंती वजा काही चिंतन आपल्या पुढ्यात मांडतो आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ‘सत्तेसाठीचे राजकारण करावे म्हणजे आतापर्यंतचे आपण केलेले राजकारण सत्तेसाठी नव्हते का?’ असा उपप्रश्न निर्माण होतो. तो स्वाभाविक आहे. आपण आपल्या सामर्थ्य शक्तीने ‘अकोला पॅटर्न’ निर्माण केला. ‘किनवट पॅटर्न’ निर्माण केला. आपण भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या चांगली कामगिरी आपण केली त्यांचे स्वागतच आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती अर्थात गावपातळीपासून सुरु झालेले आंबेडकरी राजकारण विधीमंडळाच्या प्रमुख स्थानापर्यंत क्षमतेने धडकलं पाहिजे. अर्थात, ते अद्याप झालेलं नाही म्हणजे आम्ही विधानसभा निवडणुका लढल्या नाहीत असे नाही. त्यामध्ये आपण कुठे कमी पडलो. त्यावर चिंतन होऊन आम्ही मजबुतीने, नव्या दमाने, आंबेडकरी समाजाचा पूर्णार्थाने कौल काय आहे त्याचे मत आणि विचार काय आहेत व त्यांच्यासाठीचेच नव्हे तर काँग्रेस बीजेपी सारख्या बड्या पक्षाला आम्ही मात देऊ शकतो. (महाराष्ट्रातील इतर पक्ष फुटिरतेमुळे कमजोर झाले आहेत ते आगामी निवडणूकीत प्रभावहीन होतील कारण फुटीरतेच्या दुहीत विघटन होत असते.) ही उर्जायत क्षमता असणारा महाराष्ट्रातील प्रभावशाली नेता म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकर!

प्रयोगशील नेता म्हणूनही त्यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञेतल्या ‘रिपब्लिकन’ पक्षाची धुरा वाहिलेला हा कणखर आंबेडकरी नेता आहे. बाबासाहेबांचा रिपब्लिकन म्हणून अर्थात सोन्याच्या चिंध्या करणारे दुर्भागी कार्यक्षम स्वार्थी नेत्यांनी रिपब्लिकन ह्या राजकीय संकल्पनेची पूर्णतः बाताहत केली परिणामी श्रद्धेय बाळासाहेबांना नवा पर्याय म्हणून वं. बु. आ. हा नवा प्रयोग करावा लागला. चाणाक्ष, विवेकी नेते असे प्रयोग करतात. तो प्रयोग सुरुवातीच्या फेजमध्ये प्रभावीकारी राहिला परंतु तो पुढे घसरत चालला आहे ही वस्तुस्थिती आहे. माझ्या राजकीय आकलनानुसार जर पूर्ण तयारीने निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पक्षाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रात विभागावर जरी दौरे केले, काही सर्वसाधारण सभा संमेलने घेतली तर निवडणूकीच्या कार्यकाळात मा. आंबेडकर साहेबांची तेवढी दगदग होणार नाही व निवडणूकीच्या योग्य नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळेल. वेळप्रसंगी काँग्रेस सारखा धर्मनिरपेक्ष विचारांचा पक्ष स्वतःहून राजगृहाच्या पायऱ्या झिजवेल त्याची परिणीती गेल्या. निवडणूकीत आपल्याला आली. युतीसाठी विलंब झाला. जनतेच्या मनातली भावना मनातच राहिली. नेता पक्ष- कार्यकर्त्यांची व आपल्या संभाव्य मतदार वर्गाच्या मनातले ओळखण्याची पारख त्याचप्रमाणे वेळप्रसंगी योग्य तो राजकीय निर्णय घेण्याची क्षमता सर्वार्थाने अंगी बाळगली पाहिजे. कारण निवडणूक ही पाच वर्षानंतर आलेली नामी संधी असते. त्यामाध्यमातून सत्तेपर्यंत निश्चीतपणे पोहचता येते. आंबेडकरी राजकारण नीती मूल्यांचे राजकारण आहे. तत्त्वनिष्ठतेचे राजकारण आहे आणि ते सत्तेसाठीचं राजकारण आहे हे ही तेवढेच खरं आहे. किती दिवस, किती वर्ष आम्ही मुख्य राजकीय प्रवाहापासून, राज्यातल्या सत्तेपासून दूर राहायचे काय कमी आहे, बाबासाहेब म्हणायचे मला निष्ठावान माणसांची गरज आहे. ‘आपली झोपडी सोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरू नका.’ काय गरज आहे. आदरणीय बाबासाहेबांच्या रूपाने आंबेडकरी समाजाला नेतृत्व आहे. श्रद्धेय साहेबांनी कळकळीचे आवाहन करू द्या, लोक हातातले काम सोडून, उपाशी पोटी येतील, पाहिजे त्या क्षमतेने मदत करतील. आंबेडकरी समाज हा स्वाभिमानी समाज आहे. तो विकावू माल नाही परंतु नेत्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे समाज संभ्रमित आहे. जे गळाला लागलेले नेते आहेत. स्वार्थी भावनेने पीडित आहेत, सत्तेसाठी लाचार आहेत असे नेते चांगल्या कार्यकर्त्यांची फौज निर्माण करू शकत नाहीत. ह्या वृत्तीमुळे समाजातली काही लोक विकल्या जातात व अशी लोक समाज बदनामिला कारण ठरतात. ह्या प्रवृत्तीची लोकं नगण्य आहेत. दुसरा एक प्रयत्न असाही करता येऊ शकतो. तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारस्फूर्तीतून प्रेरणा घेऊन राजकारण करताहेत अशा समविचारी (प्रस्थापितांच्या गळाला लागलेले वगळून) छोट्या-मोठ्या पक्षाची मोट बांधून सत्तेकडे वाटचाल होऊ शकते. ‘होऊ शकत नाही.’ हे वाक्य महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांकडून मान्यवर कांशीराम यांनी ऐकले होते आणि ते म्हणाले, ‘होऊ शकत आहे.’ त्यांना महाराष्ट्रात फुले-शाहू आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचे सरकार अपेक्षित होते. परंतु ते त्यांना येथे शक्य झाले नाही तो प्रयोग त्यांनी मायावतीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात यशस्वी केला. अर्थात तो विचार ती प्रेरणा आणि आर्थिक पाठबळ महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात झाले ही बाब निर्विवाद सत्य आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच बळ घेऊन मान्यवर कांशीराम ह्या देशाच्या सत्तेला हादरा देणारा बडा नेता झाला. महाराष्ट्राच्या राजकीय सिद्धांताला पूर्णतः विफलता प्राप्त झाली आहे. त्यांना जनतेशी पाहिजे त्या प्रमाणात प्रत्यवाय राहिला नाही. राजकीय चारित्र्य नसलेले लोक सत्तास्थानी बसले आहेत. म्हणूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीची राज्यघटनेच्या माध्यमातून प्राणप्रतिष्ठा करणारे आपले आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू त्यांच्या नेतृत्त्वाखाली समाजाला आता एकजुट होण्याची गरज आहे. आता आम्ही भावनेच्या आहारी जावून प्रस्थापित पक्षांना बळी पडू नये. आता आमच्या पक्षातर्फे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील पक्षाचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ही आंबेडकरी समाजाचीच नव्हे तर महाराष्ट्राची आस आहे. ‘लोकपाल विधेयकाच्या एका साध्या दिल्लीतील आंदोलनातून ज्याचे नेतृत्त्व अण्णा हजारे यांनी केले त्यातून जन्माला आलेला केजरीवालचा ‘आम आदमी पक्ष’ दिल्लीची सत्ता बळकावतो. आज त्यांचं पंजाबमध्ये सरकार आहे. अण्णा शांत झाले पण त्यांनी धुणी पेटवून दिली. दुसरे ताजे उदाहरण म्हणजे अलीकडेच पार पडलेल्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणूकीत एक तिशीतला मुलगा जो सिनेसृष्टीत नट म्हणून काम करायचा त्याच्या पक्षाने पहिल्यांदाच विधानसभा लढविली व मोठा विजय प्राप्त केला. तो आज मुख्यमंत्री आहे. जनतेला नवा पर्याय हवा आहे. आम्ही सत्तेसाठी, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे येऊ नये? आमच्याकडे कमालीचा अनुभव आहे. राजकीय चारित्र्य आहे. श्रद्धेय बाळासाहेब देशाच्या संसदेत निवडून गेलेले आहेत. आमचे आदर्श डॉ. बाबासाहेबांना काँग्रेसने कधीही लोकसभेवर निवडून येऊ दिले नाही. बाबासाहेब दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढले. बाबासाहेब आंबेडकर आपल्या पक्षाच्या जोरावर राज्यसभेचे सदस्य झाले. आज घडीला आंबेडकरी जनतेचा विश्वास आहेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यात ती निर्णय क्षमता आहे. आदरणीय आंबेडकर साहेबांवर लिहित असतांना मला प्रा. अविनाश डोळस सरांची आठवण होते आहे. स्मृतीशेष डोळस सर मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापक होते. डोळस सर म्हणजे श्रद्धेय बाळासाहेबांचा उजवा हात बाळासाहेबांसाठी, भा. रि. प. साठी जिवाचं रान करणारा हा माणूस! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी जसे नाशिकचे दादासाहेब गायकवाड तसे बाळासाहेबांसाठी प्रा. अविनाश डोळस खरा आंबेडकरी विचारांचा एकनिष्ठ माणूस सर जेव्हा अचानक गेले तेव्हा तो पक्षासाठी, बाळासाहेबांसाठी एक धक्काच होता. त्यांच्या अंतयात्रेसाठी अ‍ॅड. आंबेडकर साहेब स्वतः आले होते. हक्कांचा जीवलग माणूस अनंतात विलीन झाला होता.

अराजकीय अर्थात सामाजिक, सांस्कृतिक कार्याशिवाय कोणतेही राजकीय आंदोलन यशस्वी होणे कठीण आहे हा राजकीय सिद्धांताशी निगडीत भाग आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे डॉ. बाबासाहेबांची जी निर्मिती आहे, त्याची काळजी आपण वाहिली पाहिजे. राष्ट्रीय कार्य संविधानापासून, दीक्षाभूमीच्या धम्मक्रांतीपासून ते नागसेनवनाच्या ज्ञानभूमीपर्यंत तेथून पुढे ही महाडच्या क्रांतिसंगरापर्यंतच्या स्फूर्तीदायी प्रेरणा व बाबासाहेबांच्या आठवणी त्यासाठी त्यांची झालेली झिज आपण सर्वच जण रात्रीचा दिवस केला तर भरून निघणार नाही पण साहेब त्या सर्वांवर तुमचा वरदहस्त राहू द्या. पीइएस मुंबई अंतर्गत जेवढे ही कॉलेज, शाळा, वसतिगृहे व स्थावर संस्थेची हजारो नव्हे लाखो कोटी रुपयाची स्थावर मालमत्ता व्यवस्थापन नसल्यामुळे कोसळून पडते आहे. मॅनेजमेंट नसल्यामुळे गुणवत्ता ढासळली आहे. विद्यार्थी संख्येत घट झाली आहे. महाविद्यालयाचे प्रशासन हुकमी बनत चालले आहे. साहेब आपण कधी मधी नैतिक जबाबदारीचा भाग म्हणून जरी आलात तरी थोडा लगाम बसेल. बाबासाहेबांसारखा तुमचा धाक मोठा आहे.

उत्तरार्धात एवढेच सांगतो, बाबासाहेबांच्या घरातली व्यक्ती या पुरोगामी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावी त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलेल त्यासाठीचा आंबेडकरी जनता आणि कार्यकर्त्यांनी ध्यास घ्यावा. ज्ञानसूर्याच्या घराण्याचा कुलदीपक आंबेडकरी जनतेचा आश्वासक चेहरा म्हणजेच आदरणीय प्रकाशजी आंबेडकर!

 

कोंडबा भ. हाटकर

– कोंडबा भ. हाटकर 

छत्रपती संभाजीनगर 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top