प्रेमाचं ‘यळं’ अन् करिअरचं दिवाळं

काय सांगू गड्या तुले, याचं नशीब कसं फळलं,

पोरीच्या नादात पोट्टं, पुरतं ‘यळं’ झालं!

तिनं केलं ‘रीडिंग’ अन् यानं केलं ‘वेटिंग’,

ती पास झाली क्लासमधी, हा फेल झाला ‘डेटिंग’.

कॉलेजच्या त्या कट्ट्यावर, हा वाळत बसला काडीवाणी,

तिच्या एका स्माईलसाठी, डोळ्यात याच्या पाणी.

ती ‘असाईनमेंट’ पूर्ण करी, लायब्ररीत बसून भारी,

हा ‘इंस्टा’ वर चेक करी, तिची पोस्ट कुण्या वारी?

ती परीक्षेच्या टेन्शनमध्ये, रात्र-रात्र जागी होती,

हा तिच्या ‘लास्ट सीन’ कडे, पाहत बसला स्क्रीनवरती.

तिनं मारली बाजी गड्या, ती झाली साहेबीनं बाई,

याचं निघालं दिवाळं, आता घरी कुणी विचारीत नाही!

प्रेमाच्या या वाऱ्यानं, डोकं होतं पार रिकामं,

‘रिझल्ट’ आल्यावर मग, सुचत नाही काही काम.

पोरीच्या मागे फिरताना, चपला पार झिजल्या,

पण निकालाच्या दिवशी मात्र, साऱ्या आणाभाका भिजल्या.

बाप म्हणते, “पोट्टं माय, नाव मोठं करील,”

पण याले वाटलं, “हिच्या घरासमोर माझी वरात निघील!”

आता ती फिरते गाडीत, अन हा शोधतोय काम,

प्रेमाच्या नादात झाला, आयुष्याचा ‘राम-नाम’.

म्हणून सांगतो पोट्टेहो, वेळ आपली राखून ठेवा,

आधी बना काहीतरी, मग खा प्रेमाचा हा मेवा.

साहेबाच्या गाडीपुढं, मग दुनिया झुकते सारी,

नाहीतर उरते नशिबी, फक्त ‘बेकारीची वारी’.

तिच्या पाठी धावून, तिचं काही जात नाही,

पण फेल झालेल्या पोराले, बाप भाकर वाढत नाही!

आधी करिअरचं मैदान मारा, मग होईल जोराचा सत्कार,

नाहीतर या ‘यळपट’ प्रेमात, होईल तुमचा ‘बुक्का’ पार!

विजय बेलखेडे 'साहित्यामूलाग्र' मुख्य संपादक

– विजय बेलखेडे 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top