स्त्री समर्थक तात्यासाहेब ते बाबासाहेब

कवी ‘कुसुमाग्रज’ म्हणतात,

“समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खडू नका.

दासी म्हणुनी पिटू नका व देवी म्हणूनही भजू नका”

स्त्रियांसाठी खऱ्या अर्थाने माऊली असणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी केलेले कार्य इतिहास कधीही विसरणार नाही. आज या दोन विभूतींमुळेच स्त्रियांचे अस्तित्व ‘मानव’ म्हणून निर्माण झाल्याचे दिसून येते.

 वेदकाळाबाबत जे साहित्य उपलब्ध आहे, त्या साहित्यातून असं दिसून येतं की त्या काळात स्त्री-पुरुष यांचा दर्जा समान होता. स्त्रीला अधिकार होते. स्त्रीलाही वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळत होता. स्त्रीचेही उपनयन होत होते. याचा अर्थ स्त्रीला शिक्षणाचा अधिकार होता. त्या काळात स्त्रीला तिचा पती निवडण्याचाही अधिकार होता. पुढे मात्र मध्ययुगीन काळामध्ये स्त्रियांना विविध बंधनांमध्ये घालण्यात आले. स्त्रीला पूर्णतः व्रतवैकल्यामध्ये अडकवण्यात आले. स्त्रीला शिक्षण नाकारल्यामुळे घराच्या चार भिंतीमध्ये तिचे जीवन व्यतीत होऊ लागले. स्त्रीला उपास-तापास, पतीव्रत्य या मोहजाळात गुंतवून गुलाम करण्यात आले .पुढे परकीयांची आक्रमणे जसजशी भारतावर झाली तशी स्त्री पूर्णतः गुलामच झाली. स्त्रीवर शत्रूच्या आक्रमणाच्या भीतीमुळे बालविवाहाची सक्ती करण्यात आली. त्यामुळे आपोआपच तिचे शिक्षण तिच्यापासून हिरावून घेतले गेले. स्त्री शिकली तर अक्षरांच्या आळ्या होतात, जेवणामध्ये येतात, स्त्री शिकली तर पती मरतो अशा भाकडकथांमुळे स्त्रीला वाईट दिवस आले. चार्वाक म्हणतो की, ‘पतिव्रता स्त्री सारख्या संकल्पना स्त्रीला गुलाम बनवणाऱ्या आहेत, स्त्रियांनी यामध्ये अडकू नये.’ यानंतरच्या काळामध्ये स्त्री घरातून बाहेर पडू नये, म्हणून तिच्या पायात लाकडी चाक घातले जात होते. सती प्रथा, बालविवाह, जरठकुमारी विवाह अशा प्रथांमुळे स्त्रीचे जीवन नरकयातना सारखे बनले होते. याच काळात प्रामुख्याने स्त्रीचा शिक्षणाचा व मालमत्तेतला हक्क नाकारला गेलेला होता. या काळात स्त्रीला एकीकडे देवी म्हणून पुजले जाई व दुसरीकडे मनुस्मृती सारख्या ग्रंथांच्या माध्यमातून तिला नाडले जात होते.

अशा ह्या काळात स्त्रियांच्या उद्धारासाठी एक युगपुरुष जन्मला या युगपुरुषाचे नाव महात्मा ज्योतीराव फुले. क्रांतिवीर महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या या अवस्थेतून त्यांच्या उत्थानासाठी कार्य प्रारंभ केले. स्त्री शिक्षणाचा एक नवा अध्याय या दोन क्रांतिवीरांनी सुरू केला. स्त्रियांच्या बाबतीत होणाऱ्या वाईट प्रथा, सती प्रथा, केशवपण ,बालविवाह याला यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. महात्मा ज्योतीराव फुलेंनी विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह केले. त्याचप्रमाणे दलित, पीडित, शोषित स्त्रीला शिक्षणाचे दार उघडे करून दिले. महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व तळागाळातील लोकांना समजावून सांगितले महात्मा फुले यांनी आपल्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथामध्ये ‘मनुस्मृति जाळून टाका, कारण शूद्र आणि अतिशूद्र यांना ताडण्याचे काम ही स्मृती करते.’ म्हणून त्यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये मनुस्मृती जाळून टाकण्याचे मत व्यक्त केलेले आहे. महात्मा ज्योतीराव फुले यांनी रामजी सुभेदार यांना काही दिवस पुण्यात शिक्षकी प्रशिक्षण देण्याचे काम केलेले दिसून येते. त्यामुळेच रामजी सुभेदार यांच्या विचारावर, कार्यावर महात्मा ज्योतीराव फुले यांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. महात्मा फुले ‘मनुस्मृती’ला विषमता, जातीभेद, स्त्री गुलामगिरीचे मूळ समजून मनुस्मृतीला विरोध करतात. मानवी बुद्धीला काळीमा फासणारी नियमावली जाळून टाका असे म्हणतात. शूद्र अति शूद्र शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शिक्षणाचे समर्थन करतात

स्त्री प्रश्नांची जाणीव होऊन त्या सोडवण्यासाठी जो प्रयत्न करतो, त्यास जो पाठिंबा देतो, जो त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, स्त्रियांच्या उत्थानाकरिता जो सदैव कार्यरत असतो, त्यांनाच स्त्री समर्थक असे म्हटले जाते.

इतिहासाचा आढावा घेतला असता स्त्री समर्थक तात्यासाहेब व बाबासाहेब प्रकर्षाने समोर येतात. महात्मा फुलेंनी अठराव्या शतकामध्ये स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी १ जानेवारी १८४८ मध्ये सावित्रीबाईंच्या मदतीने पुण्यात पाहिली मुलींची शाळा सुरू केली. सती प्रथा, बालविवाह, जरठकुमारी विवाह, केशवपण या वाईट बाबींना विरोध केला. स्त्रियांना अनैतिक संबंधातून झालेल्या अपत्यामुळे आपला जीव गमवावा लागू नये म्हणून ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ स्थापन केले. त्यात बेचाळीस उच्चवर्णीय स्त्रिया सुखरूप बाळंत झाल्या होत्या. महात्मा फुले यांनी आपल्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथामध्ये मानवी बुद्धीला काळिमा फासणारी नियमावली म्हणून मनुस्मृती जाळून टाकण्याचे आवाहन केले आहे, त्यापैकी महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथात असे म्हटले आहे की, ‘मानव जातीच्या तोंडाला काळे फासणाऱ्या ‘मनुस्मृती’ला जाळून टाका’ ज्या व्यक्तीने धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्याची परखड चिकित्सा केली, स्त्री व शूद्र यांना दुःखातून मुक्त करत, विद्येचे साधन त्यांना मिळवून दिले, असे ज्योतीराव फुले मनुस्मृतीला जाळून टाकण्याचा जो संदेश देतात, त्यामध्ये शूद्रांना अतिशय हीन मिळणारी वागणूक, हेच त्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. 

स्त्री समर्थक बाबासाहेब म्हणून त्यांचे कार्य जाणून घेताना, आपणास सुरुवात करावी लागते ती १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रहापासून. ज्या पाण्याला शिवण्याचा अधिकारही व्यवस्थेने दिला नव्हता, त्या पाण्यात मात्र गाई, म्हशी, कुत्रे येथेच्छ पोहत, पाणी पीत असत. पण माणसाच्या स्पर्शाने मात्र पाण्याला विटाळ होत असे. ही गोष्ट, ही बाब मानवाचे मानवी हक्क नाकारणारे आहे. २० मार्च १९२७ मध्ये बाबासाहेबांनी रायगडला साक्षी म्हणून चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला व एक नवी क्रांती केली. ज्या ‘मनुस्मृती’ने शिवरायांना आसन नाकारले होते, शुद्र, अतिशूद्र कोणताच अधिकार दिला नव्हता, त्या ‘मनुस्मृती’चे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ मध्ये गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण व्यक्तीच्या माध्यमातून मनुस्मृतीचे दहन केले.

काय होते या मनुस्मृतीत? मनुस्मृतीत १२ अध्याय असून २६४३ श्लोक आहेत. ही सर्व साधारणतः इसवी सनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात लिहिली असावी. स्मृतीचा जनक जरी एक असला तरी स्त्रिया व अस्पृश्यांवर अन्याय करणारे किती मनू आजपर्यंत होऊन गेले, हे अज्ञात आहे. मनु म्हणतो की माता-बहीण कन्या यांच्यासोबत पुरुषांनी एकांतात बसू नये. व्याभिचार हा स्त्रीचा स्वभाव आहे.

नवऱ्याने बायको सोडली की तिच्यावरचा स्त्रीचा अधिकार असतो. लग्नात वधूचे दान होते, म्हणून स्त्री पतीची मालकी असते. लहानपणी पित्याने, तरुणपणी पतीने, वृद्धपणी मुलांनी स्त्रीला संरक्षण द्यावे. स्त्री विषय सुखाने बरबटलेली असल्याने प्रत्येक पुरुषांकडे संभोगाच्या दृष्टीने पाहते. स्त्रीला स्वातंत्र्य नाही. पती कसाही असला तरी त्याची देवाप्रमाणे सेवा करावी, दुसरा पती करू नये. वि. का. राजवाडे आपल्या ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ या पुस्तकात असे म्हणतात की, ‘स्त्री म्हणजे वस्तू’. जिनगीची याचा अर्थ ज्याचा क्रयविक्रय करता येतो, अशी वस्तू. स्त्रीचा समावेश या काळात ‘जिनगीची वस्तू’ म्हणूनच होत होता. स्त्री व शुद्ध राणी कमावलेली संपत्ती ही त्याची नसते तर ते ज्यांच्या मालकीच्या असतात, त्यांची असते. हा विचार हे मनुस्मृतीचा. स्त्री पतीच्या आधी जेवली तरी ओल्या बांबूच्या फोकाने तिला मारावे, हा विचारही स्त्रीचं अस्तित्व नाकारणारा. या अमानवी विचारांना तिलांजली देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी रायगडला समोर ठेवून मनुस्मृती जाळून टाकली. जी आजही इतिहासात अमर आहे. याच मनुच्या पुतळ्याला जयपुरला जाऊन उच्च न्यायालयासमोर मनुच्या पुतळ्याला काळे फासले, हे काम अलीकडे कांता आहिरे या स्त्रीने केले. ही खरी स्त्री समर्थक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे रणरागिणी असे म्हणावे लागेल.

मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येऊ लागले, त्यापैकी महिलांची संख्या जास्त होती. महिला मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना पाहण्यासाठी जमल्या होत्या. त्या महिलांना उदबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘समाजाचा संसार हा तुम्ही दोघांनी म्हणजेच स्त्री-पुरुष दोघांनी मिळून करावयाचा आहे. चळवळीत सहभागी व्हायचे आहे. प्रत्येक पुरुषाने सभेला येताना आपल्या स्त्रियांना घेऊन यायचे. जो पुरुष स्त्रियांना सोबत आणणार नाही, त्याला सभेत जागा दिली जाणार नाही.’ बाबासाहेबांना स्त्रियांच्या दुःखांना या गर्तेतून बाहेर काढायचे होते, म्हणूनच रमाईला लिहिलेल्या एका पत्रात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘स्त्री स्वातंत्र्यसाठी लढणारा मी एक योद्धा आहे ‘१९२७ मधील महिलांच्या सभेला उद्देशून बाबासाहेब म्हणतात, की अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न समस्त स्त्रियांचा आहे, कारण तुम्ही मुलांना जन्म देता ब्राह्मण स्त्रियाप्रमाणेच शील, धडाडी तुमच्यात आहे, पण ब्राह्मण स्त्रीच्या मुलाला समाजात जे स्थान मिळते, ते तुमच्या मुलांना मिळत नाही, त्यासाठी चारचौघात तुमची ओळख होईल, असे लुगडी नेसण्याची पद्धत सोडून द्या, गलिच्छ राहू नका, स्वच्छता बाळगा जुन्या चालीरीती सोडून द्या, तुमची अस्पृश्य म्हणून ओळख होईल, असे वागणे व व्यवसाय सोडून द्या, गळाभर गळसळ्या व कोपरभर चांदीच्या गोठ पाटल्या, लोखंड, कथिलाचे दागिने अंगावर मिरवण्‍याऐवजी सोन्याचा एकच दागिना अंगावर घाला. गळाभर गळसऱ्या घातल्याने, पतीला आयुष्य लाभत नाही. दागिन्यांवर पैसे खर्च करण्याऐवजी, कपड्यांवर पैसे खर्च करा, आपली लुगडी नेसण्याची पद्धत बदला. मेलेल्या जनावरांचे मास खाऊ नका. पती घरी आणत असेल तर त्याला प्रतिबंध करा. मुलांना शिक्षण द्या, त्याचे लवकर विवाह करू नका. जबाबदारी घेण्याचे वय झाल्यावर विवाह करा. बाबासाहेबांच्या या बोलण्याने सभेला आलेल्या महिलांनी आपल्या पेहराव जवळच्या शेतात जाऊन बदल केला. बाबासाहेबांनी उच्चवर्णीय स्त्रियांकडून अस्पृश्य स्त्रियांना लुगडी नेसण्यास शिकवले. या दलित स्त्रियांनी लगेचच आपल्या पेहरावात बदल केला. सत्याग्रहावरून घरी परत जाताना बाबासाहेबांनी प्रत्येक स्त्रीला ओवाळणी म्हणून आठ हात आणि दिले

स्त्री समर्थक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १९२८ मध्ये मुंबई प्रांत विधिमंडळात जेव्हा नेमणूक झाली त्या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठ अधिनियम, मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम ,वतनदारी अधिनियम, खोती पद्धत नष्ट करणारे विधेयक, ग्रामपंचायत विधेयक, स्थानिक संस्था कायदा दुरुस्ती विधेयक ,मुंबई पोलीस अधिनियम, दारूबंदी विधेयकावर चर्चा, मंत्र्यांचे वेतन विधेयक, मातृत्व लाभ विधेयकावर चर्चा केलेली दिसून येते. यापैकी अत्यंत महत्त्वाचे विधेयक जे महिलांच्या दृष्टिकोनातून आजही संस्मरणीय आहे, ते मातृत्व लाभ विधेयक. या मातृत्व लाभ विधेयकाबाबत त्यांनी कामगार महिलांच्या हक्काचे समर्थन केले, महिलांच्या कामाचे तास मर्यादित करणे कारखान्यात काम करणाऱ्या महिलांना सुरक्षितता देणे, रात्रीच्या वेळी होणाऱ्या कामावर नियंत्रण ठेवणे, प्रसुती काळात स्त्रियांना भरपगारी प्रसुती रजा देणे, कारखान्यात काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता प्रयत्न करणे, खाणकाम करणाऱ्या महिलांचे आरोग्य, स्त्री-पुरुष समान कामासाठी समान वेतन, कामाच्या ठिकाणी महिलांचा सन्मान, शोषण व अन्याया विरुद्ध कायदेशीर संरक्षण, महिला कामगार कल्याण निधी, खाणकाम, महिला निधी, मातृत्व लाभ कायदा याविषयी कार्य केल्याचे दिसून येते. यातूनच पुढे भारत सरकारने १९६१ मध्ये मातृत्व लाभ कायदा केला. त्यामुळेच महिलांना प्रसुतीनंतर सहा महिने भर पगारी सुट्टी मिळते. प्रसुती पूर्वकाळातही स्त्रियांना वेतना सहित सुट्टी घेता येते. स्तनपानासाठी ब्रेक, पाळणाघरची सोय, गर्भपात झाल्यास सहा आठवडे रजा महिलांना घेता येते. महिला देशाच्या भावी नागरिकांना जन्म देतात त्यामुळे हे ते सुदृढ निर्माण व्हावेत याकरिता महिलांचे आरोग्य ध्यानात घेऊन बाबासाहेबांनी कार्य केल्याचे दिसून येते बाबासाहेबांनी भारतातील सर्व दलित महिलांना एकत्र येण्याचे संघटित होण्याचे व चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. चळवळीला पैसा उभारण्याचे काम हे महिलांनी करावे जमेल तसे चळवळीला मदत करावी चळवळीच्या सभांना उपस्थित रहावे असे आव्हान केले या महिलांच्या कार्य कर्तुत्वाला उजळणी देण्यासाठी 20 जुलै 1942 मध्ये नागपूर येथे अखिल भारतीय दलित महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते आज पर्यंतच्या बाबासाहेबांच्या चळवळीतील हे सर्वात मोठे संमेलन होते त्यासाठी पंचवीस हजार महिला उपस्थित होत्या या परिषदेचे अध्यक्ष विठाबाई डोंगरे स्वागताध्यक्ष किर्तीबाई पाटील महासचिव इंदिरा पाटील या महिलांनी भूषवले होते या महिलांच्या सभेला मार्गदर्शन करताना करताना बाबासाहेब म्हणतात की स्त्रियांना पुरुषांना व्यसनांपासून दूर ठेवा आपल्या मुलांना गलिच्छ व्यवसायात आणू नका गलिच्छ कामाला नकार द्या एकच कपडे सर्व ठिकाणी घालू नका फिरायला जाताना कामावर जाताना लग्नाला जाताना वेगवेगळे कपडे परिधान करा कारण कपड्यामुळे आपण कोणत्या जातीचे आहोत हे सहज समजत नाही, त्यामुळे कपड्यांवर पैसे खर्च करा .आपल्या मुलांना शिक्षण द्या ,त्यांना दुर्गुणापासून दूर ठेवा आपण थोर पुरुष होणार हे मुलांच्या मनावर बिंबवा .मुले आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर त्यांचे लग्न करा जास्त मुले जन्मास घालणं हा राष्ट्रीय गुन्हा आहे प्रत्येक विवाह स्त्रीने पतीची मैत्रीण हवे जसा पुरुषाला वधू निवडण्याचा अधिकार असतो तसाच अधिकार स्त्रीलाही असावा बाबासाहेब म्हणतात की, आपला वर निवडण्याचा अधिकार स्त्रीला नसल्याने कित्येक सुंदर महिला कुरूप पुरुषांच्या जीवनसाथी झाल्या आहेत. बाबासाहेब महिलांना म्हणतात की, तुम्ही शिका, शिक्षिका व्हा, आपल्या जातीतील मुलांसाठी वस्तीगृह काढा, महिलांनी चळवळीत सहभागी व्हावे, त्यावेळी त्यांनी महिलांच्या घटस्फोट व मालमत्तेतील अधिकाराचे समर्थन केले १९३० च्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहा वेळी पुरुषांच्या बरोबरीने महिला मंदिर प्रवेशात सहभागी होत्या. त्यातील एका पुजार्‍याने जेव्हा एका महिलेला अपमानास्पद वागणूक दिली, त्यावेळी बाबासाहेबांच्या विचारणे प्रेरित झालेल्या स्त्रीने मंदिराच्या पुजाऱ्याला आपल्या हाताचा प्रसाद दिला होता.

   भारतीय विधवा महिलाना पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळावा यासाठी १९३७ मध्ये ब्रिटिशांनी ‘हिंदू वुमन्स प्रॉपर्टी राईट’ हा कायदा केला कारण एकदा स्त्री विधवा झाली की तिला पतीच्या संपत्ती मध्ये अधिकार सांगता येत नव्हता. विधवा स्त्रीला सासर माहेर दोन्हीही जवळ करत नसल्यामुळे तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असे. या स्त्रियांना अपत्य असल्यास अपत्य व स्वतःचा उदरनिर्वाह, विधवा स्त्रियांना डोईजड होई. या स्त्रियांच्या दुःखाला समजून हा कायदा केला होता.

 या कायद्याला ‘देशमुख कायदा’ असे म्हणतात. या कायद्यानुसार विधवा महिलांना पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळाला, पण तिला ती संपत्ती विकता किंवा हस्तांतरित करता येत नव्हती. त्यामुळे ही संपत्ती अडचणीच्या प्रसंगी स्त्रीच्या कामात पडत नसे. तसेच विधवा स्त्रीच्या निधनानंतर ती संपत्ती तिच्या सासरच्या लोकांना मिळत असे, हा या विधवा स्त्रियांवर एक प्रकारचा अन्याय होता. या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी बी. एन. राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली. या समितीने भारतभर फिरून महिलांचा संपत्ती मधील अधिकाराबाबत लोकांची मते जाणून घेतली, पण महिलांना संपत्तीमध्ये अधिकार देण्याच्या दृष्टीने फारसे काही करता आले नाही. पुढे मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चार वर्ष, एक महिना, सव्वीस दिवस मेहनत घेऊन ‘हिंदू कोड बिल’ विधेयक तयार केले व ते ११ एप्रिल १९४९ मध्ये मांडले, पण ते पास होऊ शकले नाही. पुढे ०५ फेब्रुवारी १९५१ मध्ये बाबासाहेबांनी ते संसदेत मांडले. त्यावेळी ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते, पण या विधेयकाला संसदेच्या आत व संसदेच्या बाहेर प्रचंड विरोध असल्याने ते पास होऊ शकले नाही. या ‘हिंदू कोड बिला’ विरुद्ध महिलांनी पुरुषांच्या सांगण्यावरून अनेक मोर्चे काढले. संसदेतील महिला सदस्यांनीही या विधेयकाला विरोध केला. आपला पती आपणास घटस्फोट देईल म्हणून बिलाच्या विरोधात असंख्य महिला मोर्चात सहभागी झाल्या, अशाच मोर्चात सहभागी एका महिलेला बाबासाहेबांनी विचारले की, “या विधेयकामध्ये काय आहे, हे तुला माहित आहे का?” त्यावर ती स्त्री म्हणाली, “माझा नवरा मला घटस्फोट देईल म्हणून मी आली आहे. मी या मोर्चात जर सहभागी झाली नाही, तर माझ्या पतीने मला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. यावरून ‘हिंदू कोड बिला’वरून लोक किती विरोधात होते हे समजून येते. ‘हिंदू कोड बिला’मध्ये प्रामुख्याने आठ अधिनियम होते, त्यामध्ये प्रामुख्याने –

१) हिंदू विवाह अधिनियम

२)वारसदार अधिनियम

३) विशेष विवाह अधिनियम

४)हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम

५)दत्तक घेणे व दत्तक ग्रहण अल्पायु संरक्षण अधिनियम

६)हिंदू वारसदार अधिनियम

७)अप्राप्त अल्प संरक्षण संबंधी अधिनियम

८)दुर्बल व साधनहीन कुटुंबातील सदस्यांचे भरण पोषण अधिनियम

या ‘हिंदू कोड बिला’ला भारतीय रामराज्य परिषद अध्यक्ष स्वामी करपात्री महाराज, शीख नेते हुकूम सिंग, श्यामाप्रसाद मुखर्जी, मदन मोहन मालवीय, सी. राजगोपालचारी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा विरोध होता. त्यामुळे हे बिल पास होऊ शकले नाही. महिलांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून मिळणारे अधिकार शास्त्र संमत आहे हे दाखवा? अशी भूमिका हिंदू संघटनांनी घेतल्यामुळे हे विधेयक संसदेत पास होऊ शकले नाही. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या उत्थानासाठी केलेल्या तत्त्वाला कुठेतरी बाधा निर्माण झाली म्हणून सत्ते ऐवजी तत्त्वाला महत्त्व देऊन आपल्या कायदेमंत्री पदाचा २५ सप्टेंबर १९५१ मध्ये राजीनामा दिला. पुढे पंडित नेहरूंनी ‘हिंदू कोड बिला’च्या धरतीवर महिलांना संपत्तीत अधिकार मिळावा म्हणून कायदे केले, त्यामध्ये

 १)हिंदू विवाह कायदा १९५५

२)हिंदू दत्तक व पोटगी कायदा१९५६

३) हिंदू वारसा कायदा १९५६

४) हिंदू अल्पसंख्यांक आणि पालकत्व कायदा १९५६ यांचा समावेश आहे

     स्त्री समर्थक बाबासाहेब १९३५ मध्ये ‘हिंदू धर्मात जन्मास आलो असलो, तरी हिंदू धर्मात मरणार नाही’ अशी येवला येथील मुक्ती भूमीवर घोषणा करतात. हिंदुधर्म सोडण्यासाठी, दलितांना, अस्पृश्यतेतून मुक्त करण्यासाठी, मुक्ती भूमीवर केलेल्या घोषणेनंतर बाबासाहेबांनी १९५६ मध्ये नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्यावेळी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचे आवाहन दलित महिलांना केले, कारण या धर्मात समता होती. स्त्रिया ह्या संस्कृती, परंपरा व अंधश्रद्धेचे वाहक असतात. धार्मिक गुलामगिरीतून महिलांना मुक्त करण्यासाठी त्यांनी महिलांना २२ प्रतिज्ञा दिल्या. बौद्ध धम्मात प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिला सविता कबीर होत्या, ज्यांनी बाबासाहेबांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ‘बुद्ध अँड हिज धम्मा’ या ग्रंथात आपल्या वाढलेल्या आयुष्याचे श्रेय बाबासाहेब सविता कबीर यांना देतात. ‘आपण दोन शरीरे असलो तरी, आपली मने मात्र एक आहेत.’ ही भावना बाबासाहेबांनी त्यांच्या प्रति व्यक्त केली होती. स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करणे, त्यांना मानवी हक्क देणे, स्त्रियांना पुरुषांप्रमाणे अधिकार देणे, याकरिता महिलांना बाबासाहेबांनी बौद्ध धम्मात येण्याचे आवाहन केले. आजपर्यंत स्त्रियांना हिंदू धर्माने गुलाम केले होते, उपासतापास यामध्ये अडकवले होते. मंदिर प्रवेश आंदोलन, सत्याग्रह करूनही दलितांना मंदिरात प्रवेश मिळत नव्हता. सामाजिक अन्याय खूप मोठा होता. समता व स्वातंत्र्य देणारा धम्म म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्मात लाखो स्त्री-पुरुषासहित प्रवेश केला.

‘बावीस प्रतिज्ञे’मध्ये चोरी न करणे , प्राणिमात्राना दया दाखवणे, दारू न पिणे, ब्राह्मणाकडून कोणताही विधी न करून घेणे, प्रज्ञा, शील, करुणा यावर विश्वास ठेवणे. श्राद्ध, पिंडदान न करणे, बुद्ध विष्णूचा अवतार न मानणे, हिंदू धर्मातील देवावर विश्वास न ठेवणे. त्यांचा अवतार न मानणे, यांचा समावेश होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून महिलांना समतेचा अधिकार दिला. स्त्री पुरुष भेदभाव प्रतिबंध, महिलांसाठी विशेष तरतूद, नोकरी व रोजगार यात पुरुषांप्रमाणे समान संधी, समान कामासाठी समान वेतन, स्त्रियांची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या प्रथांना विरोध केला हे केवळ तात्यासाहेब आणि बाबासाहेबांमुळेच झाले.

प्रा. डॉ. मनीषा यादव

प्रा. डॉ. मनीषा यादव.

श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर.

1 thought on “स्त्री समर्थक तात्यासाहेब ते बाबासाहेब”

  1. Shrikrishna Shamsundar

    छान चिंतन मांडले…. महिलाविषयक विचारधारांचा धागा उलगडला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top