‘साहित्यामूलाग्र’ – पहिला अंक
प्रिय वाचकबंधू-भगिनींनो,
खूप आनंदाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने ‘साहित्यामूलाग्र’चा पहिला अंक आपल्या हाती देत आहोत. ‘मूलाग्र’ म्हणजे मुळाशी जाऊन विचार करणे—साहित्याच्या आशयाचा, समाजाच्या प्रवाहाचा आणि भाषेच्या अस्मितेचा शोध घेणे. या ध्येयाने प्रेरित होऊन हा पहिला प्रवास सुरू करीत आहोत.
या अंकात कथा, कविता आणि शोधनिबंध यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्य हे केवळ मनोरंजन नसून ते चिंतन, परिवर्तन आणि प्रबोधनाचे साधन आहे, या विश्वासातून काही अभ्यासपूर्ण शोधनिबंध समाविष्ट केले आहेत. त्याचबरोबर कथांमधून मानवी जीवनाचे विविध रंग उलगडण्याचा प्रयत्न आहे; तर कवितांमधून भावविश्वाला स्पर्श करणारी अभिव्यक्ती साकारली आहे.
विशेषतः, या अंकात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्य-विचारांवरील लेख समाविष्ट केला आहे. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांसाठी त्यांनी उभा केलेला लढा आजही मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांची आजच्या काळात नव्याने चिकित्सा होणे आवश्यक आहे. समाजमनातील अंधार दूर करण्यासाठी ज्ञानदीप प्रज्वलित करण्याचे त्यांचे कार्य आणि साहित्य हे दिशा देणारे ठरते.
या अंकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वऱ्हाडी बोलीतील कथा आणि कविता. बोलीभाषा ही संस्कृतीची जिवंत साक्ष असते. वऱ्हाडीच्या ओघवत्या, सहज आणि विनोदी शैलीतून ग्रामीण जीवनाचे वास्तव अनुभवता येते. प्रमाणभाषेसोबत बोलीभाषेचे जतन करणे हेही साहित्यिक कर्तव्य आहे, असे आम्हाला वाटते.
याच महिन्यात आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही; ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे. जागतिकीकरणाच्या युगात भाषेचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘साहित्यामूलाग्र’चा हा पहिला अंक मराठी भाषेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक छोटासा प्रयत्न आहे. त्याविषयी मला एक कविता सुचली आहे,
मराठीची कात
मराठीनं आज माया, टाकली रे कात
हिंग्लिश, मिग्लिशचा धरूनीया हात.
चक्रधर स्वामी धरी मऱ्हाटीचा आगरव,
माऊलींनी सकळांना दिला मराठीतूनी आरव.
एकनाथी भारूड, ‘तुकयाची गाथा’
शब्द झाले फितुर जेव्हा, विसरल्या रीता-भाता.
लिहुनिया ‘राज्यव्यवहारकोश’ शिवबांनी दिली दिशा,
राजे आता तुम्ही बघा, मराठीची काय झाली दशा!
परक्या शब्दांची नको गुलामी, हवा स्वतःचा तोरा,
शिवबांनी जसा पुसला होता, फारसीचा तो घेरा.
नवे शब्द येणे म्हणजे, भाषेची ती श्रीमंती,
पण स्वाभिमान विकूनी नसावी, शब्दांची ही नाती.
‘आगरव’ तोच अभंगाचा, काळजात जागवूया,
माऊलींच्या त्या ‘आरवा’ला, विश्वात गाजवूया.
जुन्या लेण्यांचा डौल अन् तंत्रज्ञानाची जोड,
मराठीच्याच गोडीला, नसावी कशाची तोड!
हा प्रारंभ आहे—आगामी वाटचाल अधिक समृद्ध, व्यापक आणि विचारप्रधान करण्याचा आमचा मानस आहे. नवोदित लेखकांना व्यासपीठ देणे, सामाजिक प्रश्नांवर चिकित्सक लेखन प्रोत्साहित करणे आणि साहित्याच्या विविध प्रवाहांना एकत्र आणणे, हे आमचे ध्येय राहील.
आपल्या प्रतिक्रिया, सूचना आणि सहकार्य आम्हाला अवश्य कळवा. आपले विचारच आमची ऊर्जा आणि प्रेरणा ठरतील.
साहित्याच्या या प्रवासात आपण सर्व सहभागी व्हावे हीच अपेक्षा.
आपला संपादक
– विजय बेलखेडे ‘साहित्यामूलाग्र’