संपादकीय

‘ती’च्या अस्तित्वाचा हुंकार आणि साहित्यातील स्त्री.

प्रिय रसिक वाचकहो,

सप्रेम नमस्कार.

निसर्गाच्या पालवीसोबतच चैतन्याचा नवा हुंकार घेऊन मार्च महिना अवतरला आहे. हा महिना केवळ ऋतू परिवर्तनाचा नाही, तर मानवी हक्कांच्या आणि स्त्री-शक्तीच्या जागरणाचे प्रतीक आहे. ८ मार्च, ‘जागतिक महिला दिन’! याचे औचित्य साधून ‘साहित्यामूलाग्र’चा हा अंक आम्ही संपूर्णपणे ‘ती’च्या अस्तित्वाच्या शोधाला आणि मानवी मूल्यांच्या प्रबोधनाला समर्पित करत आहोत.

खरं तर मला या ‘महिला दिना’विषयी बोलताना असं वाटतं, एकीकडे गर्भश्रीमंती, समाजात मान-सन्मान निर्माण केलेली ती ‘पैंजन’स्वरूपी बंधनातून अजूनही मुक्त झाली? स्वातंत्र्याची ७५ पार केलेले आपण अजूनही तिला आपण स्वातंत्र्य बहाल केले? तिच्या स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा, सन्मानाचा प्रश्न आजही तसाच उंबरठ्यावर उभा असलेला दिसतो. तू आकाशाला गवसनी घालून आली तरी चालेल पण आम्हाला घरातली धुनी-भांडी आणि केरकचरा झाल्याशिवाय तुला घरात स्थान नाही, असं अजूनही तिला भासवलं जाते. तिच्या मुक्तीच्या, सामर्थ्याच्या, समृद्ध जगण्याच्या आणि दाही दिशांना पसरलेल्या कीर्तीच्या गाथा आपण अनेक गायल्या पण प्रत्येकीला मान-सन्मान प्राप्त झाला? हा तिच्यासाठी अजूनही ज्वलंत प्रश्न आहे. सावित्रीने तिच्या हातात शिक्षणाची ज्योत दिली आणि तिने त्याची मशाल केली आणि त्या मशालीच्या प्रकाशात तिने अनेक वाटा निर्माण केल्या. आपलं जगणं समृद्ध केलं. आज गरज आहे, ती खरा ‘महिला दिन’ साजरा करण्याची. जिथे प्रत्येकीला स्वातंत्र्य बहाल केलेलं असेल आणि ती आपल्या मन पाखराला स्वैरपणे, मुक्त भराऱ्या घेण्याची तिला मुभा असेल. तेव्हाच हा महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला असं समजावं.

या अंकाचे वैचारिक नेतृत्व आणि कार्यकारी संपादन करताना मी साहित्यातील सूक्ष्म आणि मूलाग्र बदलांवर विशेष भर दिला आहे.

स्त्री-अस्तित्वाचा शोध आणि जाणीव

या अंकात आपण प्रामुख्याने ‘आपल्याच अस्तित्वाच्या शोधात ती’ या लेखातून स्त्रीच्या ऐतिहासिक प्रवासाचा आढावा घेतला आहे. वैदिक काळातील सन्मानापासून ते आधुनिक काळातील ‘पतंगासारख्या’ मर्यादित स्वातंत्र्यापर्यंतचे तिचे द्वंद्व मांडताना, समाजाच्या दुटप्पी मानसिकतेवर हा लेख प्रकाश टाकतो. स्त्रीला ‘देवी’ किंवा ‘गृहलक्ष्मी’ म्हणण्यापेक्षा तिला ‘माणूस’ म्हणून जगू देणे किती महत्त्वाचे आहे, याचे चिंतन या अंकात वाचायला मिळेल.

सामर्थ्याचा नवा निर्धार

अंकातील ‘तिचं सामर्थ्य’ ही कविता स्त्रीच्या ऐतिहासिक उपेक्षेवर आणि तिच्या अंगी असलेल्या अफाट जिद्दीवर भाष्य करते. सीतेचा कलंक, यशोधरेचा त्याग आणि रमाईची उपासमार यांमधून स्त्रीने सोसलेल्या दुःखाचा पाढा वाचतानाच, कवयित्रीने जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आणि सावित्रीबाईंच्या रूपाने तिच्यातील तेजही अधोरेखित केले आहे. ही कविता केवळ एक रचना नसून, ती स्त्रीने आता घेतलेल्या ‘नव्या निर्धाराची’ घोषणा आहे.

कथांतून उलगडणारे दाहक वास्तव

अंकातील तीनही कथा समाजातील उपेक्षित आणि विदारक सत्याचा आरसा आहेत:

बोप्या’: स्मशानातील राखेखाली दडलेल्या माय-लेकाच्या नात्याची ही कथा काळजाला घर पाडणारी आहे.

वांझोटी’: मुलगी ‘सोनी’ आणि कालवड ‘सोमवती’ यांच्यातील अतुट नात्याची आणि ‘वांझ’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या अगतिकतेची ही एक महान शोकांतिका आहे.

वसान’: मराठवाडी बोलीतील ही कथा ग्रामीण भागातील बेकारी, शेतीची झीज आणि पिढ्यांमधील संघर्षाचे जिवंत चित्रण करते.

वैचारिक लेख आणि समीक्षा

संत साहित्यातील समता आणि बंधुतेचा मागोवा घेणारा प्रा. कु. भारती बाजड यांचा लेख आणि कवी प्रमोद वाळके यांच्या ‘उजेडाचे नवे वळण’ या कवितासंग्रहाची डॉ. प्रकाश राठोड यांनी केलेली समीक्षा, आंबेडकरवादी मराठी साहित्यातील विद्रोहाची नवी ओळख करून देते.

साहित्यामूलाग्र’ मासिकाचा हा अंक केवळ वाचण्यासाठी नाही, तर अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी आहे. सावित्रीच्या लेकींनी आता शिक्षणासोबतच मानसिक सक्षमीकरणाकडे कशी वाटचाल करावी, याचे दिशादर्शन या अंकातून निश्चितच होईल.

स्त्रीच्या या न थांबणाऱ्या प्रवासाला आणि तिच्या अदम्य जिद्दीला आमचा सलाम!

प्रा. मोक्षदा विजय बेलखेडे

कळावे आपली,

मोक्षदा विजय बेलखेडे

(कार्यकारी संपादक)

‘साहित्यामूलाग्र’ मासिक.

1 thought on “संपादकीय”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top