नेल्सन मंडेला हे वर्णनभेदाच्या विरोधातील एक बंड होते

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले लेखक डॉ. सदानंद बोरसे यांचे मंडेला हे चरित्र अलीकडे वाचले.आवडले. दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांच्या वर्णवर्चस्वभेदविरोधात लढणाऱ्या नेल्सन मंडेलाच्या एकूणच कार्यावर लेखकांनी जो प्रकाश टाकला तो लक्षणीय आहे. आज नेल्सन मंडेलाचा लढा हा एका विशिष्ट वर्णापुरता राहिला नाही तर जगभरातील शोषितांचा तो प्रातिनिधिक स्वरूपातील मानवतावादी लढा झाला आहे. जो एक कृष्णवर्णीय व्यक्ती स्वतःच्या हितापलीकडे जाऊन आपल्या कृष्णवर्णीय काळ्या लोकांच्या हक्कासाठी अविरत झटतो. आंदोलनाच्या केंद्रस्थानी ते स्वतः असल्याने दक्षिण आफ्रिकेतील दडपशाहीच्या कायद्याखाली दोन तपापेक्षाही म्हणजे सत्तावीस वर्षे तुरुंगवास भोगतो.तेथूनही आपल्या वर्गाचा लढा जिवंत राहिला पाहिजे यास्तव गुप्तपणे कार्यरत राहतो.याचाच अर्थ मंडेलाच्या मनात आपल्या बांधवांविषयी किती अपार करूणा असेल? आपल्या काळ्या लोकांच्या न्यायासाठी कौटुंबिक नातेसंबंध त्यांच्या कधीच आड आले नाहीत.रॉबन बेटावर जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तिथल्या नियमानुसार पत्नी विनीशी त्यांना सहा महिन्यातून एकदाच भेट घेता येत होती अन तीही अर्ध्या तासापुरतीच तुरुंगाच्या झरोक्यातूनच.इथे मला लेखकांनी मंडेलाच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा जो वेध घेतला आहे. तो मला अधिक प्रभावीत करतो. आज भारतातील भारतरत्न पुरस्कारांपासून तर नोबेल पुरस्कारापर्यंतचे जवळपास जागतिक स्तरावरचे एकूण २५० पुरस्कार मंडेलाच्या नावावर आहेत.

 

दक्षिण आफ्रिकेतील अपार्ट-हेट धोरण आणि नेल्सन मंडेला:-

 

१९४८ रोजी गोऱ्यांचे वर्चस्व व वर्णभेद यांना कायदेशीर मान्यता देणारे धोरण दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने जाहीर केले. त्यावेळी 

 ‘आफ्रिकानर नॅशनल पार्टी’ हा पक्ष सत्तेवर होता त्यांनी अपार्ट-हेट म्हणजे स्वतःस हवी तशी अन्यायी घटना तयार केली. या धोरणांनी कृष्णवर्णीय काळ्या लोकांच्या एकूण जगण्यावर, वागण्यावर अमर्यादित निर्बंध आले. नेल्सन मंडेलाच्या मते अपार्ट-हेट धोरण म्हणजे ‘पिसाट धोरण’ आहे. जर्मनीचे हिटलरचे ज्यूविरोधी धोरण आणि दक्षिण आफ्रिकेतील अपार्ट-हेट धोरणांची जातकुळी एकच आहे. ‘लोडस्टार’ या युथलिगच्या नियतकालिकेत मंडेला यांनी या नव्या धोरणावर लिहिले- “आपण सरकारचे मन वळवून समजूतीन, गोडीगुलाबीने आपले हक्क हळूहळू मिळवू शकू अशा भ्रमात ANC चे याआधीचे पुढारी होते आम्ही मात्र परिस्थितीच्या रेट्याने सरकारला नमवून आमचे हक्क मिळवू”

 

प्रस्थापित दक्षिण आफ्रिकी सरकारचे दडपशाहीचे कायदे नेस्तनाबूत करायचे असतील तर चळवळीत सगळ्या वंशांच्या लोकांचा सहभाग असणे त्यासाठी त्यांना आवाहन करणे आवश्यक आहे. असे सिसुलूचे मत होते तर मंडेलांना मात्र भीती वाटत होती की अशा सहभागाने कृष्णवर्णीयाव्यतिरिक्त इतरांचे चळवळीवर वर्चस्व राहील. कालांतराने मात्र मंडेलांना सीसुलुचे मत पटले. त्यातून मग कायदेभंग चळवळ व्यापक स्तरावर सुरू करण्याचे ठरवले मंडेला आपल्या कायदेभंग चळवळीची दिशा ठरवत असताना तिला गाळबोट लागू नये म्हणून आपल्या कार्यकर्त्यांसमोर आपली भावना व्यक्त करताना म्हणतात- “सरकार, सरकारी यंत्रणा, पोलीस धाकदपटशा दाखवतील, तुम्हांला घाबरवण्याचा प्रयत्न करतील विशेषतः सत्याग्रहांच्या पहिल्या तुकड्यांना तर अग्नी दिव्यातून सामोरा जायचंय पण लक्षात ठेवा काय वाटेल ते झालं तरी तुम्ही प्रतिकार करता कामा नये. सर्वांचं वागणं शिस्तबद्ध हवं गोंधळ अजिबात नको आपला प्रत्येक सत्याग्रही ताठ, सावध आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा असायला हवा”

 

२६ जून १९५२पोर्ट एलिझाबेथ शहरांच्या न्यू ब्रायटन उपनगरातून कायदेभंग चळवळीला प्रारंभ झाला. ट्रान्सवालमध्ये सिसुलू व नाना सीता या भारतीय वंशाचा नेता आणि ५२ सत्याग्रहीना अटक करण्यात आली.जोहान्सबर्ग येथे मंडेलानी सभा घेतली रात्री अकरानंतर ही सभा सुरू होती पास कायद्याने मंडेला आणि इतरांना अटक झाली मंडेलांची ही पहिली अटक अन पहिला तुरुंगवास होता. तिथून मग सत्याग्रहाची चळवळ देशभर ओणव्यासारखी पसरली. कामगार, डॉक्टर, वकील, कारकून, शिक्षक, विद्यार्थी, चर्चेचे पादऱी हे सर्वच लोक सत्याग्रह करून स्वतः अटक करून घेत होते. चार महिन्यानंतर म्हणजे १८ ऑक्टो.१९५२ला दुसरे आंदोलन सुरू झाले. ए. एन. सी. ने ठराविक सत्याग्रहीऐवजी आम जनतेला या सत्याग्रहामध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले मंडेलाचा ठाम विश्वास होता -“जर सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर सरकारला त्या दबावापुढे नमावेच लागेल आपण सुरू केलेल्या आंदोलनाला फक्त एकाच गोष्टी पासून धोका आहे ती म्हणजे हिंसक घटना” मंडेलाची ही भीती प्रत्यक्षात उतरली १८ ऑक्टोबरला या सत्याग्रहाला हिंसक वळण लाभलं.ANC ने न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली सरकार मात्र अधिकाधिक कठोर कारवाई करण्याच्या पावित्र्यात होते युनोने दक्षिण आफ्रिकी सरकारच्या अपार्टहेट धोरणाची चौकशी करण्यासाठी एका आयोगाची नेमणूक केली आंतरराष्ट्रीय पातळीवर दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद विरोधात उचललेले हे पहिले अधिकृत पाऊल होते. दक्षिण आफ्रिकेतही वातावरण बदलत होते. कित्येक गोऱ्या व्यक्तीनी ‘सर्व नागरिकांना समान अधिकार’ याला पाठिंबा दिला. काही गोऱ्या लोकांनी कृष्णवर्णीयांच्या बरोबरीने सत्याग्रहात भाग घेऊन स्वतःस अटक करून घेतली. नोव्हेंबर अखेरीस मंडेला, मोरोक्को,सिसुलू व अन्य नेत्यावरील खटले चालवण्यात आले. न्यायमूर्ती रंफ यांनी आपल्या निकाल पत्रास म्हटले- ‘या व्यक्तीनी आपल्या आंदोलनात स्वतःतर शांततापूर्ण कृती केलीच पण इतरांनाही सर्व प्रकारचे हिंसाचारापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या’ पुढे डिसेंबर १९५२ मध्ये चिफ अल्बर्ट लुटुली हे ANC चे अध्यक्ष तर मंडला हे उपाध्यक्ष झाले तेव्हा लुटुली यांनी पोर्ट एलिझाबेथ येथे सभा घेतली. सरकारने कम्युनिझमविरुद्धी कायद्याखाली मंडेलासकट अन्य शंभर नेत्यांनाही स्थानबद्ध करण्यात आले. मंडेलाला स्थानबद्ध केल्याने त्यांचा आवाज जाहीर रित्या लोकापर्यंत पोहोचू शकत नव्हता पण गुप्तपणे त्यांचे काम सुरूच होते.

ट्रान्सवालच्या कॉ सोसायटीने मंडेलाविरुद्ध सुप्रीम कोर्टात अर्ज केला त्यांचे म्हणणे होते की नेल्सन मंडेला यांनी कायदेभंग चळवळीत भाग घेतला चळवळीचे नेतृत्व केले त्याबद्दल त्यांना शिक्षा फर्माविण्यात आली वकिलासारख्या सामान्य व्यवसायिकाला अशा उपद्रव्यामध्ये भाग घेणे अजिबात सोबत नाही तरी त्यांची वकिलीची सनद रद्द करण्यात यावी सुप्रीम कोर्टाने मात्र हा अर्ज फेटाळून लावला १९५३ मध्ये मंडेलावर स्थानबद्धतेचे आदेश उठले.

 

अपार्टहेटच्या धोरणाचा पहिला सामुदायिक बळी ठरला सोफियाटाऊन नावाच्या वस्तीतून ५८ हजार कृष्णवर्णीय लोकांचे सक्तीने सरकारने स्थलांतर करण्याची योजना आखली होती. कृष्णवर्णीयांच्या या सक्तीच्या स्थलांतरविरोधात फादर टव्हर, हडलसन, मंडेला आणि सिसुलू यांच्या नेतृत्वात सभा घेतली स्टेनगन व रायफलधारी पोलिसांनी सभेला वेढा घातला लोक आक्रोश करत होते नेतृत्वाने त्यांना शांत केले पोलिसांने ही वस्ती उठवण्याचे काम सुरू केले होते तर दुसरीकडे कृष्णवर्णीयांच्या गीताचे करूण स्वर ऐकू येत होते.

 

सप्टेंबर १९५३ मध्ये मंडेलावर बंदीहुकूम जारी करण्यात आले. जोहान्सबर्ग इथून बाहेर पडायचे नाही सभेला संमेलनाला उपस्थित राहायचे नाही. ए.एन.सी. आणि तिच्याशी संबंधित सर्व समित्यांशी संबंध तोडण्यात आला तरीही मंडेलांनी ट्रान्सवालच्या वार्षिक अधिवेशनात आपले अध्यक्षीय भाषण गुप्तपणे पोहोचवलेच,

सगळ्या बंदी हुकूमाच्या जाचातून मंडेला आपली मते लेखाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवत होते लिबरेशन (मुक्ती) या डाव्या पक्षांच्या नियतकालिकातून ते लेख येत, शिवाय फायटिंग टॉक (लढाऊ बोल) या मासिकाच्या संपादक मंडळावर मंडेला होते.ते लिहित- “आपण घराघरातून रस्त्यारस्त्यातून व्यक्ती संपर्क साधू तळापासून सुरुवात करू फॅक्टरीत, ऑफिसात, घरात जाणे-येण्याच्या वाटेवर, बसमध्ये , रेल्वेमध्ये भेटू नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्याकडे जाणारा रस्ता काट्याकुट्यांचा खाचखळग्यांचा अन संकटांचा असतो. गुलामगिरीचे बंधने झुगारून देणे देशातील बहुसंख्य कृष्णवर्णीयांची दुर्दम्य मनीषा आहे.”

 

दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद आणि मंडेलांच्या शिक्षेला धरून इतरत्र पडसाद:-

 

दक्षिण आफ्रिकेतील दडपशाहीच्या कायद्यामुळे कृष्ण वर्णीयांची होणारी पावलोपावली गळचेपी आणि दोन तपापेक्षाही नेल्सन मंडेलासारख्या एका निष्णात वकिलांना भोगावा लागणारा तुरुंगवास हा खरे तर अन्यायकारक आहे म्हणून –

१)युनोत रशिया आणि इतर कम्युनिस्ट राष्ट्रे, भारत आणि इतर अनेक राष्ट्रांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद विरोधी लढ्याला नि:संदिग्ध पाठिंबा दिला 

२)युरोपियन संसद सदस्य व ब्रिटनमधील एक नेता लॉर्ड बेथेलने युरोपियन संसदेत मंडेलांना मुक्त करण्याबद्दल प्रचार मोहिम उघडली. युरोपातील निरनिराळ्या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांना त्यांनी विनंती केली की दक्षिण आफ्रिका सरकारवर मंडेलाच्या सुटकेसाठी दबाव आणावा 

 

३)दक्षिण आफ्रिकेच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे उद्योगपतीही चिंताग्रस्त झाले होते. ताबडतोब काळ्या नेत्याशी चर्चा करा असे त्यांचे म्हणणे होते पण राष्ट्राध्यक्ष बोथाने याकडे दुर्लक्ष केले तेंव्हा त्या उद्योगपतीचे एक शिष्टमंडळ झांबियात ऑलिव्हर टँबो व ए.एन.सी.च्या नेत्यांना भेटून आले. दक्षिण आफ्रिकेतील एक विरोधी पक्ष प्रोग्रेसिव्ह फेडरल पार्टी यांचे शिष्टमंडळ प्रदेशातील ए.एन.सी.च्या नेत्यांना भेटले ४)आजपर्यंत अमेरिका ए.एन.सी. याची संभावना दहशतवादाचा व कम्युनिस्टांचा एक गट म्हणून करत होते ते आता काळ्यांना ताबडतोब राजकीय अधिकार मिळायला हवेत असे राष्ट्राध्यक्ष बोथाना आवाहन करत होते

 

१९८९ मध्ये राष्ट्राध्यक्ष बोथाना पक्षघाताचा झटका आला आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षपद क्लार्क यांच्याकडे आले. त्यांनी सर्वञ वाढता दबाव लक्षात घेता २फेब्रुवारी १९९० मध्ये संसदेत घोषणा केली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस(ए.एन.सी) पँन आफ्रिका निस्ट काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष या तीन पक्षावरील बंदी उठवून त्यांना राजकीय पक्ष म्हणून मान्यता देत असल्याचे स्पष्ट केले. १ फेब्रुवारी १९९० रोजी सरकारतर्फे मंडेलाच्या विनाशर्त मुक्ततेची घोषणा केली आणि ११ फेब्रुवारी १९९० रोजी मंडेलाना मुक्त केले गेले. २७ एप्रिल १९९४ रोजी दक्षिण आफ्रिकेत पहिले सार्वत्रिक मतदान होणार होते. नेल्सन मंडेलाचा पक्ष ए.एन.सी. निवडणुकीत हिरारीने उतरला त्यात नेल्सन मंडेलाच्या पक्षाला ६२% मते मिळाली नऊ प्रांतापैकी सात प्रांतामध्ये ए.एन.सी.ची तर एका प्रांतात नॅशनल पक्ष आणि एका प्रांतात इंकाथाला विजय मिळाला होता स्पष्ट बहुमत असल्याने नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले त्यामुळे अपार्टहेटच्या वर्णवर्चस्ववादी राजवटीपासून बहुपक्षीय बहुवंशीय बहुसांस्कृतिक लोकशाहीची स्थापना हा खूप मोठा बदल दक्षिण आफ्रिकेत घडून आला आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात वागणाऱ्या, शञुत्वाने राहणाऱ्या गोऱ्या आणि काळ्या जनतेच्या मनात एकमेकाबद्दल विश्वास निर्माण करणे आणि साऱ्यांना बरोबर घेऊन एका समर्थ राष्ट्राची उभारणी करणे हे मंडेला आणि त्यांच्या सहका-यासमोरचे फार मोठे आव्हान होते परंतु मंडेलाने ते तितक्याच समर्थपणे पेलले दक्षिण आफ्रिका हे मंडेलासाठी ‘इंद्रधनुष्य राष्ट्र’ होते या इंद्रधनुष्यातील गोऱ्या रंगाचेही संरक्षण करणे त्यांना राष्ट्र उभारणीच्या कामात सामील करून घेणे मंडेलाना गरजेचे वाटत होते मंडेलांनी आपल्या राष्ट्रीय सरकारात डी. क्लर्कना उपाध्यक्षाचे स्थान दिले. कृषी, ऊर्जा, पर्यावरण, खनिज असे महत्त्वाचे खाते त्यांनी नॅशनल पक्षाच्या मंत्र्याकडे सोपवली इंकाथाच्या बुथेलेझींकडे तर त्यांनी गृहखातेच सोपवून टाकले. धैर्यवान व्यक्ती शांतता प्रस्थापित करण्यासाठी क्षमाशील होण्यास कचरत नाहीत हे होते मंडेलाचे आपल्या धोरणाबद्दलचे उद्गार

 

प्रा.दिलीप वानखडे

– दिलीप वानखेडे 

1 thought on “नेल्सन मंडेला हे वर्णनभेदाच्या विरोधातील एक बंड होते”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top