स्त्री ! चैतन्याचा हुंकार.

जिथे नतमस्तक होते सृष्टी, तिथे उभी एक मूर्ती,

जिच्या अंगाखांद्यावर खेळते, अवघ्या विश्वाची कीर्ती.

नावापुढे लावायला नको तिला कोणतेही बिरुद भारी,

कारण ‘महिला’ म्हणजे या भूमीची सुवर्ण-अधिकारी!

महिला म्हणजे ती सावित्री, जिने काळोखाशी झुंज दिली,

शेण-गोट्यांचा मार सोसून, ज्ञानाची ज्योत तिने पेटवली.

स्त्री-शिक्षणाचे पहिले पान, जिने रक्ताने लिहिले,

समाजाच्या रुढी-परंपरांचे पाश जिने तोडून दिले.

महिला म्हणजे ती जिजाऊ, जिच्या कुशीत शिवबा घडले,

जिच्या संस्कारांच्या बळावर, हे स्वराज्य पुन्हा सजले.

हातात पाळणा आणि नजरेत हिंदवी स्वप्न होते,

गुलामगिरीच्या छाताडावर, जिने भगवे निशाण रोवले होते.

कधी पदराखाली वात्सल्य, तर कधी हातात तलवारीची धार,

महिला म्हणजे या जगाचा, सर्वात मोठा आधार.

सिद्धार्थाच्या प्रवासासाठी, तीच झाली यशोधरा,

आपल्या कष्टाने संसाराला, जिने दिला प्रेमाचा आसरा.

भीमरावांच्या संघर्षात, तीच झाली रमाई,

दीन-दलितांच्या आयुष्यात, मायेची पाखर घालणारी आई.

पतिव्रतेच्या धर्मासाठी, सीता होऊनी रानावनात गेली,

अन्यायाचे काटे सोसून, रामाच्या चरणी ती लीन झाली.

त्यागाच्या या यज्ञकुंडात, जळणे तिचे भाग झाले,

धृतराष्ट्राच्या अंधत्वासाठी, गांधारीने जन्मभर अंधत्व सोसले.

स्वतःच्या डोळ्यांवर बांधूनी पट्टी, जिने दुःख अंतरीच गिळले,

तरीही संसाराचे गाडे, तिने कधी न ढळू दिले.

सावित्रीच्या धैर्याने ती, नवनवे ग्रंथ लिहीत आहे,

जिजाऊंच्या तेजाने ती, अन्यायाला भिडत आहे.

रमाईच्या त्यागातूनी ती, माणुसकी शिकवित आहे,

यशोधरेच्या शांततेतून, संयम ती राखत आहे.

ना अगतिक ती, ना अबला ती, ती तर विश्वाची निर्माती,

तिच्याच पदस्पर्शाने आज, पावन होते ही माती.

महिला म्हणजे चैतन्य, महिला म्हणजे भक्ती,

या साऱ्या थोर स्त्रियांची, तीच तर आहे खरी शक्ती!

मुख्य - संपादक : विजय बेलखेडे

 

– विजय बेलखेडे 

संपादक ‘साहित्यामूलाग्र’ 

2 thoughts on “स्त्री ! चैतन्याचा हुंकार.”

  1. Shrikrishna Shamsundar

    प्राचीन अर्वाचीन स्रिपात्रांचा मिलाप…. अर्थपूर्ण काव्य..

  2. Manisha Yadav

    स्त्रिया म्हणजे चैतन्य हे वाक्य खूप आवडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top