जमलं तर थोडं जपून पहा,
तिलाही मन आहे, हे समजून घ्या.
मोठी मोठी बिरुद लावून सन्मान देण्याची गरज नाही.
वास्तविक रूपाला तिच्या वंदन करून पहा,
फक्त इतकंच ठरवून पहा.
देवी म्हटलं की पुजली जाते,
वेश्या म्हटलं की नागवली जाते,
सोयीने तुमच्याच तिची ओळख करू नका.
तिच्या मनाप्रमाणे तिला जगू द्या.
पांडवांच्या ‘पांच्याली’च्या अब्रूचे झाले हाल,
रामाच्या ‘सिते’ला कलंक लावले फार.
‘अहिल्ये’च्या ‘शिडे’लाही रामाचाच का स्पर्श लागतो,
द्रौपदीचे वस्त्रहरण करून दुर्योधन दोषी होत नाही.
सीतेला घेऊन जाणारा रावण अपराधी ठरत नाही.
किती नाचवल्या इंद्राने अप्सरा तरी इंद्राच काही जात नाही.
मग
न केलेला गुन्ह्याचे आम्हीच का सोसायचे भार.
कुठे आहे आमच्या जगण्याचा आधार
इथे तर
सिद्धार्थाच्या ‘यशोधरे’चा त्याग मोठा भारी,
भीमाच्या ‘रमा’ला संसारी, उपासमारी सारी,
गांधींची ‘कस्तुरबा’ प्रेमाविना गेली,
‘प्रियदर्शनी’च्या वाट्याला तर अवहेलनाच आली,
तरी आम्ही ठरलो महान, कैद केलं जरी,
महान शिवबा, जिजाऊच्या उदरी.
रजियाची सत्ता होती भारी.
‘राणी लक्ष्मी’ची, शौर्यगाथाच न्यारी.
‘सावित्रीबाई’ सर्व समाजा उद्धारी.
‘कल्पना’च्या कल्पनेची, न्यारीच भरारी.
महिमा तिचा गाताना, श्वास तुमचा पुरत नाही,
रुपं तिची अनेक……, पण बंधन मात्र सरत नाहीत,
पण तरीही तिच्या जगण्याचा, वनवास मात्र सरत नाही.
केलाय आता तिने या सगळ्याचा स्वीकार,
अन् एक नवा निर्धार…..
म्हणून आता ती मागे हटणार नाही अन् जिंकल्याशिवाय राहणार नाही.
– मोक्षदा विजय बेलखेडे
महिला विशेष कविता सुरेख संगम अक्षर पात्रांचा… नायक मोठेपण नायिका अंधारात राहील्या…
धन्यवाद, सर 🙏