सल

तुम्ही काय बी म्हणा चिमणीच्या पिलाला पखं फुटले का ते मायले सोळून भूर्रSS….उडून जातेत, तसेच माणसाची बी गत आहे, पोरं मोठे झाले का मायबापाले वाऱ्यावर सोडून दूर निंगून जातेत.

               असंच गिरजाच्या बाबतीत घळ्ळं. खरं पाह्यलं त गिरजावर असा पर्संग या लागत नोता कारण तिनं जे लेकरांसाठी केलं ते तिच्या नवऱ्यानं बी केलं नोतं. बरं तिचा नवरा करंल तरी कसा, त्याचा तरी बिचाऱ्याचा काय दोस होता; पोर लहान लहान अस्तानीच मरण पावला. भरजवानीत नवरा मरून गेला याचं गिरजाले दु:ख झालं होतं.

               तसं किसनाचं कुटुंब कायी मोठं नव्हतं ‘हम दो, हमारे दो’ मोठा पोरगा पर्कास अन् लायना सुरज. ‘लहान कुटुंब, सुखी कुटुंब’ पण किसनाच्या आणि गिरजाच्या नशिबी सुक होतंच कुठी, तरीबी त्या दोघं नवरा-बायकोच्या मनात आशा होती का पोरं मोठी झाल्यावर तरी सुक मिळंल पण या एकाच आसेन बिच्चारे रात-दिवस लोकायच्या वावरात राबायचे अन् राबता राबता किसना एक दिवस बायको पोरं सोळून निंगून गेला. त्याले असं एकाएकी मरण आल्यानं गावात चर्चाले ऊत आला होता.

               अजूनबी मारुतीच्या पारावर तीन-च्यार माणसं बसून चर्चा करत होते, तसा नाम्या साधू म्हंला,

“मले त वाटते किसनाले मूठ मारली?”

“ हॅट होSS! मले त वाटते त्याले पान लागलं.” श्याम्या डोस्क्यावरून हात फिरवत म्हंला.

“हे सारं चुकीचं हाये भौ, माह्यात अंदाज हाये त्यायले कोणीतरी करणी केली.”

“नामा, त्याले कोण करणी करणार आहे.” सिद्धू आबा थुका गिळत म्हंला.

“मंग असा एकाएकी किस्ना गेला तरी कसा काय?” एक म्हंला.

“आता तुमाले एक सांगू का दोस्तहो…”

“सांगाS सांगाSS गणपती आबा.” साऱ्याच्या तोंडून एकच शब्द निंघला.

“माह्य काय मत हाये….

गणपती आबा समोर सांगणार होता तसा तुक्या म्हंला,

“काय मत हाये, आबा तुमचं? आमाले तरी समजू द्या.”

“माह्य त मत हाये, त्याले अट्याक आला.”

“हॅट हो, हे गलत हाये, त्याले पानच लागलं.”

                 असी गावात चर्चा सुरू होती, पण तसं कायीच नोतं. गिरजाचा नवरा जाण्याचं खरं कारण गिरजाले माहीत होतं, तसं किसनाच एक दिवस बायकोले बोल्ला होता,

“गिरजे.”

“काय.” गिरजा सपाट स्वरात म्हंली.

“तुले एक सांगायचं राहून गेलं.”

“काय सांगायचं हाये ते पटकन सांगा, माह्या उरावर लय काम धंदा हाये.”

“माह्या एक वाल कामातून जायल हाये.” किसनानं बायकोले एका दमत सांगून टाकलं.

              हे आयकून गिरजाच्या उरात धस झालं. कारण तिच्या माहेरचा शामराव बन्सोळ याच बिमारीन मेला होता. याचीच तिनं थास्ती धरली होती. आता नवऱ्याचं काय होईल या एकाच इच्यारात असताना किसना म्हंला “पण तू कायी कायजी करू नोको.”

“म्हंजे!”

“मले, डॉक्टरनं सांगलं का एका वालावर बी माणूस पुरी जिंदगानी जगू शकते.”

हे आयकून गिरजाचं मन समाधान झालं, पण तितक्यापुरतंच.

          अन् आज नवरा मरून गेला तसा गिरजावर दुःखाचा डोंगर कोसळला. गिरजा मनानं खचून गेली. तिच्या मनात विचार आला का पोरायले वाऱ्यावर सोळून नवऱ्यासोबत निंगून जावावं पण लगेच तिच्या मनात पुन्हा विचार आला का आपल्याशिवाय आता लेक्रायले कोण हाये. आपण गेल्यावर लेकरं दोन्ही पखानं अपंग होतील. मायS मायSS करून लळतील. या कारणानं गिरजानं मनात ठरवलं आपून जगायले पाह्यज्ये.

                दिसा मागून दिस जात होते. गिरजा आता थोळीबहुत दुखातून सावरली होती. लेक्र बी बाले इसरून गेले होते, पण गरिबी मात्र गिरजाच्या नशिबात चरबीसारखी चिकटून होती, पण गिरजाले पक्क मायीत होतं का गरिबी जर का दूर करायची असंल त शिक्सेनच मत्त्वाचं हाये. म्हणून त तिनं दोन्ही लेक्रं शाळेत घातले होते.

                गिरजा रोज दिवसभर कस्ट उपसत होती. सुट्टीच्या दिवशी लेक्रालेबी कामाले नेत होती. लेक्र दमून झोपायचे त्या वक्ती गिरजा माय लेक्राच्या पाटी पोटावून हात फिरवायची, त्या वक्ती गिरजाच्या डोयात टचकन पाणी यायचं, तशी गिरजा पटकन शेवाच्या पदरानं वले झालेले डोये पुसायची. अन् त्याच डोयानं उद्याचं सपन बघायची. तिच्या डोयात एकच सपन घर करून होतं का लेक्र शिकून मोठे साहेब होतील अन् हेच सपन पाह्यता पाह्यता तिचा डोयाले डोया लागायचा.

              अन् आज गिरजानं पाह्यलेलं सपन पुरं झालं होतं. तिले तिच्या ढोरमेहनतीचं फळ मिळालं होतं. तिचे दोनीबी पोरं नोकरकीवर लागले होते, त्या कारणानं गिरजाचा समाजात नियी त अख्या गावात मान होता, पण गिरजा मनात दुखी होती, कारण दोन्ही पोरं दूर शयरात राहायला गेले होते.

              शिक्सेनानं माय लेक्राची ताटातूट केली होती पण गिरजा खुस होती, आता तिले म्हातारपणाची चिंता वाटत नोती तरीपण गिरजा कामधंदा करायची.

                कष्टाचा डोह उपसता उपसता गिरजाना वयाची सत्तरी गाठली होती. त्या कारणाने आता तिले पैशापेक्षा आधाराची गरज वाटत होती, पण तिला आधार देईल कोण? तिचे दोनी बी पोरं शहरात मोठं मोठे इमले बांधून बायको पोरात खुस होते. बायकोच्या प्रेमापेक्षा मायची माया त्यायले कमी वाटत होती. म्हणून का काय मायची एक खाट बसावी इतकी पण जागा त्यायच्या इमल्यात शिल्लक नव्हती. ज्या मायनं जिवाचं रान करून हाळाच्या काळ्या केल्या. इतकच नाही त दोन लेकरावर तीनं रांडपण घातलं, याचा पोरायले इसर पळ्ळा होता. खरं सांगायचं म्हंजे पोरं मायले बेईमान झाले होते.

              पह्यले पह्यले पोरं मायले पैसे पाठवत. “आई, काम करू नको.” असं सांगायचे, पण या आठ धा वर्सात पैसे पाठवनं त सोळाच पण माय कशी हाये याची चौकशीबी केली नायी. बायका नवऱ्याले माकळासारख्या नाचवत होत्या अन् माकळं नाचत होते. लेक्राचं असं वागणं पाहून उशिरा का होईना गिरजाच्या हे लक्षात आलं होतं, पण गिरजा माय होती. तिच्याजवळ मायचं काळीज होतं, ती कशी काय लेक्राले शिव्या-सराप देणार होती. पण तिले कवा कवा वाटायचं, ‘आपलं नशीबच खोटं, आपूनच बदनशीबी, म्हणून त देवानं आपल्या पदरात खोटे शिक्ये टाकले.’

             असं समजून गिरजा निराधारासारखं जीवन जगत होती. दुख भोगत होती. दुख्खालेबी काहीतरी मर्यादा असते पण गिरजाच्या दुखाले मर्यादा नोती. तिले अंदरच्या दुख्खानं अन् बाहेरच्या दुख्खानं बेजार, बेहाल करून टाकलं होतं.

               या आठ पंधरा दिवसात गिरजा मनानं अन् तनानं खचली होती, तिच्या अंगात कवळी इतकं बी अवसान नोतं. त्या कारणानं गिरजानं खाट धरली होती. त्यात तिची खाण्यापिण्याची अपसोय. तसे शेजारी तिले घास कुटका आणून द्यायचे पण आता शेजाऱ्यानं पाठ फिरवली होती ‘रोच्चं मळं, त्याले कोनं लळं.’ अशी गिरजाची गत झाली होती. पोटाले पोटभर अन मिळत नसल्यानं ती जास्तीच हीन झाली. शिन झाली.

             आज सकाळपसूनच गिरजाले मरण यातना सुरू झाल्या होत्या. आपोआपच वाच्या बंद झाली होती. हात-पाय लकवा झाल्यासारके जागच्या जागी पळून होते सुसाटा भरून येत होता. घस्याले घर्रSSS घर लागली होती. डोये मातर अजून कोणाची तरी वाट पाह्यत होते. कोण येणार होतं? शेजारी का तिचे पोरं. पोरायले बिमारीचा निरोप देऊन आठ दिवस झाले होते, तरी आतापावतोर एक बी पोरगा आला नोता.

           तिले पोराच्या हातून घोटभर पाणी पियाचं होत. घोटभर पाण्यासाठी जीव तरसून गेला होता. तहानलेल्या तिच्या होटातून पाणी.. पाणी.. शब्द निघत होता पण समोर कोणी दिसत नोतं. तवा मनात एक इच्यार आला. “आपल्याले एखादी पोरगी अस्ती त धावत पयत आली असती, घासभर कुटका चारत होती, घोटभर पाणी पाजत होती.

        हे इच्यार येताच तिले तिच्या नवऱ्याचा राग आला. त्यानं तिले पोरीचा गर्भ पाळाले लावला होता. तीनं मनावर मनभर वजनाचा दगड ठेवून, हे केले होतं. बोवाच्या मोहरे तीचं काही चालत नायी. हे चूक तिले सतावत होती, दुखी करत होती.

मरणयातन भोगता भोगता तीच्या मनात दुसराच इच्यार आला. अन मनातल्या मनात बोलू लागली,

“देवा!’ तुले माही हात जोडून बीनती हाय, परत्येक मायच्या पोटी एक तरी पोरगी जन्माले घाल, त्या मावलीचे मायासारखे हाल होणार नाही. अन् त्या मावलीले खोट्या शिक्क्याचीबी गरज वाटणार नायी. देवा तुले खर सांगू मले पोरं असून मी वांझ हाये. ‘मायी कुस वांझ हाय’ आता माया ध्यानात आलं ‘पोरा पेक्शा पोरगी बरी अन् पर्कास देते दोनी घरी’ खरच पोरीची माया येगळी असते.”

            असा इच्यार तिच्या मनात येताच थिजलेल्या डोयात टचकन पाणी आलं. ते गालावरून सरकत होठावर आलं, तरी तीन जीभ फिरवली खारतुरट पाण्यानं सुकलेले होठ ओले केले. अन् तहान भागवली. पण पोरीच्या आठवणीनं तीचा हुबंळ्ळा दाटून आला. तो तिनं वुरातून तसाच पोटात गिळ्ळला. गिरजाच्या छातीत दाटून आलं तिले दडपण झेपावलं नायी. म्हणूनशान तिले झटके येवू लागले. दोन तीन झटक्यात गिरजाचा जीव निगून गेला.

           पण पोरीची ‘सल’ मातरं पक्की तिच्या कायजात रुतून बसली होती, कारण माय लेकीचं नातं असतंच तसं.

( टीप – ह्या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत )

 

संपादकीय मंडळ सदस्य - सुभाष पुंडलिक डहाणे

सुभाष पुंडलिक डहाणे 

भ्रमणध्वनी – ८४११८१५७४५

माळशेलू ( वाशीम)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top